आपण सर्व एकत्र मिळून आनंद करू या!
आपण सर्व एकत्र मिळून आनंद करू या!
आनंद प्राप्त करणे हल्ली अधिकाधिक कठीण होत चालले आहे. अनेकांना तर, इतरांशी दोन चांगले शब्द बोलणेही जड जाते. आधुनिक जीवनशैलीमुळे आणि खासकरून शहरी जीवनामुळे लोक स्वतःला स्वतःमध्ये आकसून घेतात व इतरांपासून फटकून राहतात.
मानस-जीवविज्ञानाचे प्राध्यापक ऑल्बेर्टो ओलीवेरीओ म्हणतात: ‘एकाकीपणा ही एक सर्वसामान्य स्थिती आहे. मोठमोठ्या शहरांतील जीवनशैलीमुळे अशा एकलकोंडेपणाला अधिक खतपाणी मिळते. अनेकदा, आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल, आपल्या शेजाऱ्यांबद्दल किंवा आपण सहसा जेथून खरेदी करतो त्या दुकानात काम करणाऱ्यांबद्दल आपल्याला काहीच आस्था वाटत नाही.’ इतरांपासून फटकून राहण्याच्या लोकांच्या या वृत्तीमुळेच त्यांना सहसा नैराश्य येते.
आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींची स्थिती व मनोवृत्ती मात्र यापेक्षा खूप वेगळी आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “सर्वदा आनंदित असा.” (१ थेस्सलनी. ५:१६) आपल्याजवळ आनंदी असण्याची व इतरांसोबत मिळून आनंद करण्याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, आपण सर्वोच्च देव, यहोवा याची उपासना करतो; बायबलमधील सत्याची आपल्याला समज आहे; आपल्याला तारणाची व अनंतकालिक जीवनाची आशा आहे; आणि हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण इतरांनासुद्धा मदत करू शकतो.—स्तो. १०६:४, ५; यिर्म. १५:१६; रोम. १२:१२.
आनंदी असणे आणि इतरांसोबत आपला आनंद वाटून घेणे ही खऱ्या ख्रिश्चनांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच, पौलाने फिलिप्पैकरांना जे लिहिले त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही. त्याने त्यांना म्हटले: ‘मी आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करितो; आणि त्याचाच तुम्हीहि आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.’ (फिलिप्पै. २:१७, १८) या अवघ्या दोन वचनांत, पौलाने दोन वेळा आनंदी असण्याचा व इतरांसोबत आनंद करण्याचा उल्लेख केला.
खऱ्या ख्रिश्चनांनी इतरांपासून फटकून न राहण्याबद्दल सावध असले पाहिजे. आपल्या बंधुभगिनींपासून दूर राहणाऱ्या व्यक्तीला मंडळीत त्यांच्यासोबत आनंद करणे शक्य नाही. तर मग, आपल्या बंधुभगिनींसोबत ‘प्रभूमध्ये आनंद करत’ राहण्याचा जो सल्ला पौलाने दिला तो आपण कसा लागू करू शकतो?—फिलिप्पै. ३:१.
आपल्या बंधुभगिनींसोबत आनंद करा
पौलाने फिलिप्पैकरांना पत्र लिहिले तेव्हा तो कदाचित रोममध्ये एक कैदी होता. त्याच्या प्रचार कार्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले असावे. (फिलिप्पै. १:७; ४:२२) पण, तुरुंगात असूनसुद्धा सेवाकार्याबद्दलचा त्याचा आवेश किंचितही कमी झाला नाही. उलट, शक्य तितकी यहोवाची सेवा करण्यात व स्वतःचे अर्पण करण्यात त्याने आनंद मानला. (फिलिप्पै. २:१७) पौलाच्या मनोवृत्तीवरून दिसून येते, की आनंद एखाद्याच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो. पौल तुरुंगात होता तरीसुद्धा तो म्हणाला: ‘मी आनंद करणारच.’—फिलिप्पै. १:१८.
पौलाने फिलिप्पैमधील मंडळीची स्थापना केली होती आणि त्यामुळे त्या मंडळीतील बांधवांबद्दल त्याला विशेष जिव्हाळा होता. त्याला माहीत होते, की यहोवाच्या सेवेत त्याला मिळालेला आनंद त्यांच्यासोबत वाटून घेतल्याने त्यांनासुद्धा उत्तेजन मिळणार होते. त्यामुळे त्याने लिहिले: “बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे; म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धि झाली.” (फिलिप्पै. १:१२, १३) पौलाने हा उत्तेजनपर अनुभव आपल्या बांधवांना सांगितल्यामुळे त्याला स्वतःला आनंद मिळाला व त्याने त्यांच्यासोबत मिळून आनंद केला; तसेच, फिलिप्पैकरांनीसुद्धा पौलासोबत आनंद केला असेल. पण, असे करण्यासाठी त्यांनी पौलाच्या अनुभवामुळे खचून न जाता, त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करणे गरजेचे होते. (फिलिप्पै. १:१४; ३:१७) याशिवाय, फिलिप्पैकर आपल्या प्रार्थनांमध्ये नियमितपणे पौलाचा उल्लेख करू शकत होते व त्याला मदत व पाठबळ देण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व करू शकत होते.—फिलिप्पै. १:१९; ४:१४-१६.
