अध्याय १२
कुटुंबाचे नुकसान करणाऱ्या समस्यांवर तुम्ही मात करू शकता
१. काही कुटुंबांमध्ये कोणत्या गुप्त समस्या आहेत?
एका जुन्या कारला नुकतेच धुऊन मेण लावले आहे. ये-जा करणाऱ्यांना ती चकचकीत आणि जवळजवळ नवीनच वाटते. पण पृष्ठभागाखाली गंज चढल्यामुळे तो गाडीच्या साच्याला झिजून टाकत आहे. असेच काही कुटुंबांच्याबाबतीत आहे. जरी बाह्य स्वरूप चांगले दिसत असले, तरी चेहऱ्यावरील हास्य, भय आणि दुःखाला लपवत असते. बंद दरवाज्यामागील, गंजणाऱ्या धातुंनी कुटुंबाच्या शांतीवर गंज चढवला आहे. दारूबाजी आणि हिंसा या प्रभाव पाडू शकणाऱ्या दोन समस्या आहेत.
दारूबाजीमुळे होणारे नुकसान
२. (अ) मद्य पेयांच्या वापराबद्दल बायबलचा दृष्टिकोन काय आहे? (ब) दारूबाजी काय आहे?
२ बायबल, मद्य पेयांचा संयमाने वापर करण्याची मनाई करत नाही पण ते दारूबाजीस मनाई करते. (नीतिसूत्रे २३:२०, २१; १ करिंथकर ६:९, १०; १ तीमथ्य ५:२३; तीत २:२, ३) परंतु, दारूबाजी, मद्यासक्त अवस्थेपेक्षा अधिक आहे; ती मद्यप्राशनाची दीर्घकालीन सवय आणि प्राशन करण्यावर अनियंत्रण आहे. मद्यपी प्रौढ असू शकतात. तसेच तरुण देखील असू शकतात हे दुःखाचे आहे.
३, ४. मद्यपी व्यक्तीच्या वैवाहिक सोबत्यावर आणि मुलांवर दारूबाजीच्या होणाऱ्या परिणामांविषयी स्पष्टीकरण द्या.
३ बायबलने बऱ्याच काळाआधी मद्याच्या अनुचित वापरामुळे कुटुंबाची शांती भंग होऊ शकते हे सूचित केले होते. (अनुवाद २१:१८-२१) गंज चढवणारे दारूबाजीचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला जाणवतात. मद्यप्राशन करणाऱ्याचे पिणे थांबवण्यात किंवा त्याच्या अनिश्चित वागणुकीला तोंड देण्याच्या आटोकाट प्रयत्नात पत्नी पूर्णपणे गढून जाऊ शकते. * ती मद्य लपवून ठेवण्याचा, फेकून देण्याचा, त्याचे पैसे लपवण्याचा आणि त्याच्यामध्ये कुटुंबाबद्दल, जीवनाबद्दल इतकेच नव्हे तर देवाबद्दल प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करते—पण तरीही मद्यपी पीत असतो. त्याच्या पिण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांना वारंवार अपयश येते तेव्हा तिला निष्फळता आणि अपुरेपणा जाणवू लागतो. कदाचित, तिला भय, राग, दोषीपणा, दुर्बलता, चिंता आणि स्वाभिमानाची उणीव यांचा त्रास वाटू लागेल.
४ पालकाच्या दारूबाजीच्या परिणामांपासून मुले वाचत नाहीत. काहींवर शारीरिकरित्या हल्ला होतो. इतरांचा लैंगिकरित्या अत्याचार केला जातो. पालकांच्या दारूबाजीमुळे कदाचित ते स्वतःलाच दोष देतील. इतरांवर भाव ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेचा मद्यपी व्यक्तीच्या विसंगत वर्तनामुळे चक्काचूर होतो. मुले घरात काय होत आहे याबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नसल्यामुळे स्वतःच्या भावनांना ते अनेकदा दाबून टाकण्याचे शिकतात ज्यामुळे हानीकारक शारीरिक परिणाम होतात. (नीतिसूत्रे १७:२२) अशा मुलांठायी आत्मविश्वासाची किंवा स्वाभिमानाची ही उणीव प्रौढ झाल्यावर देखील असेल.
कुटुंब काय करू शकते?
५. दारूबाजीवर नियंत्रण कशाप्रकारे ठेवले जाऊ शकते व ते कठीण का आहे?
