व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनात विष कालवणारा दुर्गुण ईर्ष्या

मनात विष कालवणारा दुर्गुण ईर्ष्या

मनात विष कालवणारा दुर्गुण ईर्ष्या

नेपोलियन बोनापार्ट. ज्युलियस सीझर. थोर सिकंदर. सर्वच खरेतर इतिहासातील अतिशय शक्‍तिशाली व वैभवशाली व्यक्‍ती. पण या सर्वांनी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात अशा एका दुर्गुणाला थारा दिला होता जो माणसाच्या मनात विष कालवतो. हा दुर्गुण म्हणजे ईर्ष्या.

इंग्रज तत्त्ववेत्ता बर्ट्‌रंड रस्सल याने लिहिले, “नेपोलियनला सीझरविषयी ईर्ष्या होती, सीझरला थोर सिकंदरबद्दल ईर्ष्या होती आणि सिकंदरला हक्युलीझची ईर्ष्या वाटत होती, अशा एका व्यक्‍तीची जी खरेतर अस्तित्वातही नव्हती.” ईर्ष्येची भावना कोणालाही सतावू शकते, मग तो कितीही श्रीमंत, कितीही चांगला किंवा जीवनात कितीही यशस्वी असो.

ईर्ष्या म्हणजे इतरांजवळ असलेल्या वस्तू, त्यांची समृद्धी किंवा त्यांना मिळालेला फायदा पाहून त्यांच्याबद्दल वाटणारी कटुता. ईर्ष्या आणि हेवा या दोन भावनांमधील फरक दाखवताना बायबलविषयी असलेल्या एका संदर्भग्रंथात असे म्हटले आहे: “‘हेवा’ . . . म्हणजे दुसऱ्‍याजवळ जे आहे ते आपल्याजवळही असावं ही भावना. आणि ‘ईर्ष्या’ म्हणजे दुसऱ्‍याजवळ जे आहे ते काढून घेण्याची इच्छा.” ईर्ष्येने पेटलेला माणूस इतरांजवळ जे आहे ते पाहून नुसताच खट्टू होत नाही, तर ती गोष्ट त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

ईर्ष्या कशा प्रकारे आपल्याही मनात घर करू शकते आणि यामुळे कोणते परिणाम घडू शकतात हे जाणून घेणे सुज्ञपणाचे ठरेल. विशेषतः ईर्ष्येच्या या भावनेने आपल्या जीवनाचा पुरता ताबा घेऊ नये म्हणून आपल्याला कोणती काळजी घेता येईल हे आपण समजून घेतले पाहिजे.

ईर्ष्येच्या आगीत तेल ओतणारी मनोवृत्ती

अपरिपूर्ण मनुष्यात “ईर्ष्या बाळगण्याची प्रवृत्ती” उपजतच असते. पण इतर अनेक गोष्टी याच्यात भर घालू शकतात. (याको. ४:५, NW) प्रेषित पौलाने अशा एका गोष्टीविषयी सांगितले: “आपण एकमेकांना चिथावून व एकमेकांचा हेवा [ईर्ष्या] करून पोकळ अभिमानाची इच्छा करणारे असे नसावे.” (गलती. ५:२६, पं.र.भा.) एकमेकांना चिथावण्याची म्हणजेच चढाओढीची प्रवृत्ती, आपल्यामध्ये उपजतच असलेल्या ईर्ष्येच्या भावनेत आणखीनच भर घालू शकते. यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या कल्पना आणि हेमंत * या दोघांना या गोष्टीचा अनुभव आला.

सामान्य पायनियर असलेली कल्पना म्हणते: “बरेचदा इतरांकडे पाहून माझा जळफळाट होतो. त्यांच्याजवळ असलेल्या आणि माझ्याजवळ नसलेल्या गोष्टींची मी तुलना करते.” एकदा कल्पना प्रवासी कार्याचा विशेषाधिकार लाभलेल्या एका जोडप्यासोबत जेवत होती. कल्पना व तिचे पती रितेश, प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीच्याच वयाचे होते. शिवाय, पूर्वी त्यांच्या नेमणुकाही जवळजवळ सारख्याच होत्या. हे सर्व लक्षात घेऊन कल्पना त्यांना म्हणाली: “माझा नवराही मंडळीत वडील आहे! मग तुम्ही प्रवासी कार्यात आहात आणि आम्ही मात्र काहीच नाही असं कसं?” चढाओढीच्या भावनेने ईर्ष्येच्या आगीत तेल ओतल्यामुळे, कल्पनाला आपण व आपले पती जे चांगले कार्य करत आहोत ते दिसत नव्हते. ती आपल्या जीवनात असंतुष्ट झाली होती.

