व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृतांची भीती वाटते का तुम्हाला?

मृतांची भीती वाटते का तुम्हाला?

मृतांची भीती वाटते का तुम्हाला?

“नाही. त्यांना का घाबरायचं?” असे उत्तर अनेक जण देतात. मृतांचे खरोखरच अस्तित्व मिटलेले असते. पण, कोट्यवधी लोक असे मानत नाहीत. ते असे मानतात, की मृत्यूनंतरही मानवाचे अदृश्‍य अस्तित्व राहते; यांना पितर असे संबोधले जाते.

पश्‍चिम आफ्रिकेतील बेनीन येथे, पुष्कळ लोक असा विश्‍वास करतात, की पितर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची हत्या करण्याकरता पुन्हा येतात. या पितरांना तृप्त करण्यासाठी लोक कर्ज काढून किंवा मालमत्ता विकून प्राण्यांची अर्पणे व विधी करतात. काही लोक जादूटोणा करतात. मनुष्य मेल्यावर त्याच्या शरीरातला एक भाग जिवंत राहतो व तो जिवंत असलेल्यांबरोबर संपर्क साधू शकतो, ही कल्पनाही जादूटोण्यात आहे. काही लोकांना भीतीदायक अनुभव आले आहेत. पितरांकडूनच त्यांना हे अनुभव आलेत, असे ते मानतात.

असाच एक अनुभव अग्बूला यांचा आहे. बेनीन व नायजेरियाच्या सीमेजवळ हे गृहस्थ राहतात. ते म्हणतात: “आमच्या भागात जादूटोणा खूप चालतो. कोणी मेलं तर त्याला आंघोळ घालण्याची प्रथा आहे. पुढील आत्मिक क्षेत्रात जाण्यास ते जणू काय त्याला तयार करतात. मी सहसा काय करायचो, आंघोळ घालून झाल्यावर उरलेला तो साबण गोळा करायचो व त्यात काही पानं घालून त्यांचं मिश्रण तयार करायचो. मी शिकारही करायचो. शिकार करायच्या आधी मी ते मिश्रण माझ्या बंदुकीला लावायचो आणि मग मला ज्या प्राण्याची शिकार करायची आहे ते मोठ्याने बोलून गोळी झाडायचो. आमच्याकडे अशा गोष्टी सर्रास चालतात व त्या अनेकदा खऱ्‍याही ठरतात. पण जादूटोण्यातले काही प्रकार मात्र भीतीदायक होते.

“माझ्या दोन मुलांचा जेव्हा अचानक मृत्यू झाला तेव्हा कोणीतरी माझ्यावर करणी तर केली नसावी, अशी माझ्या मनात शंका आली. म्हणून मग मी, एका म्हाताऱ्‍या माणसाकडे गेलो. त्याच्याजवळ अलौकिक शक्‍ती आहे, असे बहुतेक लोक मानायचे. माझ्या मनातली शंका खरी होती. त्यानं म्हटलं, की माझी मुलं, आत्मिक जगात थांबून आहेत. व त्यांच्या मारेकऱ्‍याचा मृत्यू झाल्यानंतर ते त्याचे चाकर बनतील. हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं. बरं, माझी पीडा इथंच थांबणार नव्हती. माझ्या तिसऱ्‍या मुलाचाही असाच दारुण अंत होणार आहे, हेही त्यानं सांगितलं. या म्हाताऱ्‍यानं सांगितल्याप्रमाणे खरंच, काही दिवसांनी माझा तिसरा मुलगाही दगावला.”

या घटनेनंतर, अग्बूला यांची ओळख जॉनबरोबर झाली. जॉन यहोवाचा साक्षीदार आहे व तो शेजारच्या नायजेरियात राहतो. जॉनने बायबलमधून मृतांची खरी अवस्था काय असते हे समजावून सांगितले. हे स्पष्टीकरण ऐकून अग्बूला यांचे जीवनच बदलले. बायबलमधल्या माहितीने तुमचेही जीवन बदलू शकते.

मृत खरोखरच जिवंत आहेत का?

