सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीचा प्रतिकार करा
सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीचा प्रतिकार करा
‘स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. तुमचा देव तुमच्या मदतीला येणार नाही. शरणागती पत्करा, नाहीतर परिणाम भोगण्यास तयार राहा!’ अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा राजदूत असलेल्या रब-शाकेने जेरूसलेमच्या रहिवाशांना केलेल्या घोषणेचा हा सारांश होता. सन्हेरीब राजाच्या सैन्याने यहुदा देशावर स्वारी केली होती. त्यामुळे जेरूसलेमच्या लोकांचे मनोधैर्य खचवावे व त्यांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना नाइलाजाने शरणागती पत्करायला लावावी या इराद्याने रब-शाकेने अगदी विचारपूर्वक शब्द निवडले होते.—२ राजे १८:२८-३५.
अश्शूरी लोक अतिशय निर्दय व क्रूर म्हणून कुख्यात होते. लोकांच्या मनात दहशत बसवण्यासाठी ते आपल्या बंदिवानांना दिल्या जाणाऱ्या भयानक यातनांचे रंगवून वर्णन करायचे. इतिहासकार फिलिप टेलर यांनी सांगितल्यानुसार, “कैद्यांनी कायम आपल्या मुठीत राहावे तसेच आपल्याशी कोणीही वैर करण्याची हिम्मत करू नये म्हणून ते इतरांना देत असलेल्या अमानुष छळाचे सचित्र वर्णन करून लोकांना वचक बसवायचे.” आपले स्वार्थी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजलेले अशा स्वरूपाचे प्रचारतंत्र खरोखरच एक शक्तिशाली हत्यार असू शकते. कारण ते लोकांच्या “विचारसरणीवर प्रहार करते” असे टेलर म्हणतात.
आज खऱ्या ख्रिश्चनांचे “झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर . . . दुरात्म्यांबरोबर” अर्थात देवाविरुद्ध बंड केलेल्या आत्मिक प्राण्यांविरुद्ध आहे. (इफिस. ६:१२) त्यांपैकी दियाबल सैतान हा देवाच्या सेवकांचा सगळ्यात प्रमुख शत्रू आहे. तोसुद्धा आपल्या नकारार्थी विचारसरणीचा प्रसार करून त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
सैतानाचा असा दावा आहे, की तो आपल्या प्रत्येकाला देवाकडे पाठ फिरवायला लावू शकतो. ईयोबाच्या काळात त्याने यहोवा देवाला असे म्हटले: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” दुसऱ्या शब्दांत, तो असे म्हणत होता की पुरेसा दबाव आणल्यास कोणताही मनुष्य शेवटी देवाशी असलेली आपली निष्ठा सोडून देईल. (ईयो. २:४) सैतानाचा हा दावा खरा आहे का? आपल्या प्रत्येकाच्या सहनशक्तीची खरोखरच एक विशिष्ट सीमा आहे का, जी पार केल्यावर आपण केवळ जिवंत राहण्यासाठी देवाची तत्त्वे झुगारून देण्यासही तयार होऊ? आपण असे मानावे अशी सैतानाची इच्छा आहे. आणि नकारार्थी विचारसरणीच्या माध्यमाने तो आपल्या मनात ही कल्पना रुजवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो कोणते काही मार्ग वापरतो व आपण त्याचा प्रतिकार कसा करू शकतो ते आपण पाहू या.
त्यांचा “पाया मातीत घातला आहे”
सैतानाने ईयोबाच्या तीन मित्रांपैकी एक असलेल्या अलीफजाचा उपयोग करून असा दावा केला, की मनुष्य इतका कमजोर आहे की तो देवाला कायम विश्वासू राहूच शकत नाही. मानवांविषयी बोलताना अलीफजाने ईयोबाला म्हटले, की ते “मृत्तिकागृहात” म्हणजेच मातीच्या घरांत राहतात आणि “[त्यांचा] पाया मातीत घातला आहे. . . . ते पतंगासारखे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही.”—ईयो. ४:१९, २०.
