योहान याचं पहिलं पत्र १:१-१०
१ जे सुरुवातीपासून होतं, ज्याबद्दल आम्ही ऐकलं, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, ज्याचं आम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाबद्दल+ आम्ही तुम्हाला लिहीत आहोत.
२ (हो, ते जीवन प्रकट झालं आणि आम्ही ते पाहिलं; जे पित्याजवळ होतं आणि आमच्यासमोर प्रकट झालं, त्या सर्वकाळाच्या जीवनाबद्दल+ आम्ही साक्ष देत आहोत+ आणि तुम्हाला सांगत आहोत.)
३ जे आम्ही पाहिलं आणि ऐकलं ते तुम्हालाही सांगत आहोत.+ हे यासाठी, की तुम्हीही आमच्यासोबत ऐक्यात असावं.* आणि आपण सगळे पित्यासोबत आणि त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्यासोबत ऐक्यात आहोत.+
४ आपल्या सर्वांचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही या गोष्टी लिहीत आहोत.
५ जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत तो असा, की देव प्रकाश आहे,+ आणि त्याच्यामध्ये अंधार मुळीच नाही.
६ “आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत,” असं जर आपण म्हटलं आणि तरीसुद्धा अंधारात चालत राहिलो, तर आपण खोटं बोलत आहोत आणि सत्याप्रमाणे चालत नाही.+
७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+
८ “आपल्यामध्ये पाप नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत+ आणि आपल्यामध्ये सत्य नाही.
९ पण जर आपण आपली पापं कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनीतीपासून शुद्ध करेल,+ कारण तो विश्वासू आणि नीतिमान आहे.
१० “आपण पापी नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण त्याला खोटं ठरवत आहोत आणि त्याचं वचन आपल्यामध्ये नाही.
तळटीपा
^ किंवा “सहभागी असावं.”