परिशिष्ट
आर्थिक व्यवहारांतील वाद सोडवणे
प्रेषित पौलाने १ करिंथकर ६:१-८ मध्ये, सहबांधवांनी एकमेकांवर भरलेल्या खटल्यांची चर्चा केली आहे. करिंथ मंडळीतील काही ख्रिश्चन आपल्या सहबांधवांना, “निकाल लावून घेण्यासाठी . . . अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करीत” होते म्हणून पौलाला खूप वाईट वाटत होते. (वचन १) कोर्टात एकमेकांना नेण्याऐवजी मंडळीच्या मार्गदर्शनानुसार वाद सोडवणे हिताचे का आहे याची अतिशय ठोस कारणे पौलाने दिली. हा ईश्वरप्रेरित सल्ला का देण्यात आला होता त्याची काही कारणे आपण पाहू या व नंतर अशा काही परिस्थितींचा आपण विचार करू या जेथे हा सल्ला लागू होत नाही.
एखाद्या बांधवाबरोबर आर्थिक व्यवहारांमुळे काही वाद निर्माण झाले असतील तर सर्वात आधी आपण, आपल्या नव्हे तर यहोवाच्या मार्गाने तो वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीतिसूत्रे १४:१२) येशूने दाखवून दिले, की एखादे प्रकरण आणखी चिघळण्याआधी ते सोडवणे जास्त महत्त्वाचे आहे. (मत्तय ५:२३-२६) पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही ख्रिस्ती बांधव इतके वितंडवादी बनतात की ते सरळ कोर्टाचीच पायरी चढतात. पौलाने म्हटले: “तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे.” का हानी आहे? याचे एक प्रमुख कारण हे आहे की, या अशा प्रकरणांमुळे मंडळीचे आणि आपण उपासना करत असलेल्या देवाचे नाव खराब होऊ शकते. त्यामुळे आपण पौलाच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करतो: “त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करित नाही?”—वचन ७.
वाद सोडवण्याकरता देवाने मंडळीत एक चांगली व्यवस्था केली आहे, असेही पौलाने सांगितले. मंडळीतील ख्रिस्ती वडिलांना, बायबलमधील सत्याच्या ज्ञानाने सुज्ञ केले आहे त्यामुळे ते ‘भावाभावांमधील’ “व्यावहारिक गोष्टींविषयी” न्यायनिवाडा करू शकतात, असे पौलाने म्हटले. (वचने ३-५) निंदा-नालस्ती व फसवणूक यांसारखे गंभीर स्वरूपाचे वाद सोडवले जाऊ शकतात अशा तीन पावलांचा येशूने उल्लेख केला. सर्वात पहिले पाऊल म्हणजे, ज्या दोघांमध्ये वाद झाला आहे त्यांनी आपापसातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरे पाऊल, जर दोघांनी एकमेकांबरोबर बोलून वाद मिटत नसेल तर एक अथवा दोन साक्षीदारांना मधे घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरे पाऊल म्हणजे, जर साक्षीदारांना घेऊनही वाद सुटत नसेल तर हे प्रकरण मंडळीतल्या वडिलांकडे नेण्यात यावे.—मत्तय १८:१५-१७.
मंडळीतले वडील हे वकील किंवा व्यापारी नसतात. त्यामुळे ते कायदेविषयी किंवा व्यापारविषयक सल्ला देणार नाहीत. बांधवांतील आर्थिक वाद सोडवण्याकरता ते काही अटी घालत नाहीत. तर, ज्यांच्यामध्ये वाद झाला आहे त्या दोन्ही पक्षातील बांधवांना ते बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्यास व शांतीने समेट करण्यास सांगतील. काही क्लिष्ट प्रकरणे सोडवण्याकरता ते कदाचित विभागीय पर्यवेक्षकांशी अथवा यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराशी संपर्क साधतील. परंतु, काही परिस्थितीत पौलाने दिलेला सल्ला लागू होत नाही. कोणत्या परिस्थितीत?
कधीकधी, एखादे प्रकरण निःस्वार्थपणे व शांतीपूर्णरीतीने सोडवण्याकरता एखादा साधा खटला भरावा लागेल किंवा कायद्यानुसार ते आवश्यक असेल. जसे की, घटस्फोट, मुलाचा ताबा, पोटगी, विम्याची भरपाई मिळवणे, दिवाळे निघालेल्या बँकेच्या खातेदारांमध्ये आपल्या नावाचा समावेश होण्याकरता व इच्छा पत्र अधिकृत करणे यासारखी कामे खटला भरूनच करवून घ्यावी लागतात. काही प्रकरणांत एखादा बांधव, त्याच्यावर खटला भरला जाऊ नये म्हणून प्रतिखटला भरेल. *
ईर्ष्येने पेटून हे खटले भरले तर पौलाने ज्या हेतूने हा ईश्वरप्रेरित सल्ला दिला होता तो साध्य होणार नाही. * तरीपण ख्रिश्चनाचा मुख्य हेतू, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि मंडळीची शांती व ऐक्यता टिकवणे हा असला पाहिजे. ख्रिस्ताचे अनुयायी, प्रामुख्याने त्यांच्यातील प्रेमामुळे ओळखले जातात व प्रीती “स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५; योहान १३:३४, ३५.
^ परि. 7 एखादा ख्रिश्चन कदाचित दुसऱ्या ख्रिश्चनाविरुद्ध, बलात्कार, हल्ला, खून किंवा दरोडा यासारखा एखादा गंभीर गुन्हा करेल; पण हे असे फार क्वचित घडेल. याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यास कदाचित कोर्टात केस सुरू होईल किंवा गुन्हेगाराची उलटतपासणी सुरू होईल पण या गुन्ह्याविषयी पोलिसांना न सांगणे हे ख्रिश्चनांना शोभणारे ठरणार नाही.
^ परि. 8 अधिक माहितीकरता कृपया टेहळणी बुरूज मार्च १५, १९९७, पृष्ठे १७-२२ पाहा.