मुख्य विषय | मृत्यूमुळे सगळेच संपते का?
मृत्यूमुळे सगळेच संपत नाही!
बेथानी हे लहानसे गाव जेरूसलेमपासून ३ किलोमीटर अंतरावर वसलेले होते. (योहान ११:१८) येशूच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी या गावात एक दुःखद घटना घडली. लाजर नावाचा येशूचा एक जवळचा मित्र अचानक खूप आजारी पडला व मरण पावला.
येशूला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले की लाजर झोपला आहे आणि तो त्याला उठवणार आहे. (योहान ११:११) पण, येशूला नक्की काय म्हणायचे आहे हे त्याच्या शिष्यांना कळले नाही, तेव्हा येशू अगदी उघडपणे त्यांना म्हणाला: “लाजर मेला आहे.”—योहान ११:१४.
लाजराला कबरेत ठेवून चार दिवस उलटल्यानंतर येशू बेथानी गावात आला आणि लाजराची बहीण मार्था हिला सांत्वन देऊ लागला. मार्था त्याला म्हणाली: “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” (योहान ११:१७, २१) त्यावर येशू तिला म्हणाला: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.”—योहान ११:२५.
“लाजरा, बाहेर ये.”
येशूचे हे शब्द अगदी खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी तो कबरेच्या जवळ गेला आणि त्याने मोठ्याने हाक मारली: “लाजरा, बाहेर ये.” (योहान ११:४३) मरण पावलेला लाजर बाहेर आला तेव्हा हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
याआधी येशूने किमान दोन जणांना मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केले होते. एका प्रसंगी त्याने, याईर नावाच्या एका माणसाच्या मुलीला पुन्हा जिवंत केले. तिला जिवंत करण्याआधीसुद्धा त्याने असे म्हटले की ती झोपली आहे.—लूक ८:५२.
लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे लाजर व याईराची मुलगी हे मरण पावले होते, पण येशूने मृत्यूची तुलना झोपेशी केली होती. ही तुलना अगदी योग्य आहे. का? कारण एखादी व्यक्ती झोपेत असते तेव्हा तिला आसपास काय चालले आहे याची शुद्ध नसते. अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना होत नाहीत. (उपदेशक ९:५; “मृत्यू गाढ झोपेसारखा आहे,” ही चौकट पाहा.) मरण पावलेले लोक नेमक्या कोणत्या अवस्थेत असतात याबद्दल येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांना अगदी चांगल्या प्रकारे माहीत होते. एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलीजन अॅन्ड एथिक्स या पुस्तकात असे म्हटले आहे: “येशूचे अनुयायी मानायचे की मृत्यू हा झोपेप्रमाणे आहे आणि जे विश्वासात मरण पावले आहेत त्यांच्यासाठी कबर हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे.”
मरण पावलेले लोक कबरेत गाढ झोपलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही वेदना होत नाहीत हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! आता आपल्याला समजले आहे की आपण मरतो तेव्हा आपले काय होते, त्यामुळे आपण घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
“मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?”
आपल्या सर्वांना रात्री झोपायला खूप आवडते, पण कायमचे झोपायला कोणाला आवडेल? लाजर व याईराची मुलगी हे दोघे कायमचे झोपी गेले होते अर्थात मरण पावले होते. पण त्यांना पुन्हा जिवंत करण्यात आले. तर मग, मेलेले लोक जिवंत होतील अशी आशा आपणसुद्धा बाळगू शकतो का?
प्राचीन काळातील ईयोब नावाच्या एका मनुष्याला जेव्हा वाटले की तो मरण पावणार आहे तेव्हा त्याने असाच प्रश्न विचारला: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?”—ईयोब १४:१४.
सर्वशक्तिमान देवाला संबोधून ईयोबाने स्वतःच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले: “तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१५) ईयोबाला याची खात्री होती की यहोवा त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा तो त्याच्या विश्वासू सेवकाला पुन्हा जिवंत करेल. ईयोब एका अशक्य गोष्टीचे स्वप्न पाहत होता का? मुळीच नाही.
येशूने मरण पावलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले त्यावरून हे दिसून येते की देवाने येशूला मृत्यूवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य दिले आहे. बायबलमध्ये म्हटले आहे की येशूजवळ “अधोलोकाच्या किल्ल्या” आहेत. (प्रकटीकरण १:१८) येशूकडे लाजराला पुन्हा जिवंत करण्याचा जो अधिकार होता, त्याच अधिकाराचा उपयोग करून तो भविष्यात लोकांना पुन्हा जिवंत करेल.
मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल या अभिवचनाबद्दल बायबलमध्ये अनेक वेळा सांगण्यात आले आहे. एका देवदूताने संदेष्टा दानीएल याला असे आश्वासन दिले: “तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.” (दानीएल १२:१३) मरण पावलेले लोक पुन्हा जिवंत होऊ शकत नाहीत असा विश्वास करणाऱ्या सदूकी नावाच्या यहुदी धर्मपुढाऱ्यांना येशूने असे म्हटले: “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहा.” (मत्तय २२:२३, २९) प्रेषित पौलाने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरतो.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
मृत लोक केव्हा जिवंत होतील?
नीतिमानांना व अनीतिमानांना पुन्हा जिवंत केले जाईल असे जे म्हटले आहे ते केव्हा घडेल? एका देवदूताने नीतिमान असलेल्या दानीएलाला म्हटले की “युगाच्या समाप्तीस” त्याला पुन्हा जिवंत केले जाईल. मार्थालादेखील यावर विश्वास होता की तिचा भाऊ लाजर “शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल.”—योहान ११:२४.
बायबल शेवटल्या दिवसाचा संबंध ख्रिस्ताच्या राज्य शासनाशी जोडते. पौलाने लिहिले: “आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत [ख्रिस्ताला] राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” (१ करिंथकर १५:२५, २६) या ठोस कारणामुळे, आपण देवाचे राज्य यावे आणि या पृथ्वीवर त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी प्रार्थना केली पाहिजे. *
ईयोबाला माहीत होते की मृत लोकांना जिवंत करण्याची यहोवाची इच्छा आहे. असे घडेल तेव्हा मरण हे कायमचे नाहीसे होईल. आणि ‘मृत्यूमुळे सगळेच संपते का?’ असा प्रश्न कोणाच्याही मनात येणार नाही. ▪ (w14-E 01/01)
^ परि. 18 देवाच्या राज्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ८ पाहा. हे पुस्तक www.isa4310.com/mr वरदेखील उपलब्ध आहे.