अध्याय ९
एक-पालक कुटुंबे यशस्वी होऊ शकतात!
१-३. एक-पालक कुटुंबांच्या वाढीस काय कारणीभूत आहे आणि यात समाविष्ट असलेल्यांवर कसा परिणाम होतो?
अमेरिकेत एक-पालक कुटुंबांना जलदगतीने वाढ होत असलेला एक कौटुंबिक प्रकार असे म्हटले जात आहे. यासारखीच परिस्थिती इतर देशांत देखील आहे. घटस्फोट, परित्याग, फारकत आणि अनौरस संततीच्या सर्व परिचित असलेल्या मोठ्या संख्येचे दूरगामी परिणाम लाखो पालक आणि मुलांवर झालेले आहेत.
२ एक-पालक असलेल्या एका मातेने लिहिले, “मी २८ वर्षांची विधवा असून मला दोन मुले आहेत. मी अतिशय निराश आहे कारण पित्याविना माझ्या मुलांचे संगोपन करण्याची माझी इच्छा नाही. कोणीच माझी काळजी करत नाही, असे दिसते. माझी मुले मला अनेकदा रडत असल्याचे पाहतात आणि याचा त्यांच्यावर परिणाम होतो.” या व्यतिरिक्त, क्रोध, दोष आणि एकाकीपणाची भावना या सोबत लढत देत असताना, अनेक एक-पालक, नोकरी आणि घरकाम सांभाळण्याच्या या आव्हानाला तोंड देत आहेत. एकाने म्हटले: “एक-पालक असणे हे हातचलाखी करणाऱ्या माणसासारखे आहे. सहा महिन्यांच्या सरावानंतर तुम्ही एकाच वेळी चार चेंडूंची हातचलाखी शेवटी करू शकला आहात. पण तुम्हाला असे नुकतेच करता येऊ लागले तोच कोणीतरी एक नवीन चेंडू तुमच्याकडे फेकतो!”
३ एक-पालक कुटुंबांमधील तरुणांना अनेकदा स्वतःच्या लढ्यांसोबत झगडावे लागते. त्यांना पालकांच्या आकस्मिक निघून जाण्याच्या अथवा मृत्यूच्या परिणामामुळे तीव्र भावनांशी झगडावे लागत असेल. पालक नसल्यामुळे अनेक तरुणांवर गंभीर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते.
४. यहोवाला एक-पालक कुटुंबांची काळजी आहे, हे आपण कसे जाणतो?
४ बायबल काळात एक-पालकीय कुटुंबे अस्तित्वात होती. शास्रवचने ‘पोरके’ व ‘विधवा’ यांचा वारंवार उल्लेख करते. (निर्गम २२:२२; अनुवाद २४:१९-२१; ईयोब ३१:१६-२२) यहोवा देव त्यांच्या दयनीय स्थितीबद्दल बेपर्वा नव्हता. स्तोत्रकर्त्याने देवाला “पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी” असे संबोधले. (स्तोत्र ६८:५) नक्कीच, यहोवाला एक-पालक कुटुंबांबद्दल देखील आज तशीच काळजी आहे! खरोखर, त्याचे वचन अशा तत्त्वांना प्रस्तुत करते जेणेकडून त्यांना यशस्वी होण्यास मदत होऊ शकते.
कुटुंबाच्या नित्यक्रमावर प्राविण्य मिळवणे
५. एक-पालकांना सुरवातीला कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते?
५ घर चालवणे याचा विचार करा. एक घटस्फोटीत व्यक्ती कबूल करते की, “तुमच्या कारमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे विचित्र आवाज होऊ लागतो व तो कोठून येत आहे हे तुम्हाला माहीत नसते त्याप्रमाणेच असे अनेक प्रसंग असतात अशा वेळी कोणी पुरुष जवळ असावा असे तुम्हाला वाटते.” अलीकडेच घटस्फोटित अथवा विधुर झालेल्या पुरुषांना आता घरात पुष्कळ काम करावे लागणार असल्यामुळे ते अशाच प्रकारे गोंधळात पडले आहेत. घरगुती अस्ताव्यस्तपणा मुलांमध्ये अस्थिरता आणि असुरक्षितपणाच्या भावना वाढवतो.
