अनुवाद ३:१-२९
३ मग आपण वळून बाशानच्या मार्गाने वर गेलो. तेव्हा बाशानचा राजा ओग त्याच्या सगळ्या लोकांना घेऊन एद्रई इथे आपल्याशी लढायला आला.+
२ मग यहोवा मला म्हणाला: ‘त्याला घाबरू नकोस, कारण मी त्याला आणि त्याच्या लोकांना तुझ्या हातात देईन, तसंच त्याचा देशही तुझ्या हातात देईन. आणि जसं तू हेशबोनमधला अमोरी राजा सीहोन याच्यासोबत केलंस, तसंच तू त्याच्यासोबतही करशील.’
३ तेव्हा आपला देव यहोवा याने बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व लोक यांनाही आपल्या हातात दिलं. आपण त्यांच्यावर हल्ला करत राहिलो आणि त्यांच्यातला एकही वाचला नाही.
४ मग आपण त्याची सगळी शहरं काबीज केली. असं एकही नगर नव्हतं, जे आपण त्यांच्याकडून घेतलं नाही. आपण एकूण ६० शहरं, अर्गोबचा सगळा प्रदेश, म्हणजेच बाशानच्या ओगचं सबंध राज्य जिंकलं.+
५ या सर्व शहरांभोवती उंच भिंती होत्या, तसंच फाटकं आणि त्या फाटकांना आडवे खांब होते. याशिवाय, आपण बरीच छोटी नगरंही जिंकली.
६ जसा हेशबोनच्या सीहोन राजाचा आपण नाश केला होता, तसाच या शहरांचाही केला.+ आपण त्यांच्या प्रत्येक शहराचा, तसंच त्यातल्या सर्व स्त्रीपुरुषांचा आणि मुलांचाही नाश केला.+
७ आणि आपण त्या शहरांतली सगळी गुरंढोरं आणि मालमत्ता लुटून नेली.
८ तेव्हा आपण यार्देनच्या प्रदेशातल्या दोन अमोरी राजांचा,+ आर्णोनच्या खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेला प्रदेश काबीज केला.+
९ (या पर्वताला सिदोनी लोक सिर्योन, तर अमोरी लोक सनीर म्हणायचे),
१० तसंच, आपण पठारावरची सगळी शहरं, गिलादचा संपूर्ण प्रदेश, आणि सलका आणि एद्रईपर्यंत+ बाशानचा सगळा प्रदेश, म्हणजेच बाशानमधल्या ओगच्या राज्यातली सगळी शहरं काबीज केली.
११ बाशानचा राजा ओग, हा रेफाई लोकांपैकी शेवटचा होता. त्याचा मृतदेह ज्या पलंगावर* ठेवण्यात आला तो लोखंडाचा* होता आणि तो पलंग अजूनही अम्मोनी लोकांच्या रब्बा शहरात आहे. त्या पलंगाची लांबी आणि रुंदी हाताच्या* ठरलेल्या मापाप्रमाणे, नऊ हात आणि चार हात इतकी होती.
१२ त्या वेळी आपण आर्णोनच्या खोऱ्याजवळ असलेल्या अरोएरपासून+ गिलादच्या डोंगराळ प्रदेशाच्या अर्ध्या भागाचा ताबा घेतला. मी तिथली शहरं रऊबेनच्या आणि गादच्या वंशजांना दिली आहेत.+
१३ गिलादचा उरलेला भाग आणि ओग राजाच्या राज्यातल्या बाशानचा सगळा प्रदेश मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिला आहे.+ बाशानमध्ये असलेल्या अर्गोबच्या सगळ्या प्रदेशाला रेफाई लोकांचा देश म्हटलं जायचं.
१४ मन्नशेचा मुलगा याईर+ याने गशूर आणि माकाथी+ लोकांच्या सीमेपर्यंत अर्गोबचा सगळा प्रदेश काबीज केला.+ त्याने बाशानच्या त्या गावांना आपल्या नावावरून, हव्वोथ-याईर*+ असं नाव दिलं. तेच आजपर्यंत त्या गावांचं नाव आहे.
