मुख्य विषय | चांगल्या लोकांसोबत वाईट का होते?
चांगल्या लोकांसोबत वाईट होते—असे का?
देव सर्वात शक्तिशाली असून सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी, अगदी वाईट गोष्टींसाठीदेखील तोच जबाबदार आहे असे अनेकांना वाटते. पण, खरा देव यहोवा * याच्याबद्दल बायबल काय म्हणते ते विचारात घ्या:
-
“परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे.”—स्तोत्र १४५:१७.
-
“[देवाचे] सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४.
-
“प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे.”—याकोब ५:११.
देव वाईट गोष्टी घडवून आणत नाही. मग, तो इतरांना वाईट गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो का? मुळीच नाही. बायबल म्हणते: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये.” असे का? “कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही.” (याकोब १:१३) देव कोणालाही वाईट वागायला लावून त्याची परीक्षा घेत नाही. स्पष्टच आहे, की देव वाईट गोष्टी घडवून आणत नाही व इतरांनाही वाईट गोष्टी करण्यास प्रवृत्त करत नाही. तर मग, वाईट गोष्टींसाठी कोण किंवा काय जबाबदार आहे?
चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे
मानवांच्या जीवनात इतके दुःख का याचे एक कारण बायबलमध्ये दिले आहे: “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) आकस्मिक घटना घडतात किंवा अपघात होतात तेव्हा सहसा एक व्यक्ती त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्यावर त्याचा परिणाम होतो. याचे एक उदाहरण विचारात घ्या. सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने एका आपत्तीविषयी सांगितले होते. त्या आपत्तीत बुरूज कोसळून पडल्यामुळे १८ लोक दगावले होते. (लूक १३:१-५) या लोकांनी आपल्या जीवनात वाईट कृत्ये केली होती म्हणून त्यांचा बळी गेला असे नाही; तर बुरूज पडला तेव्हा ते त्या ठिकाणी होते केवळ या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता अलीकडच्या काळातील उदाहरण विचारात घ्या. जानेवारी २०१० मध्ये, हैटी या देशाला एका विनाशकारी भूकंपाचा तडाखा बसला. हैटी सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्यात तीन लाखांहून अधिक लोकांचे जीव गेले. या आपत्तीत चांगले-वाईट असे सर्वच प्रकारचे लोक दगावले. तसेच, आजारसुद्धा कधीही, कोणालाही होऊ शकतो.
देव चांगल्या लोकांचे आपत्तींपासून रक्षण का करत नाही?
काही जण म्हणतील: ‘देव अशा विनाशकारी आपत्ती रोखू शकला नसता का? चांगल्या लोकांचे तो आपत्तीपासून रक्षण करू शकला नसता का?’ करू शकला असता. पण मग त्याचा असा अर्थ होईल, की वाईट गोष्टी घडण्याआधीच देवाला त्या माहीत असतात. हे खरे, की पुढे काय होणार हे जाणून घेण्याची शक्ती देवाजवळ आहे. पण प्रश्न असा आहे: अशा वाईट गोष्टी जाणून घेण्यासाठी देव त्याच्या शक्तीचा अमर्यादपणे वापर करतो का?—यशया ४२:९.
