पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —पुन्हा प्रकाशात आलेली आशा
पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —पुन्हा प्रकाशात आलेली आशा
“हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव. . . . पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धि होईल.”—दानी. १२:४.
१, २. या लेखात कोणत्या प्रश्नांची चर्चा करण्यात येईल?
पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जगण्याची आशा ही बायबलवर आधारित आहे याविषयी आज लाखो लोकांना कोणतीही शंका नाही. (प्रकटी. ७:९, १७) मानवाच्या इतिहासाच्या सुरुवातीलाच देवाने हे प्रकट केले, की मनुष्याला केवळ काही वर्षे जगून मरण्यासाठी नव्हे तर सर्वकाळ जगण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे.—उत्प. १:२६-२८.
२ आदामाने गमावलेली परिपूर्णता भविष्यात मानवांना पुन्हा प्राप्त होईल या आशेकडे इस्राएल लोक डोळे लावून होते. शिवाय, पृथ्वीवरील नंदनवनात देव कशा प्रकारे मानवांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देईल याविषयी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत खुलासा करण्यात आला. तर मग, मानवजातीची ही आशा केव्हा व कशी लोप पावली? आणि ती कशा प्रकारे पुन्हा प्रकाशात आली आणि लाखो लोकांना कळवण्यात आली?
आशा दडवून टाकण्यात आली
३. पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची मानवजातीची आशा दडवून टाकण्यात आली याचे आपल्याला आश्चर्य का वाटू नये?
३ येशूने भाकीत केले होते, की कालांतराने खोटे संदेष्टे त्याच्या शिकवणी भ्रष्ट करतील आणि बहुतेक लोकांची दिशाभूल करतील. (मत्त. २४:११) प्रेषित पेत्राने ख्रिस्ती बांधवांना असा इशारेवजा संदेश दिला: “तुम्हांतहि खोटे शिक्षक होतील.” (२ पेत्र २:१) प्रेषित पौलानेही सांगितले, की “[लोक] सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील . . . अशी वेळ येईल.” (२ तीम. ४:३, ४) लोकांची अशा रीतीने फसवणूक करण्यामागे खरेतर सैतानाचाच हात आहे आणि त्याने धर्मभ्रष्ट झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या माध्यमाने, मानवांसाठी व पृथ्वीसाठी असलेल्या देवाच्या प्रेमळ उद्देशाविषयीचे दिलासादायक सत्य दडवून टाकले आहे.—२ करिंथकर ४:३, ४ वाचा.
४. मानवजातीची कोणती आशा धर्मभ्रष्ट धर्मपुढाऱ्यांनी नाकारली आहे?
४ बायबल असे सांगते की देवाचे राज्य हे स्वर्गातील सरकार असून ते सर्व मानवी राज्यांना चिरडून त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. (दानी. २:४४) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान सैतानाला एका अथांग डोहात बंदिस्त करून ठेवले जाईल, मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि मानवजातीला या पृथ्वीवर परिपूर्ण स्थितीला आणले जाईल. (प्रकटी. २०:१-३, ६, १२; २१:१-४) पण ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मभ्रष्ट पुढाऱ्यांनी मात्र वेगळ्याच शिकवणी स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ, ॲलेक्झांड्रियाचा ओरीजन या तिसऱ्या शतकातील ख्रिस्ती धर्मगुरूने, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात मानवजातीला पृथ्वीवर आशीर्वाद मिळतील असे मानणाऱ्यांची निर्भर्त्सना केली. द कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात सांगितल्यानुसार हिप्पोचा कॅथलिक धर्मशास्त्री ऑगस्टीन (सा.यु. ३५४-४३०) यानेही “हजार वर्षांच्या राजवटीच्या शिकवणीचे समर्थन केले नाही.” *
५, ६. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाच्या शिकवणीचा ओरीजन व ऑगस्टीनने विरोध का केला?
