व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल

देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल

येशू काय शिकवतो

देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल

येशू नेहमी एकांतात जाऊन प्रार्थना करायचा आणि आपल्या अनुयायांनाही त्याने असेच करण्याचे प्रोत्साहन दिले. त्याविषयी बायबल म्हणते: “तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता; . . . त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी . . . प्रार्थना करावयास . . . आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (लूक ५:१६; ११:१, २) यावरून, आपण पित्याला अर्थात यहोवाला प्रार्थना केली पाहिजे हे येशूने दाखवून दिले. कारण तोच आपला सृष्टीकर्ता आहे व ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे.—स्तोत्र ६५:२.

सर्वच प्रार्थना देवाला संतुष्ट करतात का?

तोंडपाठ केलेल्या प्रार्थना देवाला संतुष्ट करत नाहीत. येशूने म्हटले: “तोंडपाठ एकच प्रार्थना पुनःपुन्हा म्हणू नका.” (मत्तय ६:७, सुबोध भाषांतर) आपल्या स्वर्गीय पित्याशी आपण अंतःकरणापासून बोलले पाहिजे. या गोष्टीवर जोर देत येशूने एकदा आपल्या अनुयायांना सांगितले, की धार्मिक रीतिरीवाजांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्‍या घमंडी मनुष्यापेक्षा, आपल्या जीवनात खरोखर बदल करण्याची प्रांजळ इच्छा असणाऱ्‍या पापी मनुष्याची प्रार्थना देवाला अधिक स्वीकारयोग्य वाटली. (लूक १८:१०-१४) तर मग, देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर देव आपल्याला जे सांगतो ते नम्रपणे करण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे. यालाच दुजोरा देत येशूने म्हटले: “मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो. . . . जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ८:२८, २९) आपल्या एका प्रार्थनेत येशूने म्हटले: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”—लूक २२:४२.

आपल्या प्रार्थनेचे विषय काय असावेत?

आजवर यहोवाच्या नावाची खूप निंदा झाली आहे. म्हणूनच येशूने म्हटले: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाचे राज्य यावे अशी आपण प्रार्थना केली पाहिजे कारण देवाचे राज्यच एक असे शासन आहे ज्याच्या मार्फत देव स्वर्गात आणि पृथ्वीवर आपली इच्छा पूर्ण करील. आपल्या ‘रोजच्या भाकरीसाठी’ देखील आपण प्रार्थना करू शकतो असे येशूने म्हटले. याशिवाय, नोकरी, निवारा, वस्त्र, आपले आरोग्य आणि अशा इतर चिंतेच्या बाबींविषयी आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. तसेच, देवाने आपल्या पापांची क्षमा करावी यासाठीही आपण प्रार्थना करावी असे येशूने सांगितले.—लूक ११:३, ४.

आपण इतरांसाठीही प्रार्थना करावी का?

येशूने स्वतः इतरांसाठी प्रार्थना केली. त्याविषयी बायबल म्हणते: “त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणिले.” (मत्तय १९:१३) येशूने प्रेषित पेत्राला म्हटले: “तुझा विश्‍वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे.” (लूक २२:३२) येशूने आपल्या अनुयायांना इतरांसाठी म्हणजे अगदी त्यांचा छळ करणाऱ्‍या व त्यांचा अपमान करणाऱ्‍या लोकांसाठी देखील प्रार्थना करण्याचे उत्तेजन दिले.—मत्तय ५:४४; लूक ६:२८.

आपण नेहमी प्रार्थना का केली पाहिजे

येशूने स्वतः प्रार्थना करण्यासाठी वेळ काढला आणि आपल्या अनुयायांनीही “सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये,” असे उत्तेजन त्याने त्यांना दिले. (लूक १८:१) आपल्याला ज्या गोष्टींची चिंता वाटते त्यांविषयी वारंवार यहोवाशी बोलून त्याच्यावर आपला किती भरवसा आहे हे व्यक्‍त करण्याचे उत्तेजन तो आपल्याला देतो. येशूने म्हटले: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल.” पण याचा अर्थ यहोवा एक पिता या नात्याने त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या, त्याचा आदर करणाऱ्‍या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यास इतका इच्छुक नसतो असा होत नाही. उलट येशूने म्हटले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:५-१३. (w०९ २/१)

अधिक माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकातील १७ वा अध्याय पाहा.

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.