व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला खरोखर मौल्यवान वाटतात का?

तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला खरोखर मौल्यवान वाटतात का?

तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला खरोखर मौल्यवान वाटतात का?

इस्राएल लोकांची मिसरच्या दास्यत्वातून चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यानंतर, यहोवाची उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल सुरुवातीला ते आनंदी होते. (निर्ग. १४:२९–१५:१, २०, २१) पण, त्याच्या काही काळानंतरच त्यांचा दृष्टिकोन बदलला. ते आपल्या परिस्थितीबद्दल कुरकुर करू लागले. का? कारण, यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, अरण्यातील अडचणींवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ते मोशेला म्हणाले: “तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून ह्‍या रानात मरावयाला कशाला आणिले? येथे तर अन्‍न नाही व पाणीही नाही, आणि ह्‍या हलक्या अन्‍नाला [मान्‍नाला] आम्ही कंटाळलो आहो.”—गण. २१:५.

याच्या अनेक शतकांनतर, प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाने असे गायिले: “मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेविला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल. परमेश्‍वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.” (स्तो. १३:५, ६) यहोवाने दाविदाला दाखवलेली प्रेमदया तो विसरला नाही. उलट, त्याने नियमितपणे त्यावर मनन केले. (स्तो. १०३:२) यहोवाने आपल्यावरही अनेक उपकार केले आहेत. त्यामुळे, त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे ते गृहित न धरण्याची सुज्ञता आपण दाखवली पाहिजे. तर मग, आपण सध्या अनुभवत असलेल्या काही आशीर्वादांची चर्चा करू या.

यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे

स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते.” (स्तो. २५:१४) अपरिपूर्ण मानव यहोवासोबत एक जवळचा, वैयक्‍तिक नातेसंबंध जोडू शकतात हा किती मोठा बहुमान आहे! पण, आपल्या रोजच्या जीवनात आपण इतके व्यस्त होतो का, की प्रार्थना करण्यासाठी आपल्याजवळ फार कमी वेळ उरतो? असे झाल्यास, यहोवासोबत असलेल्या आपल्या चांगल्या नातेसंबंधाचे काय होईल याचा विचार करा. आपला मित्र या नात्याने, यहोवा आपल्याकडून अशी अपेक्षा करतो, की आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा व प्रार्थनेत त्याच्याजवळ मन मोकळे करून आपल्या मनातील भीती, आपल्या इच्छा व चिंता व्यक्‍त कराव्यात. (नीति. ३:५, ६; फिलिप्पै. ४:६, ७) तेव्हा, आपण आपल्या प्रार्थनेचा दर्जा सुधारण्याचा विचार करू नये का?

आपल्या प्रार्थनांचा विचार करताना पॉल नावाच्या एका तरुण साक्षीदाराला जाणवले की त्याला काही सुधारणा केली पाहिजे. * तो म्हणतो: “यहोवाला प्रार्थना करत असताना, तेच ते शब्द वापरण्याची मला सवयच लागली होती.” प्रार्थना या विषयावर वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स मध्ये संशोधन करत असताना, त्याला समजले की बायबलमध्ये सुमारे १८० प्रार्थना नमूद करण्यात आल्या आहेत. यांत, गतकाळातील यहोवाच्या सेवकांनी आपल्या सगळ्यात गहिऱ्‍या भावना व्यक्‍त केल्या आहेत. पॉल म्हणतो: “बायबलमधील या उदाहरणांवर मनन केल्याने, मी नेमक्या गोष्टींसाठी प्रार्थना करण्यास शिकलो. यामुळे, मला यहोवाजवळ माझं मन मोकळं करण्यास मदत मिळाली आहे. आता प्रार्थनेद्वारे यहोवाजवळ जाण्यास मला खूप आनंद होतो.”

“यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न

यहोवाने आपल्याला आणखीन एक आशीर्वाद दिला आहे. तो म्हणजे, त्याने आपल्याला बायबल सत्याबद्दल भरपूर माहिती पुरवली आहे. मुबलक प्रमाणात मिळणाऱ्‍या या आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेताना, “हर्षित चित्ताने जयजयकार” करण्याचे कारण आपल्याजवळ आहे. (यश. ६५:१३, १४) पण, सत्याबद्दल आपला आवेश कमी करू शकणाऱ्‍या आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असलेल्या प्रभावांपासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण धर्मत्यागी विचारसरणीकडे लक्ष दिल्यास त्याचा आपल्या विचारशक्‍तीवर प्रभाव पडू शकतो आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ यहोवा “यथाकाळी” पुरवत असलेले आध्यात्मिक अन्‍न किती मौल्यवान आहे याकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते.—मत्त. २४:४५-४७.

अँड्रे नावाचा एक ख्रिस्ती बांधव अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत होता. पण, धर्मत्यागी विचारांमुळे बहकले जाण्याचा वाईट अनुभव त्याला आला. त्याला असे वाटले की, धर्मत्यागी वेबसाईटवर केवळ ओझरती नजर टाकण्यात काही धोका नाही. तो म्हणतो: “धर्मत्यागी लोकांच्या वरवर सत्य वाटणाऱ्‍या शिकवणींकडे मी सुरुवातीला आकर्षित झालो होतो. मी जितकं अधिक त्यांचं परीक्षण केलं, तितकं अधिक मला वाटलं की यहोवाची संघटना सोडण्याचा माझा निर्णय योग्यच होता. पण, नंतर धर्मत्यागी लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध जे वादविषय मांडले होते त्यांवर संशोधन केल्यामुळे, हे खोटे शिक्षक किती धूर्त आहेत हे मला कळून चुकलं. साक्षीदारांच्या विरोधात त्यांनी मांडलेला ‘सबळ पुरावा’ खरंतर संदर्भाला धरून नसलेल्या माहितीवर आधारित होता. म्हणून, मग मी पुन्हा आपली प्रकाशने वाचण्याचा आणि सभांना उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. लवकरच मला याची जाणीव झाली, की मी कितीतरी गोष्टी चुकवल्या होत्या.” आनंदाची गोष्ट म्हणजे, अँड्रे मंडळीत परत आला.

जगभरातील ‘बंधुवर्ग’

आपला प्रेमळ बंधुसमाज हा यहोवाकडून मिळालेला एक आशीर्वाद आहे. (स्तो. १३३:१) त्यामुळेच, प्रेषित पेत्राने लिहिले: “बंधुवर्गावर प्रीति करा.” (१ पेत्र २:१७) ख्रिस्ती बंधुसमाजाचा एक भाग असल्यामुळे, आपल्यासारखाच विश्‍वास बाळगणारे आध्यात्मिक आई, वडील, भाऊ व बहीणी यांचा प्रेमळ सहवास व आधार आपल्याला अनुभवायला मिळतो.—मार्क १०:२९, ३०.

पण, कधीकधी निरनिराळ्या परिस्थितींमुळे बंधुभगिनींबरोबर असलेल्या आपल्या नातेसंबंधाला तडा जाऊ शकतो. जसे की, एखाद्या व्यक्‍तीच्या अपरिपूर्णतेमुळे आपल्याला सहज तिचा राग येऊ शकतो व आपण तिच्याबद्दल टीकात्मक दृष्टिकोन बाळगू शकतो. असे घडल्यास, यहोवाचे सेवक अपरिपूर्ण असूनही तो त्यांच्यावर प्रेम करतो हे लक्षात ठेवल्याने आपल्याला मदत होणार नाही का? त्याशिवाय, “आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही.” (१ योहा. १:८) तर मग, आपण ‘एकमेकांचे सहन करण्यास आणि आपसात क्षमा’ करण्यास प्रयत्नशील असू नये का?—कलस्सै. ३:१३.

