व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | चिंता! चिंता! चिंता!—कशी मात कराल यांच्यावर?

पैशांची चिंता

पैशांची चिंता

“आमच्या देशात महागाई वाढली तेव्हा खाण्याच्या पदार्थांच्या किंमती आकाशाला भिडल्या आणि त्यांचा जणू दुष्काळ पडला. आम्ही तास न्‌ तास रांगेत उभं राहायचो, आणि आमचा नंबर आला की तोपर्यंत सर्व संपायचं. भुकेनं लोकांच्या अंगाच्या काड्या झाल्या होत्या. लोकांच्या अंगात शक्तीच उरली नसल्यामुळं ते चालता-चालता बेशुद्ध होऊन खाली पडायचे. अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळं, पैशाला काही किंमत उरली नाही. साध्या-सुध्या आणि दररोज लागणाऱ्या गोष्टींच्या किंमतीसुद्धा कोटींच्या घरात गेल्या. माझं बँकेचं खातं, विमा, पेन्शन फंड सर्व काही बुडालं.”

पॉल

कुटुंबाला जगवायचंय तर “चातुर्य” अर्थात व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग करावा लागेल, हे पॉलला जाणवलं. (नीतिसूत्रे ३:२१) तो म्हणतो: “मी खरं तर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. पण आता, मिळेल ते काम मी घेऊ लागलो. आणि पैसेदेखील नेहमीपेक्षा कमीच मिळायचे. काही लोक मला पैशांऐवजी खाण्याच्या गोष्टी किंवा घरातील काही सामानसुमान द्यायचे. मला जर कुणी साबणाच्या चार वड्या दिल्या तर मी त्यांपैकी दोन ठेवायचो आणि बाकीच्या दोन विकायचो. असंच एकदा मी ४० कोंबडीची पिल्लं विकत घेतली. त्यांना मोठं केलं, विकलं आणि आणखी ३०० पिल्लं घेतली. मग, त्यातील ५० कोंबड्या देऊन मी १०० किलो मक्याचं पीठ घेतलं. खूप दिवसांपर्यंत आम्हाला आणि दुसऱ्या अनेक कुटुंबांना हे पीठ पुरलं.”

पॉलला हे देखील माहीत होतं, की देवावर भरवसा ठेवणं ही खरंतर सर्वात व्यावहारिक गोष्ट होती. आपण जेव्हा देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा तो आपल्याला मदत करतो. जीवनावश्यक गोष्टी मिळवण्याबद्दल येशूनं म्हटलं: “मनात अस्वस्थ राहू नका; कारण . . . तुम्हांस त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.”—लूक १२:२९-३१.

दुःखाची गोष्ट म्हणजे, देवाचा शत्रू सैतान हा लोकांना असं भासवण्याचा प्रयत्न करतोय, की जिवंत राहण्यासाठी धडपड करणं, इतकंच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळं लोक, त्यांच्या गरजांबद्दल चिंता करत बसतात. अर्थात, यांतील काही गरजा खऱ्या असतात आणि काही काल्पनिक असतात. ज्यांची खरोखर गरज नाही अशा गोष्टी काहीही करून मिळवण्याचा त्यांना ध्यास लागतो. ते कर्जबाजारी होतात. आणि, जो माणूस कर्ज घेतो तो कर्ज देणाऱ्याचा गुलाम बनतो, ही गोष्ट त्यांना जाणवते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.—नीतिसूत्रे २२:७, ईझी-टू-रीड व्हर्शन.

काही लोक असे निर्णय घेतात ज्याचे दुःखद परिणाम त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावे लागतात. पॉल म्हणतो: “आमच्या आजूबाजूचे किती तरी लोक, चार पैसे मिळतील म्हणून बाहेर देशी गेले. त्यांना वाटलं, तिकडं परिस्थिती चांगली आहे. मग काय, बायका-पोरं, नातेवाईक, मित्र यांना ते सोडून गेले. काही जण तर इमिग्रेशन पेपर्स नसतानाही बेकायदेशीर रीत्या गेले. पण त्यांना काम मिळालं नाही. पोलिसांबरोबर त्यांचा लपंडाव सुरू झाला. राहायला जागा नाही म्हणून ते रस्त्यांवरच झोपू लागले. देवावर त्यांनी भरवसा ठेवला असता तर देवानं त्यांनाही मदत केली असती. आम्ही मात्र, कुटुंब मिळून आणि देवाच्या मदतीनं येईल त्या परिस्थितीवर मात करायचं ठरवलं.”