५ पण, ओरीजन व ऑगस्टीन यांनी हजार वर्षांच्या शासनाच्या शिकवणीचा विरोध का केला? ओरीजन हा ॲलेक्झांड्रियाचा क्लेमेंट या धर्मगुरूचा शिष्य होता. आणि क्लेमेंट याने ग्रीक विचारधारेतून अमर आत्म्याची कल्पना स्वीकारली होती. ओरीजनच्या मनावर आत्म्याविषयीच्या प्लॅटोच्या विचारांचा इतका प्रभाव पडला की वर्नर येगर या धर्मविद्वानानुसार
ओरीजन याने “ख्रिस्ती सिद्धान्तांमध्ये अमर आत्म्याची व त्याच्या अंतिम भवितव्याविषयीची प्लॅटोची शिकवण सामावून घेतली.” परिणामस्वरूप, ओरीजनने मानवजातीला हजार वर्षांदरम्यान मिळणार असलेले आशीर्वाद पृथ्वीवर नव्हे तर आत्मिक जगात मिळतील असे शिकवले.६ वयाच्या ३३ व्या वर्षी “ख्रिस्ती धर्माचा” स्वीकार करण्याअगोदर ऑगस्टीन हा नवप्लेटोमताकडे वळाला होता. नवप्लेटोमत म्हणजे प्लोटीनस याने तिसऱ्या शतकात काहीशा वेगळ्या स्वरूपात मांडलेले प्लॅटोचे तत्त्वज्ञान. ऑगस्टीनच्या धर्मांतरानंतरही त्याच्या विचारांवर या नवप्लेटोमताचा पगडा होता. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यात असे म्हटले आहे, की “नव्या कराराच्या धर्माचा व ग्रीक तत्त्वज्ञानातील प्लॅटोनिक विचारधारेचा पूर्णपणे मिलाफ करण्यास प्रामुख्याने तोच जबाबदार होता.” प्रकटीकरणातील २० व्या अध्यायातील हजार वर्षांच्या शासनाचे वर्णन “लाक्षणिक भाषेतील वर्णन असल्याचे ऑगस्टीनने स्पष्टीकरण दिले,” असे द कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे: “हे स्पष्टीकरण . . . नंतरच्या पाश्चिमात्त्य धर्मवेत्त्यांनीही स्वीकारले आणि अशा रीतीने हजार वर्षांच्या शासनाच्या पूर्वीच्या शिकवणीला कोणीही पाठिंबा देईनासे झाले.”
७. सार्वकालिक जीवनाच्या आशेवर कोणत्या खोट्या शिकवणीने घाला घातला आणि हे कसे घडले?
७ बॅबिलोनमध्ये प्रचलित असलेल्या आणि सबंध जगात पसरलेल्या एका शिकवणीने, पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगण्याच्या मानवाच्या आशेवर घाला घातला. ही शिकवण म्हणजे, मानवाच्या शरीरात एक अमर आत्मा निवास करतो. काळाच्या ओघात, ख्रिस्ती धर्मजगताने या संकल्पनेचा स्वीकार केला. परिणामस्वरूप, ख्रिस्ती धर्मवेत्त्यांनी स्वर्गीय आशेविषयी सांगणाऱ्या बायबलमधील वचनांना मुरड घालून असे भासवण्याचा प्रयत्न केला की सर्व चांगले लोक स्वर्गात जातील असे ही शास्त्रवचने शिकवतात. या मतानुसार, मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन केवळ तात्पुरते असून, तो स्वर्गलोकांत जीवन मिळण्यास लायक आहे की नाही याची पारख करण्यासाठीच त्याचा पृथ्वीवर जन्म होतो. पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगण्याच्या यहुद्यांच्या आशेबाबतीतही असेच घडले होते. यहुद्यांनी अमर आत्म्याच्या ग्रीक संकल्पनेचा स्वीकार केल्यामुळे पृथ्वीवरील जीवनाची त्यांची मूळ आशा हळूहळू नाहीशी झाली. बायबलमध्ये मानवाबद्दल जे सांगितले आहे त्यापेक्षा हे किती वेगळे आहे! बायबल असे शिकवते, की मानव हा आत्मिक नव्हे तर दैहिक प्राणी आहे. यहोवाने पहिल्या मानवाला असे म्हटले होते: “तू माती आहेस.” (उत्प. ३:१९) तेव्हा, स्वर्ग नव्हे, तर पृथ्वीच मानवाचे कायमचे निवासस्थान आहे.—स्तोत्र १०४:५; ११५:१६ वाचा.
