अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा
“आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उप. १२:१.
१, २. (क) देवाच्या प्रेरणेने शलमोनाने तरुणांना कोणता सल्ला दिला? (ख) शलमोनाने दिलेल्या सल्ल्याकडे पन्नाशीत असलेल्या व पन्नाशी ओलांडलेल्या बंधुभगिनींनीही लक्ष का द्यावे?
तरुणांना उद्देशून शलमोनाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत.” “अनिष्ट दिवस” असे कोणत्या अर्थाने म्हटले आहे? हे शब्द वृद्धापकाळाला सूचित करतात. वृद्धावस्थेत तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचे, उदाहरणार्थ, हात-पाय थरथरणे, नीट चालता न येणे, दात पडणे, डोळ्यांनी स्पष्ट न दिसणे, नीट ऐकू न येणे, केस पिकणे आणि शरीर वाकणे इत्यादी समस्यांचे शलमोनाने आलंकारिक भाषेत वर्णन केले. आणि म्हणूनच, तारुण्याच्या दिवसांत निर्माणकर्त्याला स्मरण्याचा सल्ला त्याने आपल्याला दिला.—उपदेशक १२:१-५ वाचा.
२ पन्नाशीत असलेल्या आणि पन्नाशी ओलांडलेल्या बऱ्याच ख्रिस्ती बंधुभगिनींचा उत्साह अजूनही कायम आहे. त्यांचे केस थोडेफार पिकले असतील, पण शलमोनाने वर्णन केले होते, तितके त्यांचे आरोग्य खालावलेले नाही. तर मग, निर्माणकर्त्याला स्मरण्याविषयी तरुणांना दिलेल्या सल्ल्याचे हे वयस्क ख्रिस्तीदेखील पालन करू शकतात का? आणि या सल्ल्याचे पालन करण्याचा नेमका अर्थ काय होतो?
३. निर्माणकर्त्याला स्मरण्यात कशाचा समावेश होतो?
३ आपण जरी अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी आपला निर्माणकर्ता किती महान आहे याविषयी आपण अधूनमधून कृतज्ञतेने मनन केले पाहिजे. जीवन ही यहोवाकडून मिळालेली किती अद्भुत देणगी आहे! निसर्गातील वेगवेगळ्या वसतूंची रचना इतकी आश्चर्यकारक आहे की ती पूर्णपणे समजून घेणे हे मानवाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे! यहोवाने विविध गोष्टी पुरवल्या आहेत ज्यांद्वारे आपण वेगवेगळ्या मार्गांनी जीवनाचा पुरेपूर आनंद लुटू शकतो. यहोवाच्या या सर्व कार्यांबद्दल आपण विचार करतो तेव्हा त्याचे प्रेम, बुद्धी व शक्ती यांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता दाटून येते. (स्तो. १४३:५) पण आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणे यात फक्त अशा कृतज्ञतेच्या भावना असणे एवढेच समाविष्ट नाही. तर निर्माणकर्त्याप्रती आपल्या कर्तव्यांबद्दलही मनन करणे गरजेचे आहे. असे केल्यास, आपल्या सबंध जीवनात त्याची पुरेपूर सेवा करण्याद्वारे त्याच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल!—उप. १२:१३.
वयस्क बांधवांजवळ असलेल्या खास संधी
४. बऱ्याच वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले ख्रिस्ती स्वतःला कोणता प्रश्न विचारू शकतात, आणि का?
४ तुमच्याजवळ अनेक वर्षांचा अनुभव असल्यास तुम्ही स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकता, ‘माझ्याजवळ अजूनही काही प्रमाणात शक्ती व उत्साह असेपर्यंत मला आपल्या जीवनाचा कसा उपयोग करता येईल?’ एक अनुभवी ख्रिस्ती या नात्याने, तुमच्याजवळ अशा काही खास संधी आहेत ज्या इतरांजवळ नाहीत. यहोवाकडून तुम्हाला जे काही शिकायला मिळाले आहे ते तुम्ही तरुणांना सांगू शकता. यहोवाच्या सेवेत आलेल्या आनंददायक अनुभवांविषयी सांगून तुम्ही इतरांचे मनोबल वाढवू शकता. दावीद राजा असे करण्यास उत्सुक होता. त्याने लिहिले: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; . . . मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करेपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करेपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तो. ७१:१७, १८.
