व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते

आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते

आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते

“भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:९.

आपण पूर्ण भरवसा का बाळगू शकतो, की . . .

यहोवा त्याच्या उद्देशाची पूर्णता त्याने ठरवलेल्या वेळी घडवून आणण्यास समर्थ आहे?

यहोवा त्याच्या शक्‍तीचा उपयोग करून आपल्या लोकांच्या वतीने कारवाई करेल?

घटना कशा घडतील हे यहोवाला माहीत आहे?

१. मोठ्या संकटादरम्यान या जगाची परिस्थिती कशी असेल?

 देवाच्या न्यायनिवाड्याचा दिवस सैतानाच्या जगावर अगदी अचानक येईल. (१ थेस्सलनी. ५:२, ३) “परमेश्‍वराचा मोठा दिवस” येईल तेव्हा जगात गोंधळ माजेल. (सफ. १:१४-१७) लोकांना अनेक संकटे व निरनिराळ्या गोष्टींचा तुटवडा सहन करावा लागेल. जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आला नाही असा दुःखमय काळ तो असेल.मत्तय २४:२१, २२ वाचा.

२, ३. (क) मोठ्या संकटादरम्यान देवाचे लोक कशाचा सामना करतील? (ख) भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींचा सामना करण्यास कोणती गोष्ट आपल्याला समर्थ करेल?

“मोठे संकट” संपण्याच्या बेतात असताना “मागोग देशातील गोग” देवाच्या लोकांचा नाश करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करेल. या हल्ल्यादरम्यान “मोठा दळभार” किंवा सैन्य, “अभ्राने देश झाकावा” तसे देवाच्या लोकांविरुद्ध येईल. (यहे. ३८:२, १४-१६) कोणतीही मानवी संस्था यहोवाच्या लोकांचा बचाव करण्यास पुढे येणार नाही. फक्‍त देवच त्यांना वाचवू शकेल. देवाच्या लोकांसमोर सर्वनाश उभा ठाकेल तेव्हा ते कशी प्रतिक्रिया दाखवतील?

तुम्ही यहोवाचे एक सेवक असाल, तर मोठ्या संकटातून यहोवा आपल्या लोकांना वाचवू शकतो आणि तो नक्की वाचवेल असा विश्‍वास तुम्ही करता का? प्रेषित पेत्राने लिहिले: “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) प्राचीन काळी यहोवाने आपल्या लोकांना सोडवण्यासाठी जी कार्ये केली त्यांवर मनन केल्याने भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींचा सामना करण्यास आपण समर्थ होऊ. यहोवाजवळ त्याच्या लोकांना सोडवण्याचे सामर्थ्य आहे यावरचा आपला विश्‍वास वाढवण्याकरता आपण तीन उदाहरणांची चर्चा करू या.

जलप्रलयातून सुटका

४. प्रलयाच्या संदर्भात वेळेला इतके महत्त्व का होते?

प्रथम आपण नोहाच्या दिवसातील प्रलयाच्या अहवालाचा विचार करू या. यहोवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळेला खूप महत्त्व होते. भल्या मोठ्या तारवाचे बांधकाम व प्राण्यांना तारवात सुरक्षितपणे नेणे हे प्रलय येण्याआधी पूर्ण करायचे होते. यहोवाने प्रथम नोहाकडून तारू बांधून घेतले आणि नंतर जलप्रलय कधी आणायचा हे ठरवले असे उत्पत्तीचा अहवाल सांगत नाही. जलप्रलयाची नेमकी वेळ ठरवताना, तारवाचे बांधकाम वेळेवर पूर्ण होईल की नाही याची यहोवाला चिंता करण्याची गरज नव्हती. उलट, तारू बांधण्याविषयी नोहाला काहीही सांगण्याच्या कित्येक वर्षांआधीच प्रलय नेमका केव्हा सुरू होईल हे देवाने ठरवले होते. हे आपल्याला कसे कळते?