अंधारात सत्याच्या प्रकाशाची किरणे
८. मानवाच्या आशेबद्दल १७ व्या शतकातील काही विद्वानांनी काय म्हटले?
८ ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे बहुतेक पंथ पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी शिकवत नाहीत. तरीसुद्धा, सत्याला दडपून टाकण्यात सैतानाला नेहमीच यश आले नाही. कारण गत शतकांत बायबलचे काळजीपूर्वक वाचन करणाऱ्या काही जणांना अंधारातही सत्याच्या प्रकाशाची किरणे दिसली. त्यांच्या बायबल वाचनातून त्यांना काही प्रमाणात का होईना, पण हे समजले की देव मानवजातीला पुन्हा एकदा परिपूर्ण स्थितीला आणेल. (स्तो. ९७:११; मत्त. ७:१३, १४; १३:३७-३९) सतरावे शतक उजाडले तोपर्यंत बायबलच्या भाषांतरामुळे व मुद्रणामुळे पवित्र शास्त्राच्या प्रती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. १६५१ साली एका विद्वानाने लिहिले की ज्याअर्थी आदामाद्वारे मानवांनी “नंदनवन व पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन गमावले,” त्याअर्थी ख्रिस्तामध्ये “सर्व मानव पृथ्वीवर जीवन उपभोगतील; अन्यथा त्यांची तुलना करण्यात काहीच अर्थ नाही.” (१ करिंथकर १५:२१, २२ वाचा.) इंग्रजी साहित्यातील एक सुप्रसिद्ध कवी जॉन मिल्टन (१६०८-१६७४) याने पॅरडाईस लॉस्ट (नंदनवन गमावले) आणि त्याचा पुढचा भाग पॅरडाईस रीगेन्ड् (नंदनवन पुन्हा प्राप्त झाले) ही महाकाव्ये लिहिली. मिल्टनने आपल्या लिखाणांत विश्वासू मानवांना पृथ्वीवरील नंदनवनात आशीर्वाद मिळण्याविषयी उल्लेख केला. बायबलचा सखोल अभ्यास करण्यासाठी मिल्टनने आयुष्यभर स्वतःला वाहून घेतले होते. तरीसुद्धा, ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळापर्यंत बायबलमधील सत्याचे कोणालाही पूर्णपणे आकलन होणार नाही याची त्याला जाणीव होती.
९, १०. (क) मानवजातीच्या आशेबद्दल आयझक न्यूटन यांनी काय लिहिले? (ख) ख्रिस्ताच्या उपस्थितीस अजून बराच अवकाश आहे असे न्यूटन यांना का वाटले?
९ सुप्रसिद्ध गणित शास्त्रज्ञ सर आयझक न्यूटन (१६४२-१७२७) हेही बायबलचे गाढे अभ्यासक होते. पवित्र जन स्वर्गात जाऊन अदृश्यपणे ख्रिस्तासोबत राज्य करतील असे त्यांच्या अभ्यासातून त्यांना समजले होते. (प्रकटी. ५:९, १०) त्या राज्याच्या प्रजेबद्दल न्यूटन यांनी असे लिहिले: “न्यायाच्या दिवसानंतरही मानव पृथ्वीवर राहतील आणि फक्त १,००० वर्षेच नव्हे तर सर्वकाळ राहतील.”
