व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज आपला सक्रिय पुढारी

आज आपला सक्रिय पुढारी

आज आपला सक्रिय पुढारी

“तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.”—प्रकटी. ६:२.

१, २. (क) सन १९१४ मध्ये सिंहासनारूढ झालेल्या ख्रिस्ताचे चित्रण बायबल कसे करते? (ख) राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर ख्रिस्ताने कोणती पावले उचलली?

 सन १९१४ मध्ये ख्रिस्ताला यहोवाच्या मशीही राज्याचा राजा या नात्याने सिंहासनारूढ करण्यात आले. आज आपल्या डोळ्यांसमोर त्याच्याबद्दल कोणती प्रतिमा उभी राहते? आपल्या स्वर्गीय सिंहासनावर बसून, पृथ्वीवरील आपल्या मंडळीत काय चालले आहे याकडे वेळोवेळी लक्ष देणारा अशी प्रतिमा उभी राहते का? तसे असल्यास आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. बायबलमधील स्तोत्रसंहिता व प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्याचे चित्रण, घोड्यावर स्वार होऊन “विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून” जाणाऱ्‍या व अखेरीस “विजयशाली” होणाऱ्‍या एका अतिशय उत्साही राजाप्रमाणे करण्यात आले आहे.—प्रकटी. ६:२; स्तो. २:६-९; ४५:१-४.

राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर ख्रिस्ताने सर्वात प्रथम ‘अजगर व त्याच्या दूतांवर’ विजय मिळवला. देवदूतांचा सेनापती या नात्याने आद्यदेवदूत मीखाएलाने अर्थात ख्रिस्ताने सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना पवित्र स्वर्गातून बाहेर काढले व खाली पृथ्वीवर टाकले. (प्रकटी. १२:७-९) त्यानंतर यहोवाचा ‘करार घेऊन येणारा निरोप्या’ या नात्याने येशू आपल्या पित्यासह आध्यात्मिक मंदिराची पाहणी करण्यासाठी आला. (मला. ३:१) त्याने ‘मोठ्या बाबेलीच्या’ सर्वाधिक दोषास्पद भागाचा अर्थात ख्रिस्ती धर्मजगताचा न्याय केला. कारण निर्दोष रक्‍त सांडल्याबद्दल व या जगाच्या राजनैतिक यंत्रणेशी आध्यात्मिक व्यभिचार केल्याबद्दल ख्रिस्ती धर्मजगत दोषी असल्याचे त्याला आढळून आले होते.—प्रकटी. १८:२, ३, २४.

आपल्या पृथ्वीवरील दासाचे शुद्धीकरण

३, ४. (क) यहोवाचा “निरोप्या” या नात्याने ख्रिस्ताने कोणते कार्य पूर्ण केले? (ख) मंदिराची पाहणी करण्यात आली तेव्हा काय दिसून आले, आणि मंडळीचे मस्तक या नात्याने येशूने कोणाची नेमणूक केली?

यहोवा देव व त्याचा “निरोप्या” आध्यात्मिक मंदिराची पाहणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांना मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा एक गट आढळला जो ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसचा भाग नव्हता. असे असले, तरी या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना किंवा ‘लेवीच्या वंशजांना’ देखील शुद्ध होण्याची गरज होती. याबद्दल मलाखी संदेष्ट्याने असे भाकीत केले होते: “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा तो [यहोवा] बसेल, व लेवीच्या वंशजांस शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील, मग ते धर्माने परमेश्‍वराला बलि अर्पण करितील.” (मला. ३:३) या आध्यात्मिक इस्राएलाचे शुद्धीकरण करण्यासाठी यहोवाने ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याचा’ अर्थात ख्रिस्त येशूचा उपयोग केला.

या विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना शुद्धीकरणाची गरज असली, तरी विश्‍वासू घराण्याला वेळेवर आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असल्याचे ख्रिस्ताला दिसून आले. सन १८७९ पासून हे अभिषिक्‍त ख्रिस्ती सर्व परिस्थितींत देवाच्या राज्याविषयीची बायबलवर आधारित सत्ये या नियतकालिकातून प्रकाशित करत आले होते. येशूने भाकीत केले होते, की ‘युगाच्या समाप्तीला’ तो आपल्या परिवाराची पाहणी करण्यासाठी “येईल” तेव्हा आपल्या परिवाराला ‘यथाकाळी खावयास देणारा’ एक दास त्याला आढळेल. या दासाला तो धन्य म्हणेल व त्यास पृथ्वीवरील “आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्त. २४:३, ४५-४७) ख्रिस्ती मंडळीचे मस्तक या नात्याने ख्रिस्ताने, राज्याशी संबंधित पृथ्वीवरील आपल्या सर्व कार्यांची व्यवस्था पाहण्यासाठी या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा’ उपयोग केला आहे. तसेच, एका नियमन मंडळाद्वारे त्याने अभिषिक्‍त “परिवाराला” व त्यांचे साथीदार असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ मार्गदर्शन पुरवले आहे.—योहा. १०:१६.