५ तथापि, दारूबाजीवर उपाय करता येऊ शकत नाही असे अनेक स्रोत सांगत असले, तरी पूर्ण अलिप्ततेच्या कार्यक्रमाने काही प्रमाणात सुधारणा होणे शक्य आहे, याला अनेक जण आपली संमती देतात. (पडताळा मत्तय ५:२९.) मद्यपी व्यक्ती समस्या असल्याचे सामान्यपणे नाकारत असल्यामुळे त्या व्यक्तीने मदतीचा स्वीकार केला पाहिजे असे बोलणे, करण्यापेक्षा सोपे आहे. तरीसुद्धा, दारूबाजीमुळे कौटुंबिक सदस्यांवर जो परिणाम झाला आहे त्याला तोंड देण्यासाठी ते पावले उचलतात तेव्हा मद्यपी व्यक्तीला ही त्याची समस्या असल्याची जाणीव होऊ लागेल. मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा अनुभव असणाऱ्या एका डॉक्टरांनी म्हटले: “मला वाटते की, अधिक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे कुटुंबाने अधिक लाभदायक रीतीने दररोजचे कार्य करणे होय. मद्यपी व्यक्तीला, स्वतःमध्ये आणि कुटुंबातील इतरांमध्ये असलेली मोठी तफावत याला अधिकाधिक तोंड द्यावे लागते.”
६. मद्यपी सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी सल्ल्याचा उत्तम स्रोत कोणता आहे?
६ तुमच्या कुटुंबात एखादा मद्यपी असल्यास, बायबलचा प्रेरित सल्ला, शक्यतो हितकर रीतीने जीवन जगण्याची मदत तुम्हाला करू शकतो. (यशया ४८:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) दारूबाजीला यशस्वीपणे तोंड देण्यास कुटुंबांना मदत केलेल्या काही तत्त्वांचा विचार करा.
७. कुटुंबातील एखादा सदस्य मद्यपी असल्यास त्यास कोण जबाबदार आहे?
७ सर्व दोष स्वतःवर ओढून घेऊ नका. बायबल म्हणते: “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे” आणि “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.” (गलतीकर ६:५; रोमकर १४:१२) मद्यपी व्यक्ती, इतर कौटुंबिक सदस्य जबाबदार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न कदाचित करील. उदाहरणार्थ, तो कदाचित म्हणेल: “तुम्ही मला चांगले वागवले असते तर मी पित राहिलो नसतो.” इतरांनी त्याच्याशी सहमती दाखवली असल्याची दिसत असल्यास, ते त्याला पिण्यासाठी उत्तेजन देत असतात. परंतु, आपण परिस्थितींमुळे किंवा इतर लोकांमुळे बळी पडत असलो, तरीसुद्धा आपण जे काही करतो त्यासाठी आपण सर्वजण—मद्यपी व्यक्तींदेखील—जबाबदार असतात.—पडताळा फिलिप्पैकर २:१२.
८. मद्यपी व्यक्तीला तिच्या समस्येच्या परिणामांना तोंड देण्याची मदत करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
८ मद्यपी व्यक्तीचे पिण्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून नेहमीच संरक्षण केले पाहिजे, असे तुम्हाला वाटू देऊ नका. कोणी क्रोधाविष्ट व्यक्तीकरता असणारे बायबलचे नीतिसूत्र मद्यप्याला देखील लागू होऊ शकते: “त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुनः करावे लागेल.” (नीतिसूत्रे १९:१९) मद्यप्याला त्याच्या पिण्याचे परिणाम जाणवू द्या. त्याने केलेली घाण त्यालाच स्वच्छ करू द्या किंवा पिण्याच्या घटनेनंतर स्वतःच मालकाला सकाळी फोन करून त्याला सांगू द्या.
९, १०. मद्यपींच्या कुटुंबांनी मदत का स्वीकारली पाहिजे आणि विशेषपणे त्यांनी कोणाची मदत मिळवली पाहिजे?