पौलाप्रमाणे आपणसुद्धा आनंदी मनोवृत्ती बाळगतो का? आपण आपल्या जीवनातील व ख्रिस्ती सेवाकार्यातील सकारात्मक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो का? आपण आपल्या बंधुभगिनींच्या सहवासात असतो तेव्हा सेवाकार्यात आलेल्या अनुभवांविषयी आपण बोलू शकतो. आपल्या बंधुभगिनींशी बोलण्यासाठी आपल्याजवळ एखादा खास किंवा रोमांचक अनुभव असला पाहिजे असे नाही. आपण कदाचित एखादी परिणामकारक प्रस्तावना वापरून किंवा विशिष्ट पद्धतीने तर्क करून राज्य संदेशाबद्दल एखाद्याची आस्था जागृत केली असेल; बायबलच्या एखाद्या वचनावर आपण घरमालकासोबत अर्थपूर्ण संभाषण केले असेल; किंवा मग, आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे क्षेत्रातील लोकांनी ओळखले असेल आणि केवळ यामुळे त्यांना उत्तम साक्ष मिळाली असेल. इतरांना असे अनुभव सांगणे हा त्यांच्यासोबत मिळून आनंद करण्याचा एक मार्ग आहे.
प्रचार कार्य करण्यासाठी यहोवाच्या लोकांपैकी अनेकांनी खूप त्याग केले आहेत व अजूनही करत आहेत. पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, बेथेल सेवक, मिशनरी आणि आंतरराष्ट्रीय सेवक मोठ्या आनंदाने स्वतःला पूर्ण-वेळच्या सेवेत झोकून देतात. त्यांच्या या आनंदात आपणही सहभागी होतो का? तर मग, ‘देवाच्या राज्याच्या’ या प्रिय ‘सहकाऱ्यांबद्दल’ आपण कृतज्ञता व्यक्त करू या. (कलस्सै. ४:११) मंडळीच्या सभांमध्ये किंवा मोठ्या ख्रिस्ती संमेलनांमध्ये आपण एकत्र येतो तेव्हा आपण त्यांना मनापासून प्रोत्साहन देऊ शकतो. त्यांच्या आवेशी उदाहरणाचे आपण अनुकरणही करू शकतो. तसेच, त्यांचा पाहुणचार करण्याद्वारे, कदाचित त्यांना जेवणाचे आमंत्रण देण्याद्वारे आपण त्यांचे अनुभव व उत्तेजनपर शब्द ऐकण्यासाठी “संधि” निर्माण करू शकतो.—फिलिप्पै. ४:१०.
परीक्षांचा सामना करणाऱ्यांसोबत आनंद करा
पौलाने धीराने छळाचा सामना केला व परीक्षांवर मात केली. त्यामुळे यहोवाला विश्वासू राहण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का झाला. (कलस्सै. १:२४; याको. १:२, ३) फिलिप्पै येथील बांधवांनाही कदाचित अशाच परीक्षांचा सामना करावा लागेल हे त्याला माहीत होते. त्यामुळे, आपण आपल्या परीक्षांत टिकून राहिलो, तर आपण त्यांना उत्तेजन देऊ शकतो या जाणिवेने त्याला आनंद झाला. म्हणूनच त्याने त्यांना असे लिहिले: ‘ख्रिस्तावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर त्याच्या वतीने त्याच्याकरिता दुःखहि सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे; मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीहि करीत आहा.’—फिलिप्पै. १:२९, ३०.
त्याचप्रमाणे, आजही ख्रिश्चनांना आपल्या साक्षकार्यामुळे विरोधाचा सामना करावा लागतो. काही वेळा हा विरोध उघडपणे, तर बऱ्याचदा धूर्तपणे केला जातो. धर्मत्यागी लोक आपल्यावर खोटे दोषारोप लावू शकतात, कौटुंबिक सदस्य आपला विरोध करू शकतात किंवा शाळा-कॉलेजातील मित्र अथवा आपले सहकर्मचारी आपली थट्टा करू शकतात. येशूने म्हटले, की अशा परीक्षांमुळे आपण चकित होऊ नये किंवा खचून जाऊ नये. उलट, आपण आनंद केला पाहिजे. त्याने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”—मत्त. ५:११, १२.
जगातील काही देशांत, आपल्या बांधवांचा क्रूरपणे छळ केला जात आहे हे ऐकून आपण घाबरून जाऊ नये. त्या उलट, आपले हे बांधव धीराने छळ सहन करत आहेत याबद्दल आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो आणि त्यांचा विश्वास दृढ ठेवण्यास व त्यांना धीर धरण्यास यहोवाने त्यांना मदत करावी अशी विनंती आपण करू शकतो. (फिलिप्पै. १:३, ४) त्या प्रिय बांधवांसाठी आपण फारसे काही करू शकत नसलो, तरी आपल्या स्वतःच्या मंडळीत जे बंधुभगिनी परीक्षांचा सामना करत आहेत त्यांना आपण मदत करू शकतो. आपण त्यांच्याबद्दल आपुलकी बाळगू शकतो व त्यांना आधार देऊ शकतो. अधूनमधून त्यांना आपल्या कौटुंबिक उपासनेत सहभागी होण्यासाठी बोलावण्याद्वारे, त्यांच्यासोबत प्रचार कार्य व करमणूक करण्याद्वारे आपण त्यांच्यासोबत आनंद करण्याच्या संधी निर्माण करू शकतो.
होय, आपल्या बंधुभगिनींसोबत एकत्र मिळून आनंद करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत! तेव्हा, फटकून राहण्याच्या या जगाच्या वृत्तीचा आपण प्रतिकार करू या व आपल्या बंधुभगिनींसोबत आपला आनंद वाटून घेऊ या. असे केल्याने, मंडळीतील प्रेमाला व एकतेला हातभार लागेल. तसेच, यामुळे आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचा आनंदही आपण पूर्णार्थाने घेऊ. (फिलिप्पै. २:१, २) होय, “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा,” कारण पौल पुन्हा एकदा आपल्याला आर्जवतो, “आनंद करा!”—फिलिप्पै. ४:४.
[६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Globe: Courtesy of Replogle Globes