पिता-पुत्र कसे होऊ शकतात मित्र?
पिता-पुत्र कसे होऊ शकतात मित्र?
“पप्पा तुम्हाला कसं हो इतकं माहीत?” तुमच्या मुलाने कधी तुम्हाला असा प्रश्न विचारून तुम्हालाच आश्चर्यचकित केले आहे का? त्या वेळी तुम्हाला कदाचित एक पिता असल्याचा अभिमान वाटला असेल. पण तुमच्या मुलाने जर, तुम्ही दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचे पालन केले आणि त्यामुळे त्याला फायदा झाला, तर तुमचे हृदय आणखी आनंदाने ओतप्रोत भरले असेल, यात काही शंकाच नाही. *—नीति २३:१५, २४.
पण तुमचा मुलगा लहान असताना जसे तुमचे कौतुक करायचा तसे आजही करतो का? की, तो जसजसा मोठा होत चालला आहे तसतसे त्याच्या मनातील तुमच्याबद्दलचे कौतुक कमी होत चालल्यासारखे वाटत आहे? तुमचा मुलगा लहानाचा मोठा होऊन एक प्रौढ बनतो तेव्हाही तुम्ही त्याचा मित्र कसे राहू शकता? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याआधी आपण, पित्यांसमोर असलेल्या काही आव्हानांची चर्चा करू या.
तीन सर्वसामान्य आव्हाने
१. वेळेचा अभाव: बहुतेक राष्ट्रांत, पिताच कुटुंबात जास्त पैसा कमावून आणतो. बहुतेकदा असे होते, की नोकरीमुळे त्यांना घरी यायला उशीर होतो. काही ठिकाणी, पिता आपल्या मुलांबरोबर फार कमी वेळ घालवतात. जसे की, फ्रांसमध्ये अलीकडेच घेतलेल्या एका सर्व्हेत असे दिसून आले, की पिता आपल्या मुलांसोबत राहून त्यांची काळजी घेण्यात दिवसातून सरासरी १२ मिनिटांपेक्षा कमी वेळ घालवतात.
विचार करा: तुम्ही तुमच्या मुलाबरोबर किती वेळ घालवता? पुढील एक किंवा दोन आठवड्यांसाठी तुम्ही, तुमच्या मुलाबरोबर दररोज एकूण किती वेळ घालवता हे एका कागदावर लिहून ठेवू शकता. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर नेमका किती वेळ घालवता हे पाहून तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल.
२. स्वतःच्या वडिलांचा त्यांना आलेला अनुभव: काही पित्यांची त्यांच्या स्वतःच्या वडिलांबरोबर इतकी जवळीक नव्हती. फ्रांसमध्ये राहणारे झॉन-मार म्हणतात: “मी माझ्या बाबांबरोबर फार कमी बोलायचो.” याचा झॉन-मारवर काय परिणाम झाला? ते म्हणतात: “मी कधी कल्पनादेखील केली नव्हती अशा समस्या यामुळे निर्माण झाल्या. जसं की, आता मला माझ्या मुलांबरोबर अर्थभरीत संवाद साधायला जड जातं.” इतर काही पित्यांच्या बाबतीत पाहता, त्यांना त्यांच्या वडिलांचा स्वभाव अगदी चांगल्या प्रकारे माहीत होता, पण पिता पुत्रातील संबंध इतके घनिष्ठ नव्हते. ४३ वर्षांचे फिलिप म्हणतात: “माझ्या वडिलांना मला प्रेम दाखवायला जड जायचं. त्यामुळं मला माझ्या मुलाबद्दल असलेलं माझं प्रेम व्यक्त करण्याचा जास्त प्रयत्न करावा लागतो.”
विचार करा: तुमच्या वडिलांबरोबर तुमचा जसा संबंध आहे त्याचा परिणाम, तुम्ही तुमच्या मुलाला जसे वागवता त्यावर होतो, असे तुम्हाला वाटते का? तुमच्या वडिलांच्या चांगल्या किंवा वाईट सवयींचे तुम्हीदेखील अनायासे अनुकरण करत असल्याचे तुमच्या पाहण्यात आले आहे का? ते कसे?
