भाग २
मनुष्य नंदनवन गमावून बसतो
एक बंडखोर देवदूत पहिल्या मानवी जोडप्याला अर्थात आदाम आणि हव्वेला देवाच्या आधिपत्याचा विरोध करण्यास प्रवृत्त करतो. आणि अशा प्रकारे पाप आणि मृत्यू अस्तित्वात येतात
मानवांची निर्मिती करण्याच्या बऱ्याच काळाआधी देवाने अनेक अदृश्य आत्मिक प्राण्यांची अर्थात देवदूतांची निर्मिती केली होती. यांपैकी एक देवदूत बंडखोर बनला व पुढे दियाबल सैतान म्हणून ओळखला गेला. देवाने पहिल्या मानवी जोडप्याला, एदेन बागेतल्या एका विशिष्ट झाडाचे फळ खाऊ नका असे बजावून सांगितले होते. पण, दियाबल सैतानाने ते फळ खाण्यास हव्वेला प्रवृत्त करण्याचा धूर्तपणे प्रयत्न केला.
सैतान एका सर्पाचा आड घेऊन हव्वेशी बोलला आणि देव तिच्या व तिच्या पतीपासून त्यांच्या हिताचे काहीतरी लपवून ठेवत आहे असे त्याने सुचवले. देवाने मना केलेले ते फळ खाल्ल्यास ती व तिचा पती मरणार नाहीत असे त्या देवदूताने हव्वेला सांगितले. अशा प्रकारे देव मानवांशी, आपल्या मुलांशी खोटे बोलत असल्याचा आरोप सैतानाने लावला. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने काही नुकसान होणार नाही, उलट त्यांना काहीतरी विशेष प्रकारचे ज्ञान व स्वातंत्र्य प्राप्त होईल असे त्याने भासवण्याचा प्रयत्न केला. पण, हे साफ खोटे होते—जगातले पहिले खोटे. खरा मुद्दा हा सबंध विश्वावर प्रभुत्व करण्याच्या देवाच्या एकमेव अधिकारासंबंधी होता. दुसऱ्या शब्दांत, देवाला विश्वावर आधिपत्य गाजवण्याचा हक्क आहे का? तसेच, आपल्या प्रजेच्या भल्यासाठी तो न्याय्यपणे आपले आधिपत्य गाजवतो का? याविषयी सैतानाने शंका निर्माण केली.
सैतानाने सांगितलेल्या या खोट्या गोष्टीवर हव्वेचा विश्वास बसला. तिला त्या झाडाचे फळ खावेसे वाटू लागले आणि शेवटी तिने ते घेऊन खाल्लेही. नंतर त्यातले काही तिने आपल्या पतीला दिले आणि त्यानेही ते खाल्ले. अशा प्रकारे ते दोघेही पापी बनले. वरवर पाहिल्यास क्षुल्लक वाटणाऱ्या या कृत्यातून त्यांची बंडखोर मनोवृत्ती दिसून आली. देवाने दिलेल्या आज्ञेचे आदाम आणि हव्वेने जाणूनबुजून उल्लंघन केले. आणि अशा प्रकारे, त्यांना परिपूर्ण जीवनासहित सर्वकाही देणाऱ्या निर्माणकर्त्याचे आधिपत्य त्यांनी नाकारले.
स्त्रीची संतती “तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.”—उत्पत्ति ३:१५
त्यांच्या या कृत्यांबद्दल देवाने त्यांना शिक्षा सुनावली. शिवाय, देवाने भाकीत केले की कालांतराने एक संतती किंवा मुक्तिदाता येईल जो सर्पाचा म्हणजेच सैतानाचा नाश करेल. पण, आदाम आणि हव्वेवर त्याने लगेच मृत्यूदंड बजावला नाही. असे करण्याद्वारे त्याने आदाम आणि हव्वेच्या अद्याप न जन्मलेल्या मुलांबद्दल दया दाखवली. आदाम आणि हव्वेच्या मुलांना आता एक आशा मिळाली होती, कारण देव ज्याला पाठवणार होता तो एदेन बागेतील बंडामुळे ओढवलेले दुःखद परिणाम पूर्णपणे नाहीसे करेल असे सांगण्यात आले. भवितव्यात येणाऱ्या या मुक्तिदात्यासंबंधी देवाचा उद्देश नेमका कसा पूर्ण होईल व तो पाठवलेला कोण असेल या गोष्टींचा, बायबलचे लिखाण होत गेले तसतसा क्रमाक्रमाने उलगडा झाला.
देवाने आदाम व हव्वा यांना नंदनवनाच्या बाहेर हाकलून लावले. एदेन बागेतून बाहेर पडल्यानंतर शेती करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागणार होते. त्यानंतर हव्वा गर्भवती झाली आणि तिने काईनाला जन्म दिला. तो त्यांचा पहिला पुत्र होता. त्यांनंतर त्यांना हाबेल, शेथ व आणखी मुलेमुली झाल्या. शेथ हा नोहाचा पूर्वज होता.
—उत्पत्ति ३ ते ५ अध्याय; प्रकटीकरण १२:९ वर आधारित.