५. आपल्याला शिकायला मिळालेल्या गोष्टींचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून वयस्क ख्रिस्ती काय करू शकतात?
५ तुम्हाला अनेक वर्षांच्या काळादरम्यान शिकायला मिळालेल्या गोष्टींचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून तुम्ही काय करू शकता? ख्रिस्ती संगतीचा आनंद लुटण्यासाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही तरुण बंधुभगिनींना आपल्या घरी निमंत्रित करू शकता का? यहोवाच्या सेवेतून तुम्हाला किती आनंद मिळतो हे दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना आपल्यासोबत ख्रिस्ती सेवाकार्याला येण्याविषयी सुचवू शकता का? प्राचीन काळात अलीहूने असे म्हटले होते: “जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल [“बुद्धीची वचने,” NW] सांगावी.” (ईयो. ३२:७) प्रेषित पौलानेही अनुभवी ख्रिस्ती स्त्रियांना आपल्या शब्दांतून व उदाहरणातून इतरांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला. त्याने लिहिले: “वयस्क स्त्रिया चांगल्या गोष्टींचे शिक्षण देणाऱ्या असाव्यात.”—तीत २:३, NW.
कशी करू शकता तुम्ही इतरांना मदत?
६. वयस्क ख्रिस्ती बांधवांनी आपल्या अनुभवाला कमी का लेखू नये?
६ जर तुम्ही एक अनुभवी ख्रिस्ती असाल, तर तुम्ही इतरांना बरीच मदत करू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ३० किंवा ४० वर्षांपूर्वी तुम्हाला समजत नव्हत्या पण आज त्या तुम्हाला समजल्या आहेत. जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींत बायबलमधील तत्त्वे लागू करण्याचे कौशल्य तुमच्याजवळ आहे. इतरांना बायबलचे सत्य शिकवताना त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याची कला तुम्ही आत्मसात केली आहे. तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल, तर अयोग्य निर्णय घेणाऱ्या एखाद्या बांधवाला कशी मदत करावी हे तुम्हाला कळते. (गलती. ६:१) तसेच, मंडळीच्या कार्यांची, संमेलनांतील विभागांची किंवा राज्य सभागृहांच्या बांधकाम कार्याची देखरेख करण्याचाही कदाचित तुमच्याजवळ अनुभव असेल. रक्ताविना उपचार करण्यासाठी पर्यायी पद्धतींचा वापर करण्याचे फायदे डॉक्टरांना कसे पटवून सांगावेत हे तुम्हाला माहीत असेल. जरी तुम्ही अलीकडेच सत्यात आला असला, तरीही जास्त पावसाळे पाहिले असल्यामुळे तुम्ही इतरांना बरीच मदत करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही मुलांचे संगोपन केले असल्यास तुम्हाला बऱ्याच व्यावहारिक गोष्टींचे ज्ञान मिळाले असेल. खरोखर, इतरांना शिकवण्याद्वारे, सल्ला व प्रोत्साहन देण्याद्वारे वयस्क ख्रिस्ती यहोवाच्या लोकांना अतिशय मोलाची मदत देऊ शकतात.—ईयोब १२:१२ वाचा.
७. वयस्क ख्रिस्ती, तरुणांना कोणते मोलाचे प्रशिक्षण देऊ शकतात?
