व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

स्तोत्र ३७:२५ यातील दाविदाच्या आणि मत्तय ६:३३ मधील येशूच्या शब्दांवरून असे सूचित होते का, की यहोवा त्याच्या उपासकांना कधीच उपाशी राहू देणार नाही?

दाविदाने लिहिले की त्याने कधीही “नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली . . . पाहिली नाही.” असे म्हणण्याद्वारे, दाविदाने त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून एक सर्वसाधारण विधान मांडले. यहोवा नेहमीच आपल्या सेवकांची काळजी घेतो हे दाविदाला माहीत होते. (स्तो. ३७:२५) पण, देवाच्या कोणत्याही सेवकाला आजपर्यंत उपाशी राहावे लागले नाही किंवा पुढे राहावे लागणार नाही, असा दाविदाच्या शब्दांचा अर्थ होत नाही.

स्वतः दाविदालाही अनेकदा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, एकदा शौलापासून पळ काढत असताना दाविदाजवळची अन्नसामग्री संपत आली होती. त्यामुळे त्याला स्वतःसाठी व त्याच्यासोबत असलेल्या माणसांसाठी अन्न मागावे लागले. (१ शमु. २१:१-६) तेव्हा, या प्रसंगी दाविदाजवळ पुरेसे अन्न नव्हते हे खरे आहे. पण, अशा कठीण प्रसंगीही दाविदाला ही खात्री होती की यहोवा त्याला विसरलेला नाही. खरेतर, उपासमारीची वेळ येऊन दाविदाला भीक मागावी लागली असे आपल्याला बायबलमध्ये कोठेही वाचायला मिळत नाही.

मत्तय ६:३३ मध्ये येशू आपल्याला असे आश्वासन देतो की जे राज्याच्या कार्यांना जीवनात प्रथम स्थानी ठेवतात त्यांच्या गरजा देव निश्‍चितच पुरवेल. येशूने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी [उदाहरणार्थ अन्न आणि वस्त्र] तुम्हाला मिळतील.” पण, येशूने हेदेखील सांगितले की त्याच्या ‘बांधवांना’ छळाचा सामना करताना उपाशीही राहावे लागू शकते. (मत्त. २५:३५, ३७, ४०) प्रेषित पौलाच्या बाबतीत हे घडले. त्याला काही वेळा तहानभूक सहन करावी लागली.—२ करिंथ. ११:२७.

यहोवा सांगतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या छळांचा सामना करावा लागेल. काही वेळा यहोवा देव आपल्यावर खडतर प्रसंग येऊ देईल. अशा प्रसंगी विश्वासू राहण्याद्वारे आपण दियाबलाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यास मदत करत असतो. (ईयो. २:३-५) उदाहरणार्थ, नात्झी यातना शिबिरांत आपल्या काही बांधवांना अतिशय भयानक छळाला तोंड द्यावे लागले. या बांधवांना काही प्रसंगी उपाशी ठेवण्यात आले. त्यांची देवाप्रती असलेली एकनिष्ठा भंग करण्यासाठी हा क्रूर मार्ग अवलंबण्यात आला होता. पण, आपले विश्वासू बांधव यहोवाला एकनिष्ठ राहिले, आणि यहोवानेही त्यांना सोडले नाही. इतर ख्रिश्चनांना ज्याप्रमाणे वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे यहोवाने या बांधवांवरदेखील परीक्षा येऊ दिल्या. असे असले, तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की जे लोक यहोवाच्या नावाकरता छळांचा सामना करतात त्यांना तो नेहमीच साहाय्य करतो. (१ करिंथ. १०:१३) आपण फिलिप्पैकर १:२९ मधील शब्द नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. त्यात म्हटले आहे “त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.”

यहोवा अभिवचन देतो की तो नेहमीच आपल्या सेवकांच्या पाठीशी असेल. उदाहरणार्थ, यशया ५४:१७ मध्ये असे सांगितले आहे: “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” या आणि अशा अनेक अभिवचनांवरून आपल्याला ही खात्री मिळते की समूह या नात्याने यहोवाचे लोक नेहमीच सुरक्षित राहतील. पण, व्यक्तिगत रीत्या कदाचित एखाद्या ख्रिश्चनाला कठीण परिस्थितीचा, अगदी जिवावर बेतणाऱ्या परीक्षांचाही सामना करावा लागू शकतो.