तुम्ही अदृश्य देवाला पाहू शकता का?
“दे व आत्मा आहे.” त्यामुळे मानव त्याला पाहू शकत नाही. (योहान ४:२४) असे असले तरी, काही लोकांनी एका अर्थी देवाला पाहिले असे बायबल म्हणते. (इब्री लोकांस ११:२७) हे कसे शक्य आहे? “अदृश्य” देवाला आपण खरेच पाहू शकतो का?—कलस्सैकर १:१५.
आपण आपल्या स्थितीची तुलना जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीशी करू या. एक व्यक्ती जन्मापासून अंध असली म्हणजे सभोवतालचे जग ती समजूच शकत नाही असे आहे का? नाही. अंध व्यक्ती निरनिराळ्या मार्गांनी माहिती मिळवत असते; त्या माहितीच्या साहाय्याने ती सभोवतालचे लोक, वस्तू व हालचाली समजून घेते. म्हणूनच एका अंध व्यक्तीने असे म्हटले, की ती “डोळ्यांनी नाही, तर मनाने पाहते.”
त्याचप्रमाणे आपण डोळ्यांनी देवाला पाहू शकत नसलो, तरी ‘अंतःकरणाच्या डोळ्यांनी’ त्याला नक्कीच पाहू शकतो. (इफिसकर १:१८; पं.र.भा.) अंतःकरणाच्या डोळ्यांनी देवाला पाहणे कसे शक्य आहे याचे तीन मार्ग आपण विचारात घेऊ या.
सृष्टीच्या निर्मितीवरून
एका अंध व्यक्तीची श्रवणशक्ती व स्पर्शज्ञान सहसा खूप तीक्ष्ण असते. त्यांच्या साहाय्याने ती न दिसणाऱ्या गोष्टी समजून घेत असते. त्याचप्रमाणे आपणसुद्धा सभोवतालचे जग पाहण्यासाठी आणि ते निर्माण करणाऱ्या अदृश्य देवाला पाहण्यासाठी आपल्या संवेदनांचा उपयोग करू शकतो. बायबल म्हणते: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.
आपल्या पृथ्वीग्रहाचाच विचार करा. पृथ्वीची रचना, मानवांचे केवळ अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नव्हे, तर त्यांना जीवनाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून अतिशय अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. वाऱ्याची मंद झुळूक किंवा सूर्याची उबदार किरणे आपल्या अंगाला स्पर्श करतात, रसाळ फळाची चव आपल्या जिभेवर रेंगाळते किंवा पक्ष्यांची मधुर गाणी आपल्या कानांवर पडतात तेव्हा आपले मन आनंदाने भरून जाते. सृष्टिकर्त्याने दिलेल्या या अनंत देणग्यांवरून त्याची विचारशीलता, कोमलता व उदारता दिसून येत नाही का?
आपण जेव्हा विश्वमंडळाचे अवलोकन करतो तेव्हा देवाबद्दल आपल्याला काय दिसून येते? एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते; ती म्हणजे देवाची शक्ती. अलीकडील वैज्ञानिक पुराव्यांवरून समजते की आपले विश्व कधी नव्हे इतक्या वेगाने विस्तारत आहे! रात्रीच्या वेळी तुम्ही आकाशात पाहता तेव्हा स्वतःला विचारा: अशी कोणती शक्ती आहे जी इतक्या वेगाने विश्वाचा विस्तार घडवून आणत आहे? बायबल म्हणते, की आपला निर्माणकर्ता “महासमर्थ” आहे. (यशया ४०:२६) देवाच्या सृष्टीवरून दिसून येते, की तो “सर्वसमर्थ” आहे; दुसऱ्या शब्दांत, “त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे.”—ईयोब ३७:२३.
येशूने देवाबद्दल सांगितले
दोन अंध मुलांची आई म्हणते: “अंध लोकांना शिकवण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे संवाद. तुम्ही जे काही पाहता, जे काही ऐकता ते सर्व त्यांना सांगत राहा [आणि घराबाहेर पडता तेव्हा] दिसणारी प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची तयारी ठेवा. ते तुमच्याच नजरेतून जग पाहत असतात.” त्याचप्रमाणे देवाला जरी कोणीही कधीच प्रत्यक्ष पाहिलेले नसले तरी देवाचा पुत्र, येशू जो “पित्याच्या घनिष्ठ सानिध्यात आहे . . . त्याने पित्याबद्दल आपल्याला सारे काही सांगितले आहे.” (योहान १:१८; सुबोधभाषांतर) येशू हा देवाची पहिली निर्मिती व त्याचा एकुलता एक पुत्र असल्यामुळे आपण त्याच्या “नजरेतून” स्वर्गातील गोष्टी पाहू शकतो. अदृश्य देवाबद्दल तोच आपल्याला सांगू शकतो.
