ती कयफाच्या कुटुंबातील होती
काही वेळा, बायबल काळातील व्यक्ती खरोखरच अस्तित्वात होती हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या शोधावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या सिद्ध होते. उदाहरणार्थ, २०११ मध्ये इस्राएलच्या विद्वानांनी अशाच एका शोधाबद्दल माहिती प्रकाशित केली. ही माहिती त्यांना सापडलेल्या २,००० वर्षांआधीच्या एका अस्थिपात्राविषयी आहे. हे अस्थिपात्र चुनखडीपासून बनवलेली एक नक्षीदार पेटी आहे. मृत व्यक्तीचे शरीर कुजल्यावर तिच्या अस्थी अशा अस्थिपात्रात ठेवल्या जायच्या.
या विशिष्ट अस्थिपात्रावर असा कोरीव लेख आहे: “मिरियम, बेथ इम्रीच्या माज्याचा याजक कयफा याचा पुत्र येशूआ याची मुलगी.” येशूची न्यायचौकशी करण्यात व त्याला मृत्यूदंड देण्यात सहभागी असलेला यहुदी महायाजक कयफा होता. (योहा. ११:४८-५०) इतिहासकार फ्लेवियस जोसिफस या महायाजकाचा उल्लेख, “कयफा असे टोपणनाव असलेला योसेफ” असा करतो. यावरून स्पष्ट दिसते की हे अस्थिपात्र महायाजकाच्या एका नातेवाइकाचे असावे. यापूर्वी सापडलेले एक अस्थिपात्र खुद्द महायाजकाचे होते असे समजले जाते. त्यावर येहोसेफ बार कयफा, म्हणजेच कयफाचा * पुत्र योसेफ असा कोरीव लेख असल्यामुळे, मिरियम ही कयफाची नातेवाईक होती असे दिसते.
इस्राएल ॲन्टिक्विटीस अथॉरीटीने (आयएए) दिलेल्या माहितीनुसार, मिरियमचे अस्थिपात्र चोरांकडून जप्त करण्यात आले होते ज्यांनी एक पुरातन कबर लुटली होती. या अस्थिपात्राच्या आणि त्यावरील कोरीव लेखाच्या विश्लेषणावरून त्याची सत्यता सिद्ध होते.
हे अस्थिपात्र आपल्याला आणखी एक नवीन गोष्ट सांगते. त्यावर माज्याचा उल्लेख आढळतो, जो जेरूसलेमच्या मंदिरात आळीपाळीने सेवा करणाऱ्या २४ याजकीय वर्गांपैकी शेवटला वर्ग होता. (१ इति. २४:१८) आयएएनुसार या अस्थिपात्रावर असलेल्या लेखावरून हे दिसून येते, की “कयफाचे कुटुंब माज्या वर्गाशी संबंधित होते.”
त्या अस्थिपात्रावर बेथ इम्रीचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. लेखाच्या या भागाचे दोन संभाव्य अर्थ लावले जाऊ शकतात. आयएएनुसार, “पहिली संभाव्य गोष्ट म्हणजे बेथ इम्री हे याजकाच्या घराण्याचे—इम्मेराच्या पुत्रांचे नाव आहे, (एज्रा २:३६, ३७; नहेम्या ७:३९-४२) ज्यांच्या वंशजांत माज्या वर्गातील सदस्यांचा समावेश होतो. दुसरी संभाव्य गोष्ट म्हणजे [बेथ इम्री] मिरियमचे किंवा तिच्या संपूर्ण परिवाराचे जन्मस्थान असू शकते.” काहीही असो, मिरियमच्या अस्थिपात्रावरून याचा पुरावा मिळतो की बायबल खऱ्याखुऱ्या लोकांबद्दल सांगते जे खऱ्या कुटुंबातील सदस्य होते.
^ कयफाच्या अस्थिपात्राविषयी जाणून घेण्यास, टेहळणी बुरूज (हिंदी), १५ जानेवारी २००६, पृष्ठे १०-१३ वरील “वह महायाजक जिसने यीशू को मुजरिम करार दिया” हा लेख पाहा.