६, ७. (अ) नीतिसूत्रातील ‘सद्गुणी स्त्रीने’ कोणते उत्तम उदाहरण मांडले? (ब) एक-पालक घरांमध्ये घरगुती जबाबदाऱ्यांत परिश्रमी राहिल्याने कशी मदत मिळते?
६ कोणती गोष्ट मदत करू शकते? नीतिसूत्रे ३१:१०-३१ मध्ये वर्णन केलेल्या ‘सद्गुणी स्त्रीने’ मांडलेले उदाहरण लक्षात घ्या. तिच्या साध्यतांची कृतिकक्षा उल्लेखनीय आहे—खरेदी, विक्री, शिवणकाम, स्वयंपाक, स्थावर संपत्ती, शेती आणि व्यापार सांभाळणे. तिचे रहस्य? ती मेहनती होती, उशिरापर्यंत काम करत होती आणि तिचे कार्य करण्यासाठी ती लवकर उठत होती. ती काही कामे नेमून देण्यास इतर कामे स्वतः करण्याच्या बाबतीत सुसंघटित होती. यामुळे ती स्तुतीस योग्य ठरली, यात काही आश्चर्य नाही!
७ तुम्ही एक-पालक असल्यास, घरातील तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल कर्तव्यनिष्ठ असा. अशा कामात संतुष्टी मिळवा कारण अशी कामे तुमच्या मुलांमध्ये सौख्यानंदाची अधिक भर पाडतात. तथापि, योग्य योजना आणि संघटना आवश्यक आहेत. बायबल म्हणते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात.” (नीतिसूत्रे २१:५) एक-पालक पित्याने कबूल केले: “मला भूक लागत नाही तोवर मी जेवणाचा विचारच करत नाही.” घाईघाईने बनवलेल्या जेवणापेक्षा योजना करून बनवलेले जेवण अधिक पौष्टिक आणि आवडणारे असते. तुम्हाला घरातील नवीन कौशल्ये देखील शिकावे लागतील. माहीतगार मित्रांचा सल्ला घेतल्याने, मार्गदर्शक आणि सहायक धंदेवाईकांमुळे काही एक-माता असलेल्या स्त्रिया रंगकाम, नळकाम आणि मोटार गाडीची साधारण दुरुस्ती करू शकल्या आहेत.
८. एक-पालकांची मुले घरात कशी मदत करू शकतात?
८ मुलांकडे मदतीची विचारणा करणे बरोबर आहे का? एक-पालक असलेल्या एका मातेने असा प्रतिसाद दिला: “जीवन जगणे मुलांकरता सोपे बनवल्याने इतर पालकाच्या गैरहजेरीची उणीव भरून काढण्याची तुमची इच्छा असते. ते समजण्याजोगे असेल पण कदाचित ते नेहमीच मुलांसाठी हितकर ठरणार नाही. बायबल काळातील देवभिरू तरुणांना उचित कामे नेमून दिली जात होती. (उत्पत्ति ३७:२; गीतरत्न १:६) यास्तव, तुमच्या मुलांवर अधिक भार न टाकण्याची खबरदारी घेत असला तरी, भांडी घासणे आणि घर स्वच्छ ठेवणे अशी कामे नेमून देण्यात तुम्ही सुज्ञता दाखवाल. घरातील काही कामे एकत्र मिळून का करू नयेत? हे अधिक आनंदविणारे असू शकते.
उदरनिर्वाह करण्याचे आव्हान
९. एकट्या मातांना अनेकदा आर्थिक अडचणींना का तोंड द्यावे लागते?