१० ख्रिस्ताच्या उपस्थितीला अद्याप अनेक शतकांचा अवकाश आहे असे न्यूटन यांचे मत होते. इतिहासकार स्टीव्हन स्नोबेलन याने म्हटले: “त्रैक्यवादाचा स्वीकार करून ख्रिस्ती धर्म कशा प्रकारे धर्मत्यागी बनला होता हे पाहून न्यूटन अतिशय निराश झाले होते. देवाचे राज्य येण्यास अद्याप बराच अवकाश आहे असे त्यांना वाटण्यामागे हे एक कारण होते.” सुवार्तेवर अजूनही पडदा पडलेला होता आणि तिला प्रकाशात आणू शकेल असा एकही ख्रिस्ती गट न्यूटन यांना आढळला नाही. त्यांनी लिहिले: “दानीएलाच्या व योहानाच्या [प्रकटीकरणात नमूद असलेल्या] भविष्यवाण्या अंतसमयापर्यंत स्पष्ट होणार नाहीत.” न्यूटन यांनी स्पष्ट केले: “दानीएलाने स्वतःच म्हटले, ‘पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धि होईल.’ मोठ्या संकटाआधी व जगाचा अंत होण्याआधी शुभवर्तमान सर्व राष्ट्रांत गाजविले जाईल. कारण त्याशिवाय, सर्व राष्ट्रांतील हाती झावळ्या घेतलेला अगणित लोकांचा समुदाय मोठ्या संकटातून वाचू शकणार नाही.”—दानी. १२:४; मत्त. २४:१४; प्रकटी. ७:९, १०.
११. मिल्टन व न्यूटन यांच्या काळात बहुतेक लोक मानवजातीच्या आशेविषयी अंधारातच का राहिले?
११ चर्चच्या अधिकृत सिद्धान्तांच्या विरोधात मत मांडणे हे मिल्टन व न्यूटन यांच्या काळात संकटाला आमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे बायबलच्या संशोधनावर आधारित त्यांची लिखाणे त्यांचा मृत्यू होईपर्यंत जगासमोर आली नाहीत. १६ व्या शतकात झालेली धर्मसुधारणेची चळवळ, अमर आत्म्याची खोटी शिकवण बदलू शकली नाही आणि हजार वर्षांचे शासन हे भविष्यात नसून आधीच सुरू झाले आहे ही ऑगस्टीनची शिकवण प्रोटेस्टंट चर्चचे प्रमुख पंथ पुढेही देत राहिले. पण, अंतसमयात ज्ञानवृद्धी झाली आहे असे म्हणता येईल का?
“ज्ञानवृद्धी होईल”
१२. ज्ञानवृद्धी केव्हा घडून येणार होती?
१२ ‘अंतसमयात’ एक अतिशय चांगली गोष्ट घडून येण्याविषयी दानीएलाने भाकीत केले होते. (दानीएल १२:३, ४, ९, १० वाचा.) दानीएलाप्रमाणेच येशूने देखील अंतसमयाविषयी म्हटले: “तेव्हा नीतिमान् . . . सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्त. १३:४३) अंतसमयात कशा प्रकारे ज्ञानवृद्धी घडून आली? अंतसमय म्हटलेला काळ १९१४ या सालापासून सुरू झाला. त्याआधीच्या काही दशकांतील ऐतिहासिक घडामोडींवर आता आपण विचार करू या.
१३. मानवांना परिपूर्णता कशा प्रकारे पुन्हा मिळेल या विषयाचे परीक्षण केल्यानंतर चार्ल्स टेझ रस्सल यांनी काय लिहिले?
१३ एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्ती “सुवचनांचा नमुना” म्हणजेच बायबलमधील शिकवणी नीट समजून घेण्याचा कसून प्रयत्न करत होते. (२ तीम. १:१३) यांपैकी एक चार्ल्स टेझ रस्सल हे होते. १८७० मध्ये त्यांनी व आणखी काही सत्यशोधकांनी मिळून बायबल अभ्यास करण्यासाठी एक गट सुरू केला. १८७२ मध्ये त्यांनी आदामाने गमावलेली परिपूर्णता मानवांना कशा प्रकारे पुन्हा मिळेल या विषयाचे परीक्षण केले. नंतर रस्सल यांनी या संदर्भात असे लिहिले: “ख्रिस्ताची मंडळी, जिला कसोटीस लावण्यात आले होते, तिचे अंतिम प्रतिफळ आणि सर्वसामान्य मानवजातीतील विश्वासू जनांना मिळणार असलेले प्रतिफळ किती वेगळे असेल हे तेव्हापर्यंत आमच्या लक्षात आले नव्हते.” या विश्वासू जनांना “त्यांचा पूर्वज व पिता आदाम एदेन बागेत ज्या प्रमाणे परिपूर्ण होता त्याच प्रकारे मानवी परिपूर्णता पुन्हा प्राप्त होईल.” रस्सल यांनी बायबलच्या आपल्या अभ्यासात इतरांचीही मदत झाल्याचे कबूल केले. हे इतर जण कोण होते?
