कौटुंबिक जीवनाविषयी
येशू काय शिकवतो
कौटुंबिक जीवनाविषयी
लग्नाविषयी कोणता दृष्टिकोन बाळगल्याने कुटुंबे आनंदी होतात?
विवाह पवित्र बंधन आहे. घटस्फोट घेणे योग्य आहे का असे विचारल्यावर येशूने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. . . . जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” (मत्तय १९:४-६, ९) वैवाहिक जोडपी येशूने दिलेल्या सल्ल्याचे पालन करतात व एकमेकांशी विश्वासू राहतात तेव्हा कुटुंबातील सर्वांना सुरक्षित वाटते आणि ते आनंदी राहतात.
देवावर प्रेम केल्यास कुटुंबे आनंदी का होतात?
येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” आणि हिच्यासारखीच दुसरी आज्ञा कोणती आहे? येशूने याविषयी असे म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्यावर [तुझ्यासोबत राहणाऱ्यांवर अर्थात तुझ्या कुटुंबावर] स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३७-३९) तेव्हा, देवाबरोबर चांगला नातेसंबंध असणे ही कौटुंबिक सौख्यानंदाची गुरूकिल्ली आहे. कारण, आपले देवावर प्रेम असेल तरच आपण एकमेकांवर प्रेम करू शकतो.
पती व पत्नी एकमेकांना आनंदी कसे करू शकतात?
येशूच्या आदर्शाचे पालन करून पती आपल्या पत्नीला आनंदी करू शकतो. येशूने आपल्या लाक्षणिक पत्नीला अर्थात ख्रिस्ती मंडळीला आत्म-त्यागी प्रेम दाखवले. (इफिसकर ५:२५) त्याने म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास . . . आला.” (मत्तय २०:२८) येशूला ज्यांची काळजी घ्यायची होती त्यांच्याशी तो हुकूमशाहीने किंवा कठोरपणे कधीच वागला नाही. उलट त्याच्या सहवासात लोकांना विसावा मिळत असे. (मत्तय ११:२८) पतींनी अशाच प्रकारे आपले मस्तकपण चालवले पाहिजे. त्यांच्या अधिकाराचा घरातल्या सर्वांना फायदा झाला पाहिजे.
पत्नींनासुद्धा येशूच्या आदर्शाचे फायदे होऊ शकतात. बायबलमध्ये म्हटले आहे, की “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) देवाच्या अधीन राहण्यास येशूला कमीपणाचे वाटले नाही. उलट आपल्या पित्याबद्दल त्याच्या मनात गाढ आदर होता. “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो,” असे येशूने म्हटले. (योहान ८:२९) देवाबद्दल मनात प्रेम व आदर बाळगून पत्नी आपल्या पतीच्या अधिकारपदाच्या अधीन राहते तेव्हा तिचे कौटुंबिक जीवन आनंदी बनते.
मुलांबद्दल असलेल्या येशूच्या दृष्टिकोनापासून पालक काय शिकू शकतात?
येशूने मुलांबरोबर वेळ घालवला. त्यांचे विचार, त्यांच्या भावना जाणून घेण्यास तो उत्सुक होता. बायबलमध्ये त्याच्याविषयी असे म्हटले, की ‘त्याने बाळकांस आपणाजवळ बोलाविले आणि म्हटले, बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या.’ (लूक १८:१५, १६) एकदा काही लोक येशूची स्तुती करणाऱ्या मुलांना रागवत होते तेव्हा येशूने या मुलांचे कौतुक केले आणि त्यांना रागावणाऱ्यांना म्हटले: “बाळके व तान्ही मुले ह्यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”—मत्तय २१:१५, १६.
मुले येशूकडून काय शिकू शकतात?
आध्यात्मिक गोष्टींत रस घेण्याच्या बाबतीत येशूने मुलांपुढे एक चांगले उदाहरण मांडले. तो जेव्हा १२ वर्षांचा होता तेव्हा एकदा, “मंदिरात गुरूजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रवचन करताना सापडला.” याचा परिणाम काय झाला? “त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले.” (लूक २:४२, ४६, ४७) येशूला इतके ज्ञान होते तरीपण तो गर्विष्ठ बनला नाही. उलट, त्याच्या पालकांबद्दल त्याच्या मनात आदर वाढला. बायबल म्हणते, की तो “त्यांच्या आज्ञेत राहिला.”—लूक २:५१. (w०९-E ११/०१)
अधिक माहितीकरता बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा १४ वा अध्याय पाहा. *
[तळटीप]
^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.