व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?

तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?

तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?

“प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.”—इफिस. ५:१०.

१, २. (क) आपण जीवनाचा आनंद लुटावा अशी यहोवाची इच्छा आहे हे देवाच्या वचनातून कसे सूचित होते? (ख) आपण करमणुकीसाठी जो वेळ खर्च करतो तो ‘देवाच्या देणगीचा’ एक भाग असल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे?

 संपूर्ण बायबलमध्ये अशी अनेक विधाने आढळतात ज्यांवरून हे सूचित होते, की आपण केवळ जीवन जगावे अशी यहोवाची इच्छा नाही, तर आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, स्तोत्र १०४:१४, १५ म्हणते की यहोवा, “मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर” उत्पन्‍न करतो. जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेले अन्‍न यहोवाच आपल्याला देतो. तो वनस्पती उगवतो ज्यातून आपल्याला अन्‍नधान्य, तेल व द्राक्षारस मिळतो. जीवन जगण्यासाठी द्राक्षारसाची गरज नसली, तरी द्राक्षारसामुळे ‘मनुष्याचे अंतःकरण आनंदित होऊ शकते.’ (उप. ९:७; १०:१९) होय, आपण आनंदी असावे व आपले मन ‘हर्षाने भरून तृप्त’ व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे.—प्रे. कृत्ये १४:१६, १७.

त्यामुळे, ‘आकाशातील पाखरे’ व “रानातील फुले” निरखून पाहण्यासाठी किंवा मनाला तजेला देणाऱ्‍या व आपले जीवन समृद्ध करणाऱ्‍या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी आपण अधूनमधून काही वेळ काढतो तेव्हा आपल्याला दोषी वाटण्याची गरज नाही. (मत्त. ६:२६, २८; स्तो. ८:३, ४) सुखी व समृद्ध जीवन ही “देवाची देणगी आहे.” (उप. ३:१२, १३) आणि आपण करमणुकीसाठी जो वेळ खर्च करतो तो देवाने दिलेल्या या देणगीचा भाग आहे. तेव्हा, आपण या वेळेचा उपयोग अशा रीतीने केला पाहिजे ज्यामुळे देवाचे मन आनंदित होईल.

निराळेपणा व मर्यादा

३. करमणुकीच्या बाबतीत निराळेपणा का असू शकतो?

करमणुकीच्या बाबतीत समतोल दृष्टिकोन बाळगणारे लोक निरनिराळ्या स्वरूपाची करमणूक करत असले, तरी या बाबतीत आपण मर्यादा राखली पाहिजे याची ते जाणीव बाळगतात. का? याचे उत्तर पाहण्यासाठी आपण मनोरंजनाची तुलना खाद्यपदार्थाशी करू या. जगातील निरनिराळ्या भागात निरनिराळे खाद्यपदार्थ लोकप्रिय असतात. किंबहुना, जगाच्या एका भागात अगदी चवीने खाल्ला जाणारा एखादा पदार्थ, दुसऱ्‍या भागातील लोकांना कदाचित तितका रुचकर वाटणार नाही. त्याचप्रमाणे, जगातील एका भागात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना करमणुकीचा एखादा प्रकार कदाचित सुखकर वाटेल, पण दुसऱ्‍या भागात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना मात्र तो तसा वाटणार नाही. उलट, एकाच भागात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्येसुद्धा असे पाहायला मिळते, की विरंगुळ्यासाठी एका व्यक्‍तीला जी गोष्ट करायला आवडते (उदाहरणार्थ, पुस्तक वाचणे), तीच गोष्ट दुसऱ्‍या व्यक्‍तीला अगदी कंटाळवाणी वाटेल; तसेच, जी गोष्ट एखाद्या व्यक्‍तीला सुखावह वाटते (जसे की सायकलवरून रपेट मारणे), तीच गोष्ट दुसऱ्‍या व्यक्‍तीला थकवून टाकणारी वाटेल. असे असले, तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत व करमणुकीच्या बाबतीत निराळेपणाला व वैयक्‍तिक आवडीनिवडीला बराच वाव असतो हे आपण मान्य करतो.—रोम. १४:२-४.

४. आपण जी करमणूक निवडतो त्या बाबतीत आपण मर्यादा का राखली पाहिजे? उदाहरण द्या.

