काल्पनिक विरुद्ध वास्तविक येशूबद्दलचे सत्य
काल्पनिक विरुद्ध वास्तविक येशूबद्दलचे सत्य
तुम्हाला काय वाटते? खाली सांगितलेल्या गोष्टी वास्तविक आहेत की काल्पनिक?
येशूचा जन्म डिसेंबर २५ रोजी झाला होता.
येशूच्या जन्माच्या वेळी तीन विद्यावान लोक त्याला भेटायला आले होते.
येशूला भावंडे नव्हती.
येशू देवाचा अवतार होता.
येशू फक्त एक सत्पुरुषच नव्हता.
वरील सर्व विधाने वास्तविक आहेत असेच बहुतेक लोक म्हणतील. इतर जण म्हणतील, की येशूबद्दलची खरी माहिती मिळणे कठीण आहे, कदाचित अशक्यच आहे. त्यांच्या मते, येशूवर तुमचा विश्वास असेल तर वरील विधाने वास्तविक असोत अथवा काल्पनिक, काही फरक पडत नाही.
परंतु बायबलमध्ये असे सांगितलेले नाही. बायबलमध्ये आपल्याला, ‘आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याची ओळख’ करून घेण्याचे अर्थात त्याच्याबद्दलचे अचूक ज्ञान घेण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. (२ पेत्र १:८) शुभवर्तमान अहवालांचे परीक्षण करून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो. शुभवर्तमान अहवालांत येशूची सत्य माहिती दिली आहे. यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलच्या वास्तविक आणि काल्पनिक समजुतीतला फरक दिसून येतो. वर सांगितलेल्या लोकांच्या समजुतींविषयी शुभवर्तमान अहवाल आपल्याला काय सांगतात त्यांचे आता आपण परीक्षण करून बघू या.
समजूत: येशूचा जन्म डिसेंबर २५ रोजी झाला होता.
वास्तविक की काल्पनिक: काल्पनिक.
येशूचा जन्म कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या दिवशी झाला होता याबद्दलचा स्पष्ट उल्लेख बायबलमध्ये कोठेही आढळत नाही. मग डिसेंबर २५ ही तारीख आली कोठून? द एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकानुसार, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या काहींची ‘अशी इच्छा होती, की येशूची जन्म तारीख मूर्तीपूजक रोमी सणाच्या दिवसाशी जुळावी. या दक्षिणायनाच्या काळादरम्यान रोमी लोक सूर्याची उपासना करायचे. या दक्षिणायनाच्या काळानंतर दिवस पुन्हा मोठे होऊ लागतात व सूर्य अधिकाधिक उत्तरेस वर जाऊ लागतो.’ त्याच संदर्भ ग्रंथात पुढे असे म्हटले आहे, की नाताळ सणाच्या वेळी आचरल्या जाणाऱ्या अनेक प्रथांचा उगम, “हिवाळ्याच्या मध्य काळात, मूर्तीपूजक लोक कृषी व ग्रहताऱ्यांच्या प्रीत्यर्थ करत असलेल्या सणांतून झाला आहे.”
* (लूक २२:१९) यावरून स्पष्ट होते, की येशूची अशी इच्छा होती, की आपण त्याच्या वाढदिवसाला नव्हे तर त्याच्या बलिदानरूपी मृत्यूच्या मूल्याला अधिक महत्त्व द्यावे.—मत्तय २०:२८.
डिसेंबर २५ रोजी येशूचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे त्याला आवडत असावे का? विचार करा: येशूची जन्म तारीख कोणालाच माहीत नाही. आपण येशूचा वाढदिवस साजरा करावा अशी बायबलमध्ये कोठेही आज्ञा देण्यात आलेली नाही किंवा आरंभीच्या ख्रिश्चनांनी तो साजरा केल्याचा बायबलमध्ये कोठेही उल्लेख नाही. उलट, बायबलमध्ये येशूचा मृत्यू ज्या दिवशी झाला ती तारीख दिली आहे आणि त्याने आपल्या अनुयायांना त्याच्या मृत्यूचा दिवस साजरा करण्याची आज्ञा दिली.समजूत: येशूच्या जन्माच्या वेळी तीन विद्यावान लोक (किंवा काही विश्वासांनुसार, तीन राजे) त्याला भेटायला आले होते.
वास्तविक की काल्पनिक: काल्पनिक.
तुम्ही कदाचित, बाळ येशू गव्हाणीत असलेली चित्रे किंवा भेटवस्तू घेऊन आलेले तीन विद्यावान पुरुष त्याच्याभोवती उभे असलेले देखावे पाहिले असावेत. ही चित्रे किंवा हे देखावे खरेतर वास्तविक नव्हे तर काल्पनिक आहेत.
हे खरे आहे, की येशू एक बालक होता तेव्हा पूर्वेकडून त्याला भेटायला काही लोक आले होते. हे लोक मागी म्हणजे ज्योतिषी होते. (मत्तय २:१) आणि ते आले तेव्हा येशू गव्हाणीत होता का? नाही, तो एका घरात होता. म्हणजेच, ते येशूचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी आले होते.—मत्तय २:९-११.
