सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते
सृष्टीतून यहोवाची बुद्धी दिसून येते
“त्याच्या अदृश्य गोष्टी [“गुण,” NW] . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोम. १:२०.
१. जगातील बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या लोकांचा आज अनेकांवर कोणता प्रभाव पडला आहे?
ज्यांनी निरनिराळ्या विषयांवर भरपूर ज्ञान मिळवले आहे अशा लोकांना सहसा बुद्धिमान म्हटले जाते. पण, ते खरोखर बुद्धिमान आहेत का? नाही. कारण, जगातील बुद्धिमान समजले जाणारे हे लोक इतरांना मदत करू शकत नाहीत आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी त्यांना भरवशालायक मार्गदर्शनही देऊ शकत नाहीत. जे अशा नावापुरत्या बुद्धिमान व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव पडू देतात ते ‘प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होतात.’—इफिस. ४:१४.
२, ३. (क) यहोवा एकटाच बुद्धिमान आहे असे का म्हणता येते? (ख) देवाकडून मिळणारी बुद्धी ही जगाच्या बुद्धीपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे?
२ पण, खरी बुद्धी प्राप्त करणारे लोक किती वेगळे आहेत! या बुद्धीचा स्रोत यहोवा देव आहे. बायबलमध्ये यहोवाला “एकच ज्ञानी” किंवा बुद्धिमान असे म्हटले आहे. (रोम. १६:२५-२७) यहोवाला या विश्वाबद्दल सर्वकाही माहीत आहे; विश्वाची रचना व इतिहास केवळ त्यालाच पूर्णपणे ठाऊक आहे. वैज्ञानिक ज्या नैसर्गिक नियमांच्या आधारावर संशोधन करतात ते सर्व नियम यहोवानेच स्थापित केलेले आहेत. त्यामुळे मानवांनी लावलेल्या शोधांचे त्याला नवल वाटत नाही, आणि मानवांच्या तत्त्वज्ञानामुळे तो अचंबित होत नाही. “ह्या जगाचे ज्ञान [बुद्धी] देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.”—१ करिंथ. ३:१९.
३ यहोवा आपल्या सेवकांना ‘बुद्धी देतो’ असे बायबल आपल्याला सांगते. (नीति. २:६, NW) ही बुद्धी मानवांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे अस्पष्ट नाही. उलट, देवाकडून मिळालेल्या बुद्धीमुळे आपल्याला अचूक ज्ञान व समज यांच्या आधारावर योग्य निर्णय घेणे शक्य होते. (याकोब ३:१७ वाचा.) प्रेषित पौलाने यहोवाच्या बुद्धीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्याने लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!” (रोम. ११:३३) यहोवा सर्वात बुद्धिमान असल्यामुळे आपल्याला खातरी आहे की त्याचे नियम आपल्याला जगण्याचा सर्वात उत्तम मार्ग दाखवतात. कारण काही झाले तरी, आनंदी असण्याकरता आपल्याला कशाची आवश्यकता आहे हे इतर कोणाहीपेक्षा यहोवा चांगल्या प्रकारे जाणतो.—नीति. ३:५, ६.
येशू—एक “कुशल कारागीर”
४. यहोवाच्या बुद्धीबद्दल जाणून घेण्याचा एक मार्ग कोणता आहे?
४ यहोवाची बुद्धी व त्याचे इतर अतुलनीय गुण, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींतून दिसून येतात. (रोमकर १:२० वाचा.) लहान असो वा मोठी, यहोवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूवर प्रकाश टाकते. आकाशापासून आपल्या पायाखालील जमिनीपर्यंत कोठेही पाहिले तरी आपल्याला सृष्टिकर्त्याच्या अफाट बुद्धीचे व प्रेमाचे असंख्य पुरावे सापडतील. त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवर विचार करण्याद्वारे आपण त्याच्याबद्दल पुष्कळ काही शिकू शकतो.—स्तो. १९:१; यश. ४०:२६.
५, ६. (क) यहोवाव्यतिरिक्त आणखी कोण सृष्टी करण्याच्या कार्यात सहभागी होता? (ख) आता आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत आणि का?