९ इतरांकडून मदत स्वीकारा. नीतिसूत्रे १७:१७ म्हणते: “[खरा] मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” तुमच्या कुटुंबात एखादा मद्यपी असतो तेव्हा ते दुःखाचे असते. तुम्हाला मदतीची गरज असते. साह्याकरता ‘खऱ्या मित्रांवर’ विसंबून राहण्यास हयगय करू नका. (नीतिसूत्रे १८:२४) समस्या समजू शकणाऱ्या अथवा अशाच परिस्थितीला तोंड दिलेल्या इतरांशी बोलल्यामुळे काय करावे आणि काय करू नये याबद्दल ते तुम्हाला व्यावहारिक सल्ले पुरवतील. परंतु समतोल राखा. ज्यांवर तुम्ही भरवसा ठेवता, जे तुमची “गोष्ट गुप्त” ठेवतील अशांसोबत बोला.—नीतिसूत्रे ११:१३.
१० ख्रिस्ती वडिलांवर भरवसा ठेवण्याचे शिका. ख्रिस्ती मंडळीतील वडील मदतीचा एक मोठा स्रोत असू शकतात. ही प्रौढ मनुष्ये देवाच्या वचनात प्रशिक्षित झालेली आणि त्याच्या तत्त्वांचा अवलंब करण्यात अनुभवी आहेत. ते “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा रूक्ष भूमीत पाण्याचे नाले, . . . तप्त भूमीत विशाल खडकाची छाया” याप्रमाणे शाबीत ठरू शकतात. (यशया ३२:२) ख्रिस्ती वडील, संपूर्ण मंडळीचे अपायकारक प्रभावांपासून केवळ रक्षणच करीत नाहीत तर समस्या असलेल्या वैयक्तिकांना सांत्वन व तजेला देतात आणि त्यांच्याबद्दल व्यक्तिगत आवड दाखवतात. त्यांच्या मदतीचा पूर्ण लाभ घ्या.
११, १२. मद्यपींच्या कुटुंबांना अधिक मदत कोण पुरवते आणि तो पाठिंबा कसा दिला जातो?
११ सर्वात अधिक म्हणजे यहोवापासून शक्ती मिळवा. बायबल आपल्याला जोरदार हमी देते: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) मद्यपी कौटुंबिक सदस्याबरोबर तुम्हाला राहावे लागण्याच्या दबावामुळे तुम्ही भग्नहृदयी किंवा अनुतप्त असल्यास ‘यहोवा सन्निध असतो’ याची आठवण ठेवा. तुमची कौटुंबिक परिस्थिती किती कठीण आहे हे तो समजतो.—१ पेत्र ५:६, ७.
१२ यहोवा त्याच्या वचनात काय सांगतो यावर विश्वास ठेवल्याने तुम्हाला चिंतेचा सामना करण्यास मदत होऊ शकते. (स्तोत्र १३०:३, ४; मत्तय ६:२५-३४; १ योहान ३:१९, २०) देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहिल्याने आणि त्याच्या तत्त्वानुसार जगत राहिल्याने तुम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळते, यामुळे तुम्हाला “सामर्थ्याची पराकोटी” मिळते ज्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस तोंड देण्यास सज्ज होऊ शकता.—२ करिंथकर ४:७. *
१३. अनेक कुटुंबांचे नुकसान करणारी दुसरी समस्या कोणती आहे?
१३ मद्यपानाचा दुरूपयोग, कुटुंबांचे नुकसान करणारी घरातील हिंसा या दुसऱ्या समस्येकडे निरवू शकतो.
घरातील हिंसेमुळे होणारे नुकसान
१४. घरातील हिंसेला कधी सुरवात झाली आणि आज कशी परिस्थिती आहे?
१४ काईन आणि हाबेल या दोन बांधवांचा समावेश असणारा घरातील हिंसेचा प्रसंग, मानवी इतिहासातील पहिले हिंसामय कृत्य होते. (उत्पत्ति ४:८) तेव्हापासून मानवजातीला सर्व प्रकारच्या घरातील हिंसांनी पीडिले आहे. पत्नीला मारहाण करणारे पती, पतीवर हल्ला करणाऱ्या पत्नी, क्रुरपणे आपल्या मुलांना मारहाण करणारे पालक व आपल्या वयस्कर पालकांना गैरवागणूक देणारी मुले आहेत.
१५. घरातील हिंसेमुळे कुटुंबातील सदस्यांवर भावनात्मकरित्या कसा परिणाम होतो?