हेमंतला मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करण्याची इच्छा होती. पण त्याला ही नेमणूक न मिळता इतरांना मिळाली तेव्हा त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्‍न झाली आणि तो वडील वर्गाच्या संयोजकाचा राग करू लागला. हेमंत स्वतःच कबूल करतो, “ईर्ष्येमुळे मी या बांधवाचा द्वेष करू लागलो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचा चुकीचा अर्थ घेऊ लागलो. ईर्ष्येची भावना तुमच्या जीवनाचा ताबा घेते तेव्हा तुम्ही अतिशय आत्मकेंद्रित बनता आणि तुम्हाला नीट विचार करणंही जमत नाही.”

बायबलमधील उदाहरणांवरून आपण काय शिकतो?

बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत जी आपल्याला सावध करतात. (१ करिंथ. १०:११) यांपैकी काही उदाहरणे ईर्ष्या कशी उत्पन्‍न होते, इतकेच नव्हे, तर जे तिला स्वतःवर नियंत्रण करू देतात त्यांच्या मनात ही भावना कशा प्रकारे विष कालवते हेदेखील दाखवतात.

उदाहरणार्थ, आदाम व हव्वा यांचा पहिला मुलगा काइन आपल्या भावावर, हाबेलवर क्रोधित झाला. कारण यहोवाने हाबेलचे बलिदान स्वीकारले पण त्याचे स्वीकारले नाही. खरेतर काइन या परिस्थितीवर तोडगा काढू शकला असता, पण ईर्ष्येच्या भावनेने तो जणू आंधळा झाला होता. इतका, की शेवटी त्याने आपल्या भावाचा वध केला. (उत्प. ४:४-८) म्हणूनच, बायबलमध्ये काइनाबद्दल असे म्हटले आहे की तो “त्या दुष्टापासून” म्हणजेच सैतानापासून होता.—१ योहा. ३:१२, पं.र.भा.

योसेफबद्दल आपल्या पित्याला खास जिव्हाळा आहे हे पाहून योसेफच्या दहा भावांना त्याची ईर्ष्या वाटत होती. नंतर योसेफने त्यांना आपल्या भविष्यसूचक स्वप्नांबद्दल सांगितले, तेव्हा तर ते त्याचा आणखीनच द्वेष करू लागले. इतका, की ते त्याच्या जिवावर उठले. शेवटी, त्यांनी योसेफला गुलाम म्हणून विकले आणि दुष्टपणे आपल्या पित्यासमोर असे भासवले की तो मरण पावला आहे. (उत्प. ३७:४-११, २३-२८, ३१-३३) कित्येक वर्षांनंतर त्यांनी आपले पाप कबूल केले तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: ‘आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी आहोत व आपण त्याचे दुःख पाहिले असताहि त्याचे ऐकले नाही.’—उत्प. ४२:२१; ५०:१५-१९.

कोरह, दाथान व अबीराम यांचे उदाहरण लक्षात घ्या. त्यांनी आपल्या विशेषाधिकारांची मोशे व अहरोनाच्या विशेषाधिकारांशी तुलना केली तेव्हा त्यांच्या मनात ईर्ष्या उत्पन्‍न झाली. मोशे आपल्यावर ‘अधिकार गाजवितो’ आणि शिरजोरी करतो असा त्यांनी आरोप केला. (गण. १६:१३) हा आरोप अर्थातच खोटा होता. (गण. ११:१४, १५) खुद्द यहोवानेच मोशेला नेमले होते. पण या बंडखोरांना मोशेच्या पदामुळे त्याच्याबद्दल ईर्ष्या वाटत होती. शेवटी त्यांच्या या ईर्ष्येमुळे यहोवाने त्यांचा नाश केला.—स्तो. १०६:१६, १७.

ईर्ष्या माणसाला कोणत्या पातळीला नेऊ शकते याचा शलमोन राजाला एकदा प्रत्यय आला. एका स्त्रीचे तान्हे बाळ मरण पावले होते. तेव्हा तिने मेलेले बाळ आपले नसून, आपल्यासोबत राहणाऱ्‍या स्त्रीचे बाळ मरण पावले आहे असे सांगून तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. राजासमोर त्यांची न्यायचौकशी झाली आणि जिवंत बाळाला ठार मारले जावे असे सुचवण्यात आले तेव्हा खोटे बोलणारी स्त्री यालाही तयार झाली. पण शलमोनाने योग्य न्याय करून बाळ खऱ्‍या आईकडे सोपवले.—१ राजे ३:१६-२७.

ईर्ष्येमुळे अतिशय नाशकारक परिणाम घडू शकतात. येथे चर्चा करण्यात आलेली बायबलमधील उदाहरणे दाखवतात की ईर्ष्येमुळे द्वेष, अन्याय आणि खून यांसारखे परिणाम घडू शकतात. शिवाय, यांपैकी प्रत्येक उदाहरणात इतरांच्या ईर्ष्येला बळी पडलेल्या व्यक्‍तीने कोणतीही चूक केलेली नसताना तिला इतरांकडून दुर्व्यवहार सहन करावा लागला. तर मग, ईर्ष्येच्या भावनेने आपल्या मनात विष कालवू नये म्हणून आपल्याला काय करता येईल? ईर्ष्येवर मात करण्यासाठी कोणते काही उपाय आहेत?