५. उत्पत्ती ६:३ यात यहोवाने काय जाहीर केले, आणि हा निर्णय केव्हा जाहीर करण्यात आला?

बायबल सांगते की यहोवाने एक निर्णय घेतला आणि स्वर्गात तो जाहीर केला. उत्पत्ती ६:३ मध्ये त्याने म्हटले: “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” मानवांचे सरासरी आयुष्य किती असेल याविषयीचे हे विधान नव्हते. तर यहोवा या पृथ्वीवरून दुष्टाईचा अंत केव्हा करेल हे त्याने या घोषणेद्वारे जाहीर केले. * जलप्रलय इ.स.पू. २३७० मध्ये सुरू झाला. त्याअर्थी, देवाने इ.स.पू. २४९० मध्ये ही घोषणा केली असावी. तेव्हा नोहा ४८० वर्षांचा होता. (उत्प. ७:६) सुमारे २० वर्षानंतर म्हणजे इ.स.पू. २४७० मध्ये नोहाच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला. (उत्प. ५:३२) प्रलय येण्यासाठी सुमारे शंभर वर्षे राहिली होती, पण यहोवाने मानवी कुटुंबाच्या बचावासाठी नोहाच्या खास भूमिकेबद्दल अद्यापही त्याला सांगितलेले नव्हते. ही गोष्ट नोहाला सांगण्यासाठी देव किती काळ थांबणार होता?

६. यहोवाने नोहाला तारू बांधण्याची आज्ञा केव्हा दिली?

आपण काय करणार आहोत हे यहोवाने नोहाला अनेक दशकांनंतर सांगितले असे दिसते. कोणत्या आधारावर आपण असा निष्कर्ष काढू शकतो? देवाच्या प्रेरणेने लिहिलेला अहवाल दाखवतो की देवाने नोहाला तारू बांधण्याची आज्ञा दिली तोपर्यंत त्याची मुले मोठी झाली होती व त्यांची लग्ने झाली होती. यहोवा त्याला म्हणाला: “तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो; तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा.” (उत्प. ६:९-१८) तर मग, नोहाला तारू बांधण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा कदाचित प्रलयाला ४० किंवा ५० वर्षे राहिली असावीत.

७. (क) नोहा व त्याच्या कुटुंबाने त्यांचा विश्‍वास कसा प्रदर्शित केला? (ख) प्रलयाची सुरुवात नक्की केव्हा होईल हे यहोवाने सरतेशेवटी नोहाला केव्हा सांगितले?

तारू बांधण्याचे कार्य जसजसे पूर्ण होत गेले तसतसे नोहा व त्याचे कुटुंब विचारात पडले असावेत की देव त्याचा उद्देश कसा पूर्ण करेल आणि प्रलयाची सुरुवात केव्हा होईल. ही माहिती नसतानासुद्धा ते तारवाचे बांधकाम करत राहिले. बायबल म्हणते: “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२) सरतेशेवटी प्रलय येण्याच्या सात दिवसांआधी—सर्व प्राण्यांना तारवात नेण्यासाठी नोहा व त्याच्या कुटुंबाजवळ जेमतेम वेळ उरला असताना—यहोवाने नोहाला प्रलयाची सुरुवात नक्की केव्हा होईल हे सांगितले. अशा रीतीने “नोहाच्या वयाच्या सहाशाव्या वर्षी दुसऱ्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी,” जेव्हा आकाशाची दारे उघडली तेव्हा सर्वकाही तयार होते.—उत्प. ७:१-५, ११.

८. आपल्या लोकांना केव्हा सोडवायचे हे यहोवाला माहीत आहे अशी खातरी बाळगण्यास प्रलयाचा अहवाल कशी मदत करतो?

आपल्या लोकांचा बचाव करण्याची सर्वात योग्य वेळ आणि मार्ग यहोवाला अचूक माहीत असतो हे प्रलयाच्या अहवालावरून सिद्ध होते. या जगाचा अंत जवळ येत असता, आपण खातरी बाळगू शकतो की यहोवाचा हरएक उद्देश त्याच्या ठरवलेल्या वेळी, अगदी त्याच दिवशी व त्याच घटकेला पूर्ण होईल.—मत्त. २४:३६; हबक्कूक २:३ वाचा.