९ अनेक एक-पालकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे कठीण जाते आणि सामान्यपणे, अविवाहित मातांकरता विशेषकरून कठीण समय असतो. * नोकरी मिळेपर्यंत तरी सरकारी मदत उपलब्ध असलेल्या देशांमध्ये, मदतीचा लाभ घेणे सूज्ञतेचे असू शकते. आवश्यक असते तेव्हा अशा तरतुदींचा उपयोग करण्यास ख्रिश्चनांना बायबल अनुमती देते. (रोमकर १३:१, ६) विधवा आणि घटस्फोटित, अशाच प्रकारच्या आव्हानांना तोंड देतात. अनेक वर्षे घर चालवणाऱ्या, पण पुन्हा एकदा नोकरी करण्यास भाग पडलेल्यांना बहुधा, केवळ कमी पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. काही जण जॉब ट्रेनिंग कार्यक्रम किंवा अल्पावधीचे शालेय कोर्स यांमध्ये दाखल होऊन त्यांचे भविष्य सुधारू शकले आहे.
१०. एकटी असलेल्या मातेने लौकिक नोकरी का केली पाहिजे हे ती आपल्या मुलांना कशी सांगू शकते?
१० तुम्ही नोकरी शोधत असताना तुमची मुले दुःखी आहेत याचे आश्चर्य वाटू देऊ नका आणि दोषी असल्याचे जाणवू देऊ नका. उलटपक्षी, तुम्ही काम का केले पाहिजे याचे स्पष्टीकरण त्यांना द्या आणि त्यांचे पालनपोषण करावे अशी यहोवा अपेक्षा करतो हे समजण्यास त्यांची मदत करा. (१ तीमथ्य ५:८) कालांतराने, अनेक मुले जुळवून घेतात. तथापि, तुमचा व्यग्र आराखडा अनुमती देतो त्यानुसार त्यांच्यासोबत होता होईल तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. असे प्रेमळपणे लक्ष दिल्यामुळे कुटुंब कदाचित अनुभवत असलेल्या कोणत्याही आर्थिक मर्यादांचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील मदत होते.—नीतिसूत्रे १५:१६, १७.
कोण कोणाची काळजी घेत आहे?
११, १२. एक-पालकांनी कोणत्या मर्यादा राखल्या पाहिजेत आणि हे ते कसे करू शकतात?
११ एक-पालकांनी त्यांच्या मुलांच्या अधिक जवळ असणे स्वाभाविक असले तरी देवाने पालक आणि मुलांमधील नेमलेल्या मर्यादा निरुपयोगी होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, एक पालकीय कुटुंबात मातेने तिच्या मुलाला घरातील प्रमुखाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची त्याच्याकडून अपेक्षा केल्यास किंवा तिच्या मुलीला आपल्या गुप्त गोष्टी सांगून तिच्यावर खाजगी समस्यांचे ओझे लादल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. असे करणे अनुचित, तणावपूर्ण आणि कदाचित मुलाला गोंधळात टाकणारे आहे.
१२ मुलांना, ते नव्हे तर तुम्ही पालक आहात, तुम्ही त्यांची काळजी घ्याल याची त्यांना खातरी द्या. (पडताळा २ करिंथकर १२:१४.) काही वेळा तुम्हाला सल्ला किंवा साह्याची आवश्यकता भासेल. ते तुमच्या अल्पवयीनांकडून नव्हे तर ख्रिस्ती वडिलांकडून अथवा कदाचित प्रौढ ख्रिस्ती स्त्रियांकडून मिळवा.—तीत २:३.
शिस्त राखणे
१३. शिस्तीबद्दल एक-पालक मातेला कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागेल?
१३ एखाद्या पुरुषाला शिस्तीचा भोक्ता असे गंभीरपणे समजणे कठीण जात नसेल पण या संबंधी स्त्रीला समस्या असू शकतील. एकटी पालक असलेली माता म्हणते: “माझी मुले प्रौढ झाली आहेत. काही वेळा अनिर्णायक किंवा तुलना करण्यात कमकुवत न होणे अतिशय कठीण असते.” याशिवाय, तुमच्या प्रिय सोबत्याच्या मृत्यूमुळे तुम्ही अजूनही शोक करीत असाल किंवा विवाह तुटल्यामुळे तुम्हाला कदाचित दोषी वाटत असेल अथवा राग येत असेल. मुलावरील कायदेशीर ताब्याची सहभागिता असल्यास, तुमचे मूल तुमच्या आधीच्या सोबत्यासोबत राहण्याचे पसंत करते का याचे भय तुम्हाला वाटेल. अशा परिस्थिती संतुलित शिस्त लावण्यास कठीण बनवू शकतात.
