व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्त त्याने दिलेला संदेश आणि तुम्ही

येशू ख्रिस्त त्याने दिलेला संदेश आणि तुम्ही

येशू ख्रिस्त त्याने दिलेला संदेश आणि तुम्ही

“मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” —योहान १०:१०.

येशू ख्रिस्त, लोकांकडून काही घेण्यासाठी नव्हे तर त्यांना काहीतरी देण्यासाठी प्रामुख्याने पृथ्वीवर आला होता. आपल्या सेवेद्वारे त्याने मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली. देव आणि त्याची इच्छा यांबद्दलच्या सत्याचा संदेश त्याने दिला. जे लोक हा संदेश ऐकून तो स्वीकारतात त्यांचे जीवन उत्तम प्रतीचे बनते. लाखो खरे ख्रिस्ती याची ग्वाही देऊ शकतात. * पण येशूने प्रचार केलेल्या संदेशाचा गाभा किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या सर्वांकरता एका अमूल्य देणगीप्रमाणे आहे. ती देणगी म्हणजे, त्याने आपल्यासाठी दिलेले त्याच्या परिपूर्ण जीवनाचे अर्पण! त्याच्या संदेशातल्या या मुख्य गोष्टीला आपण जसा प्रतिसाद देऊ त्यावर आपले भवितव्य अवलंबून आहे.

देवाने व ख्रिस्ताने काय दिले? शत्रूंच्या हातून आपल्याला यातनामय मृत्यू सहन करावा लागणार आहे हे येशूला माहीत होते. (मत्तय २०:१७-१९) तरीपण योहान ३:१६ या अगदी सुपरिचित वचनात त्याने असे म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” येशूने असेही म्हटले, की तो “पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव द्यायला [अर्थात अर्पण करायला] आला आहे.” (मत्तय २०:२८, पं.र.भा.) लोक माझा जीव घेतील असे नव्हे तर मी स्वतःहून तो द्यायला आलो आहे, असे त्याने का म्हटले?

पाप आणि त्याचे उपजत परिणाम अर्थात अपरिपूर्णता आणि मृत्यू यांपासून मानवांची सुटका व्हावी म्हणून देवाने अपार प्रेमाने प्रेरित होऊन एक तरतूद केली. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करण्यासाठी त्याला पृथ्वीवर पाठवले. येशू आपल्याखातर स्वेच्छेने त्याचे परिपूर्ण जीवन अर्पण करण्यासाठी तयार झाला. या तरतुदीला खंडणी म्हटले जाते. देवाने मानवजातीला दिलेली ही सर्वात अमूल्य देणगी आहे. * या देणगीमुळे सार्वकालिक जीवन मिळू शकते.

तुम्ही काय केले पाहिजे येशूचे खंडणी बलिदान हे वैयक्‍तिक रीत्या तुमच्यासाठी आहे का? ते तुमच्यासाठी आहे किंवा नाही हे तुम्हाला ठरवावे लागेल. समजा, कोणी तुम्हाला एक भेटवस्तू देत आहे. जोपर्यंत तुम्ही हात पुढे करून ती भेटवस्तू तुमच्या हातात घेत नाही तोपर्यंत ती भेटवस्तू तुमची होत नाही. अशाच रीतीने, यहोवा खंडणीची देणगी तुम्हाला देत आहे पण जोपर्यंत तुम्ही ती स्वीकारत नाही तोपर्यंत ती तुमची होत नाही. म्हणजे तुम्ही नेमके काय केले पाहिजे?

येशूने म्हटले, की जे कोणी त्याच्यावर ‘विश्‍वास ठेवतील’ त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. तुम्ही ज्या प्रकारे जगता त्यावरून तुमचा येशूवर विश्‍वास आहे हे दिसून येईल. (याकोब २:२६) येशूवर विश्‍वास करणे म्हणजे, त्याने सांगितलेल्या व आचरलेल्या गोष्टींनुसार आपले जीवन जुळवणे. असे करण्याकरता तुम्ही आधी येशू आणि त्याचा पिता यांना चांगल्या प्रकारे ओळखले पाहिजे, अर्थात त्यांचे ज्ञान घेतले पाहिजे. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने लोकांना एक असा संदेश दिला ज्यामुळे संपूर्ण जगातील कोट्यवधी लोकांचे जीवन पार बदलून गेले. तो संदेश काय आहे आणि तुम्हाला व तुमच्या प्रिय जनांना फक्‍त आत्तापुरताच नव्हे तर सदासर्वकाळ त्याचा फायदा कसा होऊ शकतो हे जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे का? यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला याबाबतीत मदत करायला आवडेल.

यानंतरचे लेख तुम्हाला, तुमचे जीवन कायमचे बदलणारा संदेश देणाऱ्‍या मनुष्याची अर्थात येशू ख्रिस्ताची आणखी ओळख करून देतील. (w१०-E ०४/०१)

[तळटीपा]

^ परि. 3 ख्रिस्ती असल्याचा दावा करणारा प्रत्येक जण, येशू ख्रिस्ताचा सच्चा अनुयायी नाही. देव आणि त्याची इच्छा यांबद्दलच्या सत्यानुसार जगत असलेले लोकच त्याचे सच्चे अनुयायी आहेत.—मत्तय ७:२१-२३.

^ परि. 5 शास्त्रवचनावर आधारित असलेल्या खंडणीच्या शिकवणीच्या अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील “खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट” हा अध्याय ५ पाहा.