या प्रश्‍नाचे योग्य उत्तर कोण देऊ शकेल? अर्थात कोणताही मानव, मग त्याच्याजवळ कितीही अलौकिक शक्‍ती असली तरीसुद्धा या प्रश्‍नाचे योग्य उत्तर देऊ शकत नाही. तर, ज्याने ‘आकाशात व पृथ्वीवर असलेल्या, दृश्‍य व अदृश्‍य’ गोष्टी बनवल्या तो जीवनदाता, यहोवा देवच या प्रश्‍नाचे योग्य उत्तर देऊ शकतो. (कलस्सैकर १:१६) आत्मिक क्षेत्रात राहण्याकरता त्याने देवदूतांची निर्मिती केली आणि पृथ्वीवर राहण्याकरता त्याने मानव व प्राण्यांची निर्मिती केली. (स्तोत्र १०४:४, २३, २४) सर्व जिवंत प्राणी त्याच्यावर अवलंबून आहेत. (प्रकटीकरण ४:११) तेव्हा, देवाचे वचन बायबल मृत्यूविषयी काय शिकवण देते ते आपण पाहू या.

यहोवाने सर्वात आधी मृत्यूचा उल्लेख केला. आदाम आणि हव्वेला त्याने अशी ताकीद दिली, की त्यांनी जर त्याच्या आज्ञेचे पालन केले नाही तर ते मरतील. (उत्पत्ति २:१७) म्हणजे काय? यहोवाने म्हटले: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) म्हणजे, मृत्यू झाल्यावर शरीराची पुन्हा माती होते व जीवन नष्ट होते.

आदाम व हव्वेने जाणूनबुजून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले त्यामुळे त्यांना मृत्यूदंड मिळाला. पण त्यांचा मृत्यू होण्याआधी त्यांचा मुलगा हाबेल याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मोठ्या मुलाने, काईनाने हाबेलाला ठार मारले होते. (उत्पत्ति ४:८) पण आपला मृत भाऊ हाबेल आपला सूड उगवेल, अशी काईनाला भीती नव्हती. उलट, जिवंत लोक आपल्याला सोडणार नाही, अशी भीती त्याच्या मनात होती.—उत्पत्ति ४:१०-१६.

अनेक शतकांनंतर फलज्योतीषींनी जेव्हा हेरोद राजाला त्याच्या राज्यात, “यहूद्यांचा राजा” जन्माला आला आहे, असे सांगितले तेव्हा तो खूपच संतापला. हा आपला प्रतिस्पर्धी बनेल, अशी हेरोदाला भीती वाटली म्हणून त्याने या नवीन राजाला ठार मारण्यासाठी एक कट रचला. बेथलेहेमेतील दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे असलेल्या सर्व मुलग्यांची हत्या करण्याचा त्याने हुकूम काढला. पण एका देवदूताने योसेफाला, येशू व मरिया यांना घेऊन “मिसर देशास पळून जा,” असे सांगितले.—मत्तय २:१-१६.

हेरोदचा मृत्यू झाल्यानंतर देवदूताने योसेफला पुन्हा इस्राएलाच्या देशात जाण्यास सांगितले, कारण “बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहात होते ते मरून गेले [होते].” (मत्तय २:१९, २०) देवदूत जो स्वतः एक आत्मिक व्यक्‍ती होता त्याला माहीत होते, की हेरोद मरण पावल्यामुळे तो येशूच्या केसांनाही धक्का लावू शकत नाही. शिवाय योसेफालाही मृत राजा हेरोदाची भीती वाटली नाही. त्याला फक्‍त हेरोदाचा जिवंत असलेला मुलगा अर्खेंलाव याची भीती वाटत होती. कारण तो जुलूमी असल्यामुळे काहीही करू शकत होता. म्हणून योसेफ आपले कुटुंब घेऊन अर्खेंलावाचा अधिकार नसलेल्या प्रदेशात अर्थात गालीलात स्थायिक झाला.—मत्तय २:२२.

या अहवालांवरून आपल्याला कळते, की मृतांमध्ये काहीही करण्याची शक्‍ती नसते. पण मग, अग्बूला व इतरांना आलेल्या अनुभवांबद्दल काय?