बरे, आता पाहू या की किती लोक येशूला भेटायला आले होते; २, ३ की ३०. बायबल याबद्दल काही सांगत नाही. या लोकांनी येशूला दिलेल्या तीन भेटवस्तूंवरून कदाचित अशी समजूत निघाली असावी, की त्याला तीन जण भेटायला आले होते. * (मत्तय २:११) काही लोक तर असेही म्हणतात, की येशूला भेटायला आलेले हे विद्यावान म्हटले जाणारे पुरुष, मानवजातीच्या वेगवेगळ्या कुळांना सूचित करतात. पण ही समजूतही बायबलवर आधारित नाही. उलट, या काल्पनिक समजुतीचा जन्म, “कल्पनाचित्र रंगवण्यात हुशार असलेल्या एका आठव्या शतकातील इतिहासकाराच्या डोक्यातून” झाला, असे शुभवर्तमानांवरील एका टिपणीत म्हटले आहे.
समजूत: येशूला भावंडे नव्हती.
वास्तविक की काल्पनिक: काल्पनिक.
येशूला भावंडे असल्याचा स्पष्ट उल्लेख शुभवर्तमान अहवालांत करण्यात आला आहे. लूकच्या शुभवर्तमान अहवालात येशूला मरीयेचा “प्रथमपुत्र” असे म्हटले आहे; यावरून असे सूचित होते, की मरीयेला नंतर इतरही मुले झाली. * (लूक २:७) मार्कच्या शुभवर्तमानात असा उल्लेख केलेला आहे, की नासरेथ शहरातील काहींनी येशूला, तो कोणी महान नव्हे तर त्याच्या भावंडांप्रमाणेच आहे असे लेखले. त्यांनी असे विचारले: “याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि त्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?”—मार्क ६:३; मत्तय १२:४६; योहान ७:५.
शुभवर्तमान अहवालांत सत्य माहिती दिलेली असली तरी धर्मशास्त्राचा अभ्यास करणारे पुष्कळ जण याच समजुतीवर अडून आहेत, की येशूला भावंडे नव्हती. काहींचे असे म्हणणे आहे, की शुभवर्तमानांत उल्लेखलेली येशूची भावंडे खरेतर त्याची सख्खी नव्हे तर त्याची चुलत, आते किंवा मावस भावंडे होती. * आणि काहीतर असेही म्हणतात, की येशूची भावंडे मरीयेची सावत्र मुले होती. पण आता विचार करा: जर येशू मरीयेचा एकुलता एक पुत्र असता तर आपण आधी नासरेथकरांनी म्हटल्याचे जे वाचले ते त्यांनी म्हटले असते का? उलट, काहींनी तर मरीयेला इतर मुलांच्या वेळीही गरोदर असताना आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांना चांगले माहीत होते, की येशू हा मरीयेला झालेल्या इतर मुलांप्रमाणेच एक होता.
समजूत: येशू देवाचा अवतार होता.
वास्तविक की काल्पनिक: काल्पनिक.
देव पृथ्वीवर आला आणि येशू या नावाने तो मानव म्हणून वावरत होता ही त्रैक्याच्या शिकवणीतील मुख्य कल्पना अनेक काळापासून प्रचलित आहे. पण येशू पृथ्वीवर असताना
त्रैक्याच्या शिकवणीची सुरुवात झाली नाही. उलट, “त्रैक्य हा शब्द किंवा त्रैक्याची शिकवण नवीन करारात कोठेच आढळत नाही. . . . ही शिकवण अनेक शतकांनंतर हळूहळू व अनेक वादविवादांनंतर उदयास आली,” असे द एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यामध्ये म्हटले आहे.देवाने मानवरूप धारण केले अशी शिकवण देऊन खरेतर धर्म येशूचा अपमान करतात. * ते कसे? पुढील उदाहरणाचा विचार करा. काही कामगार त्यांच्या सुपरवायझरला एक विनंती करतात. पण, ती विनंती मान्य करण्याचा अधिकार माझ्याजवळ नाही, असे तो सुपरवायझर त्यांना सांगतो. सुपरवायझरचे बोलणे खरे असेल तर तो त्याच्या वागण्यावरून दाखवतो, की त्याला स्वतःच्या मर्यादांची जाणीव आहे. पण जर तो खोटे बोलत असेल, म्हणजे कामगारांची विनंती मान्य करण्याचा त्याला अधिकार असतानाही, आपण ती मान्य करू शकत नाही असे फक्त तो बोलत असेल तर याचा अर्थ तो लबाड आहे.