३. समाजाचा प्रभाव: काही संस्कृतींमध्ये, मुलांचे संगोपन करण्याची पित्याचीदेखील भूमिका आहे, या गोष्टीला कमी लेखले जाते. “मी जिथं लहानाचा मोठा झालो, तिथं मुलांना सांभाळायचं काम बायकोचं आहे, असा लोकांचा समज होता,” असे
एका पश्चिम युरोपियन देशात वाढलेल्या लुका यांनी म्हटले. इतर संस्कृतींमधील पित्यांना, त्यांनी कडक असले पाहिजे, त्यांनी मुलांबरोबर मजा करू नये असे त्यांना उत्तेजन दिले जाते. जसे की, जॉर्ज एका आफ्रिकन देशात लहानाचे मोठे झाले. ते म्हणतात: “आमच्या समाजात पिता कधीच आपल्या मुलांबरोबर खेळत नाहीत. अशानं पित्याचा दबदबा कमी होईल, असं लोक मानतात. त्यामुळं आता मला माझ्या मुलाबरोबर मजा-मस्ती करायला जड जातं.”विचार करा: तुमच्या समाजात, पित्यांची काय भूमिका असली पाहिजे, असे अपेक्षिले जाते? मुलांना सांभाळायचे काम हे स्त्रीचे आहे, असे त्यांना शिकवले जाते का? आपल्या मुलांना प्रेम व आपुलकी व्यक्त करण्याचे त्यांना उत्तेजन दिले जाते, की या कल्पनांबद्दल नापसंती व्यक्त केली जाते?
तुम्ही जर एक पिता असाल व वर उल्लेखण्यात आलेली एक किंवा अधिक आव्हाने तुमच्यासमोरसुद्धा असतील तर तुम्ही या आव्हानांवर कशा प्रकारे मात करू शकता? पुढे काही सल्ले दिले आहेत ज्यावर तुम्ही विचार करू शकता.
लहान वयातच सुरुवात करा
मुलांमध्ये आपल्या पित्याचे अनुकरण करण्याची जन्मापासूनच इच्छा असते, असे दिसून आले आहे. यास्तव, तुमचा मुलगा लहान आहे तेव्हापासूनच त्याच्या या इच्छेला खतपाणी घाला. हे तुम्ही कसे करू शकता? आणि त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्ही केव्हा वेळ काढू शकता?
शक्य असते तेव्हा तेव्हा आपल्या मुलाला, तुमच्या दररोजच्या कामांमध्ये तुमच्यासोबत घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही घरात काही काम करत असाल तर त्याला तुम्हाला मदत करू द्या. त्याच्या हातात एखादा लहान झाडू किंवा मग बागकाम करत असाल तर लहानसे फावडे द्या. त्याचा हिरो व रोल मॉडल असलेल्या त्याच्या वडिलांबरोबर काम करायला त्याला नक्कीच खूप आनंद होईल! ते काम संपवायला जरा जास्त वेळ लागला तरी चालेल; पण अशाने तुमच्यातील बंधन आणखी मजबूत होईल आणि तुम्ही त्याला कामाची चांगली सवय लावू शकाल. हजारो वर्षांपूर्वी बायबलमध्ये पित्यांना दररोजच्या कामांत आपल्या मुलांनाही सामील करण्याचे व त्यांच्याबरोबर संवाद साधण्याकरता, त्यांना काही गोष्टी शिकवण्याकरता अशा प्रसंगांचा उपयोग करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. (अनुवाद ६:६-९) हा सल्ला आजही तितकाच उपयुक्त आहे.
तुमच्या मुलाबरोबर काम करण्याव्यतिरिक्त तुम्ही त्याच्याबरोबर खेळण्यासाठीसुद्धा वेळ काढला पाहिजे. खेळ खेळल्याने, तुम्ही दोघे एकत्र मिळून फक्त आनंदच लुटत नाही तर त्याचा आणखीही फायदा होतो. पिता जेव्हा आपल्या मुलांबरोबर खेळतात तेव्हा ते त्यांना साहसी व धाडसी होण्याचे उत्तेजन देत असतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे.
पिता-पुत्राने एकमेकांबरोबर खेळल्याने आणखी एक महत्त्वाचा उद्देश साध्य होतो. “खेळ खेळत असताना एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर उत्तम प्रकारे संवाद साधतो,” असे संशोधक मिशल फिझ म्हणतात. खेळताना एक पिता आपल्या शब्दांतून व कार्यांतून मुलाबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करू शकतो. असे करून तो त्याच्या मुलावर, आपुलकी व प्रेम व्यक्त करण्याचे धडे गिरवत असतो. जर्मनीत राहणारे ऑन्द्रे म्हणतात: “माझा मुलगा लहान होता तेव्हा आम्ही बहुतेकदा एकत्र खेळायचो. खेळताखेळता मी त्याला मिठी मारायचो, आणि तोही मग त्याचं प्रेम व्यक्त करायला शिकला.”