“भुते” किंवा दुरात्मे

मोठा झाल्यावर येशूने दुरात्म्यांचा सामना केला. तो येशू आहे हे दुरात्म्यांनी ओळखून त्याला ‘देवाचा पुत्र’ असे संबोधले. येशूनेही त्यांना ओळखले. ते मेलेल्या लोकांचे आत्मे नव्हते. उलट येशूने त्यांना “भुते” किंवा दुरात्मे म्हटले.—मत्तय ८:२९-३१; १०:८; मार्क ५:८.

बायबलमध्ये, देवाशी एकनिष्ठ राहिलेल्या व त्याच्याविरुद्ध बंड केलेल्या आत्मिक प्राण्यांविषयी अर्थात देवदूतांविषयी सांगितलेले आहे. बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की यहोवाने आदाम व हव्वेला एदेन बागेतून हाकलून लावल्यानंतर, एदेन बागेची राखण करण्याकरता तिच्या पूर्व भागी करुब किंवा देवदूतांना ठेवले. (उत्पत्ति ३:२४) यावेळी पहिल्यांदाच मानव आत्मिक प्राण्यांना पाहू शकत होते.

काही वर्षांनंतर, अनेक देवदूत मानवी देह धारण करून पृथ्वीवर आले. यहोवाने त्यांना पृथ्वीवर कोणत्याही कामासाठी पाठवले नव्हते. तर ते स्वतःहूनच स्वर्गातील ‘आपले वसतिस्थान सोडून’ आले होते. (यहूदा ६) ते एका स्वार्थी कारणासाठी पृथ्वीवर आले होते. त्यांनी पृथ्वीवरील स्त्रियांशी संग केला व या स्त्रियांनी अनैसर्गिक संततीला जन्म दिला ज्यांना नेफलीम हे नाव पडले. या नेफलीमने व त्यांच्या बंडखोर बापांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. त्यांच्यामुळे पृथ्वीवर हिंसाचाराला व इतर गैरप्रकारांना ऊत आला. (उत्पत्ति ६:१-५) या सर्वावर उपाय म्हणून यहोवा देवाने नोहाच्या दिवसांत संपूर्ण पृथ्वीवर एक जलप्रलय आणला. जलप्रलयात दुष्ट लोकांचा आणि नेफलीमांचा नाश झाला. पण त्या बंडखोर देवदूतांचे काय झाले?

जलप्रलयामुळे या देवदूतांनी, आपले मानवी देह टाकून पुन्हा आत्मिक जगात प्रवेश करायचा प्रयत्न केला. पण यहोवाने त्यांना त्यांचे पहिले “अधिकारपद” घेऊ दिले नाही. (यहूदा ६) बायबल म्हणते: “ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांस नरकांत [“टार्टरसात,” तळटीप] टाकले आणि न्यायनिवाड्याकरिताराखून अंधकारमय खाड्यात ठेवले.”—२ पेत्र २:४.

टार्टरस हे खरोखरचे ठिकाण नाही. तर ते, तुरुंगासारख्या बंदिस्त अवस्थेस सूचित करते. टार्टरसात टाकलेल्यांना कोणत्याही कार्यहालचाली करता येत नाहीत. या देवदूतांच्या कार्यहालचालींवर बंधन घालण्यात आल्यामुळे त्यांना पुन्हा मानवी शरीरे धारण करता येऊ शकत नाही. पण त्यांच्याकडे असलेल्या शक्‍तीच्या जोरावर ते लोकांच्या मनावर व जीवनावर बराच प्रभाव पाडू शकतात. ते मनुष्यांच्या व प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. (मत्तय १२:४३-४५; लूक ८:२७-३३) मृतांचे पितर असल्याचा आव आणून ते मनुष्यांना फसवतात. का फसवतात? यहोवाला संतुष्ट करणाऱ्‍या मार्गाने लोकांनी त्याची उपासना करू नये व मृतांच्या अवस्थेविषयी गोंधळून जावे, म्हणून ते लोकांना फसवतात.

भीतीवर मात कशी करता येईल?

लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेल्या अग्बूला यांना, मृत्यूविषयी व दुरात्म्यांविषयी बायबलमध्ये दिलेली कारणे तर्काला पटणारी वाटली. आपल्याला बायबलची आणखी माहिती घेण्याची गरज आहे, असे त्यांना जाणवले. त्यामुळे ते जॉनबरोबर बायबल व बायबल आधारित प्रकाशने वाचू लागले. या अभ्यासात त्यांना जेव्हा समजले, की त्यांची मुले, त्यांच्या मारेकऱ्‍याचे चाकर होण्याकरता कुठल्याही आत्मिक जगात नाहीत तर कबरेत आहेत तेव्हा त्यांना हायसे वाटले.—योहान ११:११-१३.