१५ मी गिलादचा प्रदेश माखीरला दिला आहे.+
१६ आणि रऊबेन व गाद यांच्या वंशजांना+ मी गिलादपासून आर्णोन खोऱ्यापर्यंतचा प्रदेश दिला आहे. (या खोऱ्याच्या मधोमध त्यांची सीमा आहे.) तसंच यब्बोक खोऱ्यापर्यंतचा प्रदेशही मी त्यांना दिला आहे. हे खोरं अम्मोनी लोकांची सीमा आहे.
१७ यासोबतच मी त्यांना अराबा आणि यार्देन, तसंच किन्नेरेथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतचा, म्हणजेच क्षार समुद्रापर्यंतचा* किनाऱ्याचा भाग दिला आहे. अराबाचा समुद्र हा पूर्वेकडे पिसगाच्या उतारांच्या पायथ्याजवळ आहे.+
१८ मग मी तुम्हाला ही आज्ञा दिली: ‘या देशाचा तुम्ही ताबा घ्यावा म्हणून तुमचा देव यहोवा याने तो तुम्हाला दिला आहे. तुमच्यातल्या सर्व शूर पुरुषांनी आपापली शस्त्रं घेऊन तुमच्या भावांच्या, म्हणजे इस्राएली लोकांच्या पुढे चालावं आणि पलीकडे जावं.+
१९ फक्त तुमची बायकामुलं आणि गुरंढोरं (तुमच्याकडे पुष्कळ गुरंढोरं आहेत हे मला माहीत आहे), मी जी शहरं तुम्हाला दिली आहेत तिथेच राहतील.
२० आणि शेवटी जेव्हा यहोवा तुमच्यासारखीच तुमच्या भावांनाही विश्रांती देईल आणि यार्देनच्या पलीकडे तुमचा देव यहोवा जो देश देणार आहे त्याचा ते ताबा घेतील; तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण मी तुम्हाला वारसा म्हणून दिलेल्या आपापल्या जमिनीकडे परत येईल.’+
२१ त्या वेळी मी यहोशवाला अशी आज्ञा दिली होती:+ ‘या दोन राजांसोबत तुमचा देव यहोवा याने काय केलं, हे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आता तुम्ही पलीकडे ज्या राज्यांत जाल त्या सर्वांसोबतही यहोवा असंच करेल.+
२२ तुम्ही त्यांना घाबरू नका, कारण तुमच्यासाठी लढणारा तुमचा देव यहोवा आहे.’+
२३ तेव्हा मी यहोवाला अशी विनंती केली,
२४ ‘हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू तुझ्या या सेवकाला तुझा महिमा आणि तुझी ताकद दाखवायला सुरुवात केली आहेस.+ आकाशात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखी महान कार्यं करणारा दुसरा कोण देव आहे?+
२५ मला यार्देन ओलांडून पलीकडचा तो चांगला देश पाहायचा आहे. कृपा करून तो सुंदर डोंगरांचा प्रदेश आणि लबानोन मला पाहू दे.’+
२६ पण तुमच्यामुळे यहोवा माझ्यावर अजूनही रागावला होता+ आणि त्याने माझं काहीही ऐकून घेतलं नाही. उलट यहोवा मला म्हणाला, ‘बस झालं! या विषयावर माझ्याशी पुन्हा कधी बोलू नकोस.
२७ पिसगाच्या शिखरावर जा+ आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, तसंच उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपली नजर फिरव आणि तो देश बघ, कारण ही यार्देन नदी ओलांडून तू पलीकडे जाणार नाहीस.+
२८ यहोशवाला इस्राएली लोकांवर नियुक्त कर+ आणि त्याला प्रोत्साहन देऊन त्याची हिंमत वाढव; कारण तोच लोकांपुढे नदी ओलांडून जाईल+ आणि जो देश तू पाहशील त्या देशाचा वारसा त्यांना मिळवून देईल.’
२९ हे सर्व आपण बेथ-पौरच्या+ समोर असलेल्या खोऱ्यात राहत असताना घडलं.
तळटीपा
^ किंवा “दगडी शवपेटीत.”
^ किंवा कदाचित, “काळ्या पाषाणाचा.”
^ म्हणजे, “याईरची छावण्या असलेली नगरं.”
^ म्हणजे, मृत समुद्र.