गुणकारी उपाय!

प्रीती आणि बंधुभाव विकसित करा. प्रेषित पेत्राने ख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति करा.” (१ पेत्र १:२२) आणि प्रीतीमध्ये काय गोवलेले आहे? प्रेषित पौलाने लिहिले: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथ. १३:४, ५) इतरांबद्दल अशा प्रकारची प्रीती उत्पन्‍न केल्यास ईर्ष्येच्या नकारात्मक प्रवृत्तीवर मात करण्यास आपल्याला साहाय्य मिळणार नाही का? (१ पेत्र २:१) योनाथानने दाविदाबद्दल ईर्ष्या बाळगली नाही, उलट दावीद त्याला “प्राणाप्रमाणे प्रिय” होता.—१ शमु. १८:१.

देवाच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या लोकांची संगत धरा. ७३ वे स्तोत्र लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याला ऐशआरामात राहणाऱ्‍या दुष्ट लोकांबद्दल ईर्ष्या वाटत होती. पण तो “देवाच्या पवित्रस्थानात” गेला तेव्हा त्याला या ईर्ष्येच्या भावनेवर मात करता आली. (स्तो. ७३:३-५, १७) सहउपासकांच्या सहवासात, स्तोत्रकर्त्याला ‘देवाजवळ गेल्यामुळे’ मिळणाऱ्‍या आशीर्वादांची जाणीव झाली. (स्तो. ७३:२८) ख्रिस्ती सभांमध्ये आपल्या सहविश्‍वासू बांधवांसोबत नियमित सहवास राखल्याने आपल्या बाबतीतही असेच घडेल.

चांगुलपणाने वागण्याचा प्रयत्न करा. काइनाच्या मनात ईर्ष्या व द्वेष उत्पन्‍न झाला आहे हे पाहून देवाने त्याला ‘बरे कर’ किंवा चांगुलपणाने वाग असा सल्ला दिला. (उत्प. ४:७) खरे ख्रिस्ती कशा प्रकारे चांगुलपणाने वागू शकतात? येशूने म्हटले की आपण ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति केली पाहिजे. [तसेच] आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति केली पाहिजे.’ (मत्त. २२:३७-३९) यहोवाची सेवा करण्यास व इतरांना मदत करण्यास जीवनात प्राधान्य देणे हा ईर्ष्येच्या भावनांवर मात करण्याचा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात अर्थपूर्ण सहभाग घेणे हा देवाबद्दल व आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. असे केल्याने आपल्याला यहोवाचा “आशीर्वाद” लाभतो.—नीति. १०:२२.

“आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा.” (रोम. १२:१५) येशूने आपल्या शिष्यांना मिळालेल्या सफलतेबद्दल आनंद व्यक्‍त केला. आणि राज्याच्या प्रचारात आपले शिष्य आपल्यापेक्षा जास्त कार्य साध्य करतील असेही त्याने म्हटले. (लूक १०:१७, २१; योहा. १४:१२) आपण सर्व जण मिळून एकजुटीने यहोवाची सेवा करत आहोत. त्यामुळे, आपल्यापैकी एखाद्याला सफलता मिळाल्यास सर्वांसाठीच तो एक आशीर्वाद असतो. (१ करिंथ. १२:२५, २६) तर मग, इतरांवर अधिक जबाबदाऱ्‍या सोपवल्या जातात तेव्हा ईर्ष्या वाटण्याऐवजी आपल्याला आनंदच वाटू नये का?

हा संघर्ष सोपा नाही!

ईर्ष्येच्या भावनांवर आपण एका रात्रीत मात करू शकत नाही. कल्पना कबूल करते: “अजूनही माझ्यात ईर्ष्या करण्याची प्रवृत्ती आहे. माझी इच्छा नसतानाही ही प्रवृत्ती माझ्या स्वभावात आहे आणि ती आटोक्यात ठेवण्यासाठी मला सतत प्रयत्न करावा लागतो.” हेमंतला आपल्या भावनांशी अशाच प्रकारे संघर्ष करावा लागला. तो सांगतो, “वडील वर्गाच्या संयोजकाच्या चांगल्या गुणांची कदर करायला यहोवानं मला मदत केली. देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवल्यामुळे मला खूपच साहाय्य मिळालं.”

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने ज्यांविरुद्ध संघर्ष केला पाहिजे अशा ‘देहाच्या कर्मांपैकी’ ईर्ष्याही एक आहे. (गलती. ५:१९-२१) या भावनेला स्वतःवर नियंत्रण न करू दिल्यास आपले जीवन आणखी आनंदी बनेल आणि आपण आपल्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला आनंदित करू.

[तळटीप]

^ परि. 7 नावे बदलण्यात आली आहेत.

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आनंद करणाऱ्‍यांबरोबर आनंद करा”