एक पिता आपल्या पुत्राबरोबरचे आपले बंधन आणखी एका प्रसंगी मजबूत करू शकतो. म्हणजे रात्री मुलगा झोपायला जातो तेव्हा पिता त्याला दररोज एक गोष्ट वाचून दाखवू शकतो, दिवसभरात झालेल्या मजेशीर गोष्टी, किंवा त्याच्यासमोर काही समस्या आल्या असतील तर त्या तो ऐकून घेऊ शकतो. असे केल्यास त्याचा मुलगा मोठा होत असताना पित्याबरोबर खुल्या मनाने दळणवळण करत राहील.
समान आवडी-निवडी जोपासण्याचा प्रयत्न करा
पिता आपल्या मुलांबरोबर खुले संवाद साधायचा प्रयत्न करत असेल, पण पौगंडावस्थेत असलेल्या त्याच्या मुलांना कदाचित त्याच्याबरोबर बोलण्यात काही रस नसेल. तुमचा मुलगा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला टंगळमंगळ करत असेल तर, तो तुमच्याबरोबर काही बोलू इच्छित नाही, असा निष्कर्ष काढू नका. तुम्ही त्याच्याबरोबर ज्या प्रकारे संवाद साधता त्यात जर फेरबदल केला तर कदाचित तो तुमच्याशी बोलू लागेल.
फ्रांसमध्ये राहणारे जॅक यांना कधीकधी आपला मुलगा जेरोम याच्याबरोबर संवाद साधणे कठीण वाटत होते. पण त्याला बळजबरीने बोलते करण्याऐवजी त्यांनी स्वतःत बदल केला. ते त्याच्याबरोबर फुटबॉल खेळू लागले. “खेळल्यानंतर आम्ही दोघं गवतावर बसून आराम करत असू. त्या वेळेला पुष्कळदा माझा मुलगा मला त्याच्या मनातल्या गोष्टी सांगायचा. आम्ही दोघं एकत्र होतो आणि मला वाटतं, की तो माझ्याबरोबर एकांतात वेळ घालवू शकतो, याची त्याला जाणीव झाल्यामुळं आमच्यात एक खास प्रकारचं नातं निर्माण झालं.”
पण समजा तुमच्या मुलाला खेळ आवडत नसतील तर? ऑन्द्रे यांना ते दिवस आठवतात जेव्हा त्यांनी आपल्या मुलाबरोबर रात्रीच्या वेळी आकाशातील ताऱ्यांकडे बघत तास न् तास घालवले. ते म्हणतात: “आम्ही रात्रीच्या वेळी, बाहेर आराम खुर्च्या टाकायचो. हवेत गारवा असल्यामुळं आम्ही स्वतःभोवती उबदार यशया ४०:२५, २६.
शाली गुंडाळून, हातात मस्त वाफाळणाऱ्या चहाचा कप घेऊन त्या आराम खुर्चीवर पडून आकाशाकडे बघायचो. ताऱ्यांची सृष्टी करणाऱ्याबद्दल आम्ही बोलायचो. स्वतःबद्दल बोलायचो. जवळजवळ सगळ्याच विषयांवर बोलायचो.”—पण तुमच्या मुलाला आवडत असलेल्या गोष्टी तुम्हालाच करायला आवडत नसतील तर काय? अशा वेळी तुम्हाला तुमच्या आवडी-निवडींना बाजूला ठेवावे लागेल. (फिलिप्पैकर २:४) दक्षिण आफ्रिकातील ईअन म्हणतात: “मला स्पोर्ट्समध्ये खूप आवड होती; पण माझा मुलगा वॉन याला मुळीच नव्हती. त्याला विमानं, कंप्युटर आवडायचे. त्यामुळं मग मी पण माझ्यात त्या गोष्टींची आवड निर्माण केली, मी त्याला हवाई शोला घेऊन जायचो, कंप्युटरवर विमान चालवण्याचे गेम्स खेळायचो. आम्ही दोघंही असं गमतीशीर खेळ खेळत असल्यामुळं वॉन माझ्याबरोबर निसंकोचपणे बोलू शकला.”