बायबलच्या इतर शास्त्रवचनांत आपली तुलना अत्यंत नाजूक अशा ‘मातीच्या भांड्यांशी’ करण्यात आली आहे. (२ करिंथ. ४:७) आपण कमजोर आहोत ते वारशाने आपल्याला मिळालेल्या पापामुळे व अपरिपूर्णतेमुळे. (रोम. ५:१२) तेव्हा, आपण स्वतःच्या बळावर सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केल्यास आपला टिकाव लागणार नाही. पण, ख्रिस्ती या नात्याने आपण एकटे नाहीत. तर खुद्द यहोवा आपल्या पाठीशी आहे. आपल्यात अनेक दोष असले तरी देवाच्या नजरेत आपण अनमोल आहोत. (यश. ४३:४) शिवाय, जे यहोवाकडे विनंती करतात त्यांना तो आपला पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) देवाच्या आत्म्यामुळे आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ लाभते, ज्याच्या बळावर सैतानाकडून येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करण्यास आपण समर्थ होऊ शकतो. (२ करिंथ. ४:७; फिलिप्पै. ४:१३) आपण दियाबलाविरुद्ध “विश्वासात दृढ” उभे राहिल्यास देव आपल्याला स्थिर व बळकट करेल. (१ पेत्र ५:८-१०) तेव्हा, सैतानाला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
मनुष्य “पाण्याप्रमाणे दुष्टाई पितो”
“मनुष्य काय आहे की तो निर्मळ ठरावा? आणि जो स्त्रीपासून जन्मलेला तो काय आहे की तो न्यायी ठरावा?” असे अलीफजाने विचारले. पुढे स्वतःच याचे उत्तर देत तो म्हणाला: “पाहा, [देव] आपल्या पवित्रांवर विश्वास ठेवीत नाही, आणि आकाशे त्याच्या दृष्टीने स्वच्छ नाहीत, तर मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टाई पितो, जो अमंगळ व कुजका त्याची स्वच्छता किती कमी?” (ईयो. १५:१४-१६, पं.र.भा.) अलीफज ईयोबाला असे सांगत होता, की यहोवा कोणत्याही मनुष्याला नीतिमान समजत नाही. आज दियाबलसुद्धा अशाच नकारार्थी विचारांचा गैरफायदा घेऊन स्वतःचा दुष्ट हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतो. गतकाळात आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दल आपण सतत स्वतःला छळत राहावे, सतत स्वतःला दोष देत राहावे व देव आपल्या पापांची कधीच क्षमा करणार नाही असा आपण विचार करावा असे त्याला वाटते. तसेच, आपण यहोवाच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि तो कितीही दयाळू, क्षमाशील व प्रेमळ असला तरी आपल्यासारख्या व्यक्तीच्या चुकांची तो क्षमा करूच शकत नाही असा विचार सैतान आपल्याला करायला लावतो.
अर्थात, आपण सर्वांनीच ‘पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत.’ त्यामुळे कोणताही अपरिपूर्ण मानव यहोवाच्या परिपूर्ण स्तरांची उंची गाठू शकत नाही हे खरे आहे. (रोम. ३:२३; ७:२१-२३) पण, म्हणून देवाच्या नजरेत आपल्याला काहीच किंमत नाही असा याचा अर्थ होत नाही. वास्तवात ‘दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप’ मानवांच्या पापी प्रवृत्तीचा गैरफायदा घेतो याची यहोवाला पूर्ण कल्पना आहे. (प्रकटी. १२:९, १०) आपण ‘केवळ माती आहोत’ याची जाणीव राखून तो आपल्याशी विचारशीलतेने वागतो आणि आपल्याला ‘सर्वदा दोष देत राहत नाही.’—स्तो. १०३:८, ९, १४.
आपण चुकीचा मार्ग सोडून पश्चात्तापी अंतःकरणाने यहोवाकडे वळालो तर तो उदार मनाने आपल्याला क्षमा करेल. (यश. ५५:७; स्तो. ५१:१७) आपली पातके “लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील” असे बायबल म्हणते. (यश. १:१८) तेव्हा, काहीही झाले तरी हार न मानता देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करत राहू या.
आपण अपरिपूर्ण अवस्थेत असल्यामुळे स्वतःच्या बळावर यहोवाच्या नजरेत कधीच नीतिमान ठरू शकणार नाही. आदाम आणि हव्वेने पाप केले तेव्हा त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर पर्यायाने सर्व मानवजातीसाठी परिपूर्णता आणि सार्वकालिक जीवनाची आशा गमावली. (रोम. ६:२३) पण, मानवजातीवर असलेल्या असीम प्रेमामुळे यहोवाने आपल्या पुत्राच्या, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची तरतूद केली, ज्यावर विश्वास ठेवून मानव पापांची क्षमा मिळवू शकतात. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६) खरोखर हा देवाच्या अपार ‘कृपेचाच’ पुरावा नाही का? (तीत २:११) होय, आपल्या पापांची क्षमा होऊ शकते! तर मग, देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही असा विचार आपण सैतानाला आपल्या मनात का आणू द्यावा?
‘त्याच्या हाडामांसास हात लावून तर पाहा’
ईयोबाला आपले चांगले आरोग्य गमवावे लागले तर तो नक्कीच देवाकडे पाठ फिरवेल असा सैतानाने दावा केला. दियाबलाने यहोवाला आव्हान केले: “तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” (ईयो. २:५) होय, आपल्या शारीरिक दुर्बलतांमुळे आपण अगदीच कुचकामी आहोत असे आपल्याला वाटल्यास देवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रुला नक्कीच खूप आनंद होईल.
