धडा ०१
देव आपल्याला आनंदी राहायला कसं शिकवतो?
आपल्या सगळ्यांच्याच मनात जीवनाबद्दल, दुःखाबद्दल, मृत्यूबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच प्रश्न असतात. तसंच, दररोजच्या जीवनातही आपल्याला बऱ्याच चिंता असतात. जसं की, घर कसं चालवावं किंवा कुटुंबातल्या समस्या कशा सोडवाव्यात? बऱ्याच लोकांना दिसून आलंय, की देवाकडून असलेलं पुस्तक, बायबल त्यांच्या मनात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तर देतंच; पण दररोजच्या जीवनासाठी उपयोगी सल्लाही देतं. तुम्हाला वाटत नाही का, की आज सर्वांना अशाच माहितीची गरज आहे?
१. बायबलमध्ये कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळतात?
बायबलमध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात: सृष्टीची सुरुवात कशी झाली? माणसाच्या जीवनाचा उद्देश काय आहे? चांगल्या लोकांना दुःख का सहन करावं लागतं? माणूस मेल्यावर त्याचं काय होतं? जर सगळ्यांना शांती हवी आहे, तर मग इतकी युद्धं का होतात? भविष्यात पृथ्वीचा नाश होईल का? बायबल सांगतं, की आपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे. आणि लाखो लोकांना बायबलमधून या प्रश्नांची मनाला पटण्यासारखी उत्तरं मिळाली आहेत.
२. बायबलमुळे दररोजच्या जीवनात कसा फायदा होऊ शकतो?
बायबलमध्ये खूप चांगला सल्ला दिलाय. जसं की, कुटुंब आनंदी असावं म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे हे त्यात सांगितलंय. तसंच, तणावाचा सामना कसा करायचा आणि कामातून समाधान कसं मिळवायचं याबद्दलही त्यात सल्ला दिलाय. या पुस्तकातून चर्चा करताना, अशा बऱ्याच विषयांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय, हे तुम्हाला शिकायला मिळेल. आणि यामुळे नक्कीच तुम्हीही मान्य कराल, की “संपूर्ण शास्त्र [बायबलमध्ये दिलेली सगळी माहिती] . . . उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
हे पुस्तक बायबलची जागा घेत नाही. उलट ते तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला मदत करतं. म्हणून, या पुस्तकातल्या धड्यांमध्ये दिलेली वचनं बायबलमधून वाचा. आणि तुम्ही शिकत असलेला मुद्दा त्यांतून कसा स्पष्ट होतो, यावर विचार करा.
आणखी जाणून घेऊ या
बायबलमुळे बऱ्याच लोकांना कशी मदत झाली आहे? बायबल वाचायची गोडी लागावी म्हणून काय केलं पाहिजे? आणि बायबल समजून घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत का घेतली पाहिजे? यावर विचार करू या.
३. बायबल आपल्याला योग्य मार्ग दाखवतं
बायबल वाट दाखवणाऱ्या प्रकाशासारखं आहे. जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी आणि भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण बायबलचा उपयोग करू शकतो.
स्तोत्र ११९:१०५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
हे स्तोत्र लिहिणाऱ्याने बायबलची तुलना कशाशी केली? आणि का?
-
तुम्हाला बायबलबद्दल काय वाटतं?
४. बायबल आपल्या प्रश्नांची उत्तरं देतं
एका स्त्रीला बऱ्याच वर्षांपासून तिच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधून मिळाली. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या स्त्रीच्या मनात कोणते प्रश्न होते?
-
बायबलचा अभ्यास केल्यामुळे तिला कशी मदत झाली?
बायबल सांगतं की आपण प्रश्न विचारले पाहिजेत. मत्तय ७:७ वाचा, आणि मग यावर चर्चा करा:
-
तुम्हाला बायबलमधून कोणत्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत?
५. बायबल वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल
बऱ्याच लोकांना बायबल वाचायची गोडी लागली आहे आणि यामुळे त्यांना खूप फायदाही होत आहे. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तरुणांना पुस्तकं वाचण्याबद्दल कसं वाटायचं?
-
पण आता त्यांना बायबल वाचायला का आवडतं?
बायबल सांगतं, की त्यातल्या माहितीमुळे आपल्याला सांत्वन आणि आशा मिळेल. रोमकर १५:४ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
बायबलमधून सांत्वन आणि आशा कशी मिळू शकेल, हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?
६. बायबल समजण्यासाठी आपण दुसऱ्यांची मदत घेऊ शकतो
बऱ्याच जणांना असं दिसून आलंय, की स्वतःहून बायबल वाचण्यासोबतच दुसऱ्यांबरोबर चर्चा केल्यामुळे बायबलचा अर्थ समजून घेणं जास्त सोपं जातं. प्रेषितांची कार्यं ८:२६-३१ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
बायबल समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो?—३० आणि ३१ वचनं पाहा.
काही जण म्हणतात: “बायबलचा अभ्यास करणं म्हणजे नुसता वेळ वाया घालवणं.”
-
तुम्हाला काय वाटतं? आणि का?
थोडक्यात
बायबल दररोजच्या जीवनासाठी सल्ला देतं, महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देतं आणि लोकांना सांत्वन आणि आशा देतं.
उजळणी
-
बायबल कोणत्या गोष्टींबद्दल सल्ला देतं?
-
बायबलमध्ये आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळतात?
-
तुम्हाला बायबलमधून कोणत्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल?
हेसुद्धा पाहा
बायबलचा सल्ला आजच्या काळातही कसा उपयोगी आहे हे जाणून घ्या.
लहानपणापासून आपल्या भावनांशी झगडत असलेल्या एका माणसाला बायबलमुळे कशी मदत झाली ते पाहा.
बायबलमध्ये कुटुंबांसाठी दिलेला उपयोगी सल्ला वाचा.
आज जगावर कोणाचं राज्य आहे, याबद्दल लोकांचा एक गैरसमज बायबल कसा दूर करतं हे जाणून घ्या.