तुम्हाला माहीत होते का?
तुम्हाला माहीत होते का?
जेरूसलेमच्या मंदिरात पैशांची अदलाबदल करणारे सराफ का होते?
▪ येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी मंदिरात होणाऱ्या घोर अन्यायाविरुद्ध पाऊल उचलले. त्याबद्दल बायबल म्हणते: “मंदिरात जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना [येशूने] बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या, आणि त्यांस म्हटले, ‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहा.”—मत्त. २१:१२, १३.
पहिल्या शतकातील यहुदी आणि यहुदी मतानुसारी निरनिराळ्या देशांतून व शहरांतून जेरूसलेममधील मंदिरात यायचे तेव्हा ते आपापल्या भागांतील नाणी आपल्यासोबत आणायचे. पण, मंदिराचा वार्षिक कर भरण्यासाठी, यज्ञपशूंची खरेदी करण्यासाठी व इतर ऐच्छिक अर्पणे देण्यासाठी त्यांना एकाच स्वीकृत चलनाचा उपयोग करावा लागत असे. त्यामुळे, पैशांची अदलाबदल करणारे सराफ निरनिराळ्या भागांतील व निरनिराळ्या किंमतींची नाणी स्थानिक चलनात बदलायचे व या सेवेच्या बदल्यात ते लोकांकडून काही पैसे घ्यायचे. यहुदी सणांची वेळ जवळ यायची तेव्हा हे सराफ मंदिरातील विदेश्यांच्या अंगणात आपले चौरंग थाटून बसायचे.
पैशांची अदलाबदल करणारे हे सराफ मंदिराला “लुटारूंची गुहा” बनवत होते अशी जी टीका येशूने केली त्यावरून असे दिसते, की पैशांची अदलाबदल करण्यासाठी ते लोकांकडून भरमसाट पैसे उकळत होते. (w११-E १०/०१)