१४. एक-पालक शिस्तीबद्दल संतुलित दृष्टिकोन कसे राखू शकतात?
१४ बायबल म्हणते की, “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) कौटुंबिक नियम बनविण्यात आणि ते अंमलात आणण्यात तुम्हाला यहोवा देवाचे पाठबळ असल्यामुळे दोष, खेद किंवा भय यांच्यापुढे हात टेकू नका. (नीतिसूत्रे १:८) कधीही बायबल तत्त्वांबद्दल हातमिळवणी करू नका. (नीतिसूत्रे १३:२४) वाजवी, अढळ आणि दृढ राहण्याचा प्रयत्न करा. कालांतराने, बहुतेक मुले प्रतिसाद देतील. असे असले, तरी तुमच्या मुलांच्या भावनांचा विचार करण्याची गरज असेल. एक-पालक असलेला पिता म्हणतो: “मुलांना त्यांची आई गमावण्याचा धक्का बसल्यामुळे माझ्या शिस्तीची तीव्रता समजदारीमुळे कमी करावी लागली. मी प्रत्येक प्रसंगी त्यांच्यासोबत बोलतो. संध्याकाळचे जेवण तयार करत असताना आम्ही खाजगी गोष्टी बोलतो. त्यावेळी ते मला त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतात.”
१५. आधीच्या सोबत्याबद्दल बोलताना घटस्फोटित पालकाने काय टाळले पाहिजे?
१५ तुम्ही घटस्फोटित असल्यास, तुमच्या आधीच्या सोबत्याकरता असलेला आदर कमी केल्याने काहीही चांगले साध्य होत नाही. पालकीय कुरकूर मुलांना त्रासदायक असते आणि शेवटी त्यांना तुम्हा दोघांबद्दल असलेला आदर कमी होईल. या कारणास्तव, “बापासारखाच आहेस!” असे अपायकारक शेरे देण्याचे टाळा. आधीच्या सोबत्यामुळे तुम्हाला कितीही दुःख सोसावे लागले असले, तरी तो किंवा ती अजूनही तुमच्या मुलाचे पालक आहे आणि तुमच्या मुलाला दोन्ही पालकांकडील प्रेम, लक्ष व शिस्तीची गरज आहे. *
१६. एक-पालक घरात शिस्त लावण्यात कोणत्या आध्यात्मिक योजनांचा नियमित भाग असला पाहिजे?
१६ आधीच्या अध्यायांमध्ये चर्चा केल्यानुसार, शिस्तीत केवळ शिक्षा नव्हे तर प्रशिक्षण आणि बोधाचा समावेश होतो. आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या चांगल्या कार्यक्रमामुळे अनेक समस्या टाळल्या जाऊ शकतात. (फिलिप्पैकर ३:१६) ख्रिस्ती सभांमधील नियमित उपस्थिती आवश्यक आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) अशाच रीतीने, साप्ताहिक कौटुंबिक बायबल अभ्यास देखील आवश्यक आहे. असा अभ्यास नियमितपणे करत राहणे सोपे नाही, हे खरे आहे. एक दक्ष माता म्हणते, “दिवसाच्या अखेरीस तुम्हाला आराम करावा असे वाटते. पण माझ्या मुलीसोबत अभ्यास केला पाहिजे याची जाणीव ठेवून मी स्वतःची मानसिक तयारी करते. तिला खरोखर आमचा कौटुंबिक अभ्यास आवडतो!”
१७. पौलाचा सोबती तीमथ्य याच्या उत्तम पालनपोषणाबद्दल आपण काय शिकू शकतो?