बायबल म्हणते: “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो.” (स्तोत्र ११५:३) देवाजवळ सर्वकाही करण्याची शक्ती असली, तरी त्याला योग्य वाटते तेव्हाच तो त्याच्या शक्तीचा वापर करतो. पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याच्या बाबतीतही देव तेच करतो. उदाहरणार्थ, सदोम व गमोरा या प्राचीन शहरांत दुष्टाई बेसुमार वाढल्यानंतर देवाने कुलप्रमुख अब्राहाम याला म्हटले: “त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” (उत्पत्ति १८:२०, २१) यावरून दिसून येते, की त्या प्राचीन शहरांतील दुष्टाई किती व्यापक प्रमाणात वाढली होती हे देवाने आधीच जाणून घेतले नाही. स्पष्टच आहे, की यहोवा सर्वकाही आधीच जाणून घेत नाही. (उत्पत्ति २२:१२) पण याचा अर्थ, तो अपरिपूर्ण किंवा कमकुवत आहे असा होतो का? मुळीच नाही. उलट, “त्याची कृती परिपूर्ण” असल्यामुळे त्याचा उद्देश साध्य करण्यासाठी त्याला योग्य वाटते तेव्हाच तो पुढे घडणाऱ्या गोष्टी जाणून घेतो; मानवांनी एका विशिष्ट मार्गाचा अवलंब करावा म्हणून तो कधीही त्यांच्यावर दबाव टाकत नाही. * (अनुवाद ३२:४) यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? हाच की, पुढे होणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याच्या शक्तीचा देव निवडकपणे व त्याला योग्य वाटते तेव्हाच वापर करतो.
मानव जबाबदार आहे का?
जगातील दुष्टाईसाठी काही प्रमाणात मानव जबाबदार आहे. वाईट कृत्ये टप्प्याटप्प्याने कशी घडतात त्याकडे लक्ष द्या. बायबल म्हणते: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते.” (याकोब १:१४, १५) एक व्यक्ती चुकीच्या इच्छा-अभिलाषांच्या किंवा वासनांच्या आहारी जाते तेव्हा त्याचे दुष्परिणाम तिला हमखास भोगावे लागतात. (रोमकर ७:२१-२३) इतिहासावरून दिसून येते, की मानवांनी भयंकर कृत्ये करून कमालीचे दुःख ओढवून घेतले आहे. शिवाय, दुष्ट लोक इतरांना वाईट वागण्यास प्रवृत्त करून दुष्टाईला आणखी खतपाणी घालतात.—नीतिसूत्रे १:१०-१६.
मानवांनी भयंकर कृत्ये करून कमालीचे दुःख ओढवून घेतले आहे
देवाने लोकांना वाईट कृत्ये करण्यापासून रोखावे का? मानवाची निर्मिती कशी करण्यात आली त्याकडे लक्ष द्या. बायबल म्हणते, की देवाने मानवाला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात बनवले. दुसऱ्या शब्दांत, मानवाला देवासारखे बनवण्यात आले आहे. म्हणूनच, मानवामध्ये देवाचे गुण प्रदर्शित करण्याची क्षमता आहे. (उत्पत्ति १:२६) देवाने मानवाला इच्छा-स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करण्याद्वारे देवावर प्रेम करण्याची व त्याला एकनिष्ठ राहण्याची निवड मानव करू शकतो. (अनुवाद ३०:१९, २०) देवाने जर लोकांना विशिष्ट मार्गाने चालण्याची जबरदस्ती केली तर इच्छा-स्वातंत्र्याच्या देणगीचा काय उपयोग? मानवात आणि यंत्रात काय फरक राहील? ज्याप्रमाणे एखादे यंत्र विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेले असते अगदी त्याप्रमाणे मानवदेखील कार्य करेल. हीच गोष्ट नशिबाच्या किंवा भाग्याच्या बाबतीतही म्हणता येईल. नशिबात किंवा भाग्यात लिहिलेले असते तेच आपण करतो किंवा तेच आपल्या बाबतीत घडते असे जर आपण धरून चाललो तर इच्छा-स्वातंत्र्याच्या देणगीला काहीच अर्थ उरणार नाही. आपण किती आनंदी आहोत की देवाने आपल्याला आपला मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे! पण याचा अर्थ, मानवाच्या चुकांमुळे किंवा चुकीच्या निवडींमुळे होणारे दुष्परिणाम मानवजातीला कायम भोगावे लागतील असा होत नाही.
हे कर्माचे भोग आहेत का?
तुम्ही जर एखाद्या हिंदू किंवा बौद्ध धर्माच्या व्यक्तीला विचारले की, ‘चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं?’ तर तुम्हाला सहसा हेच उत्तर ऐकायला मिळेल: “सगळे कर्माचेच भोग असतात. मागच्या जन्मी जे केलं त्याचं फळ भोगावंच लागतं.”