५ यहोवाने “आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” तेव्हा तो एकटाच नव्हता. (उत्प. १:१) बायबलमधून आपल्याला समजते की दृश्य सृष्टीची निर्मिती करण्याआधी त्याने एका आत्मिक व्यक्तीला निर्माण केले. आणि या आत्मिक प्राण्याद्वारे त्याने इतर “सर्व काही” निर्माण केले. हा आत्मिक प्राणी, “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असलेला यहोवाचा एकुलता एक पुत्र होता, जो नंतर येशू या नावाने पृथ्वीवर एका मानवाच्या रूपात राहिला. (कलस्सै. १:१५-१७) यहोवाप्रमाणेच, येशू देखील बुद्धिमान आहे. खरेतर, नीतिसूत्राच्या ८ व्या अध्यायात बुद्धीचे साक्षात रूप असे येशूचे वर्णन करण्यात आले आहे. बायबलमधील याच अध्यायात येशूला देवाचा “कुशल कारागीर” असेही म्हटले आहे.—नीति. ८:१२, २२-३१.
६ अशा प्रकारे, दृश्य सृष्टीतून यहोवासोबतच त्याचा कुशल कारागीर असलेल्या येशूचीही बुद्धी प्रकट होते. सृष्टीचे निरीक्षण केल्याने आपल्याला अनेक मौल्यवान धडे शिकायला मिळतात. तर आता आपण नीतिसूत्रे ३०:२४-२८ यात वर्णन केलेल्या अशा चार प्राण्यांविषयी चर्चा करू या, ज्यांच्या उल्लेखनीय उपजत बुद्धीमुळे त्यांना “अत्यंत शहाणे” असे म्हणण्यात आले आहे.
परिश्रमी असण्याबाबत धडा
७, ८. मुंग्यांबद्दल कोणत्या गोष्टीचे तुम्हाला नवल वाटते?
७ काही प्राणी “लहान” असले तरीसुद्धा जेव्हा आपण त्यांच्या रचनेचे व कार्यांचे जवळून परीक्षण करतो तेव्हा आपल्याला त्यांच्याकडूनही बरेच काही शिकायला मिळते. उदाहरणार्थ, मुंगीच्या उपजत बुद्धीविषयी पाहू या.—नीतिसूत्रे ३०:२४, २५ वाचा.
८ काही संशोधकांच्या मते, पृथ्वीवर मुंग्यांची संख्या माणसांपेक्षा दोन लाख पटींनी जास्त आहे. या मुंग्या जमिनीवर व जमिनीच्या खाली सतत आपले काम करण्यात मग्न असतात. मुंग्या वसाहती करून राहतात आणि बहुतेक वसाहतींत तीन प्रकारच्या मुंग्या असतात: राणी, नर व कामकरी मुंग्या. प्रत्येक गट आपापल्या परीने वसाहतीतील कामकाजात योगदान करतो. अमेरिकन लीफ-कटिंग ॲन्ट नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या मुंग्यांना कुशल शेतकरी म्हणता येईल. या मुंग्यांच्या वारुळात बुरशीच्या बागा असतात व त्या जास्तीत जास्त अन्न उत्पन्न होईल अशा प्रकारे या बागांची लागवड, मशागत व छाटाछाट करतात. कुशल “शेतकरी” असणारी ही विशिष्ट प्रकारची मुंगी वेळ व शक्ती वाचवण्यासाठी आपल्या वसाहतीत जितक्या अन्नाची आवश्यकता असेल तितकेच काम करते.
९, १०. मुंगीच्या मेहनतीपणाचे आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
९ मुंग्यांकडून आपण बरेच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, कोणत्याही कामात चांगले परिणाम मिळवायचे असतील तर कष्ट केलेच पाहिजेत. बायबलमध्ये आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो; तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपति नसता ती उन्हाळ्यांत आपले अन्न मिळविते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेविते.” (नीति. ६:६-८) यहोवा व त्याचा कुशल कारागीर, येशू हे दोघेही परिश्रमी आहेत. येशूने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.”—योहा. ५:१७.