पृथ्वीची कापणी

५. मशीही राजा काय करत असल्याचे योहानाने एका दृष्टान्तात पाहिले?

सन १९१४ मध्ये राज्याधिकार हाती घेतल्यानंतर मशीही राजा ‘प्रभूच्या दिवसात’ आणखी काहीतरी करणार असल्याचे प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात पाहिले. योहानाने लिहिले: “नंतर मी पाहिले, तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक दृष्टीस पडला; त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुगूट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.” (प्रकटी. १:१०; १४:१४) मग, योहानाने यहोवाचा एक देवदूत कापणी करणाऱ्‍याला असे सांगत असल्याचे ऐकले की आपला विळा चालव कारण “पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”—प्रकटी. १४:१५, १६.

६. कालांतराने काय घडेल असे येशूने सांगितले?

‘पृथ्वीच्या पिकाच्या’ या कापणीवरून आपल्याला गहू व निदणाच्या येशूच्या दाखल्याची आठवण होते. त्या दाखल्यात येशूने स्वतःची तुलना, शेतात गव्हाचे चांगले बी पेरणाऱ्‍या मनुष्याशी केली. यामागचा त्याचा उद्देश, चांगल्या गव्हाचे भरघोस पीक अर्थात ‘राज्याच्या पुत्रांना’ गोळा करणे हा होता. राज्याचे हे पुत्र म्हणजे त्याच्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी अभिषिक्‍त करण्यात आलेले खरे ख्रिस्ती. पण, रात्रीच्या वेळी एका वैऱ्‍याने अर्थात ‘सैतानाने’ गव्हाच्या शेतात निदण पेरले. हे निदण म्हणजे “दुष्टाचे पुत्र.” चांगले बी पेरणाऱ्‍या मनुष्याने आपल्या कामकऱ्‍यांना सूचना दिली, की त्यांनी गहू व निदण हे दोन्ही कापणीपर्यंत म्हणजे ‘युगाच्या समाप्तीपर्यंत’ बरोबर वाढू द्यावेत. त्या वेळी मग, निदणापासून गहू वेगळे करण्यासाठी तो आपल्या देवदूतांना पाठवेल.—मत्त. १३:२४-३०, ३६-४१.

७. कशा प्रकारे ख्रिस्त ‘पृथ्वीच्या पिकाची’ कापणी करत आहे?

योहानाला दिलेल्या दृष्टान्ताच्या पूर्णतेत, येशू एक जगव्याप्त कापणीचे कार्य करत आहे. येशूच्या दाखल्यातील “गहू” अर्थात १,४४,००० ‘राज्याच्या पुत्रांपैकी’ जे उरलेले आहेत त्यांना गोळा करण्यास सुरुवात झाली तेव्हा ‘पृथ्वीच्या पिकाची’ कापणी सुरू झाली. दुसऱ्‍या महायुद्धानंतर, खरे ख्रिस्ती आणि खोटे ख्रिस्ती यांच्यातील फरक अधिक स्पष्ट होऊ लागला. हा फरक इतका ठळकपणे दिसू लागला की त्यामुळे ‘पृथ्वीच्या पिकाच्या’ कापणीचा दुसरा भाग म्हणजे दुसऱ्‍या मेंढरांना गोळा करणे शक्य झाले. ही दुसरी मेंढरे “राज्याचे पुत्र” नाहीत, तर ती राज्याच्या नम्र प्रजेचा एक “मोठा लोकसुमदाय” आहे. यांना “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे” यांच्यातून गोळा करण्यात येत आहे. ते मशीही राज्याला, म्हणजेच ख्रिस्त येशू व त्याच्या स्वर्गीय राज्यात त्याच्यासह राज्य करणारे १,४४,००० “पवित्र जन” यांनी बनलेल्या राज्याला अधीनता दाखवतात.—प्रकटी. ७:९, १०; दानी. ७:१३, १४, १८.