तांबड्या समुद्राजवळ सुटका

९, १०. इजिप्तच्या सैन्याला पाशात पकडण्यासाठी यहोवाने आपल्या लोकांचा उपयोग कसा केला?

आतापर्यंत आपण हे पाहिले की यहोवा त्याच्या उद्देशाची पूर्णता त्याने ठरवलेल्या वेळी घडवून आणण्यास समर्थ आहे. आता आपण दुसऱ्‍या उदाहरणाचा विचार करू या. हे उदाहरण, यहोवा त्याच्या लोकांना सोडवू शकतो यावर विश्‍वास करण्याच्या आणखी एका कारणावर प्रकाश टाकते. आणि ते कारण म्हणजे, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या अमर्याद शक्‍तीचा उपयोग करेल. आपल्या सेवकांना सोडवण्याचे यहोवाचे सामर्थ्य इतके खातरीलायक आहे की काही वेळा तो शत्रूंना पाशात टाकण्यासाठी आपल्या सेवकांना धोकादायक परिस्थितीत येऊ देतो. त्याने इस्राएली लोकांना इजिप्तच्या दास्यातून सोडवले तेव्हा अशीच घटना घडली.

१० इजिप्तमधून निघालेल्या इस्राएली लोकांची संख्या सुमारे तीस लाख असावी. यहोवाने मोशेद्वारे त्यांना अशा मार्गाने नेले ज्यामुळे ते गोंधळलेल्या स्थितीत भटकत आहेत असा विचार करण्यास फारो प्रवृत्त झाला. (निर्गम १४:१-४ वाचा.) इस्राएली लोकांवर विजय मिळवणे आता अगदी सोपे आहे असे समजून, फारोने त्याच्या सैन्याला त्याच्या पूर्वीच्या या दासांचा पाठलाग करण्यास सांगितले व त्यांना तांबड्या समुद्राजवळ गाठले. इस्राएली लोकांसाठी आता बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही असे भासले. (निर्ग. १४:५-१०) पण, खरे पाहता त्यांना कोणताही धोका नव्हता. का नव्हता? कारण यहोवा लवकरच त्यांच्या वतीने कारवाई करणार होता.

११, १२. (क) यहोवाने त्याच्या लोकांच्या वतीने कशा प्रकारे कारवाई केली? (ख) यहोवा इस्राएल लोकांच्या वतीने लढल्यामुळे काय परिणाम झाला, आणि हा अहवाल आपल्याला यहोवाविषयी काय शिकवतो?

११ जो “मेघस्तंभ” इस्राएल लोकांना मार्ग दाखवत होता तो मागे गेल्यामुळे फारोच्या सैन्याचा रस्ता अडवला गेला व ते अंधारात सापडले. पण इस्राएल लोकांना मात्र हा स्तंभ चमत्कारिक रीत्या प्रकाश देत राहिला. (निर्गम १४:१९, २० वाचा.) नंतर यहोवाने समुद्राच्या पाण्याचे दोन भाग केले. ही गोष्ट घडायला बराच वेळ लागला असेल कारण अहवाल म्हणतो: “परमेश्‍वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले.” इजिप्शियन सैन्याच्या रथांच्या तुलनेत इस्राएल लोकांची चालण्याची गती खूप कमी होती. तरीसुद्धा, इजिप्शियन सेना त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्यच नव्हते, कारण यहोवा इस्राएल लोकांच्या वतीने लढत होता. त्याने इजिप्शियन सेनेची “त्रेधा उडविली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले.”—निर्ग. १४:२१-२५.