७ तुमच्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा म्हणून तुम्हाला आणखी काय करता येईल? मंडळीतील तरुणांना तुम्ही बायबल अभ्यास कसे सुरू करावेत व ते कसे चालवावेत हे दाखवू शकता. जर तुम्ही एक बहीण असाल तर तुम्ही तरुण बहिणींना आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यासोबतच आध्यात्मिक कार्यांत कसे सक्रिय राहता येईल याविषयी व्यावहारिक सल्ला देऊ शकता. तुम्ही बांधव असल्यास जोशपूर्ण भाषण कसे द्यावे आणि परिणामकारक रीत्या प्रचार कार्य कसे करावे हे तरुण बांधवांना शिकवू शकता का? तुम्ही वयोवृद्ध बंधुभगिनींना भेटी देऊन कशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक प्रोत्साहन देता हे तुम्हाला या तरुणांना दाखवता येईल का? आज जरी तुमच्याजवळ पूर्वीइतकी शारीरिक शक्ती नसली, तरीही मंडळीतील तरुण सदस्यांना प्रशिक्षण देण्याच्या उत्कृष्ट संधी तुमच्याजवळ आहेत. देवाचे वचन म्हणते: “बल हे तरुणांस भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.”—नीति. २०:२९.
जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा
८. प्रेषित पौलाने जीवनाच्या उत्तरार्धात कशा प्रकारे यहोवाची सेवा केली?
८ प्रेषित पौलाने जीवनाच्या उत्तरार्धात आपली सगळी शक्ती पणाला लावून देवाची सेवा केली. इ.स. ६१ च्या सुमारास त्याला रोममधील बंदिवासातून सुटका मिळाली. यापूर्वी त्याने अनेक वर्षे मिशनरी सेवा केली होती आणि अनेक खडतर प्रसंगांना तोंड दिले होते. त्यामुळे, आता रोममध्येच राहून प्रचार कार्य करावे असा विचार तो करू शकला असता. (२ करिंथ. ११:२३-२७) रोम हे एक मोठे शहर होते, आणि पौलाने तेथेच राहायचे ठरवले असते, तर तेथील बांधवांनी त्याच्या मदतीची नक्कीच कदर केली असती. पण, इतर देशांत जाऊन कार्य करण्याची जास्त गरज आहे याची पौलाला जाणीव होती. त्यामुळे बंदिवासातून सुटल्यावर तो तीमथ्य व तीत यांना घेऊन मिशनरी कार्यासाठी पुन्हा प्रवासाला निघाला. ते प्रथम इफिससला, त्यानंतर क्रेतला आणि कदाचित मासेदोनियालाही गेले असावेत. (१ तीम. १:३; तीत १:५) स्पेनलाही जाण्याची इच्छा पौलाने व्यक्त केली होती, पण तो तेथे जाऊ शकला किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही.—रोम. १५:२४, २८.
९. पेत्र जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यास केव्हा गेला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
९ प्रेषित पेत्र जेव्हा जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करायला गेला तेव्हा कदाचित त्याने पन्नाशी ओलांडलेली असावी. असे आपण का म्हणू शकतो? जर तो येशूच्याच वयाचा किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल, तर इ.स. ४९ मध्ये जेरूसलेममध्ये पेत्र व इतर प्रेषितांची सभा झाली त्या वेळी त्याचे वय ५० च्या आसपास असावे. (प्रे. कृत्ये १५:७) त्या सभेच्या काही काळानंतर, पेत्र बॅबिलोनला राहायला गेला. त्या भागात बरेच यहुदी राहत होते आणि त्यांना प्रचार करता यावा म्हणूनच पेत्र तेथे गेला असावा. (गलती. २:९) इ.स. ६२ च्या सुमारास त्याने त्याचे पहिले प्रेरित पत्र लिहिले तेव्हा तो बॅबिलोनमध्येच राहत होता. (१ पेत्र ५:१३) परक्या देशात जाऊन राहताना साहजिकच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पण, पेत्राने केवळ वय वाढले आहे म्हणून यहोवाच्या सेवेत पुरेपूर योगदान देण्याची सुसंधी दवडली नाही.
१०, ११. रॉबर्ट व त्यांच्या पत्नीने पन्नाशी ओलांडल्यावर काय केले?