आपल्याला जादूटोण्याशी पूर्णपणे संबंध तोडावा लागेल, हे अग्बूला यांना या अभ्यासातून समजले. त्यामुळे त्यांनी, भूतविद्येशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू जाळून टाकल्या. (प्रेषितांची कृत्ये १९:१९) आता दुरात्मे तुला छळतील, असे म्हणून समाजातील लोक त्यांना घाबरवू लागले. पण अग्बूला घाबरले नाहीत. त्यांनी इफिसकर ६:११, १२ मधील सल्ल्याचे पालन केले, जिथे म्हटले आहे: “देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे . . . दुरात्म्यांबरोबर आहे.” या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत, सत्य, धार्मिकता, शांतीची सुवार्ता, विश्‍वास आणि आत्म्याची तलवार अर्थात देवाचे वचन यांचा समावेश होतो. ही शस्त्रसामग्री देवाची असल्यामुळे ती शक्‍तिशाली आहे!

अग्बूला यांनी जेव्हा भूतविद्येशी संबंधित प्रथा सोडून दिल्या तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी त्यांना वाळीत टाकले. पण, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहात बायबलच्या शिकवणी पाळणारे नवीन मित्र त्यांना भेटले.

अग्बूला यांना माहीत झाले आहे, की यहोवा देव लवकरच पृथ्वीवरून सर्व दुष्टाईचा अंत करेल व सर्व दुरात्म्यांना निष्क्रिय बनवेल. आणि कालांतराने या दुरात्म्यांचा नाश करेल. (प्रकटीकरण २०:१, २, १०) स्मृती “कबरेतील” सर्वांना तो उठवेल. (योहान ५:२८, २९) म्हणजे, हाबेल, हेरोदाने ज्यांची हत्या करायला लावली होती ती निष्पाप मुले आणि इतर कोट्यवधी लोक पुन्हा जिवंत होतील. आपणही आपल्या तीन मुलांना पुन्हा भेटू, अशी अग्बूला यांना खात्री आहे. तुम्हाला देखील तुमच्या मृत प्रिय जनांना पुन्हा भेटता येईल. ज्यांचे ज्यांचे पुनरुत्थान होईल ते सर्व जण सांगतील, की त्यांचा मृत्यू झाला तेव्हापासून त्यांचे पुनरुत्थान होईपर्यंतच्या काळादरम्यान ते पूर्णपणे बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या कोणत्याही विधींची त्यांना जाणीव झाली नाही.

तुम्हाला मृतांची भीती बाळगण्याची गरज नाही. उलट, तुम्ही त्या काळाची आतुरतेने वाट पाहू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मृत प्रिय नातेवाईकांना भेटणार आहात. पण तोपर्यंत निर्माणकर्त्यावर तुमचा विश्‍वास वाढवण्याकरता तुम्ही बायबलचा अभ्यास करू शकता. आणि बायबल जे शिकवते ते पाळणाऱ्‍या लोकांच्या सभांना जाऊ शकता. तुम्ही मौजेखातर जरी जादूटोणा करत असाल तर तो लगेचच थांबवा. “देवाची शस्त्रसामग्री धारण” करून दुरात्म्यांपासून स्वतःचे संरक्षण करा. (इफिसकर ६:११) यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करायला आनंद वाटेल. ते तुमच्याबरोबर बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा उपयोग करून मोफत गृह बायबल अभ्यास चालवू शकतात. *

अग्बूला यांना आता मृतांची भीती वाटत नाही. दुरात्म्यांचा प्रतिकार कसा करायचा हे ते शिकले आहेत. ते म्हणतात: “माझ्या तीन मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ते मला अजूनही माहीत नाही. पण मी यहोवाची सेवा करायला सुरुवात केल्यापासून मला आणखी सात मुले झाली. आणि दुरात्मे त्यांना काहीही करु शकलेले नाहीत.” (w०९ १/१)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.