त्याचा आत्मविश्वास वाढवा
“पप्पा, बघा मी काय केलं ते!” तुमचा मुलगा लहान असताना त्याने पहिल्यांदा तुम्हाला एक नवीन गोष्ट करून दाखवली तेव्हा तो असाच ओरडला असेल, नाही का? आता तो एक किशोरवयीन असेल; आताही तो तुम्हाला अशाच खुल्या मनाने हाक मारून तुमची संमती मिळवण्याचा प्रयत्न करतो का? कदाचित नसेल. पण त्याने जर एक जबाबदार प्रौढ झाले पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्याने विनासंकोच तुमची संमती मिळवली पाहिजे.
यहोवा देवाने आपल्या एका पुत्राशी वागताना कोणते उदाहरण मांडले ते पाहा. येशू पृथ्वीवर त्याच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात करणार होता तेव्हा देवाने येशूबद्दल त्याला असलेले प्रेम सर्वांसमक्ष व्यक्त केले. तो म्हणाला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७; ५:४८) तुमच्या मुलाला शिस्त लावण्याचे, त्याला शिकवण्याचे तुमचे कर्तव्य आहे, हे कबूल आहे. (इफिसकर ६:४) पण तुमच्या मुलाने केलेल्या किंवा त्याने म्हटलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल तुमची संमती व्यक्त करण्यासाठीसुद्धा तुम्ही संधी शोधता का?
काही पुरुषांना, संमती व आपुलकी व्यक्त करायला कठीण वाटेल. ते अशा कुटुंबात लहानाचे मोठे झाले असतील जेथे पालकांनी, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींपेक्षा त्यांच्या चुकाच जास्त दाखवल्या होत्या. असे तुमच्याबाबतीत झाले असेल तर तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याकरता तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे तुम्ही कसे करू शकता? आधी उल्लेख करण्यात आलेले लुका, मॅन्यूएल नावाच्या आपल्या १५ वर्षीय मुलाला नेहमी, घरातील कामे करताना सोबत घेतात. ते म्हणतात: “कधीकधी मी मॅन्यूएलला एक काम देऊन टाकतो आणि त्याला सांगतो, की जर त्याला माझी मदत लागली तर मी येईन. पण पुष्कळदा तो एकटाच ते काम पूर्ण करतो. ते काम त्यानं यशस्वी रीत्या पार पाडलं म्हणून त्याला समाधान मिळतं, शिवाय त्याचा आत्मविश्वासही वाढतो. काम चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्यावर मी त्याची स्तुती करतो. एखादं काम केल्यावर तो खूश नसला तरी मी, त्यानं केलेल्या प्रयत्नांची स्तुती करतो.”
जीवनात मोठी ध्येये साध्य करण्यास मदत करूनही तुम्ही तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू शकता. पण तुमचा मुलगा, एखादे ध्येय गाठण्यासाठी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लावत असेल तर? किंवा, तुमच्या मुलाची ध्येये, जी वाईट नाहीत, पण ती तुमच्या ध्येयांपेक्षा वेगळी आहेत, मग काय? अशा वेळी, तुम्हाला तुमच्या अपेक्षांचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल. लेखात आधी उल्लेख करण्यात आलेले जॅक म्हणतात: “मी माझ्या मुलाला, साध्य करण्याजोगी ध्येये ठेवण्यास मदत करतो. पण ही ध्येये त्याची आहेत, माझी नव्हेत, हेही पाहतो. आणि मग स्वतःला आठवण करून देतो, की त्याने त्याच्या गतीने त्याची ध्येये साध्य केली पाहिजेत.” तुम्ही जर तुमच्या मुलाची मते ऐकून घेतली, तो जे काही उत्तम रीत्या करतो त्याच्याबद्दल त्याची स्तुती केली आणि अपयशांवर मात करायचे त्याला उत्तेजन दिले तर तुम्ही त्याला त्याची ध्येये साध्य करण्यास मदत करू शकता.
खरे पाहता, तुमच्या नातेसंबंधात अधूनमधून तणाव येईल, किंवा तुमच्यासमोर नवीन आव्हाने येतील. तरीसुद्धा तुमच्या मुलाला तुमच्याजवळ राहावेसे वाटेल. कारण तुम्ही त्याला यशस्वी होण्यास मदत करू इच्छिता. आणि अशा प्रेमळ वडिलांपासून कोणत्या मुलाला दूर जावेसे वाटेल? (w११-E ११/०१)
[तळटीप]
^ परि. 2 या लेखात पिता व पुत्र यांच्यात असलेल्या अनोख्या बंधनाची चर्चा करण्यात आलेली असली तरी, लेखातील तत्त्वे पिता व मुलगी यांच्या नातेसंबंधांनादेखील लागू होतात.