१० आज पन्नाशीत असलेल्या व पन्नाशी ओलांडलेल्या बऱ्याच ख्रिस्ती बंधुभगिनींना असे दिसून आले आहे की जीवनातील बदललेल्या परिस्थितीमुळे, नवनवीन मार्गांनी यहोवाची सेवा करण्याचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले आहे. काही जण जास्त गरज असलेल्या ठिकाणी राहायला गेले आहेत. उदाहरणार्थ, रॉबर्ट लिहितात: “माझ्या पत्नीचं व माझं वय ५५ च्या आसपास असताना आम्हाला जाणीव झाली की आमच्यासमोर सेवेचे अनेक पर्याय आहेत. आम्हाला एकच मुलगा आहे आणि तो आमच्यासोबत राहत नव्हता; तसंच, वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याची जबाबदारीही आता आमच्यावर नव्हती. शिवाय, आम्हाला थोडीशी वडिलोपार्जित संपत्ती मिळाली होती. त्यामुळं मी असा हिशोब लावला की जर आम्ही आमचं घर विकलं तर आम्हाला सगळं लोन तर फेडता येईलच, शिवाय माझी पेन्शन सुरू होईपर्यंत त्याच पैशांत आमचा घरखर्च चालवणंही आम्हाला शक्य होईल. आम्ही असं ऐकलं होतं, की बोलिव्हिया या देशात खूप लोक बायबलचा अभ्यास करण्यास उत्सुक आहेत आणि या देशाचं राहणीमानही साधं आहे. त्यामुळं आम्ही या देशात जाऊन सेवा करण्याचं ठरवलं. नवीन ठिकाणाशी जुळवून घेणं आम्हाला सोपं गेलं नाही. उत्तर अमेरिकेतल्या आमच्या जीवनापेक्षा इथलं जीवन अगदीच वेगळं होतं. पण आमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं.”
११ रॉबर्ट पुढे म्हणतात: “आता आमचा बहुतेक वेळ मंडळीच्या कार्यांतच जातो. आम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास केला त्यांच्यापैकी काही जणांचा बाप्तिस्मा झाला आहे. यांपैकी एक कुटुंब कित्येक किलोमीटर लांब असलेल्या एका लहानशा खेड्यात राहतं. पण, दर आठवडी या कुटुंबाचे सदस्य एवढ्या लांबचा कठीण प्रवास करून शहरात सभांना येतात. हे कुटुंब उत्तम प्रगती करत आहे आणि सर्वात थोरल्या मुलानं तर पायनियर सेवादेखील सुरू केली आहे. हे पाहून आम्हाला किती आनंद होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का?”
परकीय भाषिक क्षेत्रांतील संधी
१२, १३. ब्रायन सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्यांनी व त्यांच्या पत्नीने काय केले?
१२ परकीय भाषिक मंडळ्यांना व गटांना बांधवांकडून व बहिणींकडून बरेच साहाय्य मिळू शकते. शिवाय, अशा क्षेत्रांत कार्य करणे सहसा खूप आनंददायक असते. उदाहरणार्थ, ब्रायन लिहितात: “ब्रिटिश कायद्यानुसार ६५ वर्षांचा झाल्यावर मी सेवानिवृत्त झालो. आमची मुलं एव्हाना स्वतंत्रपणे राहत होती; शिवाय, आम्हाला क्षेत्रात आपल्या संदेशाबद्दल आवड दाखवणारे लोक क्वचितच भेटायचे. त्यामुळे माझ्या पत्नीला व मला जीवन काहीसं कंटाळवाणं वाटू लागलं. त्याच दरम्यान मला एक चिनी तरुण भेटला जो शहरातील विद्यापीठात कसलंतरी संशोधन करत होता. त्यानं आपल्या सभेला येण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि मी त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागलो. काही आठवड्यांनंतर तो आपल्यासोबत आणखी एका चिनी सहकाऱ्याला सभेला घेऊन आला. दोन आठवड्यांनंतर तिसरा आणि त्यानंतर चौथा चिनी तरुण सभांना येऊ लागला.