ख्रिस्त मंडळ्यांचे नेतृत्व करतो

८, ९. (क) ख्रिस्ताचे मंडळीच्या एकंदरीत आचरणाकडेच नव्हे, तर मंडळीतील प्रत्येक सदस्याच्या आचरणाकडे बारीक लक्ष आहे हे कशावरून दिसते? (ख) पृष्ठ २६ वर दाखवल्याप्रमाणे, “सैतानाच्या” कोणत्या ‘गहन गोष्टी’ आपण टाळल्या पाहिजेत?

सा.यु. पहिल्या शतकातील प्रत्येक मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीवर येशूचे किती बारीक लक्ष होते हे आपण आधीच्या लेखात पाहिले. आज आपल्या काळात, राजा या नात्याने त्याला “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” देण्यात आला आहे. त्यामुळे आपला नेता असलेला ख्रिस्त जगभरातील सर्व ख्रिस्ती मंडळ्यांवर व त्यांतील पर्यवेक्षकांवर सक्रियपणे मस्तकपद चालवतो. (मत्त. २८:१८; कलस्सै. १:१८) “त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून” यहोवाने त्याला अभिषिक्‍त जनांच्या “मंडळीला दिले” आहे. (इफिस. १:२२) त्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांच्या १,००,००० पेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक मंडळीमध्ये जे काही घडते त्यातील कोणतीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटत नाही.

येशूने प्राचीन काळच्या थुवतीरा मंडळीला असा संदेश पाठवला: ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत तो देवाचा पुत्र म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत.’ (प्रकटी. २:१८, १९) त्या मंडळीतील सदस्यांच्या अनैतिक, स्वैराचारी जीवनशैलीबद्दल येशूने त्यांचे कडक शब्दांत ताडन केले. त्याने म्हटले: “मी मने व अंतःकरणे ह्‍यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.” (प्रकटी. २:२३) या विधानावरून सूचित होते, की ख्रिस्ताचे प्रत्येक मंडळीच्या एकंदरित आचरणाकडेच नव्हे, तर मंडळीतील प्रत्येक सदस्याच्या जीवनशैलीकडेही बारीक लक्ष असते. येशूने ‘सैतानाच्या गहन गोष्टी माहीत नसलेल्या’ थुवतीरा मंडळीतील ख्रिश्‍चनांची प्रशंसा केली. (प्रकटी. २:२४) त्याचप्रमाणे आजही, मंडळीतील जे सदस्य इंटरनेट, हिंसक व्हीडिओ गेम्स किंवा स्वैर मानवी तर्कवाद यांद्वारे ‘सैतानाच्या गहन गोष्टींत’ गुरफटण्याचे टाळतात अशा सर्व लहानमोठ्यांचा येशूला आनंद वाटतो. जीवनाच्या प्रत्येक पैलूत येशूचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जे ख्रिस्ती आटोकाट प्रयत्न करतात व जीवनात अनेक त्याग करतात त्या सर्वांना पाहून त्याला खरोखरच किती आनंद होत असेल!

१०. ख्रिस्त मंडळीतील वडिलांचे मार्गदर्शन करतो हे कसे चित्रित करण्यात आले आहे, पण ख्रिस्ती वडिलांनी कोणती गोष्ट मान्य केली पाहिजे?

१० ख्रिस्त, नियुक्‍त वडिलांद्वारे पृथ्वीवरील आपल्या मंडळ्यांची प्रेमळपणे देखरेख करतो. (इफिस. ४:८, ११, १२) पहिल्या शतकात सर्व पर्यवेक्षक आत्म्याने अभिषिक्‍त केलेले होते. प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्यांचे वर्णन ख्रिस्ताच्या उजव्या हातात असलेले तारे अशा प्रकारे करण्यात आले होते. (प्रकटी. १:१६, २०) आज ख्रिस्ती मंडळीतील बहुतेक वडील दुसऱ्‍या मेंढरांपैकी आहेत. त्या सर्वांची प्रार्थनापूर्वक व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार नेमणूक करण्यात येते. त्याअर्थी, ते देखील ख्रिस्ताच्या निर्देशनाखाली किंवा मार्गदर्शक हाताखाली आहेत असे म्हणता येईल. (प्रे. कृत्ये २०:२८) असे असले, तरी ते हे मान्य करतात की ख्रिस्त, पृथ्वीवरील आपल्या शिष्यांचे नेतृत्व करण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिस्ती पुरुषांच्या एका लहान गटाचा अर्थात नियमन मंडळाचा उपयोग करत आहे.—प्रेषितांची कृत्ये १५:६, २८-३० वाचा.