१० देवाचे व ख्रिस्ताचे अनुकरण करणारे या नात्याने आपण देखील कष्टाळू असले पाहिजे. देवाच्या संघटनेत आपल्यावर कोणतेही काम सोपवलेले असो, आपण सर्वांनी “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असले पाहिजे. (१ करिंथ. १५:५८) यासाठी आपण रोममधील ख्रिश्चनांना पौलाने दिलेल्या या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे: “आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभुची सेवा करा.” (रोम. १२:११) यहोवाच्या सेवेतील आपले परीश्रम कधीही व्यर्थ जाणार नाहीत कारण बायबल आपल्याला असे आश्वासन देते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.
देवासोबतच्या आपल्या नात्याचे रक्षण करणे
११. रॉक बॅजरच्या काही वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
११ रॉक बॅजर हा आणखी एक लहान प्राणी आहे, जो आपल्याला महत्त्वाचे धडे देऊ शकतो. (नीतिसूत्रे ३०:२६ वाचा.) * हा प्राणी एखाद्या मोठ्या सशासारखाच दिसतो, पण त्याचे कान लहानशेच व गोलाकार असतात आणि पाय आखूड असतात. त्याच्या तीक्ष्ण दृष्टीमुळे आणि तो खडकांतील छिद्रांत व कपारींमध्ये राहात असल्यामुळे, हिंस्र जनावरांपासून त्याचे संरक्षण होते. हे प्राणी सहसा एकत्र समूहाने राहत असल्यामुळे त्यांना संरक्षण तर मिळतेच शिवाय हिवाळ्यात ऊब देखील मिळते.
१२, १३. रॉक बॅजरकडून आपण काय शिकू शकतो?
१२ रॉक बॅजरकडून आपण काय शिकू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे हा प्राणी आपल्यावर हल्ला होणार नाही याची काळजी घेतो. शिकारी प्राण्यांना दुरूनच पाहण्यासाठी तो आपल्या तीक्ष्ण दृष्टीचा उपयोग करतो. तसेच, काही धोका संभवल्यास लगेच लपून जीव वाचवता यावा म्हणून तो खडकांतील छिद्रांच्या व कपारींच्या जवळपासच राहतो. त्याच प्रकारे, आपलीही आध्यात्मिक दृष्टी तीक्ष्ण असली पाहिजे, जेणेकरून सैतानाच्या जगातील सहज दिसून न येणारे धोकेही आपल्याला ओळखता येतील. प्रेषित पेत्राने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) पृथ्वीवर असताना, येशूने सतत सावधगिरी बाळगली. सैतानाने कोणत्याही मार्गाने आपली निष्ठा भंग करू नये म्हणून तो सतत जागरूक राहिला. (मत्त. ४:१-११) येशूच्या अनुयायांनी याबाबतीत त्याचे अनुकरण केले पाहिजे.
१३ सावध राहण्याचा एक मार्ग म्हणजे यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक संरक्षणाचा फायदा करून घेणे. देवाच्या वचनाच्या अभ्यासाकडे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. (लूक ४:४; इब्री १०:२४, २५) शिवाय, ज्याप्रमाणे रॉक बॅजर एकत्र समूहाने राहतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या निकट सहवासात राहिले पाहिजे. यामुळे आपल्याला व त्यांनाही “उत्तेजन” प्राप्त होईल. (रोम. १:१२) यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या संरक्षणाचा लाभ घेण्याद्वारे आपण स्तोत्रकर्त्या दाविदाच्या पुढील शब्दांशी सहमत असल्याचे दाखवतो: “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.”—स्तो. १८:२.
विरोध होत असतानाही टिकून राहणे
१४. टोळाकडे पाहिल्यास तो फार विशेष दिसत नसला तरी, टोळांच्या झुंडीची गोष्ट वेगळी आहे असे का म्हणता येते?
