व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू आद्यदेवदूत मीखाएल आहे का?

येशू आद्यदेवदूत मीखाएल आहे का?

वाचक विचारतात . . .

येशू आद्यदेवदूत मीखाएल आहे का?

▪ या प्रश्‍नाचे सरळसोपे उत्तर होय असे आहे. एकाच व्यक्‍तीला एकापेक्षा अधिक नावे देण्याची प्रथा अनेक संस्कृतींमध्ये दिसून येते. बायबलमधील नावांच्याबाबतीतही हेच खरे होते. उदाहरणार्थ, कुलपिता याकोब याचे दुसरे नाव इस्राएल होते. (उत्पत्ति ३५:१०) बायबलच्या मूळ लिखाणात, प्रेषित पेत्राची पाच वेगवेगळी नावे आहेत. जसे की सिमियोन, शिमोन, पेत्र, केफा आणि शिमोन पेत्र. (मत्तय १०:२; १६:१६; योहान १:४२; प्रेषितांची कृत्ये १५:७, १४) पण मीखाएल हे येशूचेच दुसरे नाव आहे, हे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो? खाली दिलेल्या बायबलमधील पुराव्याचा विचार करा.

बायबलमध्ये मीखाएल या शक्‍तिशाली आत्मिक प्राण्याबद्दल पाच उल्लेख आढळतात. यांपैकीचे तीन उल्लेख दानीएलाच्या पुस्तकात आहेत. दानीएल १०:१३, २१ मध्ये आपण, ‘मुख्य अधिपतींपैकी एक’ असलेला व “तुमचा अधिपति” म्हटलेला मीखाएल याने, कामगिरीसाठी पाठवलेल्या एका देवदूताची सुटका केल्याचे वाचतो. नंतर दानीएल १२:१ मध्ये आपण, अंतसमयात “लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपति जो मीखाएल तो उठेल,” असे वाचतो.

त्यानंतर प्रकटीकरण १२:७ मध्ये मीखाएलचा आणखी उल्लेख आढळतो. यामध्ये त्याचे वर्णन, “मीखाएल व त्याचे दूत” एक अतिशय मोठे युद्ध करत असल्याचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. या युद्धात, दियाबल सैतान व त्याच्या दुष्ट दूतांना स्वर्गातून खाली टाकण्यात आले.

वर उल्लेख करण्यात आलेल्या प्रत्येक घटनेत मीखाएलचे वर्णन देवाच्या लोकांसाठी लढणारा व त्यांचे रक्षण करणारा असे करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर यहोवाचा कडवा शत्रू, सैतान याचाही सामना करणारा योद्धा देवदूत म्हणून त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

यहूदाच्या ९ व्या वचनात त्याला “आद्यदेवदूत” मीखाएल असे म्हटले आहे. बायबलमध्ये “आद्यदेवदूत” हा शब्द अनेकवचनी कधीही वापरण्यात आलेला नाही. आद्यदेवदूत असा आणखी एक उल्लेख १ थेस्सलनीकाकर ४:१६ या वचनात करण्यात आला आहे. या वचनात, पुन्हा जिवंत करण्यात आलेल्या येशूचे वर्णन पौलाने पुढीलप्रमाणे केले: “आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु [येशू] स्वतः स्वर्गातून उतरेल.” यास्तव, येथे येशू ख्रिस्ताला आद्यदेवदूत किंवा प्रमुख देवदूत असे म्हटलेले आहे.

यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? हाच, की येशू ख्रिस्तच आद्यदेवदूत मीखाएल आहे. मीखाएल (म्हणजे “यहोवासमान कोण आहे?”) आणि येशू (म्हणजे “यहोवाकडून तारण आहे”) ही दोन्ही नावे, देवाच्या सार्वभौमत्त्वाची घोषणा करण्यात पुढाकार घेण्याच्या त्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतात. फिलिप्पैकर २:९ मध्ये म्हटले आहे: “देवाने त्याला [महिमावान येशूला] अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले.”

येशूचा पृथ्वीवर मानव म्हणून जन्म झाला तेव्हा ती त्याच्या जीवनाची सुरुवात नव्हती, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. येशूचा जन्म होण्याआधी एक देवदूत मरीयेला येऊन सांगतो, की ती पवित्र आत्म्याच्या साहाय्याने गरोदर राहील व तिने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवावे. (लूक १:३१) आपल्या सेवेदरम्यान येशूने मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी तो स्वर्गात असल्याचा अनेकदा उल्लेख केला.—योहान ३:१३, ८:२३, ५८.

यास्तव, आद्यदेवदूत मीखाएल हा पृथ्वीवर येण्याआधीचा येशूच आहे. येशूला पुन्हा जिवंत केल्यावर तो स्वर्गात गेला तेव्हा त्याने मीखाएल अर्थात प्रमुख देवदूत म्हणून ‘देवपित्याचे गौरव’ करण्याचे काम पुन्हा सुरु केले.—फिलिप्पैकर २:११. (w१०-E ०४/०१)