मला “दारूचं पिंप” म्हणायचे.—लूका शूट्स
बायबलने बदललं जीवन
मला “दारूचं पिंप” म्हणायचे.—लूका शूट्स
जन्म: १९७५
देश: स्लोव्हेनिया
पार्श्वभूमी: अट्टल दारुडा
माझं आधीचं जीवन: स्लोव्हेनियाची राजधानी, ल्युब्लियाना इथे माझा जन्म झाला. मी चार वर्षांचा झालो तेव्हापर्यंत माझं बालपण चांगलं गेलं. पण मग माझ्या बाबांनी आत्महत्या केली. आमच्यावर आभाळच कोसळलं. या घटनेनंतर माझ्या आईला आम्हा दोघांना, म्हणजे माझ्या मोठ्या भावाला आणि मला वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.
मी १५ वर्षांचा झालो तेव्हा मी माझ्या आजीच्या घरी राहू लागलो. मला तिच्याकडे राहायला आवडायचं कारण माझे बरेच मित्र तिथेच आसपास राहायचे. आणि घरच्यापेक्षा मला तिथे जास्त स्वातंत्र्य होतं. १६ वर्षांचा झाल्यावर मला वाईट संगत लागली. माझे मित्र शनिवारी-रविवारी दारू प्यायचे. त्यांच्यासोबत राहून मी मोठे केस ठेवू लागलो, टवाळखोर मुलांसारखे कपडे घालू लागलो आणि सिगरेटही पिऊ लागलो.
मी बरेच वेगवेगळे ड्रग्स घेऊन पाहिले. पण त्यापेक्षा मला ड्रिंक्स घ्यायला सगळ्यात जास्त आवडायचं. सुरुवातीला मी फक्त २-३ ग्लास वाईन प्यायचो. पण पाहता-पाहता मी एकाच वेळी एका बाटलीपेक्षा जास्त पिऊ लागलो. मी कितीही प्यायलो तरी मला चढली आहे हे दुसऱ्या कोणाला कळायचं नाही. ते लपवण्यात मी अगदी माहीर झालो होतो. सहसा माझ्या तोंडाच्या वासावरून लोकांना फक्त इतकंच कळायचं की मी घेतलीय. पण, मी एकाच वेळी कितीतरी लिटर वाईन, बियर आणि वोडका प्यायलोय हे कोणालाही कळायचं नाही!
बऱ्याचदा रात्रभर प्यायल्यावर जेव्हा आम्ही पबमधून बाहेर पडायचो तेव्हा माझ्या झिंगलेल्या मित्रांना मीच सावरायचो. खरंतर, त्यांच्यापेक्षा दुप्पट दारू मी प्यायलेली असायची तरीसुद्धा. एकदा मी माझ्या एका मित्राला माझ्याबद्दल असं म्हणताना ऐकलं, की ‘हा तर दारूचं पिंप आहे.’ स्लोव्हेनियन भाषेत खूप जास्त पिणाऱ्यांसाठी सहसा हे अपशब्द वापरले जातात. त्याचं ते बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं.
तेव्हापासून मी विचार करायला लागलो की मी जीवनात नेमकं काय करतोय. मी काहीच कामाचा नाही आणि माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटू लागलं.
बायबलने जीवन कसं बदललं? त्याच दरम्यान मी पाहिलं की माझा एक वर्गसोबती खूप बदललाय; आधीपेक्षा त्याचा स्वभाव खूप सुधारलाय. हा बदल कसा काय झाला हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. म्हणून मी त्याला कॉफी प्यायला घेऊन गेलो. तिथे बोलता बोलता त्याने मला सांगितलं, की त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केलाय. त्याला शिकायला मिळालेल्या काही गोष्टीही त्याने मला सांगितल्या. पण लहानपणापासून मला देवाधर्माबद्दल कोणीच काही शिकवलं नसल्यामुळे, त्याने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी अगदी नवीन होत्या. म्हणून मग मी त्याच्यासोबत साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागलो आणि त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यासही करू लागलो.
बायबलमधून मला बऱ्याच जबरदस्त आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की, आज आपण ज्या काळात राहत आहोत त्याला बायबलमध्ये ‘शेवटचे दिवस’ म्हटलंय हे मला समजलं. (२ तीमथ्य ३:१-५) तसंच, मला हेही कळलं की लवकरच देव पृथ्वीवरून सगळ्या वाईट लोकांचा नाश करणार आहे आणि चांगल्या लोकांना एका सुंदर परिस्थितीत कायमचं जीवन देणार आहे. (स्तोत्र ३७:२९) त्या चांगल्या लोकांपैकी एक होण्यासाठी मी माझ्या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत, असं मला मनापासून वाटू लागलं.
मी ज्या गोष्टी बायबलमधून शिकत होतो त्यांबद्दल मी माझ्या मित्रांना सांगू लागलो. पण, त्यांच्यापैकी बरेच जण माझी मस्करी करायचे. एका दृष्टीने हे बरंच झालं, कारण यामुळे मला कळलं की माझे खरे मित्र कोण आहेत. मला जाणीव झाली की चुकीच्या मित्रांमुळेच खरंतर मला जास्त पिण्याची सवय लागली होती. हे मित्र आठवडा कधी संपतोय आणि प्यायला कधी मिळतंय, याचीच वाट पाहायचे.
मी त्या मित्रांसोबत संबंध तोडून टाकले आणि त्याऐवजी यहोवाच्या साक्षीदारांसोबत मैत्री केली. त्यांच्याकडून मला खूप प्रोत्साहन मिळालं, कारण त्यांचं देवावर मनापासून प्रेम होतं आणि त्याला आवडेल असं वागायचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. हळूहळू, मी जास्त पिण्याची माझी वाईट सवय पूर्णपणे सोडून दिली.
मला झालेला फायदा: मी यहोवाचा खूप आभारी आहे की आता मला खूश राहण्यासाठी दारूची गरज भासत नाही. मी आधीच्या वाईट सवयी सोडल्या नसत्या तर काय माहीत आज मी कुठे असतो? पण आज मी जास्त सुखी आहे असं मी खात्रीने म्हणू शकतो.
मागच्या सात वर्षांपासून मी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्लोव्हेनियातल्या शाखा कार्यालयात सेवा करतोय. हा माझ्यासाठी खरंच एक मोठा बहुमान आहे. यहोवाला जाणून घेतल्यामुळे आणि त्याची सेवा केल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ मिळालाय.