येशूच्या दोन प्रेषितांनी त्याला, त्यांना अधिकार पदावर नेमण्याची विनंती केली तेव्हा त्याने त्यांना काय उत्तर दिले? त्याने त्यांना म्हटले: “माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” (मत्तय २०:२३) जर येशू खरोखरच देव असता तर याचा अर्थ तो खोटे बोलत होता, नाही का? पण, आपल्याजवळ हा अधिकार नसून देवाकडे आहे असे म्हणून येशूने नम्रतेच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण मांडले, हो ना? तो देवाच्या तुल्य नाही हे त्याने स्पष्टपणे दाखवून दिले.
समजूत: येशू फक्त एक सत्पुरुषच नव्हता.
वास्तविक की काल्पनिक: वास्तविक.
मी फक्त एक सत्पुरुष आहे, असे येशूने म्हटले नाही, तर “मी देवाचा पुत्र आहे,” असे त्याने स्पष्टपणे सांगितले. (योहान १०:३६) अर्थात कोणीही स्वतःला देवाचा पुत्र म्हणवून घेऊ शकला असता. पण जर येशूचा दावा खोटा असता तर तो कोण ठरला असता? तो एक सत्पुरुष नव्हे तर महाठग ठरला असता!
येशू देवाचा पुत्र होता याची स्वतः देवाने पुष्टी दिली जिच्यावर आपण भरवसा ठेवू शकतो. दोनदा त्याने येशूविषयी असे म्हटले: “हा माझा पुत्र” आहे. (मत्तय ३:१७; १७:५) आता विचार करा: देवाचा आवाज पृथ्वीवर ऐकू आला अशा मोजक्याच प्रसंगांचा बायबलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे; आणि त्यातल्या दोन प्रसंगी त्याने येशू आपला पुत्र असल्याचे कबूल केले! आपण कोण आहोत याबद्दल येशूने जे म्हटले त्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे!
या लेखामुळे तुम्हाला येशूबद्दलच्या काही वास्तविक गोष्टी समजल्या का ज्या तुम्हाला आधी माहीत नव्हत्या? जर असे आहे, तर शुभवर्तमान अहवालांचे आणखी परीक्षण करून पाहायला काय हरकत आहे? हा अभ्यास तुम्हाला आवडेलही आणि तुम्हाला त्याचा फायदाही होईल. कारण येशूनेही असे म्हटले होते, की त्याच्याबद्दल आणि त्याच्या पित्याबद्दलचे सत्य जाणून घेतल्यावर “सार्वकालिक जीवन” मिळू शकेल!—योहान १७:३. (w१०-E ०४/०१)
[तळटीपा]
^ परि. 13 यहुदी कालगणनेनुसार, येशूचा मृत्यू वल्हांडणाच्या दिवशी किंवा निसान १४ रोजी झाला होता.—मत्तय २६:२.
^ परि. 18 येशूला भेटायला आलेल्या या विदेशांनी, “आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून” येशूला “सोने, ऊद व गंधरस” भेट म्हणून दिल्या. मोलामहागाच्या या भेटवस्तू योसेफ व मरीयेला अगदी वेळेवर मिळाल्या होत्या असे म्हणता येईल, कारण ते गरीब होते आणि लवकरच त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जावे लागले.—मत्तय २:११-१५.
^ परि. 21 येशूची गर्भधारणा एका चमत्काराने झाली होती. पण मरीयेची बाकीची मुले तिला तिचा नवरा योसेफ याच्याकडून झाली होती.—मत्तय १:२५.
^ परि. 22 मरीया आयुष्यभर कुमारी राहिली ही सा.यु. ३८३ च्या सुमारास जेरोमने सुरू केलेली समजूत आजही अनेक लोक मानतात. जेरोमने नंतर, त्याला स्वतःला या सिद्धांताविषयी शंका वाटत असल्याचे कबूल केले असले तरी, या शिकवणीने अनेकांच्या मनात आणि कॅथलिक चर्चच्या धर्मशिकवणीत कायमचे घर केले.
^ परि. 26 त्रैक्याच्या शिकवणीबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे २०१-२०४ वरील परिशिष्ट पाहा.
[१४ पानांवरील चौकट/चित्रे]
तुम्हाला थक्क करणाऱ्या आणखी काही वास्तविक गोष्टी
येशू मानव म्हणून या पृथ्वीवर होता तेव्हा तो कसा होता? तो एखाद्या साधूसारखा किंवा थंड आणि तुटक स्वभावाचा होता का ज्यामुळे साधेसुधे लोक त्याच्याजवळ येऊ शकत नव्हते? होय, तो असाच होता असे काही जण म्हणतील. पण मग येशूबद्दल पुढे सांगितलेल्या गोष्टी जेव्हा त्यांना समजतील तेव्हा त्यांना आश्चर्य वाटेल, की . . .
• येशू आनंदाच्या प्रसंगांना हजर राहिला होता.—योहान २:१-११.
• येशूने लोकांची स्तुती केली.—मार्क १४:६-९.
• येशूला मुलांबरोबर वेळ घालवायला आवडायचे.—मार्क १०:१३, १४.
• येशू सर्वांसमक्ष रडला.—योहान ११:३५.
• येशूला लोकांचा कळवळा आला.—मार्क १:४०, ४१.