१४. (क) हेन्री डन यांनी प्रेषितांची कृत्ये ३:२१ या वचनाचा कसा अर्थ घेतला? (ख) पृथ्वीवर सर्वकाळ जगणारे कोण असतील याबद्दल डन यांनी काय सांगितले?
१४ हेन्री डन हे त्यांच्यापैकी एक होते. त्यांनी “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले” त्याविषयी लिहिले होते. (प्रे. कृत्ये ३:२१) सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोचण्यामध्ये ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळादरम्यान मानवजातीला परिपूर्ण स्थितीला आणले जाणे देखील समाविष्ट असेल हे डन यांना माहीत होते. त्यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकलेल्या आणखी एका प्रश्नाचेही परीक्षण केले. तो म्हणजे, पृथ्वीवर सर्वकाळ कोण राहतील? त्यांनी असे स्पष्टीकरण दिले की लाखो मृत जनांना पुन्हा जिवंत केले जाईल, त्यांना सत्याविषयी शिकवले जाईल आणि ख्रिस्तावर विश्वास असल्याचे प्रकट करण्याची संधी दिली जाईल.
१५. जॉर्ज स्टॉर्स यांना पुनरुत्थानाबद्दल काय समजले?
१५ जॉर्ज स्टॉर्स हे देखील १८७० साली अशा निष्कर्षावर पोचले की अनीतिमान लोकांचे पुनरुत्थान केले जाईल आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची संधी दिली जाईल. शास्त्रवचनांच्या अभ्यासातून त्यांना हेही समजले की पुनरुत्थान झालेल्या एखाद्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे या संधीचा फायदा न घेतल्यास “त्याचा, मग तो ‘पापी शंभर वर्षांचा’ असला तरी मृत्यू होईल.” (यश. ६५:२०, पं.र.भा.) स्टॉर्स हे न्यूयॉर्क येथील ब्रुक्लिनमध्ये राहत होते आणि बायबल एक्झॅमिनर नावाच्या एक नियतकालिकाचे संपादक होते.
१६. बायबल विद्यार्थी व ख्रिस्ती धर्मजगताच्या बहुतेक पंथांत कोणता एक मुख्य फरक होता?
१६ सुवार्तेचा सर्वदूर प्रचार करण्याची वेळ आली आहे हे रस्सल यांना त्यांच्या बायबल अभ्यासातून समजले. त्यामुळे १८७९ मध्ये त्यांनी झायन्स वॉच टावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्स प्रेझेन्स (सध्याचे टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक) हे नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. पूर्वी, मानवजातीच्या आशेविषयीचे सत्य फार कमी लोकांना माहीत होते, पण आता अनेक देशांतील बायबल विद्यार्थ्यांना झायन्स वॉच टावर मिळू लागले व त्याच्या साहाय्याने ते बायबलचा अभ्यास करू लागले. ख्रिस्ती धर्मजगताचे बहुतेक पंथ व बायबल विद्यार्थी यांमध्ये एक मुख्य फरक होता. बायबल विद्यार्थ्यांचा असा विश्वास होता, की केवळ काही मोजकेच लोक स्वर्गात जातील, तर इतर लाखो लोक पृथ्वीवर परिपूर्ण मानवी जीवन उपभोगतील.
१७. सत्याच्या ज्ञानात कशा प्रकारे वृद्धी झाली?