१७ प्रेषित पौलाचा सोबती, तीमथ्य याला असे दिसते की त्याच्या वडिलाने नव्हे—तर त्याची आई व आजीने बायबल तत्त्वांचे प्रशिक्षण दिले होते, हे पुराव्यानुसार स्पष्ट आहे. तरीही, तीमथ्य किती उल्लेखनीय ख्रिस्ती बनला! (प्रेषितांची कृत्ये १६:१, २; २ तीमथ्य १:५; ३:१४, १५) तुम्ही देखील तुमच्या मुलांचे संगोपन “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” करण्याचा प्रयत्न करत असताना अशाच प्रकारच्या अनुकूल परिणामांची आशा करू शकता.—इफिसकर ६:४.
एकाकीपणाविरुद्धची लढत जिंकणे
१८, १९. (अ) एक-पालकाला एकाकीपणा कसा दिसून येऊ शकतो? (ब) शारीरिक वासनांना नियंत्रणात ठेवण्यात मदत करण्यासाठी कोणता सल्ला दिला आहे?
१८ एक-पालकाने उसासा टाकला: “घरात आल्यावर त्या चार भिंती पाहिल्यावर आणि विशेषपणे मुले झोपी गेल्यावर एकाकीपणा मला खरोखर वेढतो.” होय, एकाकीपणा ही वारंवार एक-पालक तोंड देत असलेली सर्वात मोठी समस्या आहे. विवाहातील आल्हाददायक सोबतीची आणि सलगीची ओढ बाळगावी हे स्वाभाविक आहे. पण एखाद्या व्यक्तीने या समस्या कोणत्याही किंमतीवर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय? प्रेषित पौलाच्या दिवसात काही तरुण विधवांनी ‘कामुक होऊन ख्रिस्ताला सोडले.’ (१ तीमथ्य ५:११, १२) शारीरिक अभिलाषांना आध्यात्मिक आस्थांवर मात करू देणे हानीकारक असेल.—१ तीमथ्य ५:६.
१९ एका ख्रिस्ती पुरूषाने म्हटले: “लैंगिक वासना अधिक तीव्र असतात पण त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. तुमच्या मनात विचार येतो तेव्हा त्यावर विचार करत बसू नका. तो विचार काढून टाकला पाहिजे. तुमच्या मुलाचा विचार करण्यास देखील हे मदत करते.” देवाचे वचन सल्ला देते: ‘तुमचे अवयव म्हणजे कामवासनेला जिवे मारा.’ (कलस्सैकर ३:५) तुम्ही जेवणाबद्दलची इच्छा मारण्याचा प्रयत्न करीत असल्यास स्वादिष्ट भोजनाची चित्रे असलेली नियतकालिके तुम्ही वाचाल काय अथवा सतत भोजनाबद्दल बोलत असलेल्या लोकांची संगत तुम्ही धरणार का? निश्चितच नाही! हेच शारीरिक वासनांबद्दल देखील खरे आहे.
२०. (अ) सत्य न मानणाऱ्यांसोबत प्रियाराधना करणाऱ्यांकरता कोणते धोके आहेत? (ब) पहिल्या शतकात आणि आज देखील एक-पालकांना एकाकीपणासोबत कसे झगडावे लागले आहे?
२० काही ख्रिश्चनांनी सत्य न मानणाऱ्यांसोबत प्रियाराधना सुरू केली आहे. (१ करिंथकर ७:३९) यामुळे त्यांच्या समस्येचे निरसन झाले आहे का? नाही. एका घटस्फोटित ख्रिस्ती स्त्रीने इशारा दिला: “एक अशी गोष्ट आहे जी सडे राहण्यापेक्षाही अधिक वाईट आहे. ती म्हणजे अयोग्य व्यक्तीबरोबर विवाहित होणे!” पहिल्या शतकातील, ख्रिस्ती विधवांना वेळोवेळी एकाकीपणा वाटत होता यात काही शंका नाही पण सुज्ञ विधवा, ‘अनोळख्यांचा पाहुणचार करणे, पवित्र जनांचे पाय धुणे आणि संकटात पडलेल्यांची गरज भागविणे’ यात व्यग्र राहिल्या. (१ तीमथ्य ) अशाच रीतीने, अनेक वर्षांपासून देवभिरू सोबती मिळवण्यासाठी थांबून राहिलेल्या आजच्या विश्वासू ख्रिश्चनांनी स्वतःला वेगळे ठेवले आहे. एका ६८ वर्षीय विधवेला एकटेपणा जाणवू लागला तेव्हा ती इतर विधवांना भेटू लागली. तिने म्हटले: “या भेटी घेणे, घरकाम करणे आणि माझ्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देणे यामुळे एकटे असण्याकरता माझ्याकडे वेळच नाही.” इतरांना देवाच्या राज्याबद्दल शिकवणे विशेषपणे एक लाभदायक चांगले काम आहे.— ५:१०मत्तय २८:१९, २०.