१२ इस्राएली लोक एकदाचे सुरक्षितपणे किनाऱ्‍याला पोहचले तेव्हा यहोवाने मोशेला आज्ञा दिली: “आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिसऱ्‍यांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल.” सैनिक त्यांच्यावर कोसळणाऱ्‍या पाण्यापासून पळ काढू लागले तेव्हा “परमेश्‍वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले.” त्यांच्याजवळ बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नव्हता. “त्यांतला एकही वाचला नाही.” (निर्ग. १४:२६-२८) अशा रीतीने, यहोवाने हे दाखवून दिले की त्याच्याजवळ त्याच्या लोकांना कोणत्याही परिस्थितीतून सोडवण्याची शक्‍ती आहे.

जेरूसलेमच्या नाशातून सुटका

१३. येशूने कोणत्या सूचना दिल्या, आणि त्याच्या शिष्यांच्या मनात कदाचित कोणता प्रश्‍न आला असावा?

१३ यहोवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता घटना कशा प्रकारे घडून येतील हे तंतोतंत माहीत असते. आपण जे तिसरे उदाहरण पाहणार आहोत ते यावर प्रकाश टाकते. ते उदाहरण म्हणजे पहिल्या शतकात जेरूसलेमला घालण्यात आलेला वेढा. इ.स. ७० मध्ये जेरूसलेमचा नाश होण्याअगोदर यहोवाने त्याच्या पुत्राद्वारे जेरूसलेम व यहूदीयामधील ख्रिश्‍चनांना बचावाकरता काही सूचना दिल्या. येशू म्हणाला: “दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांत पळून जावे.” (मत्त. २४:१५, १६) पण ही भविष्यवाणी केव्हा पूर्ण होणार हे येशूच्या शिष्यांना कसे कळणार होते?

१४. कोणत्या घटना घडल्यामुळे येशूने दिलेल्या सूचनांचा अर्थ स्पष्ट झाला?

१४ एकेक घटना घडू लागली तसतसा येशूच्या शब्दांचा अर्थ स्पष्ट झाला. इ.स. ६६ मध्ये, यहुद्यांनी केलेला बंड दडपून टाकण्यासाठी सेस्टियस गॅलसच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्य जेरूसलेममध्ये आले. बंडखोरांनी मंदिरात आश्रय घेतला, तेव्हा रोमन सैनिक मंदिराच्या भिंती तोडू लागले. जागरूक ख्रिश्‍चनांकरता या घटनेचा अर्थ अगदी स्पष्ट होता: एक मूर्तिपूजक सैन्य त्यांचे ध्वज (“अमंगळ पदार्थ”) घेऊन जेरूसलेममधील मंदिराच्या भिंतीपर्यंत (“पवित्रस्थानात”) पोहचले होते. येशूच्या शिष्यांनी “डोंगरांत पळून” जाण्याची हीच वेळ होती. पण, रोमी सैन्याने शहराला वेढा घातला असल्यामुळे ते बाहेर कसे निघणार होते? लवकरच काहीतरी अनपेक्षित घडणार होते.

१५, १६. (क) येशूने कोणती विशिष्ट आज्ञा दिली होती, आणि त्याच्या शिष्यांनी ती आज्ञा पाळणे इतके गरजेचे का होते? (ख) आपली सुटका कशावर अवलंबून असेल?

