मुख्य विषय | मृत्यूमुळे सगळेच संपते का?
मृत्यूमुळे होणाऱ्या वेदना
बऱ्याच लोकांना मृत्यूविषयी बोलायला आवडत नाही. असे असले, तरी कधी ना कधी आपल्या सर्वांनाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मृत्यूमुळे आपल्याला तीव्र व असह्य वेदना होतात.
मृत्यूमुळे आपल्या आईवडिलांना, विवाहसोबत्याला, मुलाला किंवा मुलीला गमावण्याच्या दुःखाला तोंड देण्यासाठी आपण कधीच पूर्णपणे तयार नसतो. मृत्यू हा एखाद्यावर अचानक झडप घालू शकतो किंवा एखाद्याला तो रोज तीळ-तीळ मारू शकतो. मृत्यूमुळे होणाऱ्या वेदना आपण टाळू शकत नाही आणि त्यामुळे होणारे परिणाम विनाशकारक ठरू शकतात.
ऑन्टोनयो, ज्यांच्या वडिलांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला, असे म्हणतात: “मृत्यू म्हणजे जणू कोणीतरी तुमच्या घराला कुलूप लावल्यासारखं आहे ज्याची किल्ली तुमच्याजवळ नाही. तुम्ही एका क्षणासाठीदेखील तुमच्या घरात जाऊ शकत नाही. तुमच्यासोबत राहतात त्या केवळ आठवणी. या नव्या वस्तुस्थितीला तुम्ही नाकारू शकत नाही. तुमच्यावर अन्याय झालाय असं तुम्हाला वाटत असलं, तरीही तुम्ही काहीही करू शकत नाही.”
डॉरथी यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यूमुळे आपल्या पतीला गमावले. त्यामुळे, मृत्यूनंतर काय होते याची उत्तरे शोधण्याचे त्यांनी ठरवले. त्या संडे-स्कूलमध्ये मुलांना बायबल शिकवायच्या; म्हणून मृत्यूनंतर सर्वकाही संपत नाही याची त्यांना जाणीव होती. पण, मृत्यूनंतर नेमके काय होते हे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी एका पाळकांना विचारले: “मृत्यूनंतर आपलं काय होतं?” ते पाळक म्हणाले: “मृत्यूनंतर नेमकं काय होतं हे कोणालाच माहीत नाही. ते जाणून घेण्यासाठी आपल्याला फक्त वाट पाहावी लागेल.”
आपण वाट पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही का? मृत्यूनंतर नेमके काय होते हे जाणून घेणे शक्य आहे का? (w14-E 01/01)