अचानक आजारी पडल्यावर काय करायचं?
तुम्ही अचानक आजारी पडला आहात का? जर असं असेल तर यामुळे होणारा मानसिक आणि भावनिक त्रास तुम्हाला चांगलाच माहीत असेल. शिवाय यामुळे पैसा खर्च होतो तो वेगळाच. मग याचा सामना करायला तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे मदत होईल? जर तुमच्या कुटुंबातला सदस्य किंवा एखादा मित्र आजारी असेल तर तुम्ही त्याला कशी मदत करू शकता? बायबल वैद्यकीय माहिती देणारं पुस्तक नसलं तरी त्यात दिलेल्या व्यावहारिक तत्त्वांमुळे तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करायला मदत होईल.
आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी हे करून पाहा
वैद्यकीय उपचार घ्या
पवित्र शास्त्र म्हणतं: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.”—मत्तय ९:१२.
हे लागू कसं कराल? गरज असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.
हे करून पाहा: उपलब्ध असलेले सर्वात चांगले उपचार घ्या. काही वेळा, दुसऱ्या डॉक्टरांचं मत घेतलेलंही बरं असतं. (नीतिवचनं १४:१५) डॉक्टर तुम्हाला जे काही सांगतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलंय याची खातरी करा आणि तुम्हाला जे काही होतंय त्याबद्दल त्यांना व्यवस्थित कळलंय याचीही खातरी करा. (नीतिवचनं १५:२२) तुमच्या आजाराबद्दल आणि त्यासाठी असलेल्या सर्व उपचारांबद्दल आणखी जाणून घ्या. या माहितीमुळे त्या परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करायला तुम्ही मानसिक रित्या तयार असाल. तसंच, या माहितीमुळे तुम्हाला चांगले निर्णय घ्यायलाही मदत होईल.
स्वतःला चांगल्या सवयी लावा
पवित्र शास्त्र म्हणतं: “कसरत . . . [शरीरासाठी] उपयोगी आहे.”—१ तीमथ्य ४:८, मराठी आर. व्ही.
हे लागू कसं कराल? नियमित कसरत केल्यामुळे आणि यांसारख्या चांगल्या सवयी स्वतःला लावल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
हे करून पाहा: नियमितपणे व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. तुमच्या आरोग्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल करावे लागले, तरी चांगल्या सवयी लावल्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. आणि तज्ज्ञही हेच सांगतात. पण असं करत असताना तुमची तब्येत लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी करा. तसंच, या गोष्टी तुमच्या उपचाराच्या आड येणार नाहीत याचीही खातरी करा.
इतरांची मदत घ्या
पवित्र शास्त्र म्हणतं: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”—नीतिवचनं १७:१७.
हे लागू कसं कराल? तुमच्या मित्रांमुळे तुम्हाला या कठीण काळाचा सामना करायला मदत होईल.
हे करून पाहा: एखाद्या भरवशालायक मित्रासमोर तुमचं मन मोकळं करा. यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्हाला जरा बरं वाटेल. तुमच्या मित्रांना आणि तुमच्या कुटुंबाला कदाचित वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला मदत करायची इच्छा असेल. पण, नेमकं काय करायचं हे त्यांना माहीत नसेल. म्हणून कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत होईल हे त्यांना स्पष्टपणे सांगा. पण तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच याची अपेक्षा करू नका. याउलट, ते तुम्हाला जी काही मदत पुरवतात त्याबद्दल नेहमी त्यांचे आभार माना. तुमच्या मित्रांना तुमच्यासाठी खूप काही करायचं असेल. पण, काही वेळा ते अशा काही गोष्टी करतील ज्यांमुळे तुम्ही थकून जाऊ शकता. म्हणून ते तुम्हाला किती वेळा भेटायला येऊ शकतात आणि कधी भेटायला येऊ शकतात याबद्दल काही सीमा ठरवा.
चांगला विचार करा
पवित्र शास्त्र म्हणतं: “आनंदी मन हे उत्तम औषध आहे, पण दुःखी मनामुळे शरीरात जोम राहत नाही.”—नीतिवचनं १७:२२.
हे लागू कसं कराल? सगळं चागलं होईल असा विचार केल्यामुळे तुम्हाला शांत राहायला मदत होईल. तसंच, तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करायलाही मदत होईल.
हे करून पाहा: नवीन परिस्थितीशी जुळवून घेत असताना, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या करण्याऐवजी तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्यांवर लक्ष द्या. स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका. तसंच, तुमची तब्येत बिघडण्याआधी तुमची जी परिस्थिती होती तिच्यासोबत सध्याच्या परिस्थितीशी तुलना करू नका. (गलतीकर ६:४) योग्य आणि गाठता येतील अशी ध्येयं ठेवा. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला सकारात्मक विचार करायला मदत होईल. (नीतिवचनं २४:१०) तुमच्याकडून होईल तितकी इतरांना मदत करा. कारण, इतरांना मदत केल्यामुळे आपल्याला आनंद होतो आणि त्यामुळे आपल्याला नकारात्मक विचारांवर मात करता येते.—प्रे. कार्यं २०:३५.
देव तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करायला मदत करेल का?
बायबलमधून समजतं की यहोवा देव a एखाद्याला आरोग्याच्या समस्यांचा सामना करायला मदत करू शकतो. आपण चमत्काराने बरं व्हायची अपेक्षा करू शकत नाही. तरी, जे देवाची उपासना करतात त्यांना तो खाली दिलेल्या मार्गांनी मदत करतो:
शांती. यहोवा “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” देतो. (फिलिप्पैकर ४:६, ७) अशा प्रकारची शांती मिळाल्यामुळे आपण चिंतेच्या ओझ्याखाली दबून जाणार नाही. जे लोक देवाला प्रार्थना करतात आणि आपल्या चिंता त्याला सांगतात त्यांना तो ही शांती देतो.—१ पेत्र ५:७.
बुद्धी. यहोवा योग्य निर्णय घ्यायला बुद्धी देतो. (याकोब १:५) बायबलमध्ये मौल्यवान तत्त्वं दिली आहेत आणि ती आजच्या काळातरी उपयोगी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती बायबलची तत्त्वं शिकून घेते आणि लागू करते तेव्हा ती बुद्धी मिळवते.
भविष्यासाठी एक आशा. यहोवाने वचन दिलंय की भविष्यात “मी आजारी आहे,” असं कोणीही म्हणणार नाही. (यशया ३३:२४) या आशेमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करणाऱ्या बऱ्याच लोकांना योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत झाली आहे.—यिर्मया २९:११, १२.
a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं सांगितलं आहे.—स्तोत्र ८३:१८.