१५ काहीही कारण नसताना सेस्टियस गॅलस व त्याच्या सैन्याने जेरूसलेम सोडले व ते माघारी जाऊ लागले. यहुदी बंडखोरांनी त्यांचा पाठलाग केला. लढणारे दोन्ही पक्ष आता शहरात नसल्यामुळे, अचानक येशूच्या शिष्यांना पळून जाण्याची संधी मिळाली होती. येशूने त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांनी आपली मालमत्ता सोडून जराही उशीर न करता पळून जावे. (मत्तय २४:१७, १८ वाचा.) त्यांनी ताबडतोब पाऊल उचलण्याची खरोखरच गरज होती का? याचे उत्तर लवकरच स्पष्ट झाले. काही दिवसांतच यहुदी बंडखोर परतले आणि जेरूसलेम व यहूदीयाच्या रहिवाशांना त्यांच्या बंडाळीत सामील होण्यास जबरदस्ती करू लागले. यहुद्यांमधील विरोधी गट शहरावर ताबा मिळवण्यासाठी आपापसांत लढू लागल्यामुळे शहरातील परिस्थिती झपाट्याने ढासळू लागली. शहरातून पळ काढणे दिवसेंदिवस कठीण होत गेले. इ.स. ७० मध्ये रोमी सैन्य परत आले, तेव्हा तर पळून जाणे अशक्य झाले. (लूक १९:४३) ज्यांनी हयगय केली होती ते आता शहरातच अडकले. पण ज्या ख्रिश्‍चनांनी येशूचा सल्ला ऐकला व डोंगरात पळून गेले त्यांचे जीव वाचले. आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. या अहवालातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१६ मोठ्या संकटादरम्यान एकेक घटना घडू लागेल, तेव्हा ख्रिश्‍चनांना देवाच्या वचनातून व त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सूचनांचे पालन करण्याची गरज असेल. उदाहरणार्थ, “डोंगरांत पळून” जाण्याविषयी येशूने दिलेली आज्ञा आधुनिक दिवसांतही लागू होते. आपण कोणत्या अर्थाने पलायन करू हे येणाऱ्‍या काळातच स्पष्ट होईल. * पण, आपण खातरी बाळगू शकतो की यहोवाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची वेळ येईल तेव्हा तो आपल्याला त्यांचा अर्थ स्पष्ट करेल. आपली सुटका आज्ञाधारक राहण्यावर अवलंबून असल्यामुळे, आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘आज यहोवा त्याच्या लोकांना जे मार्गदर्शन देतो त्याला मी कसा प्रतिसाद देतो? मी लगेचच ते पाळतो का, की ते पाळण्याची हयगय करतो?’—याको. ३:१७.

भविष्याचा सामना करण्यास समर्थ

१७. भविष्यात देवाच्या लोकांवर होणाऱ्‍या हल्ल्याविषयी हबक्कूकची भविष्यवाणी काय प्रकट करते?

१७ आता आपण सुरुवातीला सांगितलेल्या गोगद्वारे होणाऱ्‍या हल्ल्याविषयी पुन्हा चर्चा करू या. एका संबंधित भविष्यवाणीत हबक्कूक संदेष्ट्याने म्हटले: “मी हे ऐकले तो माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर [सैन्यावर] हल्ला करणारा [देव] येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.” (हब. ३:१६) देवाच्या लोकांवर येणाऱ्‍या हल्ल्याविषयीची बातमी फक्‍त ऐकून संदेष्ट्याच्या पोटात गोळा आला, त्याचे ओठ कापू लागले आणि त्याला अगदी शक्‍तीहीन वाटू लागले. हबक्कूकच्या प्रतिक्रियेवरून हे कळते की गोग व त्याची टोळी आपल्यावर हल्ला करण्यास येतील तेव्हा आपणही घाबरून जाण्याची शक्यता आहे. हबक्कूकला भीती वाटली तरीसुद्धा तो यहोवाच्या मोठ्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहण्यास इच्छुक होता. यहोवा त्याच्या लोकांना सोडवेल असा भरवसा त्याला होता. आपणही तसाच विश्‍वास बाळगू शकतो.—हब. ३:१८, १९.

१८. (क) भविष्यात होणाऱ्‍या हल्ल्याला न घाबरण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे? (ख) पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१८ आपण चर्चा केलेल्या तिन्ही उदाहरणांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की आपल्या लोकांना कसे सोडवायचे हे यहोवाला कळते. त्याचा उद्देश कधीही असफल होणार नाही. तो नक्कीच विजयी ठरेल. पण, त्या वैभवी विजयात सहभागी होण्यासाठी आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे. आज आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी यहोवा आपली मदत कशी करतो? हा पुढील लेखाचा विषय आहे.

[तळटीपा]

^ परि. 16 टेहळणी बुरूज, १ मे १९९९, पृष्ठ १९ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

इस्राएल लोकांना फारोच्या सैन्यापासून कधीही, कोणत्याही प्रकारचा धोका होता का?