पेत्र याचं पहिलं पत्र २:१-२५

  • देवाच्या वचनासाठी तीव्र इच्छा उत्पन्‍न करा (१-३)

  • जिवंत दगडांपासून मंदिराचं बांधकाम (४-१०)

  • जगात विदेशी म्हणून राहणं (११, १२)

  • योग्य अधीनता (१३-२५)

    • ख्रिस्त, आपल्यासाठी आदर्श (२१)

 त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा,+ कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करायचं सोडून द्या. २  नवीन जन्मलेल्या मुलांसारखी,+ देवाच्या वचनाच्या शुद्ध* दुधासाठी तीव्र इच्छा उत्पन्‍न करा, म्हणजे तुमची वाढ होत राहील आणि तुमचं तारण होईल.*+ ३  कारण, प्रभू किती प्रेमळ आहे हे तुम्ही स्वतः अनुभवलं* आहे. ४  माणसांनी जिवंत दगडाला नाकारलं,+ पण तो देवाचा निवडलेला आणि त्याच्या नजरेत मौल्यवान आहे.+ जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, ५  तेव्हा तुम्हीसुद्धा पवित्र शक्‍तीद्वारे बांधल्या जाणाऱ्‍या मंदिराकरता जिवंत दगडांसारखे रचले जाता.+ हे यासाठी, की तुम्ही पवित्र याजकवर्ग बनावं आणि येशू ख्रिस्ताद्वारे बलिदानं अर्पण करावीत. अशी बलिदानं जी पवित्र शक्‍तीप्रमाणे आहेत+ आणि देवाला मान्य आहेत.+ ६  कारण शास्त्रात म्हटलं आहे: “पाहा! मी सीयोनमध्ये एक निवडलेला दगड, इमारतीच्या पायात एक मौल्यवान, कोपऱ्‍याचा दगड बसवत आहे; आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍याची कधीच निराशा* होणार नाही.”+ ७  म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्‍वास ठेवता. पण, जे विश्‍वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणतं, की “बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला+ तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनला आहे,”+ ८  आणि त्यांच्यासाठी तो “ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक” बनला आहे.+ ते वचनाचं पालन करत नाहीत म्हणून अडखळतात. त्यांचा हा अंत ठरलेला आहे. ९  तुम्ही मात्र, एक निवडलेला वंश, राजे असलेले याजक, एक पवित्र राष्ट्र+ आणि देवाची खास प्रजा आहात.+ हे यासाठी, की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्‌भुत प्रकाशात आणलं,+ त्याच्या महान गुणांची* तुम्ही संपूर्ण जगात घोषणा करावी.+ १०  कारण एके काळी तुम्ही देवाचे लोक नव्हता, पण आता तुम्ही त्याचे लोक आहात;+ एके काळी तुमच्यावर दया दाखवण्यात आली नव्हती, पण आता मात्र दाखवण्यात आली आहे.+ ११  प्रिय बांधवांनो, तुम्ही विदेशी आणि तात्पुरते रहिवासी+ असल्यामुळे मी विनंती करतो, की तुमच्याशी लढत राहणाऱ्‍या+ शारीरिक वासनांपासून दूर राहा.+ १२  जगातल्या लोकांमध्ये आपलं वागणं चांगलं ठेवा.+ हे यासाठी, की ते तुम्हाला वाईट म्हणून तुमच्यावर दोष लावत असले, तरी तुमची चांगली कामं स्वतः पाहिल्यामुळे,+ देव परीक्षण करायला येईल त्या दिवशी ते देवाचा गौरव करतील. १३  माणसांनी स्थापन केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहा;+ राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा;+ १४  तसंच, राजाने नेमलेल्या राज्यपालांच्या अधीन राहा. कारण वाईट कामं करणाऱ्‍यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामं करणाऱ्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना नेमलं जातं.+ १५  खुद्द देवाची अशी इच्छा आहे, की तुम्ही चांगली कामं करून, अविचारीपणे बोलणाऱ्‍या मूर्ख माणसांची तोंडं बंद करावीत.*+ १६  स्वतंत्र लोकांसारखे जीवन जगा.+ पण, वाईट कामांवर पांघरूण घालण्यासाठी* आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका,+ तर देवाचे दास व्हा.+ १७  सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा,+ संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा,+ देवाची भीती बाळगा+ आणि राजाचा आदर करा.+ १८  सेवकांनी योग्य भीती बाळगून आपल्या मालकांच्या अधीन राहावं.+ जे चांगले आणि समजूतदार आहेत फक्‍त त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणं कठीण असतं अशांच्याही त्यांनी अधीन राहावं. १९  कारण देवासमोर शुद्ध विवेक बाळगण्यासाठी जर कोणी त्रास* आणि अन्याय सहन करत असेल, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+ २०  कारण पाप केल्याबद्दल जर तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्ही ती निमूटपणे सहन केली, तर त्यात कोणता मोठेपणा?+ पण, जर चांगलं केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसलं, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+ २१  खरंतर, याच मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात आलं होतं, कारण ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं+ आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.+ २२  त्याने कोणतंही पाप केलं नाही+ आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत.+ २३  त्याचा अपमान* केला जात होता,+ तेव्हा त्याने उलटून अपमान* केला नाही.+ दुःख भोगत असताना,+ त्याने धमकावलं नाही. उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिलं.+ २४  त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+ २५  कारण तुम्ही भरकटलेल्या मेंढरांसारखे होता,+ पण आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे+ आणि तुमच्या जिवाची* देखरेख करणाऱ्‍याकडे परत आला आहात.

तळटीपा

किंवा “भेसळ नसलेल्या.”
किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”
शब्दशः “चाखून पाहिलं.”
शब्दशः “लज्जित.”
शब्दशः “सद्‌गुणांची,” म्हणजे, त्याचे प्रशंसनीय गुण आणि कार्यं.
शब्दशः “माणसांच्या मुसक्या बांधाव्यात.”
किंवा “वाईट कामांसाठी सबब म्हणून.”
शब्दशः “बंधुत्वावर.”
किंवा “दुःख; यातना.”
किंवा “निंदा.”
किंवा “निंदा.”
किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जीवनाची.”