१४ टोळांकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. जेमतेम दोन इंच लांबीच्या या कीटकाकडे पाहिल्यास तुम्हाला काही विशेष वाटणार नाही, पण टोळांच्या झुंडीची गोष्ट मात्र वेगळी आहे. (नीतिसूत्रे ३०:२७ वाचा.) अत्यंत अधाशी म्हणून ओळखले जाणारे आणि कोणत्याही अडथळ्याला न जुमानणारे हे कीटक कापणीसाठी तयार असलेल्या शेताचा पाहता पाहता फडशा पाडतात. बायबलमध्ये, झुंडीने येणाऱ्या टोळांच्या व इतर कीटकांच्या आवाजाची तुलना रथांच्या आवाजाशी व धसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेच्या कडकडण्याशी करण्यात आली आहे. (योए. २:३, ५) टोळधाडीवर उपाय म्हणून कधीकधी शेतकरी आग लावतात, पण सहसा याचा काही उपयोग होत नाही. का? कारण होरपळून मेलेले टोळ खाली पडल्यामुळे आग विझते आणि बाकीचे टोळ पुढे वाटचाल करतात. राजा किंवा सेनापती नसूनही टोळांची झुंड आपल्या मार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करत, एखाद्या सुसंघटित सेनेप्रमाणे कार्य करते. —योए. २:२५.
१५, १६. आधुनिक काळातील राज्य प्रचारक कशा प्रकारे टोळांच्या झुंडीसारखे आहेत?
१५ योएल संदेष्ट्याने यहोवाच्या सेवकांची तुलना टोळांशी केली. त्याने लिहिले: “वीरांप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपआपल्या मार्गाने कूच करितात, ते आपली दिशा सोडीत नाहीत. ते एकमेकास रेटून चालत नाहीत; बलवान पुरुषासारखे ते वाटचाल करतात; त्यांपैकी काही शस्त्रांना बळी पडले तरी बाकीचे आपला मार्ग सोडत नाहीत.”—योए. २:७, ८, NW.
१६ ही भविष्यवाणी आपल्या काळातील देवाच्या राज्याच्या प्रचारकांचे किती सुरेखपणे वर्णन करते! विरोधाचा कोणताही “तट” किंवा भिंत आजपर्यंत त्यांचे प्रचार कार्य रोखू शकलेली नाही. उलट, अनेकांनी तुच्छ लेखले तरीसुद्धा देवाच्या इच्छेनुसार वागत राहिलेल्या येशूचे ते अनुकरण करतात. (यश. ५३:३) हे खरे आहे की काही ख्रिस्ती “शस्त्रांना बळी पडले” आहेत, म्हणजेच त्यांच्या विश्वासामुळे त्यांना शत्रूंकडून जिवे मारण्यात आले आहे. पण यामुळे प्रचार कार्यात खंड पडलेला नाही. उलट राज्य प्रचारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खरेतर, छळ होत असलेल्या देशांमध्ये बरेचदा असे झाले आहे की एरवी ज्यांनी राज्याचा संदेश ऐकला नसता त्यांनाही सुवार्तेविषयी ऐकण्याची संधी मिळाली आहे. (प्रे. कृत्ये ८:१, ४) तुमच्या सेवाकार्यात, लोकांची अनास्था किंवा विरोध यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यास तुम्ही देखील टोळांप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याची वृत्ती दाखवत आहात का?—इब्री १०:३९.
“बऱ्याला चिकटून राहा”
१७. पालीचे पाय गुळगुळीत पृष्ठभागाला का चिकटतात?
१७ पालीवर गुरुत्वाकर्षणाचा काहीच परिणाम होत नाही असे वाटते. बायबलमध्ये असे म्हटले आहे, “पाल आपल्या हातांनी घट्ट धरून ठेवते.” (नीति. ३०:२८, NW) लहानशी पाल भिंतींवर कशी सरसर चढते आणि गुळगुळीत छतावरून चालताना खाली कशी काय पडत नाही याचे शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटते. पालीला हे जमतेच कसे? तिच्या पावलांत हवा खेचून घेण्याची क्षमता किंवा कोणताही चिकट पदार्थ नसतो. त्याऐवजी, पालीच्या पायांच्या बोटांचा तळभाग गादीसारखा असतो ज्यावर हजारो केसांसारख्या वाढी असतात. या प्रत्येक वाढीत शेकडो तंतू असतात ज्यांचे टोक बशीच्या आकाराचे असते. या तंतूंमध्ये असणाऱ्या अणू-रेणूंच्या आपसांतील बंधांमुळे एक प्रकारचे आकर्षण बल निर्माण होते, जे पालीच्या शरीरापेक्षा जास्त वजन पेलण्यास पुरेसे असते. म्हणूनच काचेसारख्या गुळगुळीत पृष्ठभागावरून खालच्या दिशेने तुरुतुरु पळतानाही पाल खाली पडत नाही! पालीच्या या अनोख्या गुणवैशिष्ट्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की पालीच्या पायांची नक्कल करून अतिशय घट्ट बसणारी कृत्रिम चिकटपट्टी तयार करता येईल. *
१८. आपण कशा प्रकारे नेहमी ‘बऱ्याला चिकटून राहू’ शकतो?