पित्याच्या निकट सहवासात असंख्य युगे घालवलेल्या येशूने देवाबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी विचारात घ्या:
-
देव सतत काम करतो. “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे.”—योहान ५:१७.
-
देव आपल्या गरजा जाणतो. “तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.”—मत्तय ६:८.
- देव उदार मनाने आपल्या गरजा पूर्ण करतो. आपला स्वर्गातील पिता “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.”—
-
देव प्रत्येक व्यक्तीला मौल्यवान समजतो. “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”—मत्तय १०:२९-३१.
अदृश्य देवाचे प्रतिबिंब असलेला मनुष्य
ज्यांना डोळ्यांनी दिसते ते लोक ज्या प्रकारे गोष्टी समजून घेतात आणि अंध लोक ज्या प्रकारे गोष्टी समजून घेतात त्यात सहसा खूप फरक असतो. एका अंध व्यक्तीसाठी सावलीचा अर्थ सूर्यप्रकाश नसलेले अंधारे ठिकाण असा होत नाही; तर सूर्याच्या दाहापासून दूर असलेले थंडगार ठिकाण असा होऊ शकतो. ज्याप्रमाणे एक अंध व्यक्ती सावली किंवा सूर्यप्रकाश पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे आपणसुद्धा स्वतःच्या बळावर यहोवाला जाणू शकत नाही. म्हणूनच, यहोवाने एका मानवाची तरतूद केली. त्या मानवाने देवाचे गुण व व्यक्तिमत्त्व तंतोतंत प्रतिबिंबित केले.
तो मानव येशू होता. (फिलिप्पैकर २:७) त्याने आपल्या पित्याबद्दल फक्त सांगितलेच नाही, तर देव कसा आहे हे त्याने दाखवूनही दिले. येशूचा शिष्य फिलिप्प याने त्याला विचारले: “प्रभुजी आम्हाला पिता दाखवा.” त्यावर येशूने त्याला म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:८, ९) येशूच्या कार्यांवरून पित्याबद्दल आपल्याला काय “दिसते”?
येशू प्रेमळ व नम्र होता. शिवाय, कोणीही निःसंकोचपणे त्याच्याकडे जाऊ शकत होते. (मत्तय ११:२८-३०) त्याच्या या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वामुळे लोक सहज त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. येशूने इतरांचे दुःख आपले दुःख मानले; तसेच, तो इतरांच्या आनंदातही सहभागी झाला. (लूक १०:१७, २१; योहान ११:३२-३५) बायबलमधील येशूबद्दलचे वृत्तान्त तुम्ही वाचता किंवा ते ऐकता तेव्हा स्वतःला त्याच्या जागी ठेवा आणि त्या वृत्तान्तातील घटना जिवंत करा. येशू लोकांशी ज्या प्रकारे वागला त्यावर जर तुम्ही मनन केले तर देवाचे सुरेख व्यक्तिमत्त्व अधिक स्पष्टपणे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल.
डोळ्यांसमोर चित्र तयार करा
एक अंध व्यक्ती सभोवतालचे जग कसे जाणून घेते त्याबद्दल एक लेखिका म्हणते: “तिला निरनिराळ्या मार्गांनी (स्पर्श, गंध, श्रवण इत्यादी) थोडी-थोडी माहिती मिळते; ही सर्व माहिती ती कशीबशी एकत्र जोडते. त्यानंतर तिच्या मनात एक चित्र तयार होते.” त्याचप्रमाणे, तुम्ही देवाची सृष्टिकार्ये पाहता, येशूने त्याच्या पित्याबद्दल जे काही म्हटले ते वाचता आणि देवाचे गुण त्याने कसे प्रतिबिंबित केले याचे बारकाईने परीक्षण करता तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर यहोवाचे एक सुरेख चित्र तयार होईल. तुम्हाला तो अधिक खरा वाटू लागेल.
प्राचीन काळातील ईयोब नावाच्या व्यक्तीने नेमके हेच अनुभवले. सुरुवातीला तो जे काही बोलला त्याबद्दल तो म्हणतो की, “मला समजत नाही ते मी बोललो.” (ईयोब ४२:३) पण मग देवाच्या अद्भुत सृष्टिकार्यांचे त्याने जवळून परीक्षण केले तेव्हा तो असे म्हणण्यास प्रवृत्त झाला: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.”—ईयोब ४२:५.
तुम्ही यहोवाचा शोध घेतला तर तो तुम्हाला सापडेल
तुमच्याबाबतीतही हेच घडू शकते. बायबल म्हणते: “जर तू [यहोवाचा] शोध करशील तर तो तुला सापडेल.” (१ इतिहास २८:९; पं.र.भा.) अदृश्य देवाचा शोध घेण्यास व त्याच्या जवळ जाण्यास यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आनंदाने मदत करतील. ▪ (w14-E 07/01)