येशूच्या सल्ल्याचं पालन

पॉल पुढं म्हणतो: “येशूनं म्हटलं, ‘उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे.’ आम्ही रोज इतकीच प्रार्थना करायचो: ‘आमची रोजची भाकर आज आम्हाला दे,’ म्हणजे आम्ही जिवंत राहू. आणि येशूनं वचन दिल्याप्रमाणं यहोवानं * खरोखरच आम्हाला रोजचं अन्न पुरवलं. हे अन्न नेहमीच आमच्या आवडीचं नव्हतं. तरीपण आम्ही कधी उपाशी झोपलो नाही. याचं उदाहरण देतो. आमच्या इथं कधीकधी अन्न पदार्थांचं वाटप व्हायचं. त्यावेळी लोक ते घेण्यासाठी रांगेनं उभे राहायचे. असंच एकदा, मी लोकांची एक रांग पाहिली. काय दिलं जात आहे ते मला माहीत नव्हतं. मीपण रांगेत जाऊन उभा राहिलो. माझा नंबर आल्यावर समजलं, की ते दही वाटत होते. मला दही आवडत नाही. पण ते अन्न होतं त्यामुळं त्या रात्री आम्ही नुसतं दही खाऊनच झोपलो. त्या हलाखीच्या परिस्थितीत देवानं मला आणि माझ्या कुटुंबाला कधीच उपाशी ठेवलं नाही, म्हणून मी त्याचे खूप आभार मानतो.” *

‘मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही.’ असं वचन यहोवा देव देतो.—इब्री लोकांस १३:५, ईझी-टू-रीड व्हर्शन.

“आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधरली आहे. पण आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो, की चिंतेवरील एकमात्र उपाय, देवावर भरवसा ठेवणं हाच आहे. जोपर्यंत तुम्ही यहोवाच्या इच्छेनुसार वागत राहाल तोपर्यंत तो तुमची काळजी घेईल. स्तोत्र ३४:८ मध्ये म्हटलं आहे: ‘[यहोवा] परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!’ हे वचन आमच्या बाबतीत खरं ठरलं. पुन्हा कधी आमच्यावर आर्थिक संकट आलंच तर आम्ही त्याला तोंड देऊ शकू, असं मला वाटतं.

देवाशी विश्वासू राहणाऱ्यांना तो त्यांची “रोजची भाकर” मिळवण्यास मदत करेल

“माणसाला खरंतर कामाची किंवा पैशाची इतकी गरज नसते जितकी अन्नाची असते, हे आम्हाला कळलं. आम्ही त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतोय जेव्हा, ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल,’ हे देवानं दिलेलं वचन पूर्ण होईल. पण तोपर्यंत आम्ही ‘अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त’ राहू. बायबलमधल्या आणखी एका वचनातून आम्हाला सांत्वन मिळतं: ‘तुमचं जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवानं असं म्हटलं आहे: मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही. म्हणून आम्ही धैर्याने म्हणतो, यहोवा माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही.’” *

पॉल आणि त्याच्या कुटुंबाप्रमाणं देवाबरोबर चालण्यासाठी खऱ्या विश्वासाची गरज आहे. (उत्पत्ति ६:९) आज किंवा भविष्यात आपल्यावर कोणतंही आर्थिक संकट कोसळलं तरी, पॉलकडून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. आपणही त्याच्याप्रमाणे विश्वास आणि व्यावहारिक ज्ञान किंवा बुद्धी दाखवू शकतो.

पण मग आपल्याला कौटुंबिक समस्यांची चिंता असेल तर काय? (w15-E 07/01)

^ परि. 9 यहोवा हे देवाचं नाव आहे जे बायबलमध्ये आहे.