वाचण्याजोगे पुस्तक
वाचण्याजोगे पुस्तक
मनमोकळेपणाने बोलणाऱ्या एका तरुणीला विद्यापीठाचे एक प्राध्यापक म्हणाले, “बायबलचे वाचन काही तेवढ्या गांभिर्याने घेण्यालायक नाहीय.”
“तुम्ही कधी बायबल वाचलेय?” तिने विचारले.
या प्रश्नामुळे जरा चमकून गेलेल्या प्राध्यापकांना आपण ते वाचलेले नाही हे कबूल करावे लागले.
“जे पुस्तक तुम्ही वाचलेच नाहीय त्याविषयी तुम्ही एवढ्या खात्रीने कसे काय बोलू शकता?”
तिच्या बोलण्यात तथ्य होते. बायबल वाचून मगच त्याविषयी मत बनविण्याचे प्राध्यापकांनी ठरवले.
एकूण ६६ लिखाणांचा समावेश असलेल्या बायबलचे वर्णन, “मानवी इतिहासातील कदाचित सर्वाधिक प्रभाव पाडणारा ग्रंथसंग्रह” या शब्दांत करण्यात आले आहे.१ आणि खरोखरच जगातील सर्वश्रेष्ठ कला, वाङ्मय आणि संगीत यांवर बायबलचा बऱ्याच प्रमाणावर प्रभाव पडला आहे. कायदेशास्त्रावरही त्याचा जबरदस्त पगडा आहे. त्यातील लेखनशैली सतत प्रशंसेस पात्र ठरली आहे आणि अनेक विद्वानांनी या पुस्तकाचा मनापासून आदर केला आहे. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने समाजातील सर्व थरांतील लोकांच्या जीवनांवर पाडलेला विलक्षण प्रभाव. या पुस्तकाने आपल्या असंख्य वाचकांमध्ये एक असामान्य प्रकारची निष्ठा जागृत केली आहे. काहींनी तर स्वतःला मृत्यूच्या दाढेत झोकून द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही, फक्त ते वाचता यावे म्हणून.
पण दुसरीकडे पाहता, बायबलविषयी अनेक शंकाकुशंकाही आहेत. स्वतः कधीही ते वाचून पाहिलेले नसताना काही लोक त्याविषयी ठाम मते बाळगतात. बायबलचे साहित्यिक आणि ऐतिहासिक महत्त्व कदाचित ते कबूल करतीलही, पण त्यांना प्रश्न असा पडतो की, हजारो वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या पुस्तकात या अर्वाचीन जगाला समर्पक असणारी माहिती कशी असू शकेल? आपण “माहितीशास्त्राच्या युगात” जगत आहोत. चालू घटना आणि तंत्रज्ञान यांविषयी क्षणाक्षणाची माहिती आपल्याला चुटकीसरशी उपलब्ध होते. शिवाय, आधुनिक जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या अक्षरशः प्रत्येक आव्हानावर मात करण्याकरता सहायक ठरू शकेल असा “विशेषज्ञांचा” सल्ला आपल्याला सहज उपलब्ध आहे. हे सर्व लक्षात घेता, बायबलमध्ये आजच्या काळात उपयुक्त ठरेल अशी माहिती असणे खरोखर शक्य आहे का?
या माहितीपत्रकात अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याची रचना करण्यात आली आहे, ती तुमच्यावर कोणते धार्मिक दृष्टिकोन किंवा विश्वास लादण्यासाठी नव्हे, तर हे दाखवण्यासाठी की इतिहासात प्रभावी ठरलेले हे पुस्तक, अर्थात बायबल तुम्हीही विचारात घ्यावे असे पुस्तक आहे. १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, काही शिक्षण तज्ज्ञ ठामपणे असे मानतात की पाश्चात्त्य संस्कृतीत बायबल केवढे खोलवर रुजले आहे हे लक्षात घेता, “बायबलच्या शिकवणुकींशी आणि त्यातील वृत्तान्तांशी परिचित नसणारा, मग तो त्यावर विश्वास बाळगणारा असो अथवा नसो, तो सांस्कृतिक दृष्टीने अशिक्षितच समजला जाईल.”२
या प्रकाशनातील माहिती वाचल्यावर, कदाचित तुम्हीही म्हणाल की—माणूस धार्मिक प्रवृत्तीचा असो वा नसो—त्याने बायबल निदान वाचून तरी पाहिलेच पाहिजे.
[३ पानांवरील चौकट/चित्र]
“मला मिळालेल्या आध्यात्मिक ज्ञानाचे श्रेय मी प्रामाणिकपणे एका पुस्तकाला देईन—पुस्तकाला? हो पुस्तकालाच, आणि तेही एका जुन्याकाळच्या साध्यासुध्या पुस्तकाला; जे निसर्गासारखे अकृत्रिम आणि तितकेच स्वाभाविकही आहे . . . त्या पुस्तकाचे नाव, बायबल.”—हाइनरिक हाइन, १९ व्या शतकातील जर्मन लेखक.३