२१. एकाकीपणावर मात करण्यासाठी प्रार्थना आणि चांगली संगती कशाप्रकारे मदत करू शकते?
२१ एकाकीपणावर चमत्कारिक उपाय नाही हे कबूल आहे. पण यहोवाकडील सामर्थ्याने त्यास सहन केले जाऊ शकते. असे सामर्थ्य एखादी ख्रिस्ती व्यक्ती “रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते” तेव्हा मिळू शकते. (१ तीमथ्य ५:५) विनवण्या कळकळीच्या विनंत्या आहेत, होय, ते कदाचित मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत मदतीसाठी याचना करणे आहे. (पडताळा इब्री लोकांस ५:७.) “रात्रंदिवस” यहोवासमोर आपले अंतःकरण मोकळे करीत राहिल्याने खरोखर मदत मिळू शकते. याशिवाय, हितकर सहवास एकाकीपणाच्या पोकळीला भरून काढण्यासाठी अधिक काही करू शकतो. चांगल्या संगतीने नीतिसूत्रे १२:२५ मध्ये वर्णन केलेले उत्तेजनपर “गोड शब्द” एखाद्याला मिळू शकतात.
२२. एकाकीपणाची भावना वेळोवेळी डोकावते तेव्हा कोणत्या विचाराने मदत मिळेल?
२२ एकाकीपणाची भावना वेळोवेळी डोकावते—कदाचित तसे होईलही—तेव्हा कोणाचेही जीवन समस्यांपासून मुक्त नाही, हे लक्षात ठेवा. खरे म्हणजे, एखाद-दुसऱ्या रीतीने आमच्या संबंध “बंधुवर्गाला” त्रास सहन करावा लागत आहे. (१ पेत्र ५:९) गतकाळाबद्दल विचार करत राहण्याचे टाळा. (उपदेशक ७:१०) तुम्ही आनंद घेत असलेल्या लाभांवर चिंतन करा. सर्वात अधिक म्हणजे, तुमची सचोटी टिकवण्याचा आणि यहोवाचे अंतःकरण आनंदित करण्याचा निश्चय करा.—नीतिसूत्रे २७:११.
इतर जण कशी मदत करू शकतात
२३. मंडळीतील एक-पालकांप्रती सह ख्रिश्चनांची काय जबाबदारी आहे?
२३ सह ख्रिश्चनांचे पाठबळ आणि मदत अमूल्य आहे. याकोब १:२७ म्हणते: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे” आहे. होय, एक-पालक कुटुंबांना साह्य करणे हे ख्रिश्चनांचे कर्तव्य आहे. हे कोणत्या व्यावहारिक मार्गांद्वारे केले जाऊ शकते?
२४. गरजवंत एक-पालक कुटुंबांना कोणत्या मार्गांनी मदत दिली जाऊ शकते?
२४ भौतिक साहाय्य दिले जाऊ शकते. बायबल म्हणते: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?” (१ योहान ३:१७) “पाहून” याकरता असलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ केवळ हल्की नजर फिरवणे असा नाही तर मुद्दामहून पाहणे असा होतो. याद्वारे हे सूचित होते की एखाद्या दयाळू ख्रिश्चनाला कुटुंबाच्या परिस्थिती आणि गरजांची जाणीव प्रथम झाली पाहिजे. कदाचित त्यांना पैशांची गरज असेल. काहींना घराची दुरुस्ती करण्यासाठी मदतीची गरज असेल. किंवा ते कदाचित भोजनाकरता अथवा सामाजिक मेळाव्याकरता आमंत्रित केल्याने कृतज्ञ असतील.