पण, करमणुकीच्या बाबतीत निराळेपणाला वाव आहे म्हणून आपण त्यात आकंठ बुडावे असा त्याचा अर्थ होत नाही हेदेखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण पुन्हा एकदा खाद्यपदार्थाचाच विचार करू या. निरनिराळे खाद्यपदार्थ खाण्याची आपली इच्छा असली, तरी आपण नासलेले अन्‍नपदार्थ जाणूनबुजून खाणार नाही. असे करणे व्यवहारबुद्धीच्या विरोधात असून त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे, हितकारक मनोरंजनाचे निरनिराळे पर्याय आपल्यासमोर आहेत. पण, आपण जीवघेण्या, हिंसक किंवा नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असलेल्या मनोरंजनाचा आस्वाद घेणार नाही. अशा प्रकारचे मनोरंजन निवडणे बायबल तत्त्वांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आपले शारीरिक व आध्यात्मिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. या बाबतीत आपण उचित मर्यादा राखत आहोत याची खातरी करण्यासाठी, आपल्याला आवडणारा करमणुकीचा एखादा प्रकार आपल्यासाठी हितकारक आहे की नाही हे आधी आपण ठरवले पाहिजे. (इफिस. ५:१०) आपल्याला हे कसे करता येईल?

५. आपण निवडलेली करमणूक देवाच्या स्तरांच्या एकवाक्यतेत आहे की नाही हे आपण कसे ठरवू शकतो?

आपण निवडलेली करमणूक आपल्यासाठी हितकारक व यहोवाच्या दृष्टीने स्वीकार्य असावी म्हणून ती देवाच्या वचनातील विशिष्ट स्तरांच्या एकवाक्यतेत असली पाहिजे. (स्तो. ८६:११) तुम्हाला आवडणारा करमणुकीचा एखादा प्रकार बायबलच्या स्तरांनुसार आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही स्वतःला तीन प्रश्‍न विचारू शकता. ते तीन प्रश्‍न आहेत: काय, केव्हा आणि कोण? या प्रत्येक प्रश्‍नाची आता आपण सविस्तरपणे चर्चा करू या.

त्यात काय गोवले आहे?

६. आपण कोणत्या प्रकारचे मनोरंजन टाळले पाहिजे, आणि का?

एखाद्या करमणुकीचा आस्वाद घेण्याआधी आपण सर्वात प्रथम स्वतःला जो प्रश्‍न विचारला पाहिजे तो आहे, काय?—म्हणजे, ‘करमणुकीचा जो प्रकार मला आकर्षक वाटतो त्यात काय गोवले आहे?’ या प्रश्‍नाचे उत्तर मिळवताना ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की मनोरंजनाचे मुळात दोन प्रकार असतात. त्यांपैकी पहिल्या प्रकाराला आपण थेट ‘नाही’ असे उत्तर देऊ; तर दुसऱ्‍या प्रकाराला कदाचित ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर देऊ. मनोरंजनाचा पहिला प्रकार काय आहे? या दुष्ट जगातील बहुतांश मनोरंजनात बायबलच्या तत्त्वांचे किंवा देवाच्या नियमांचे उघडउघड उल्लंघन करणाऱ्‍या गोष्टी दाखवल्या जातात. (१ योहा. ५:१९) अशा प्रकारच्या मनोरंजनाला खरे ख्रिस्ती साफ नकार देतात. अशा मनोरंजनात क्रूरता, भूतविद्या, समलैंगिकता, अश्‍लीलता किंवा हिंसा दाखवली जाते; किंवा मग इतर वाईट, अनैतिक कृत्यांना उत्तेजन दिले जाते. (१ करिंथ. ६:९, १०; प्रकटीकरण २१:८ वाचा.) आपण कोठेही असू, अशा प्रकारचे मनोरंजन कटाक्षाने टाळण्याद्वारे आपण यहोवाला दाखवतो की आपण ‘वाइटाचा वीट मानतो.’—रोम. १२:९; १ योहा. १:५, ६.

७, ८. मनोरंजनाच्या एखाद्या प्रकाराची गुणवत्ता आपण कशा प्रकारे तपासून पाहू शकतो? उदाहरण द्या.

मनोरंजनाच्या दुसऱ्‍या प्रकारात, अशा गोष्टी गोवलेल्या असतात ज्यांचे देवाच्या वचनात स्पष्टपणे खंडन केलेले नसते. तेव्हा, अशा प्रकारचे मनोरंजन निवडण्याआधी ते यहोवाच्या दृष्टीने हितकारक आहे की नाही हे आपण काळजीपूर्वक पडताळून पाहिले पाहिजे. त्या बाबतीत देवाचा दृष्टिकोन काय आहे हे बायबलच्या तत्त्वांवरून समजू शकते. (नीति. ४:१०, ११) त्यानंतर, आपल्याला एक शुद्ध विवेक राखण्यास मदत करेल असा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे. (गलती. ६:५; १ तीम. १:१९) आपण हे कसे करू शकतो? याचा विचार करा: एखादा नवीन पदार्थ खाण्याआधी त्यात कोणकोणते जिन्‍नस आहेत हे आधी आपण जाणून घेतो. त्याचप्रमाणे, करमणुकीचा एखादा प्रकार निवडताना त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे आधी आपण जाणून घेतले पाहिजे.—इफिस. ५:१७.