१३ “असं करता करता जेव्हा पाचव्या चिनी संशोधकानं बायबल अभ्यासाची विनंती केली तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मी ६५ वर्षांचा असलो म्हणून काय झालं, यहोवाच्या सेवेतून मी निवृत्त व्हावं असा याचा नक्कीच अर्थ होत नाही.’ आणि म्हणून मी माझ्या पत्नीला, जी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे, आपण चिनी भाषा शिकायची का असं विचारलं. आम्ही कॅसेटवर असलेल्या एका कोर्सच्या साहाय्यानं चिनी भाषा शिकू लागलो. या गोष्टीला आता दहा वर्षं झाली आहेत. परकीय भाषिक क्षेत्रात प्रचार कार्य सुरू केल्यापासून आम्हाला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटू लागलंय. आतापर्यंत आम्ही ११२ चिनी व्यक्तींसोबत बायबल अभ्यास केला आहे. यांच्यापैकी बहुतेक जण आपल्या सभांना येऊन गेले आहेत. आणि त्यांपैकी एक तर आता आमच्यासोबत पायनियर म्हणून सेवा करतेय.”
जे काही करू शकता ते आनंदाने करा
१४. वयस्क ख्रिस्ती बंधुभगिनींनी कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि पौलाच्या उदाहरणातून त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन मिळते?
१४ पन्नाशीत असलेल्या अनेक ख्रिस्ती बांधवांसमोर नवनवीन मार्गांनी यहोवाची सेवा करण्याच्या संधी असल्या, तरी सर्वांनाच हे जमेल असे नाही. काहींना आरोग्याच्या समस्या आहेत, तर इतर जण वृद्ध आईवडिलांची किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांची काळजी घेत आहेत. अशा बंधुभगिनींनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की यहोवाच्या सेवेत ते जे काही करू शकतात त्याची तो कदर करतो. त्यामुळे, जे करणे तुम्हाला शक्य नाही त्याविषयी खंत बाळगण्याऐवजी जे काही तुम्ही करू शकता ते आनंदाने करा. प्रेषित पौलाचे उदाहरण विचारात घ्या. कितीतरी वर्षे तो बंदिवासात होता आणि त्यामुळे त्याला पूर्वीप्रमाणे मिशनरी कार्यासाठी प्रवास करणे शक्य नव्हते. पण बंदिवासात असताना, जेव्हा कधी लोक त्याला भेटायला यायचे तेव्हा तो त्यांना शास्त्रवचनांतील माहिती सांगायचा आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहण्यास त्यांना मदत करायचा.—प्रे. कृत्ये २८:१६, ३०, ३१.
१५. आपल्यामधील वृद्ध बांधव इतके मौल्यवान का आहेत?
१५ वयोवृद्ध बांधवदेखील यहोवाच्या सेवेत जे काही करू शकतात त्याची तो कदर करतो. शलमोनाने कबूल केल्याप्रमाणे वृद्धापकाळात माणसाचे आरोग्य खालावल्यामुळे “अनिष्ट दिवस” येतात तेव्हा यहोवाची सेवा करणे सोपे जात नाही. पण, तरीसुद्धा बायबल आपल्याला याची आठवण करून देते, की वृद्ध ख्रिस्ती यहोवाची स्तुती करण्यासाठी जे काही करतात त्यास तो मौल्यवान लेखतो. (लूक २१:२-४) या वृद्ध बंधुभगिनींच्या विश्वासूपणाच्या व धीराच्या उत्तम उदाहरणामुळे ते मंडळीतील सर्व बांधवांना प्रिय वाटतात.
१६. हन्नाला कोणत्या संधी कदाचित मिळाल्या नसाव्यात, पण यहोवाच्या उपासनेत ती काय करू शकली?
