नीतिवचनं १८:१-२४
१८ जो नेहमी एकटा-एकटा राहतो, तो आपल्या स्वार्थी इच्छांच्या मागे लागतो;तो सर्व प्रकारची व्यावहारिक बुद्धी नाकारतो.*
२ मूर्खाला समजशक्ती नकोशी वाटते;तो मनात जे काही आहे ते व्यक्त करायला उतावीळ असतो.+
३ दुष्ट माणसासोबत तिरस्कारही आलाच,आणि निर्लज्जपणे वागल्याने बदनामी ठरलेली असते.+
४ माणसाच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे असतात.+
बुद्धीचा झरा खळखळत्या नदीसारखा असतो.
५ दुष्टाचा पक्ष घेणं;किंवा नीतिमानाला न्याय नाकारणं चांगलं नाही.+
६ मूर्खाच्या शब्दांमुळे भांडण पेटतं,+त्याचं तोंड फटक्यांना आमंत्रण देतं.+
७ मूर्खाच्या तोंडामुळे त्याचा नाश होतो,+त्याचे ओठ त्याच्या जिवासाठी पाश ठरतात.
८ बदनामी करणाऱ्याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,+ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+
९ जो कामात आळस करतो,तो नासधूस करणाऱ्याचा भाऊ असतो.+
१० यहोवाचं नाव एक भक्कम बुरूज आहे.+
नीतिमान त्यात धावत जाऊन सुरक्षित राहतो.*+
११ श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहर असते;त्याच्या कल्पनेत ती संरक्षण देणाऱ्या भिंतीसारखी असते.+
१२ मन गर्विष्ठ झालं, की माणूस खाली आपटतो,+पण जो नम्र असतो त्याचा गौरव होतो.+
१३ जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो,त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.+
१४ माणसाचं मनोबल त्याला आजारपण सोसायला मदत करतं,+पण, खचलेल्या मनाचा* भार कोण वाहू शकतं?+
१५ समजूतदार माणसाचं हृदय ज्ञान मिळवतं,+आणि बुद्धिमानाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.
१६ माणसाने दिलेल्या भेटवस्तूमुळे त्याचा मार्ग मोकळा होतो+आणि त्याला मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं.
१७ जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं,+पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.*+
१८ चिठ्ठ्या टाकल्याने भांडणं मिटतात+आणि कट्टर विरोध्यांमध्ये निर्णय होतो.*
१९ दुखावलेल्या भावाची समजूत घालणं, तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं,+आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.+
२० माणसाच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांनी* त्याचं पोट भरेल;+त्याच्या ओठांच्या उत्पन्नाने तो तृप्त होईल.
२१ जिभेत मरण आणि जीवन देण्याची ताकद आहे;+माणूस तिचा जसा वापर करायचं निवडतो, तसंच फळ त्याला भोगावं लागेल.*+
२२ ज्याला चांगली बायको मिळते, त्याला मौल्यवान खजिना सापडतो;+त्याच्यावर यहोवाची कृपा असते.+
२३ गरीब माणूस गयावया करून बोलतो,पण श्रीमंत माणूस कठोरपणे उत्तर देतो.
२४ काही सोबती एकमेकांचा नाश करायला तयार असतात,+पण असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.+
तळटीपा
^ किंवा “तुच्छ लेखतो.”
^ किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्या गोष्टी.”
^ शब्दशः “उंचावला जातो,” म्हणजे तो हाती लागणार नाही अशा ठिकाणी, सुरक्षित असतो.
^ किंवा “घोर निराशेचा.”
^ किंवा “झडती घेतो.”
^ शब्दशः “वेगळं करतो.”
^ शब्दशः “तोंडाने.”
^ शब्दशः “तिच्यावर प्रेम करणारा तिचं फळ खाईल.”