१५ घरातील हिंसेमुळे होणारे नुकसान शारीरिक व्रणांपेक्षाही अधिक असते. मारपीट झालेल्या एका पत्नीने म्हटले: “खूप दोष आणि लज्जा यांचा सामना करावा लागतो. ते केवळ एक दुःस्वप्न आहे असे समजून अनेकदा सकाळच्या वेळी बिछान्यातच पडून राहावे असे वाटते.” घरातील हिंसा पाहणारी अथवा तिचा अनुभव घेणारी मुले मोठे झाल्यावर त्यांना स्वतःचे कुटुंब असते तेव्हा ते देखील कदाचित हिंसक होऊ शकतात.
१६, १७. भावनात्मक अत्याचार काय आहे आणि त्याचा कौटुंबिक सदस्यांवर कसा परिणाम होतो?
१६ घरातील हिंसा केवळ शारीरिक दुरूपयोगापुरतीच मर्यादित नाही. अनेकदा शाब्दिक हल्ला केला जातो. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” घरातील हिंसेचे विशेष लक्षण असलेल्या या ‘भोसकण्यात’ शिवीगाळ करणे आणि ओरडणे तसेच सतत टीका करणे, मानहानी आणि शारीरिक हिंसेचा धाक यांचा समावेश होतो. भावनात्मक हिंसेच्या जखमा अदृश्य असतात आणि अनेकदा इतरांना त्या दिसत नाहीत.
१७ मुलाला भावनात्मक मारहाण—त्याच्या क्षमता, बुद्धिमत्ता अथवा एक व्यक्ती या नात्याने त्याची सतत टीका करणे आणि त्याचे मोल कमी करणे हे विशेषपणे दुःखाचे आहे. अशा अपशब्दांमुळे मुलाचा स्वतःवरील आत्मविश्वास नष्ट होऊ शकतो. हे खरे आहे की, सर्व मुलांना शिस्तीची गरज असते. परंतु बायबल, पित्यांना बोध करते: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.”—कलस्सैकर ३:२१.
घरातील हिंसा कशी टाळावी?
१८. घरातील हिंसेला कोठे सुरवात होते आणि त्यास थांबवण्याचा कोणता मार्ग बायबल दाखवते?
१८ घरातील हिंसेची सुरवात अंतःकरणात आणि मनात होते; आपण जे कार्य करतो, ते आपण जसा विचार करतो त्यावरून सुरू होते. (याकोब १:१४, १५) हिंसा थांबवण्यासाठी गैरवर्तन करणाऱ्याने स्वतःच्या विचारसरणीत बदल करण्याची गरज आहे. (रोमकर १२:२) हे शक्य आहे का? होय. देवाच्या वचनात लोकांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. ते “तटबंदी” केलेल्या विध्वंसक दृष्टिकोनांचे देखील पूर्णपणे निर्मूलन करू शकते. (२ करिंथकर १०:४; इब्री लोकांस ४:१२) बायबलचे अचूक ज्ञान लोकांमध्ये इतका बदल घडवून आणण्यात मदत करू शकते ज्यामुळे ते नवीन मनुष्यत्व धारण करत आहेत असे म्हटले जाते.—इफिसकर ४:२२-२४; कलस्सैकर ३:८-१०.
१९. ख्रिश्चनाने त्याच्या वैवाहिक सोबत्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे आणि त्यासोबत व्यवहार कसा राखावा?
१९ वैवाहिक सोबत्याबद्दलचा दृष्टिकोन. देवाचे वचन सांगते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो.” (इफिसकर ५:२८) पतीने आपल्या पत्नींवर त्या ‘अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्यासोबत सुज्ञतेने सहवास ठेवण्याविषयी’ देखील बायबल सांगते. (१ पेत्र ३:७) पत्नींना बोध करण्यात आलेला आहे की, त्यांनी आपल्या ‘नवऱ्यांवर प्रेम करावे’ व त्यांची “भीड राखावी.” (तीत २:४; इफिसकर ५:३३) नक्कीच मग, आपल्या पत्नीवर शारीरिकरित्या अथवा शाब्दिकरित्या हल्ला करत असलेला कोणताही देवभिरू पती त्याच्या पत्नीचा खरेपणाने सन्मान करत असल्याचे प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. तसेच, एखादी पत्नी आपल्या पतीवर किंचाळत असल्यास, अथवा उपरोधात्मक रितीने त्याला संबोधत असल्यास, किंवा नेहमी त्याला रागावत असल्यास ती त्याच्यावर प्रेम करते व त्याची भीड राखते असे म्हणू शकत नाही.
