व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

म्हातारे पुन्हा तरुण होतील तेव्हा

म्हातारे पुन्हा तरुण होतील तेव्हा

देवाच्या जवळ या

म्हातारे पुन्हा तरुण होतील तेव्हा

सुरकुतलेली त्वचा, अंधूक दृष्टी, बहिरेपण व लटपटणारे पाय हे सर्व म्हातारपणाचे परिणाम. हे कोणाला आवडतात? कोणालाच नाही. तेव्हा मनात प्रश्‍न येतो, की ‘म्हातारपणाचे हे भयानक परिणाम भोगायचे होते तर मग देवाने आपल्याला, सळसळत्या तारुण्याचा उपभोग कशाला करू दिला?’ पण आपण म्हातारे व्हावे असा देवाचा मुळीच उद्देश नव्हता. त्यामुळे त्याने, म्हातारपणातून आपली सुटका करण्यासाठी एक प्रेमळ योजना केली आहे. बायबलमधील ईयोब नावाच्या पुस्तकाच्या ३३ व्या अध्यायाच्या २४ आणि २५ वचनात कुलपिता ईयोबाने काय म्हटले ते पाहा.

ईयोबाच्या परिस्थितीचा विचार करा. यहोवाचे त्याच्यावर खूप प्रेम होते कारण तो एकनिष्ठ होता. पण सैतानाने ईयोबाच्या एकनिष्ठेवर सवाल केला. तो देवाची सेवा स्वार्थी कारणांसाठी करतोय, असा त्याने त्याच्यावर आरोप लावला. पण यहोवाला ईयोबावर पूर्ण भरवसा होता. म्हणून त्याने सैतानाला ईयोबाची परीक्षा घेण्याची परवानगी दिली. ईयोबावर येणारे संकट काढण्याची ताकद असल्यामुळेसुद्धा यहोवाने सैतानाला ईयोबाची परीक्षा घेऊ दिली. यहोवा आणि सैतानामध्ये जे चालले होते त्यातले ईयोबाला काही एक माहीत नव्हते. सैतानाने मग “ईयोबास मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पीडिले.” (ईयोब २:७) त्याच्या शरीरात किडे पडले, त्याच्या त्वचेवर मोठमोठे फोड आले, ते काळवंडले आणि फुटून त्याच्या खपल्या पडल्या. (ईयोब ७:५; ३०:१७, ३०) ईयोबाला हे सर्व सहन करताना किती यातना होत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता का? एवढे सर्व होऊनही ईयोब यहोवाशी विश्‍वासू राहिला. तो म्हणाला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.”—ईयोब २७:५.

अर्थात, ईयोबाच्या हातून एक गंभीर चूकदेखील झाली. आपले आता काही खरे नाही, असे जेव्हा त्याला जाणवले तेव्हा त्याला स्वतःची जास्त काळजी वाटू लागली. ‘देवाला न्यायी ठरवण्याच्या ऐवजी त्याने स्वतःला न्यायी ठरवले.’ (ईयोब ३२:२, पं.र.भा.) तेव्हा, देवाच्या वतीने बोलणाऱ्‍या अलीहूने ईयोबाला त्याची चूक दाखवून दिली. देवाकडून आलेला एक आशादायक संदेश अलीहूने ईयोबाला सांगितला: “याला खाचेत उतरण्यापासून सोडीव, मला खंडणी मिळाली आहे. त्याचा देह बालकाच्यापेक्षा टवटवीत होईल, आणि तो पुनः आपल्या तरुणपणाच्या दिवसांत येईल.” (ईयोब ३३:२४, २५) हे ऐकून ईयोबाला बरे होण्याची आशा मिळाली असेल. मृत्यू येईपर्यंत त्याला यातना सहन कराव्या लागणार नव्हत्या. ईयोबाने जर पश्‍चात्ताप केला तर देव त्याच्यावतीने दिली जाणारी खंडणी स्वीकारून त्याला त्याच्या संकटांतून मुक्‍त करणार होता. *

अलीहूने जेव्हा ईयोबाची चूक त्याच्या ध्यानात आणून दिली तेव्हा ईयोबाने नम्रपणे ती स्वीकारली व पश्‍चात्ताप केला. (ईयोब ४२:६) आणि यहोवानेदेखील ईयोबाच्या वतीने दिलेली खंडणी, त्याचे पाप झाकण्यासाठी स्वीकारली. यामुळे, ईयोबाला पुन्हा त्याचे आरोग्य मिळवून देऊन त्याला त्याच्या एकनिष्ठेबद्दलचे प्रतिफळ देण्याकरता यहोवाने एक मार्ग उघडला. यहोवाने “ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्‍न केले.” (ईयोब ४२:१२-१७) ईयोबाला त्याने गमावलेले सर्व दुप्पट मिळाले. त्याच्या अंगावरचे किळसवाणे फोड नाहीसे होऊन त्याची त्वचा जेव्हा, ‘बालकाच्या त्वचेपेक्षाही’ टवटवीत झाली तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल, याची कल्पना करा!

ईयोबाच्या वतीने देवाने स्वीकारलेल्या खंडणीचे मूल्य फक्‍त काही काळापुरतेच होते कारण ईयोब अपरिपूर्ण होता आणि नंतर तो मरण पावला. परंतु आज आपल्या सर्वांसाठी एक उत्तम खंडणी उपलब्ध आहे. यहोवाने आपल्या सर्वांसाठी आपला पुत्र येशू याचे खंडणी बलिदान दिले. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना, पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे. या नवीन जगात देव विश्‍वासू मानवांना म्हातारपणापासून मुक्‍त करणार आहे. म्हातारे पुन्हा तरुण होतील आणि ‘बालकाच्या त्वचेपेक्षाही’ त्यांची त्वचा टवटवीत होईल तो काळ पाहता यावा म्हणून आपण आता काय करू शकतो याबद्दल तुम्हाला अधिक शिकून घ्यायचे आहे का? (w११-E ०४/०१)

[तळटीप]

^ या वचनामध्ये वापरलेल्या “खंडणी” या शब्दाचा अर्थ, “झाकणे” असा होतो. ईयोबाला, एखाद्या पशूचे अर्पण करून खंडणी द्यावी लागणार होती आणि ईयोबाचे पाप झाकण्याकरता देव या अर्पणाचा स्वीकार करणार होता.—ईयोब १:५.