ॲन नावाच्या एका तरुणीचे उदाहरण घ्या. ख्रिस्ती सहवास किती अनमोल आहे हे ती आपल्या कटू अनुभवातून शिकली. येशूने सांगितलेल्या दाखल्यातील उधळ्या पुत्राप्रमाणे काहीसे वागून ती ख्रिस्ती मंडळीपासून बहकली होती. पण, नंतर तिला तिची चूक लक्षात आली आणि ती पुन्हा सत्यात आली. (लूक १५:११-२४) या अनुभवातून ॲन काय शिकली? ती म्हणते: “पुन्हा यहोवाच्या संघटनेत आल्यामुळे, बंधुभगिनींमध्ये अपरिपूर्णता असली, तरी मी माझ्या सर्व बंधुभगिनींना अनमोल समजते. पूर्वी, मी सतत त्यांची टीका करायचे. पण, आता मी निर्धार केला आहे की आपल्या सहविश्‍वासू बांधवांसोबत अनुभवत असलेल्या आशीर्वादांपासून मी वंचित होऊ शकेन अशा कोणत्याही गोष्टीला मी आड येऊ देणार नाही. जगात कोणतीही गोष्ट इतकी मौल्यवान नाही की जिच्यासाठी आपल्याला आपले आध्यात्मिक नंदनवन सोडावे लागेल.”

तुम्हाला मिळणाऱ्‍या आशीर्वादांची नेहमी कदर करा

देवाचे राज्य मानवांच्या सर्व समस्यांचे निवारण करेल ही आशा एक अतिशय मौल्यवान खजिना आहे. आपण पहिल्यांदा या आशेबद्दल ऐकले तेव्हा आपले हृदय किती कृतज्ञतेने भरून आले होते! आपल्याला येशूच्या दाखल्यातील व्यापाऱ्‍याप्रमाणे वाटले होते, ज्याने “एक अति मोलवान मोती” विकत घेण्यासाठी “आपले सर्वस्व विकले.” (मत्त. १३:४५, ४६) मोतीबद्दल त्या व्यापाऱ्‍याला वाटणारे मोल कधी कमी झाले असेल असे येशूने सांगितले नाही. त्याचप्रमाणे, आपल्या अद्‌भुत आशेबद्दलची आपली कृतज्ञता आपण कधीच कमी होऊ देऊ नये.—१ थेस्सलनी. ५:८; इब्री ६:१९.

जीन नावाच्या बहिणीचे उदाहरण पाहा. ती ६० हून अधिक वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहे. ती म्हणते: “इतरांसोबत देवाच्या राज्याबद्दल बोलत राहिल्यामुळे, देवाचे राज्य सतत डोळ्यांसमोर ठेवण्यास मला मदत मिळाली. हे राज्य काय आहे हे लोकांना समजल्यानंतर मी त्यांच्या डोळ्यांत जी चमक पाहते त्यामुळे माझ्या मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. राज्याच्या सत्यामुळे बायबल विद्यार्थ्यांच्या जीवनात किती फरक पडतो हे पाहून मी असा विचार करण्यास प्रवृत्त होते, की ‘इतरांना सांगण्यासाठी माझ्याजवळ किती अद्‌भुत सत्य आहे!’”

आपण सध्या अनुभवत असलेल्या आध्यात्मिक आशीर्वादांबद्दल कृतज्ञता बाळगण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. आपल्याला विरोध, आजारपण, वाढते वय, नैराश्‍य, मृत्यू, आणि आर्थिक संकटे यांचा सामना करावा लागत असला, तरी या सर्व समस्या तात्पुरत्या आहेत हे आपण जाणतो. देवाच्या राज्यात, आध्यात्मिक आशीर्वादांसोबतच इतर अनेक आशीर्वाद आपल्याला लाभतील. आज आपण जे काही दुःख सहन करतो, ते नव्या जगात नाहीसे केले जाईल.—प्रकटी. २१:४.

दरम्यान, आपण आपल्या आध्यात्मिक आशीर्वादांची कदर करत राहू या, आणि स्तोत्रकर्त्याप्रमाणेच कृतज्ञता व्यक्‍त करू या, ज्याने असे गायिले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.”—स्तो. ४०:५.

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.

[१८ पानांवरील चित्र]

संकट काळी आपल्याला आध्यात्मिक आधार मिळतो हा एक आशीर्वादच आहे