लपवून ठेवलेला खजिना गवसला!
लपवून ठेवलेला खजिना गवसला!
तुम्हाला कधी अचानक एखाद्या अनपेक्षित ठिकाणी खजिना सापडला आहे का? एस्टोनियातील यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या ईव्हो लॉड याला २७ मार्च, २००५ रोजी असा अनुभव आला. तो आल्मा वार्द्या या वृद्ध साक्षीदार बहिणीला एक जुने शेड पाडायला मदत करत होता. बाहेरची भिंत पाडताना आतल्या एका खांबाची एक बाजू एका लाकडी फळीने झाकलेली त्यांना आढळली. ही फळी काढल्यावर त्यांना खांबात ४ इंच रुंद, ५० इंच लांब आणि ४ इंच खोल अशी एक खाच दिसली, जी तेवढ्याच आकाराच्या लाकडी फळीने झाकलेली होती. (१) ही खाच म्हणजे खजिना लपवून ठेवण्याचे गुप्त ठिकाण होते! पण, तेथे कोणता खजिना लपवला होता? आणि तो कोणी लपवला होता?
खाचेतून जाडजूड कागदात गुंडाळलेली बरीच पाकिटे निघाली.
(२) पाकिटांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे साहित्य, खासकरून टेहळणी बुरूज यातील अभ्यास लेख होते. यांपैकी काही १९४७ सालचे लेख होते. (३) हे लेख एस्टोनियन भाषेत अतिशय काळजीपूर्वक रीत्या हाताने लिहिलेले होते. काही पाकिटांमधून, ते साहित्य तेथे कोणी लपवले होते याचे सुगावे सापडले. कारण त्यांत आल्माचे पती व्हिलेम वार्द्या यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या चौकशींचे तपशील होते. तसेच त्यांनी तुरुंगात घालवलेल्या अनेक वर्षांची माहितीही त्यांत होती. त्यांना तुरुंगात का जावे लागले होते?व्हिलेम वार्द्या हे पूर्वीच्या सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकांपैकी एक असलेल्या एस्टोनियात, प्रथम टार्टू आणि नंतर ओटेपा नावाच्या मंडळीत जबाबदारीच्या पदावर सेवा करत होते. कदाचित ते दुसऱ्या महायुद्धाच्या काही काळाआधी बायबलमधील सत्य शिकले असावेत. काही वर्षांनी, २४ डिसेंबर, १९४८ रोजी कम्युनिस्ट शासनाने बंधू वार्द्या यांना त्यांच्या धार्मिक कार्यामुळे अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांच्याकडून इतर साक्षीदारांची नावे काढण्यासाठी त्यांना वाईट वागणूक दिली. मग न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याची संधीही न देता, त्यांना रशियातील तुरुंग छावण्यांमध्ये दहा वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.
व्हिलेम वार्द्या ६ मार्च, १९९० रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत यहोवाला विश्वासू राहिले. लपवून ठेवलेल्या त्या साहित्याबद्दल त्यांच्या पत्नीला जराही कल्पना नव्हती. तिचीही चौकशी झाल्यास ती अडचणीत सापडू नये म्हणून कदाचित त्यांनी तिला याविषयी सांगितले नसावे. पण, त्यांना ते साहित्य लपवून का ठेवावे लागले? कारण, धार्मिक प्रकाशने ताब्यात घेण्यासाठी केजीबी या सोव्हिएत राज्य सुरक्षा समितीकडून बरेचदा यहोवाच्या साक्षीदारांच्या घरांची अचानक झडती घेतली जायची. केजीबींनी सर्व साहित्य जप्त केले तरीसुद्धा बांधवांसाठी आध्यात्मिक अन्नाचा साठा असावा या हेतूने बंधू वार्द्या यांनी ते साहित्य लपवले असण्याची शक्यता आहे. यापूर्वी १९९० सालच्या उन्हाळ्यात इतर ठिकाणीही असेच लपवलेले साहित्य सापडले होते. यांपैकी, दक्षिण एस्टोनियातील टार्टू हे एक ठिकाण होते. तेथे सुद्धा व्हिलेम वार्द्या यांनीच साहित्य लपवले होते.
या साहित्याची तुलना खजिन्याशी का करता येईल? कारण, अतिशय कष्टाने लिहिलेल्या व सावधगिरीने लपवलेल्या या लेखांच्या प्रती पाहिल्यावर साक्षीदारांना त्या काळात उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक अन्नाची किती कदर होती हे दिसून येते. (मत्त. २४:४५) आज तुम्हाला ज्या काही आध्यात्मिक तरतुदी उपलब्ध आहेत, त्यांबद्दल तुम्हालाही मनापासून कृतज्ञता वाटते का? या तरतुदींपैकी एक टेहळणी बुरूज नियतकालिक आहे, जे आता एस्टोनियनशिवाय १७० पेक्षा जास्त भाषांतून प्रकाशित होते.