पण, यहोवाचा दृष्टिकोन तसा नाही. आपले आरोग्य खालावल्यामुळे आपण पूर्वीइतकी त्याची सेवा करू शकत नसलो तरी तो आपल्याला नाकारत नाही. उदाहरणार्थ, तुमच्या एका जवळच्या मित्रावर हल्ला झाला व त्यात त्याला काहीतरी दुखापत झाली अशी कल्पना करा. पूर्वी हा मित्र तुमच्यासाठी जे काही करू शकत होता ते आता त्याला जमत नाही म्हणून तुम्ही त्याला अंतर द्याल का? त्याच्यावरील तुमचे प्रेम व काळजी कमी होईल का? नक्कीच नाही! खासकरून तुमच्यासाठीच काही करत असताना त्याला ही दुखापत झाली असेल तर तुम्ही मुळीच त्याच्याशी तसे वागणार नाही. तर मग, यहोवाकडून आपण काही वेगळी अपेक्षा का करावी? बायबल म्हणते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—बायबलमध्ये ‘एका दरिद्री विधवेविषयी’ सांगण्यात आले आहे जिने कदाचित अनेक वर्षांपासून देवाच्या उपासनेला हातभार लावला असेल. येशूने तिला मंदिरातील दानपेटीत “दोन टोल्या” अर्थात अतिशय कमी मूल्याची दोन नाणी टाकताना पाहिले तेव्हा त्याने तिला अथवा तिने दिलेल्या दानाला क्षुल्लक लेखले का? नाही. उलट, तिच्या परिस्थितीनुसार तिला खऱ्या उपासनेसाठी जे काही करणे शक्य होते ते केल्याबद्दल त्याने तिची प्रशंसा केली.—लूक २१:१-४.
आपण यहोवाला निष्ठावान राहिल्यास कोणतीही गोष्ट त्याच्यासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधाच्या आड येणार नाही याची आपण खातरी बाळगू शकतो. अपरिपूर्णतेमुळे वाढते वय किंवा आजारपण यांसारख्या कितीही समस्या आपल्यावर आल्या तरी यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आपल्याला टिकवून ठेवता येईल. आपल्या अडीअडचणींमुळे आपल्याला पूर्वीइतकी देवाची सेवा करता येत नसली तरी तो आपल्या विश्वासू सेवकांचा कधीच त्याग करणार नाही.—स्तो. ७१:९, १७, १८.
“तारणाचे शिरस्त्राण” धारण करा
सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीपासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” या शस्त्रसामग्रीचा एक भाग म्हणजे “तारणाचे शिरस्त्राण.” (इफिस. ६:१०, ११, १७) आपल्याला सैतानाच्या नकारार्थी विचारसरणीचा प्रतिकार करता यावा म्हणून आपण सतत हे शिरस्त्राण धारण केले पाहिजे. शिरस्त्राण धारण केल्यामुळे युद्धात सैनिकाच्या डोक्याचे संरक्षण होते. त्याचप्रमाणे “तारणाची आशा”—देवाच्या अद्भुत नव्या जगाविषयीच्या प्रतिज्ञांवरील आपला भरवसा—सैतानाच्या खोट्या व नकारार्थी विचारांपासून आपल्या बुद्धीचे संरक्षण करेल. (१ थेस्सलनी. ५:८) तेव्हा, ही आशा सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावी व दिवसेंदिवस दृढ होत जावी म्हणून आपण वैयक्तिकपणे देवाच्या वचनाचा मनापासून अभ्यास केला पाहिजे.
ईयोबाला सैतानाकडून प्रखर व द्वेषपूर्ण हल्ल्यांचा सामना करावा लागला. पण, पुनरुत्थानावर त्याचा इतका विश्वास होता की मृत्यूच्या भीतीमुळेसुद्धा तो खचला नाही. उलट त्याने यहोवाला असे म्हटले: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयो. १४:१५) देवाला निष्ठावान राहिल्यामुळे मृत्यूलासुद्धा तोंड द्यावे लागले तरी देवाचे आपल्या विश्वासू सेवकांवर असलेले प्रेम त्यांचे पुनरुत्थान करण्यास त्याला प्रवृत्त करेल या गोष्टीवर ईयोबाचा भरवसा होता.
खऱ्या देवावर आपणसुद्धा तितकाच भरवसा ठेवू शकतो. कारण सैतानाने व त्याच्या साथीदारांनी आपल्यावर परीक्षा आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यास निष्फळ ठरवण्यास यहोवा समर्थ आहे. शिवाय, पौलाने दिलेले आश्वासनही लक्षात घ्या. त्याने म्हटले: “देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथ. १०:१३.
[२० पानांवरील चित्र]
तुम्ही विश्वासूपणे करत असलेल्या सेवेची यहोवा कदर करतो
[२१ पानांवरील चित्र]
“तारणाचे शिरस्त्राण” सतत धारण करा