२५. सह ख्रिस्ती एक-पालकांना दया कशी दाखवू शकतील?
२५ याशिवाय, १ पेत्र ३:८ म्हणते: “तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा.” सहा मुले असलेल्या एक-पालकाने म्हटले: “हे अतिशय कठीण आहे आणि कधीकधी मी खिन्न होते. तथापि, काही वेळा एखादा बंधू अथवा बहीण मला म्हणते: ‘जोन, तू चांगले काम करत आहेस. त्यामुळे चांगले परिणाम मिळतील.’ इतर जण तुमचा विचार करतात आणि तुमची काळजी घेतात हे केवळ जाणणे अधिक मदतदायक असते.” प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया, एक-पालक असलेल्या तरुण स्त्रियांना मदत करण्यास विशेषपणे अधिक प्रभावकारी असू शकतील, तरुण स्त्रियांना अशा समस्या असतात ज्यांची चर्चा एखाद्या पुरूषासोबत करण्यास त्यांना कदाचित विचित्र वाटत असते तेव्हा या स्त्रिया यांचे ऐकू शकतात.
२६. प्रौढ ख्रिस्ती पुरूष अनाथ मुलांना मदत कशी करू शकतात?
२६ ख्रिस्ती पुरूष इतर मार्गांनी मदत करू शकतात. ईयोब या नीतिमान पुरूषाने म्हटले: “अनाथ व निराश्रित यांचा मी उद्धार करीन.” (ईयोब २९:१२) आज काही ख्रिस्ती पुरूष अनाथ मुलांमध्ये हितकर रस घेतात आणि कोणताही अंतःस्थ हेतू न बाळगता ‘शुद्ध अंतःकरणाने खरी प्रीती’ प्रदर्शित करतात. (१ तीमथ्य १:५) स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता ते अशा तरुणांसोबत ख्रिस्ती सेवेत कार्य करण्याची योजना वेळोवेळी बनवतील तसेच कौटुंबिक अभ्यासाला उपस्थित राहण्याचे अथवा मनोरंजनाचे निमंत्रण देतील. अशी दया, अनाथ मुलाला स्वच्छंदी मार्ग पत्करण्यापासून वाचवील.
२७. एक-पालक कोणत्या पाठबळाची खातरी बाळगू शकतात?
२७ अर्थातच, एक-पालकांना सरतेशेवटी, ‘स्वतःच्या भाराची’ जबाबदारी उचलावी लागते. (गलतीकर ६:५) तथापि, त्यांना ख्रिस्ती बंधू आणि भगिनींबद्दल आणि यहोवा देवाबद्दलही प्रेम मिळू शकते. बायबल त्याच्याविषयी म्हणते: तो “अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो.” (स्तोत्र १४६:९) त्याच्या प्रेमळ पाठबळाने एक-पालकीय कुटुंबे यशस्वी होऊ शकतात!
^ परि. 9 अनैतिक वर्तनामुळे एखादी ख्रिस्ती तरुणी गरोदर राहते तेव्हा तिने केलेल्या कृत्याकडे ख्रिस्ती मंडळी कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करत नाही. पण तिने पश्चात्ताप केल्यास, मंडळीतील वडील आणि इतर जण कदाचित तिला मदत देऊ इच्छितील.
^ परि. 15 दुर्व्यवहार करणाऱ्या पालकांपासून मुलाचे संरक्षण करण्याची गरज असेल अशा परिस्थितींचा आम्ही उल्लेख करत नाही. तसेच, दुसरा पालक, कदाचित मुलाने तुम्हाला सोडावे या उद्देशाने त्याचे मन वळवून तुमच्या अधिकाराला कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करत असल्यास, अशा परिस्थितीला कसे हाताळावे याबद्दल सल्ला मिळवण्याकरता अनुभवी मित्रांसोबत, जसे की ख्रिस्ती मंडळीतील वडिलांसोबत बोलणे योग्य असेल.