२०. पालक त्यांच्या मुलांबद्दल कोणाला जबाबदार आहेत आणि पालकांना त्यांच्या मुलांबद्दल अवाजवी अपेक्षा का असू नयेत?
२० मुलांविषयी उचित दृष्टिकोन. मुले पालकांकडील प्रेम आणि लक्ष मिळण्याच्या पात्रतेची आहेत, होय याची त्यांना गरज असते. देवाचे वचन मुलांना ‘यहोवाकडील धन’ व “देणगी” असे संबोधते. (स्तोत्र १२७:३) त्या धनाची काळजी घेण्यासाठी पालक यहोवासमोर जबाबदार आहेत. बायबल “पोरकटपणाच्या गोष्टी” आणि बालपणाची “मूर्खता” याबद्दल सांगते. (१ करिंथकर १३:११; नीतिसूत्रे २२:१५) पालकांना मुलांमध्ये मूर्खता दिसल्यास त्यांना आश्चर्य वाटू नये. किशोरवयीन प्रौढ नाहीत. पालकांनी मुलाचे वय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि क्षमता यास उचित असेल त्यापेक्षा अधिक अपेक्षा करू नये.—उत्पत्ति ३३:१२-१४ पाहा.
२१. वयस्कर पालकांकडे पाहण्याचा आणि त्यांच्याशी वागण्याचा ईश्वरी मार्ग कोणता आहे?
२१ वयस्कर पालकांचा दृष्टिकोन. लेवीय १९:३२ म्हणते: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे.” अशा प्रकारे, देवाच्या नियमशास्राने वयस्करांना आदर आणि मान देण्याचे उत्तेजन दिले. वयस्कर पालक अवास्तव मागणी करत असल्यास किंवा आजारी असल्यास आणि कदाचित लगेच हालचाल अथवा त्यांना विचार करता येत नसल्यास ते एक आव्हान असेल. तरीही, “आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे” याची आठवण मुलांना करून दिली आहे. (१ तीमथ्य ५:४) याचा अर्थ त्यांना सन्मानाने आणि आदराने वागवणे कदाचित आर्थिकरित्या त्यांचे पालनपोषण करणे असा देखील होतो. वयस्कर पालकांशी शारीरिकपणे अथवा इतर प्रकारे दुर्व्यवहार करणे म्हणजे बायबल आपल्याला सांगते त्यापेक्षा अगदी विरुद्ध प्रतिपादन करण्यासारखे आहे.
२२. घरातील हिंसेवर मात करण्याचा एक महत्त्वपूर्ण गुण कोणता आहे आणि तो कसा दाखवला पाहिजे?
२२ आत्मसंयम विकसित करा. नीतिसूत्रे २९:११ म्हणते: “मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करितो पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.” तुम्ही तुमचा क्रोध कसा आवरू शकता? निराशेला मनात वाढू देण्याऐवजी उद्भवणाऱ्या अडचणी मिटवण्यासाठी लगेच कार्य करा. (इफिसकर ४:२६, २७) तुम्ही संयम गमावत असल्याचे तुम्हाला वाटल्यास तेथून निघून जा. तुमच्यामध्ये आत्मसंयम निर्माण करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. (गलतीकर ५:२२, २३) फिरायला गेल्याने किंवा काही शारीरिक व्यायाम केल्याने तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. (नीतिसूत्रे १७:१४, २७) ‘लवकर क्रोधीत न होण्याचा’ प्रयत्न करा.—नीतिसूत्रे १४:२९.
विभक्त होणे की एकत्र राहणे?
२३. ख्रिस्ती मंडळीतील कोणी सदस्य वारंवार व पश्चात्ताप न करता क्रोध व्यक्त करत असल्यास त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबावर कदाचित शारीरिक अत्याचार करीत असल्यास काय होऊ शकते?
२३ देव ज्या कर्मांची मनाई करतो त्यापैकी “वैर, कलह . . . राग” यांचा उल्लेख बायबल करते आणि “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही” असे ते सांगते. (गलतीकर ५:१९-२१) या कारणास्तव, ख्रिश्चन असल्याचा दावा करणारा कोणी कदाचित शारीरिक गैरवागणुकीसोबत वारंवार व अपश्चात्तापाने त्याच्या पत्नीवर अथवा मुलांवर क्रोध व्यक्त करत असल्यास, त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. (पडताळा २ योहान ९, १०.) अशा रीताने, अत्याचार करणाऱ्या व्यक्तींपासून मंडळी शुद्ध ठेवली जाते.—१ करिंथकर ५:६, ७; गलतीकर ५:९.