१६ बायबल हन्ना नावाच्या एका वृद्ध स्त्रीबद्दल सांगते, जी उतारवयातही यहोवाची विश्वासूपणे उपासना करत राहिली. येशूचा जन्म झाला तेव्हा हन्ना ८४ वर्षांची होती. येशूने त्याचे सेवाकार्य सुरू करण्याआधीच कदाचित तिचा मृत्यू झाला असावा आणि त्यामुळे, त्याच्या अनुयायांपैकी एक होण्याची, पवित्र आत्म्याने अभिषिक्त होण्याची किंवा सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आनंददायक कार्यात सहभागी होण्याची संधी तिला मिळाली नसावी. तरीसुद्धा, हन्ना जे काही करू शकत होती ते तिने आनंदाने केले. ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.” (लूक २:३६, ३७) दररोज सकाळी व संध्याकाळी याजक मंदिरात धूप जाळायचे तेव्हा हन्ना इतर लोकांसोबत अंगणात असायची व सुमारे अर्धा तास मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना करायची. असेच एकदा मंदिरात असताना तिला बाळ येशूला पाहण्याची संधी मिळाली. येशूला पाहिल्यावर, ती “यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस . . . त्याच्याविषयी सांगू लागली.”—लूक २:३८.
१७. आपण वृद्ध किंवा शारीरिक दुर्बलता असलेल्या बंधुभगिनींना खऱ्या उपासनेत सहभागी होण्यास कशा प्रकारे साहाय्य करू शकतो?
१७ आज आपण वृद्ध किंवा शारीरिक दुर्बलता असलेल्या बंधुभगिनींना साहाय्य करण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत. त्यांच्यापैकी काही जणांना मंडळीच्या सभांना व संमेलनांना उपस्थित राहण्याची खूप इच्छा असूनही त्यांना असे करणे शक्य नसेल. मंडळीकडून अशा बंधुभगिनींना कोणती मदत पुरवली जाऊ शकते? काही ठिकाणी त्यांना टेलिफोनद्वारे सभेचा कार्यक्रम ऐकता येईल अशी व्यवस्था केली जाते. इतर ठिकाणी, कदाचित अशी व्यवस्था करणे शक्य नसेल. ज्यांना सभांना येणे शक्य नाही असे बंधुभगिनीदेखील खऱ्या उपासनेला हातभार लावण्यात सहभाग घेऊ शकतात. उदाहरणार्थ, ते मंडळीच्या वाढीसाठी प्रार्थना करू शकतात.—स्तोत्र ९२:१३, १४ वाचा.
१८, १९. (क) वयोवृद्ध ख्रिस्ती बंधुभगिनींकडून इतरांना कशा प्रकारे प्रोत्साहन मिळू शकते? (ख) निर्माणकर्त्याला स्मरण्याविषयीचा सल्ला कोणी मनावर घेतला पाहिजे?
१८ वयोवृद्ध ख्रिस्ती बंधुभगिनींनो, कदाचित तुम्हाला कल्पनाही नसेल की तुमच्याकडून इतरांना किती प्रोत्साहन मिळू शकते. उदाहरणार्थ, हन्ना अनेक वर्षांपर्यंत विश्वासूपणे मंदिरात गेली. तिला कधी वाटलेही नसेल, की तिच्या उदाहरणाबद्दल आणि तिला यहोवावर किती प्रेम होते याबद्दल बायबलमध्ये लिहून ठेवण्यात येईल आणि या माहितीमुळे कित्येक शतकांनंतरही देवाच्या सेवकांना प्रोत्साहन मिळेल. त्याचप्रमाणे, तुम्ही यहोवाबद्दल दाखवलेले प्रेम तुमचे बंधुभगिनी कधीही विसरणार नाहीत. खरोखर, देवाच्या वचनात उगाच म्हटलेले नाही: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.”—नीति. १६:३१.
१९ आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण रीत्या यहोवाची सेवा करू शकत नाही; सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या मर्यादा आहेत. पण, आपल्यापैकी ज्यांच्याजवळ अद्यापही थोडीफार शक्ती व उत्साह आहे त्यांनी “अनिष्ट दिवस” येण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचा देवप्रेरित सल्ला नक्कीच मनावर घेतला पाहिजे.—उप. १२:१.