१८ पालीकडून आपण काय शिकू शकतो? बायबलमध्ये आपल्याला अशी आज्ञा देण्यात आली आहे: “वाइटाचा वीट माना; बऱ्याला चिकटून राहा.” (रोम. १२:९) सैतानाच्या जगातील वाईट गोष्टींच्या प्रभावामुळे देवाच्या वचनातील तत्त्वांवर असलेली आपली पकड ढिली होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी किंवा अयोग्य प्रकारच्या मनोरंजनाच्या माध्यमाने, देवाच्या तत्त्वांना जडून न राहणाऱ्या लोकांशी संगती केल्यामुळे चांगली कार्ये करण्याचा आपला निर्धार हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. असे कधीही घडू देऊ नका! देवाचे वचन आपल्याला अशी चेतावणी देते: “स्वतःस शहाणा समजू नको.” (नीति. ३:७) याउलट, प्राचीन काळी मोशेने देवाच्या लोकांना दिलेल्या या सल्ल्याचे आपण पालन केले पाहिजे: “आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा.” (अनु. १०:२०) यहोवाला नेहमी चिकटून राहिल्याने आपल्याला येशूचे अनुकरण करता येईल, ज्याच्याविषयी असे म्हणण्यात आले: “तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे.”—इब्री १:९.
सृष्टीतून शिकायला मिळणारे धडे
१९. (क) तुम्हाला सृष्टीतून यहोवाचे कोणते गुण दिसून येतात? (ख) देवाच्या बुद्धीमुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
१९ आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे यहोवाने निर्मिलेल्या गोष्टींतून त्याचे गुण स्पष्टपणे दिसून येतात आणि या गोष्टींतून आपल्याला अनेक मोलाचे धडे मिळतात. आपण यहोवाच्या कार्यांविषयी जितकी जास्त माहिती मिळवतो तितकेच आपण त्याच्या बुद्धीमुळे अचंबित होतो. जर आपण देवाची बुद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर आपल्या सध्याच्या जीवनातील आनंद तर द्विगुणित होईलच पण भविष्यातही यामुळे आपले संरक्षण होईल. (उप. ७:१२) खरोखर, नीतिसूत्रे ३:१३, १८ यातील आश्वासन किती खरे आहे हे आपल्याला स्वतःच्या जीवनात अनुभवता येईल: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.”
[तळटीपा]
^ परि. 11 नीतिसूत्रे ३०:२६ यात “ससा” असे भाषांतर केलेला मूळ इब्री शब्द शाफान असून, इंग्रजीत या प्राण्याला रॉक बॅजर म्हणतात.
^ परि. 17 पालीबद्दल आणखी माहितीसाठी सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर २००६ अंकातील पृष्ठे ५-६ पाहावेत.
तुम्हाला आठवते का?
खालील प्रत्येक प्राण्याकडून आपल्याला काय शिकायला मिळते?
• मुंगी
• रॉक बॅजर
• टोळ
• पाल
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्र]
शेतकरी मुंग्यांसारखे तुम्ही कष्टाळू आहात का?
[१७ पानांवरील चित्रे]
रॉक बॅजर एकत्र समूहाने राहत असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते. तुम्ही या प्राण्याचे अनुकरण करता का?
[१८ पानांवरील चित्रे]
टोळांप्रमाणे ख्रिस्ती प्रचारकही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याची वृत्ती दाखवतात
[१८ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती लोक पालीप्रमाणे बायबलमधील तत्त्वांना चिकटून राहतात
[चित्राचे श्रेय]
Stockbyte/Getty Images