२४. (अ) अत्याचार झालेल्या वैवाहिक सोबत्यांना कसा व्यवहार करावासा वाटेल? (ब) अत्याचार झालेल्या वैवाहिक सोबत्याला हितचिंतक मित्र आणि वडील कसा पाठिंबा देऊ शकतात पण त्यांनी काय करू नये?
२४ बदल करण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसलेल्या अत्याचारी वैवाहिक सोबत्यांकडून सध्या मारहाण केली जात असणाऱ्या ख्रिश्चनांविषयी काय? काहींनी अत्याचार करणाऱ्यासोबत एखाद-दुसऱ्या कारणांसाठी राहण्याची निवड केली आहे. इतरांना त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य—कदाचित त्यांचे जीवनच—धोक्यात असल्याचे वाटल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याची निवड केली आहे. अशा परिस्थितींत घरातील हिंसेला बळी पडणारा काय करण्याची निवड करतो ही यहोवासमोर त्याची एक वैयक्तिक बाब आहे. (१ करिंथकर ७:१०, ११) बळी पडणाऱ्या व्यक्तीला मदत आणि सल्ला द्यावा, असे हितचिंतक मित्र, नातेवाईक किंवा ख्रिस्ती वडील यांना वाटेल पण त्यांनी बळी पडणाऱ्याने कोणते कार्य करावे याबद्दल त्याच्यावर दबाव टाकू नये. तो त्याचा अथवा तिचा व्यक्तिगत निर्णय आहे.—रोमकर १४:४; गलतीकर ६:५.
नुकसान करणाऱ्या समस्यांचा अंत
२५. यहोवाचा कुटुंबाबद्दल काय उद्देश आहे?
२५ यहोवाने आदाम आणि हव्वेला विवाहाद्वारे एकत्र आणले तेव्हा, दारूबाजी किंवा हिंसा अशा नुकसान करणाऱ्या समस्यांनी कुटुंबाची झीज व्हावी असा त्याचा कधीही उद्देश नव्हता. (इफिसकर ३:१४, १५) कुटुंब हे प्रेम आणि शांतीचे तसेच प्रत्येक सदस्याच्या मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या जातील असे ठिकाण असावयाचे होते. तथापि, पाप घडल्यामुळे, कौटुंबिक जीवनाचा लवकरच ऱ्हास झाला.—पडताळा उपदेशक ८:९.
२६. यहोवाच्या अपेक्षांनुसार राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कोणते भवितव्य ठेवलेले आहे?
२६ यहोवाने कुटुंबाबद्दल असलेल्या उद्देशाचा त्याग केला नाही, हे आनंदाचे आहे. लोक “निर्भय वसतील कोणी त्यांस भीति घालणार नाही” अशा शांतीदायक नवीन जगाच्या अभिवचनाची हमी तो देतो. (यहेज्केल ३४:२८) त्याचवेळी, दारूबाजी, घरातील हिंसा आणि आज कुटुंबांचे नुकसान करणाऱ्या इतर सर्व समस्या गतकाळात जमा होतील. लोक भय आणि दुःख लपवण्यासाठी नव्हे तर “उदंड शांतिसुख” मिळत असल्यामुळे त्यांच्या मुखावर हास्य असेल.—स्तोत्र ३७:११.
^ परि. 3 आम्ही येथे, एखादा पुरुष मद्यपी असल्याचा उल्लेख केलेला असला, तरी एखादी स्त्री मद्यपी असल्यास हीच तत्त्वे तिलाही तितकीच लागू होतात.
^ परि. 12 काही देशांमध्ये खास मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी असलेली उपचार केंद्रे, इस्पितळे आणि सुधारणा कार्यक्रम आहेत. अशी मदत घ्यावी की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. वॉच टावर सोसायटी कोणत्याही विशिष्ट उपचाराला मान्यता देत नाही. तरीपण, खबरदारी बाळगण्याची गरज आहे जेणेकडून ही मदत घेत असताना एखादी व्यक्ती अशास्त्रवचनीय तत्त्वांबद्दल हातमिळवणी करणाऱ्या कार्यहालचालींत गुंतणार नाही.