उदाहरणार्थ, तुम्हाला खेळ खूप आवडत असेल आणि त्यात काहीच गैर नाही. खेळात खूप मौज व आनंद असू शकतो. पण, काही खेळांमधील जीवघेणी स्पर्धा, अवाजवी धोका, गंभीर दुखापती होण्याची शक्यता, बेफाम जल्लोष, राष्ट्रीयत्वाची तीव्र भावना किंवा असे इतर “जिन्‍नस” असतील. अशा खेळांचे तुम्हाला आकर्षण वाटत असल्यास काय? एखाद्या खेळात कोणकोणत्या गोष्टी गोवल्या आहेत याचे परीक्षण केल्यानंतर, खेळाचा हा प्रकार यहोवाच्या विचारसरणीशी किंवा आपण प्रचार करत असलेल्या शांतीच्या व प्रेमाच्या संदेशाशी सुसंगत नाही या निष्कर्षावर बहुधा तुम्ही याल. (यश. ६१:१; गलती. ५:१९-२१) दुसरीकडे पाहता, करमणुकीच्या एखाद्या प्रकारात, यहोवाच्या नजरेत स्वीकृत असलेले “जिन्‍नस” असतील, तर अशा प्रकारची करमणूक तुमच्यासाठी हितकर व आनंददायक असू शकते.—गलती. ५:२२, २३; फिलिप्पैकर ४:८ वाचा.

मी केव्हा करमणूक करावी?

९. ‘मी केव्हा करमणूक करावी?’ या प्रश्‍नाच्या उत्तरावरून काय दिसून येते?

आपण स्वतःला विचारला पाहिजे असा दुसरा प्रश्‍न आहे, केव्हा?—म्हणजे, ‘मी केव्हा करमणूक करावी? त्यासाठी मी किती वेळ द्यावा?’ याआधी आपण काय? या प्रश्‍नाची चर्चा केली होती आणि त्या प्रश्‍नाच्या उत्तरावरून आपल्या मनाचा कल दिसून येतो. म्हणजे, आपल्याला काय स्वीकृत आहे व काय अस्वीकृत आहे हे दिसून येते. पण, केव्हा? या प्रश्‍नाच्या उत्तरावरून आपला प्राधान्यक्रम—आपण कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे व कोणत्या गोष्टीला कमी महत्त्व दिले पाहिजे हे दिसून येते. तर मग, आपण मनोरंजनाला जितके महत्त्व देतो ते उचित आहे की नाही हे आपण कसे ठरवू शकतो?

१०, ११. आपण करमणुकीसाठी किती वेळ द्यावा हे ठरवण्यासाठी मत्तय ६:३३ मध्ये नमूद असलेले येशूचे शब्द कशा प्रकारे आपली मदत करू शकतात?

१० येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सांगितले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” (मार्क १२:३०) तेव्हा, आपल्या जीवनात यहोवावरील आपले प्रेम सर्वात पहिल्या स्थानी असले पाहिजे. आपण असे करत आहोत हे आपण येशूच्या पुढील सल्ल्याचे पालन करण्याद्वारे दाखवतो: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३३) करमणुकीसाठी आपण किती वेळ द्यावा व त्यास किती महत्त्व द्यावे हे ठरवण्यासाठी येशूचा हा सल्ला आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो?