“ये, प्रभू येशू, ये”

११. आपण सर्व आपल्या नेत्याच्या लवकर येण्याची आतुरतेने वाट का पाहत आहोत?

११ प्रेषित योहानाला दिलेल्या प्रकटीकरणाच्या दृष्टान्तात येशूने अनेकदा आपण लवकरच येत असल्याचे म्हटले. (प्रकटी. २:१६; ३:११; २२:७, २०) यावरून तो मोठ्या बाबेलीवर व सैतानाच्या दुष्ट जगावर न्यायदंड बजावण्यासाठी येत असल्याचे सूचित करत होता यात शंका नाही. (२ थेस्सलनी. १:७, ८) वयोवृद्ध झालेल्या प्रेषित योहानाला, भाकीत केलेल्या सर्व विस्मयकारक घटना पाहण्याची इतकी उत्सुकता लागली होती की त्याने उद्‌गारले: “आमेन. ये, प्रभु येशू, ये.” या दुष्ट जगाच्या अंतसमयात जगत असलेले आपण सर्व देखील, आपला नेता व राजा असलेला ख्रिस्त त्याच्या पित्याच्या नावाचे पवित्रीकरण करण्यासाठी व त्याचे सार्वभौमत्व उंचावण्यासाठी राजाधिकाराने येईल त्या वेळेची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत.

१२. विनाशाचे वारे सोडण्यापूर्वी ख्रिस्त कोणते काम पूर्ण करेल?

१२ सैतानाच्या दृश्‍य संघटनेचा विनाश करण्यासाठी येशू येईल त्याआधी आध्यात्मिक इस्राएलाच्या १,४४,००० सदस्यांपैकी उरलेल्या सदस्यांवर शेवटचा शिक्का मारण्यात येईल. बायबल स्पष्टपणे सांगते, की १,४४,००० जणांवर हे शिक्का मारण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सैतानाच्या जगावर विनाशाचे वारे सोडले जाणार नाहीत.—प्रकटी. ७:१-४.

१३. ‘मोठ्या संकटाच्या’ पहिल्या टप्प्यादरम्यान ख्रिस्त आपली उपस्थिती कशा प्रकारे प्रदर्शित करेल?

१३ सन १९१४ पासून सुरू झालेली ख्रिस्ताची “उपस्थिती” पृथ्वीवरील बहुतेक लोकांच्या नजरेतून सुटली आहे. (२ पेत्र ३:३, ४, NW) पण, लवकरच तो सैतानाच्या दुष्ट जगाच्या विविध घटकांवर यहोवाचा न्यायदंड बजावून आपली उपस्थिती दाखवून देईल. ‘अनीतिमान पुरुषाचा’ अर्थात ख्रिस्ती धर्मजगताचा विनाश हे ख्रिस्ताच्या ‘येण्याचे’ किंवा उपस्थितीचे सुस्पष्ट ‘दर्शन’ असेल. (२ थेस्सलनीकाकर २:३,  वाचा.) त्याने यहोवाचा नियुक्‍त न्यायाधीश या नात्याने सूत्रे हाती घेतल्याचा हा सबळ पुरावा असेल. (२ तीमथ्य ४:१ वाचा.) खोट्या धर्माच्या दुष्ट जागतिक साम्राज्याचा समूळ नाश होण्याआधी त्याच्या सगळ्यात दोषास्पद भागाचा अर्थात ख्रिस्ती धर्मजगताचा विध्वंस होईल. आध्यात्मिक रीत्या जारकर्म करणाऱ्‍या या वेश्‍येला उद्‌ध्वस्त करण्याचा विचार यहोवा राजकीय पुढाऱ्‍यांच्या मनात घालेल. (प्रकटी. १७:१५-१८) हा ‘मोठ्या संकटाचा’ पहिला टप्पा असेल.—मत्त. २४:२१.

१४. (क) मोठ्या संकटाचा पहिला टप्पा कमी का केला जाईल? (ख) “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह” प्रकट होण्याचा यहोवाच्या लोकांकरता काय अर्थ असेल?