१७ बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेला ‘अंतसमय’ १९१४ मध्ये सुरू झाला. तेव्हापासून, मानवजातीच्या आशेसंबंधी दानी. १२:४) १९१३ सालापर्यंत रस्सल यांची व्याख्याने १,५०,००,००० लोकांचा वाचक वर्ग असलेल्या २,००० वृत्तपत्रांतून प्रकाशित करण्यात आली होती. १९१४ हे वर्ष संपेपर्यंत तीन खंडांतील ९०,००,००० पेक्षा जास्त लोकांनी ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाबद्दल माहिती देणाऱ्या चलचित्रांचा व स्लाइड्सचा “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” हा कार्यक्रम पाहिला होता. १९१८ ते १९२५ या काळात पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी स्पष्टीकरण देणारे “आज जिवंत असलेले लाखो लोक कधीच मरणार नाहीत” हे भाषण यहोवाच्या साक्षीदारांनी ३० पेक्षा जास्त भाषांतून जगभरात सादर केले. १९३४ हे साल येईपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांना समजले होते, की पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा बाळगणाऱ्यांनी बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे. हे समजल्यामुळे ते राज्याच्या सुवार्तेचा नव्या जोमाने प्रचार करू लागले. आज लाखो लोक या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा दिल्याबद्दल यहोवाचे मनापासून आभारी आहेत.
सत्याच्या ज्ञानात खरोखरच वृद्धी झाली का? (लवकरच “गौरवयुक्त मुक्तता”!
१८, १९. यशया ६५:२१-२५ मध्ये कशा प्रकारच्या जीवनाबद्दल पूर्वभाकीत करण्यात आले आहे?
१८ यशया संदेष्ट्याने देवप्रेरणेने, पृथ्वीवर देवाचे लोक कशा प्रकारचे जीवन उपभोगतील याविषयी लिहिले. (यशया ६५:२१-२५ वाचा.) २,७०० वर्षांपूर्वी यशयाने हे शब्द लिहिले होते, तेव्हा अस्तित्वात असलेली काही विशिष्ट वृक्षे आजही जिवंत आहेत. तुम्ही स्वतः इतका काळ उत्तम आरोग्यासह जिवंत राहण्याची कल्पना करू शकता का?
१९ भविष्यातील जीवन हे सध्याच्या क्षणभंगुर जीवनासारखे नसेल. तेथे घरे बांधणे, बागा फुलवणे यांसारख्या निरनिराळ्या गोष्टी करण्याच्या, तसेच नवनवी कलाकौशल्ये आत्मसात करण्याच्या असंख्य संधी आपल्यासमोर असतील. तुम्हाला कितीतरी लोकांशी मैत्री करण्याची संधी मिळेल याची कल्पना करा. आणि ही प्रेमळ नाती अनंतकाळपर्यंत बहरत राहतील. खरोखर, ‘देवाच्या मुलांना’ या पृथ्वीवर किती “गौरवयुक्त मुक्तता” अनुभवण्यास मिळेल!—रोम. ८:२१.
[तळटीप]
^ परि. 4 ऑगस्टीनचे असे म्हणणे होते की देवाच्या राज्याचा हजार वर्षांचा शासनकाळ भविष्यात येणार नसून, चर्चची स्थापना झाली तेव्हापासूनच तो सुरू झाला आहे.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• पृथ्वीवरील जीवनाची मानवजातीची आशा कशा प्रकारे लोप पावली?
• १७ व्या शतकात काही बायबल वाचकांना काय समजले?
• १९१४ पर्यंत मानवजातीची खरी आशा कशा प्रकारे प्रकाशात आली?
• पृथ्वीवरील जीवनाच्या आशेबद्दल सत्याच्या ज्ञानात कशा प्रकारे वृद्धी झाली?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्रे]
पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल कवी जॉन मिल्टन (डावीकडे) आणि गणित शास्त्रज्ञ आयझक न्यूटन (उजवीकडे) यांना माहीत होते
[१५ पानांवरील चित्रे]
मानवजातीच्या खऱ्या आशेबद्दल सर्वदूर प्रचार करण्याची वेळ आली आहे हे सुरुवातीच्या बायबल विद्यार्थ्यांना शास्त्रवचनांतून समजले होते