११ येशूने जे म्हटले त्याकडे बारकाईने लक्ष द्या: त्याने म्हटले, ‘पहिल्याने राज्य मिळविण्यास झटा.’ त्याने, ‘केवळ राज्य मिळविण्यास झटा’ असे म्हटले नाही. यावरून स्पष्ट होते, की जीवनात देवाच्या राज्याव्यतिरिक्‍त इतरही अनेक गोष्टी मिळवण्यास आपल्याला झटावे लागेल याची येशूला जाणीव होती. आपल्याला अन्‍न-वस्त्र-निवारा, मूलभूत शिक्षण, नोकरी-व्यवसाय, करमणूक व अशा इतर गोष्टींची गरज आहे. पण, आपण ज्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी झटतो त्यांत केवळ एकाच गोष्टीला म्हणजे राज्याशी संबंधित कार्यांना आपण पहिले स्थान दिले पाहिजे. (१ करिंथ. ७:२९-३१) हे मूलभूत सत्य जाणून घेतल्यानंतर, आपण करमणुकीला व इतर सर्व गोष्टींना जीवनात दुय्यम स्थान देऊ आणि सगळ्यात महत्त्वाच्या कार्याला—राज्याशी संबंधित कार्याला पहिले स्थान देऊ. आपण असे केले, तर मर्यादित स्वरूपाची करमणूक आपल्याला लाभदायक ठरू शकते.

१२. लूक १४:२८ मधील तत्त्व करमणुकीच्या बाबतीत कसे लागू होऊ शकते?

१२ तर मग, करमणुकीचा विचार करताना आपण प्रथम ‘खर्चाचा अंदाज’ बांधला पाहिजे. (लूक १४:२८) याचा अर्थ, एखाद्या करमणुकीसाठी आपला किती वेळ खर्च होईल याचा आपण आधी विचार केला पाहिजे. त्यानंतर, त्या विशिष्ट करमणुकीसाठी आपण किती वेळ देणे योग्य असेल हे आपण ठरवले पाहिजे. एखाद्या करमणुकीमुळे वैयक्‍तिक बायबल अभ्यास, कौटुंबिक उपासना, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे किंवा राज्य प्रचाराच्या कार्यात सहभागी होणे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होत असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही. (मार्क ८:३६) पण, अधूनमधून एखादी करमणूक केल्यामुळे राज्याशी संबंधित कार्ये पार पाडण्याची स्फूर्ती जर आपल्याला मिळत असेल, तर त्यासाठी वेळ खर्च करणे लाभदायक आहे असे आपण म्हणू शकतो.

माझे साथीदार कोण आहेत?

१३. आपण कोणासोबत करमणूक करतो याचा आपण काळजीपूर्वक विचार का केला पाहिजे?

१३ करमणुकीच्या बाबतीत आपण स्वतःला विचारला पाहिजे असा तिसरा प्रश्‍न आहे, कोण?—म्हणजे, ‘मी कोणासोबत करमणूक करू इच्छितो?’ स्वतःला हा प्रश्‍न विचारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. का? कारण आपले साथीदार जसे असतील तशीच आपली करमणूक असेल. ज्याप्रमाणे चांगल्या मित्रांच्या सहवासात जेवणाचा आस्वाद घेणे अधिक आनंददायक असते, त्याचप्रमाणे चांगल्या साथीदारांच्या सहवासात करमणूक करणे अधिक आनंददायक असते. त्यामुळेच, आपल्यापैकी अनेक जण आणि खासकरून तरुण लोक इतरांच्या सहवासात करमणुकीचा आनंद का लुटतात हे समजण्याजोगे आहे. पण, एखादी करमणूक आपल्यासाठी हितकारक ठरेल की नाही याची खातरी करण्यासाठी आपण कोणते साथीदार निवडावेत व कोणते टाळावेत हे आधी आपण सुज्ञपणे ठरवले पाहिजे.—२ इति. १९:२; नीतिसूत्रे १३:२० वाचा; याको. ४:४.

१४, १५. (क) चांगले साथीदार निवडण्याच्या बाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले? (ख) साथीदारांची निवड करण्याच्या बाबतीत आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१४ साथीदार निवडण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणे आपल्यासाठी लाभदायक ठरेल. मानवांच्या निर्मितीपासूनच, येशूला मानवांबद्दल प्रेम होते. (नीति. ८:३१) पृथ्वीवर असताना त्याने सर्व प्रकारच्या लोकांबद्दल प्रेमळ कळकळ दाखवली. (मत्त. १५:२९-३७) पण, मैत्रिपूर्ण असणे आणि घनिष्ठ मित्र असणे यात फरक आहे हे येशूला माहीत होते. पृथ्वीवर असताना येशू सर्व लोकांशी मैत्रीपूर्ण असला, तरी सर्वांशीच त्याची घनिष्ठ मैत्री होती असे नाही. त्याने आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांना जे म्हटले त्यावरून कोणत्या लोकांशी त्याची घनिष्ठ मैत्री होती हे दिसून येते. त्याने म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” (योहा. १५:१४; तसेच योहान १३:२७, ३० देखील पाहा.) होय, ज्यांनी येशूचे अनुसरण केले व यहोवाची सेवा केली केवळ अशाच लोकांसोबत त्याने घनिष्ठ मैत्री केली.