कर्माविषयी बोलताना, मृत्यूबद्दल बायबल काय म्हणते ते विचारात घेणे गरजेचे आहे. निर्माणकर्त्याने एदेन बागेत पहिल्या मानवाची अर्थात आदामाची निर्मिती केली तेव्हा त्याला अशी आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) देवाने दिलेल्या या आज्ञेचे आदामाने उल्लंघन केले नसते तर तो सदासर्वकाळ जिवंत राहिला असता. पण, आदामाने त्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि त्याला मृत्युदंड मिळाला. पुढे आदाम व त्याची पत्नी हव्वा यांना मुले झाली तेव्हा, “सर्व माणसांमध्ये . . . मरण पसरले.” (रोमकर ५:१२) म्हणूनच, “पापाचे वेतन मरण आहे” असे म्हणता येईल. (रोमकर ६:२३) बायबल असेही म्हणते: “जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे.” (रोमकर ६:७) दुसऱ्या शब्दांत, मृत्यूनंतर लोकांना त्यांच्या पापांची किंमत मोजावी लागत नाही.
आज लक्षावधी लोकांचे असे म्हणणे आहे की मानवी दुःखाचे कारण कर्म आहे. कर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती सहसा स्वतःच्या किंवा इतरांच्या वाट्याला आलेल्या दुःखाचा बाऊ करत नाही. पण वास्तविक पाहता, ही शिकवण वाईट गोष्टी कायमच्या काढून टाकण्याची आशा देत नाही. असे मानले जाते, की दुःखापासून सुटका मिळवण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, चांगल्या आचरणाद्वारे व विशिष्ट ज्ञान घेण्याद्वारे पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होणे. अर्थात, या शिकवणींमध्ये व बायबलच्या शिकवणींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. *
दुष्टाईचे मूळ कारण
दुष्टाईचे मूळ कारण मानव नाही, तर दियाबल सैतान आहे. सैतान हा सुरुवातीला एक विश्वासू देवदूत होता. पण, “तो सत्यात टिकला नाही” आणि त्याच्यामुळेच जगात पाप आले. (योहान ८:४४) एदेन बागेत त्यानेच पहिल्या मानवी दांपत्याला देवाविरुद्ध बंड करण्यास उघुक्त केले. (उत्पत्ति ३:१-५) येशू ख्रिस्ताने त्याला ‘दुष्ट’ व “जगाचा अधिकारी” असे म्हटले. (मत्तय ६:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन; योहान १४:३०) आज मानवजात सैतानाच्याच पावलांवर पाऊल ठेवून चालत आहे; कारण तोच मानवांना यहोवाच्या चांगल्या मार्गांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करतो. (१ योहान २:१५, १६) १ योहान ५:१९ म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” पण, असेही काही आत्मिक प्राणी आहेत जे दुष्ट बनले व सैतानाला जाऊन मिळाले. बायबल म्हणते, की सैतान व त्याचे हे दुरात्मे “सर्व जगाला” फसवत आहेत आणि त्यामुळे पृथ्वीवर “अनर्थ ओढवला आहे.” (प्रकटीकरण १२:९, १२) म्हणूनच, जगातील दुष्टाईसाठी प्रामुख्याने दियाबल सैतान जबाबदार आहे.
तर मग स्पष्टच आहे, की लोकांसोबत वाईट गोष्टी घडतात त्यासाठी देव जबाबदार नाही. आणि तो लोकांना दुःखही देत नाही. त्याने तर उलट, मुळापासून दुष्टाई नाहीशी करण्याचे अभिवचन दिले आहे. त्याविषयी आपण पुढील लेखात वाचू या. (w14-E 07/01)
^ परि. 3 बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.
^ परि. 11 देवाने आजवर दुष्टाई का खपवून घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.
^ परि. 18 मृत्यूनंतर माणसाचे काय होते आणि मृत लोकांसाठी कोणती आशा आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ६ आणि ७ पाहा.