१४ येशूने म्हटले, की त्या संकटाचे दिवस “निवडलेल्यांसाठी” म्हणजे पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या शेष जनांसाठी कमी केले जातील. (मत्त. २४:२२) खोट्या धर्मावरील या विनाशकारी हल्ल्यात यहोवा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा व त्यांचे साथीदार असलेल्या दुसऱ्‍या मेंढरांचा नाश होऊ देणार नाही. येशूने असेही म्हटले, की “त्या दिवसांतील संकटानंतर” सूर्य, चंद्र व तारे यांत चिन्हे घडून येतील आणि “तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल.” यामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे “शोक करितील.” पण, स्वर्गीय जीवनाची आशा असलेले अभिषिक्‍त जन व पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले त्यांचे साथीदार यांच्या बाबतीत मात्र असे घडणार नाही. उलट, ते ‘सरळ उभे राहतील आणि आपली डोकी वर करतील कारण त्यांचा मुक्‍तिसमय जवळ आलेला असेल.’—मत्त. २४:२९, ३०; लूक २१:२५-२८.

१५. ख्रिस्त येईल तेव्हा तो कोणते कार्य करेल?

१५ आपला विजय पूर्ण करण्याआधी मनुष्याचा पुत्र आणखी एका मार्गाने येतो. त्याने भाकीत केले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.” (मत्त. २५:३१-३३) ख्रिस्ताचे हे येणे, ‘सर्व राष्ट्रांतील’ लोकांचे दोन भागांत विभाजन करण्यासाठी तो न्यायाधीश म्हणून येईल त्यास सूचित करते. त्यांपैकी एक भाग म्हणजे “मेंढरे,” ज्यांनी त्याच्या आध्यात्मिक बांधवांना (पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना) सक्रियपणे पाठबळ दिलेले असेल. तर दुसरा भाग म्हणजे ‘शेरडे,’ जे “आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत.” (२ थेस्सलनी. १:७, ८) “नीतिमान” असे वर्णन केलेल्या मेंढरांना पृथ्वीवर “सार्वकालिक जीवन” मिळेल, तर शेरडे “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील,” म्हणजे त्यांचा नाश होईल.—मत्त. २५:३४, ४०, ४१, ४५, ४६.

येशू विजय संपादन करतो!

१६. आपला नेता ख्रिस्त कशा प्रकारे विजय संपादन करेल?

१६ ख्रिस्तासोबत राजे व याजक म्हणून कार्य करणाऱ्‍या सर्व १,४४,००० जणांवर शिक्का मारून झाल्यानंतर, तसेच मेंढरांना वेगळे करून त्यांचे तारण करण्यासाठी त्यांना आपल्या उजवीकडे ठेवल्यानंतर ख्रिस्त आता “विजय मिळविण्यास” जाऊ शकतो. (प्रकटी. ५:९, १०; ६:२) देवदूतांच्या शक्‍तीशाली सैन्याचा व निश्‍चितच आपल्या पुनरुत्थित बांधवांचा सेनापती असलेला ख्रिस्त सैतानाची संपूर्ण राजकीय, लष्करी व व्यापारी यंत्रणा नष्ट करेल. (प्रकटी. २:२६, २७; १९:११-२१) सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश केल्यानंतर ख्रिस्ताचा विजय पूर्ण होईल. मग तो सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना एक हजार वर्षांसाठी अथांग डोहात टाकून देईल.—प्रकटी. २०:१-३.

१७. हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान ख्रिस्त दुसऱ्‍या मेंढरांना कोठे नेईल?

१७ मोठ्या संकटातून वाचणाऱ्‍या दुसऱ्‍या मेंढरांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाविषयी’ बोलताना प्रेषित योहानाने भाकीत केले, की “राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल.” (प्रकटी. ७:९, १७) होय, जे मनापासून ख्रिस्ताची वाणी ऐकतात त्या दुसऱ्‍या मेंढरांचे तो आपल्या हजार वर्षांच्या सबंध राजवटीदरम्यान मार्गदर्शन करत राहील व त्यांना सार्वकालिक जीवन मिळवून देईल. (योहान १०:१६, २६-२८ वाचा.) तेव्हा, आपण आता आणि यहोवाच्या प्रतिज्ञात नवीन जगातही आपला राजा व नेता असलेल्या ख्रिस्ताचे निष्ठेने अनुसरण करत राहू या!

उजळणी

• राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर ख्रिस्ताने काय केले?

• आज ख्रिस्ती मंडळ्यांचे नेतृत्व करण्यासाठी ख्रिस्त कोणत्या दृश्‍य माध्यमाचा उपयोग करत आहे?

• आणखी कोणत्या मार्गांनी आपला नेता ख्रिस्त येणार आहे?

• नवीन जगातही ख्रिस्त कशा प्रकारे आपले मार्गदर्शन करत राहील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करून ख्रिस्त आपली उपस्थिती दाखवून देईल