१५ तेव्हा, एखाद्या व्यक्‍तीला आपला घनिष्ठ मित्र म्हणून निवडावे की नाही हे ठरवताना येशूचे शब्द लक्षात ठेवणे शहाणपणाचे ठरेल. स्वतःला असे प्रश्‍न विचारा: ‘ही व्यक्‍ती आपल्या वागण्याबोलण्यातून हे दाखवून देते का की ती यहोवाच्या व येशूच्या आज्ञांचे पालन करत आहे? मी ज्या बायबल मूल्यांचे व नैतिक तत्त्वांचे पालन करतो त्याचे तीदेखील पालन करते का? तिच्या सहवासात राहिल्यामुळे मला देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याचे व यहोवाचा निष्ठावंत सेवक बनण्याचे प्रोत्साहन मिळेल का?’ या प्रश्‍नांची उत्तरे तुम्ही खातरीने “होय” अशी दिलीत, तर करमणूक करण्यासाठी तुम्हाला एक चांगला साथीदार मिळाला आहे असे समजा.स्तोत्र ११९:६३ वाचा; २ करिंथ. ६:१४; २ तीम. २:२२.

आपली करमणूक हितकारक आहे का?

१६. मनोरंजनाची निवड करताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे?

१६ मनोरंजनाच्या तीन पैलूंची म्हणजे गुणवत्ता, प्रमाण आणि सहवास यांची आपण थोडक्यात चर्चा केली. आपण निवडलेले मनोरंजन आपल्यासाठी लाभदायक असावे असे जर आपल्याला वाटत असेल, तर ते बायबलच्या स्तरांशी सुसंगत असले पाहिजे. तेव्हा, एखादी करमणूक करण्याआधी आपण त्याची पारख केली पाहिजे. गुणवत्तेच्या बाबतीत आपण हे जाणून घेतले पाहिजे की, ‘त्यात काय गोवले आहे? ते हितकर आहे की हिणकस आहे?’ (नीति. ४:२०-२७) प्रमाणाच्या बाबतीत आपण हे तपासून पाहिले पाहिजे की, ‘त्यासाठी मी किती वेळ द्यावा? मी जितका वेळ देतो तो उचित आहे की वाजवीपेक्षा जास्त आहे?’ (१ तीम. ४:८) आणि सहवासाच्या बाबतीत आपण हे ठरवले पाहिजे की, ‘मी कोणासोबत करमणूक करू इच्छितो? हे साथीदार चांगले आहेत की वाईट?’—उप. ९:१८; १ करिंथ. १५:३३.

१७, १८. (क) आपले मनोरंजन बायबलच्या स्तरांशी सुसंगत आहे की नाही याची पारख आपण कशी करू शकतो? (ख) मनोरंजनाची निवड करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा तुम्ही वैयक्‍तिकपणे काय करण्याचे ठरवले आहे?

१७ मनोरंजनाचा एखादा प्रकार, वर उल्लेख केलेल्या तीन पैलूंच्या बाबतीत बायबलच्या स्तरांशी सुसंगत नसेल, तर तो आपल्यासाठी उचित नाही. या उलट, आपण निवडलेली करमणूक तिन्ही पैलूंच्या बाबतीत बायबलच्या स्तरांच्या एकवाक्यतेत आहे याची जर आपण खातरी केली, तर त्यामुळे यहोवाचा सन्मान होईल व ती करमणूक आपल्याला लाभदायक ठरेल.—स्तो. ११९:३३-३५.

१८ तर मग, करमणुकीचा प्रश्‍न येतो, तेव्हा आपण योग्य गोष्ट, योग्य वेळी व योग्य व्यक्‍तींसोबत करण्याचा प्रयत्न करू या. होय, या बाबतीत बायबल जो सल्ला देते त्याचे पालन करण्याची आपल्या प्रत्येकाची मनस्वी इच्छा असली पाहिजे. बायबल म्हणते: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथ. १०:३१.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

करमणुकीच्या बाबतीत पुढील शास्त्रवचनांत दिलेली तत्त्वे तुम्ही कशा प्रकारे लागू करू शकता?

फिलिप्पैकर ४:८.

मत्तय ६:३३.

नीतिसूत्रे १३:२०.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

काय

[१० पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

केव्हा

[१२ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

कोण

[१० पानांवरील चित्र]

मित्रांची व करमणुकीची निवड करण्याच्या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचे अनुसरण कसे करू शकतो?