प्राचीन क्यूनिफॉर्म लिपी आणि बायबल
प्राचीन क्यूनिफॉर्म लिपी आणि बायबल
बाबेल येथे मानवांच्या भाषेत गोंधळ झाल्यानंतर, लिखाणाच्या निरनिराळ्या पद्धती निघाल्या. मेसोपोटेमिया येथे राहणारे सुमेरियन व बॅबिलोनी लोक कील लिपीचा अर्थात क्यूनिफॉर्म लिपीचा उपयोग करत असत. लॅटिन भाषेत क्यूनिफॉर्मचा अर्थ “पाचर-आकार” असा होतो. ओल्या मातीवर बोरूने किंवा हाडांच्या कांड्यांच्या साहाय्याने उमटविल्या जाणाऱ्या त्रिकोणी खुणांना किंवा चिन्हांना हा शब्द सूचित करतो.
उत्खनन करणाऱ्यांना, बायबलमधील लोकांविषयी व घटनांविषयी सांगणारे कीलाकृती लेख आढळून आले आहेत. या प्राचीन लेखनशैलीविषयी आपल्याला काय माहीत आहे? आणि हे लेख बायबल भरवसालायक असल्याचा कोणता पुरावा सादर करतात?
टिकून राहिलेले लिखाण
विद्वानांचे असे म्हणणे आहे, की सुरुवातीला मेसोपोटेमिया येथे आढळून आलेली लेखनशैली ही चित्रलिपी होती. माणसाच्या कल्पना व विचार प्रकट करणारी प्रतीके अथवा चिन्हे म्हणजे चित्रलिपी. उदाहरणार्थ, बैलासाठी जे चिन्ह वापरले जायचे ते बैलाच्या डोक्यासारखे दिसायचे. नोंदी जपून ठेवण्याची जसजशी गरज भासू लागली तसतसा क्यूनिफॉर्म लिपीचा विकास होत गेला. “या प्रतीकांतून फक्त शब्दच नव्हेत तर शब्दांचे अवयव देखील व्यक्त होऊ लागले. कधीकधी तर अनेक प्रतीकांना एकत्र लिहून एका शब्दाचे शब्दावयव दर्शवले जात,” असे एनआयव्ही आर्कियॉलॉजिकल स्टडी बायबल या पुस्तकात म्हटले आहे. हळूहळू, सुमारे २०० वेगवेगळ्या चिन्हांमुळे क्यूनिफॉर्म लिपीतून, “जटील शब्दसंग्रह व व्याकरण असलेली भाषा व्यक्त करणे शक्य झाले.”
सा.यु.पू. २००० च्या सुमारास म्हणजे अब्राहामाच्या काळाच्या सुमारास, क्यूनिफॉर्म लिपीचा बराच विकास झाला होता. पुढील २० शतकांमध्ये, सुमारे १५ भाषांनी ही लिपी आत्मसात केली. आढळून आलेल्या कीलाकृती लेखांपैकी ९९ टक्के लेख मृण्मय अथवा मातीच्या पाट्यांवर लिहिण्यात आलेले होते. गेल्या १५० वर्षांपासून, अशा प्रकारच्या भरपूर पाट्या ऊर, युरक, बॅबिलोन, निमरूड, निप्पूर, अश्शूर, निनव्हे, मारी, एब्ला, युगारीट आणि अमर्ना येथे सापडल्या आहेत. आर्कियॉलॉजी ओडीसी नावाच्या मासिकात असे म्हटले आहे: “अभ्यासकांच्या अंदाजानुसार, क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या दहा ते वीस लाख पाट्या उत्खननात आढळून आल्या आहेत आणि सुमारे २५,००० पाट्या तर दर वर्षी सापडतातच.”
संपूर्ण जगभरातील क्यूनिफॉर्म लिपीच्या अभ्यासकांसमोर, भाषांतराचे एक मोठे व अवघड काम आहे. एका अंदाजानुसार, “या आधुनिक काळातही, सध्या अस्तित्वात असलेल्या क्यूनिफॉर्म लिपीतील लेखांपैकी फक्त १० टक्के लेखच वाचता आले आहेत.”
ही क्यूनिफॉर्म लिपी एकाच पाटीवर दोन अथवा तीन भाषांत लिहिलेली असल्यामुळे, तिचे वाचन करणे शक्य झाले. विद्वानांच्या पाहण्यात आले, की सापडलेल्या लेखांमध्ये, एकच माहिती वेगवेगळ्या भाषांमध्ये क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेली आहे. वेगवेगळ्या भाषांच्या या लेखांतील नावे, उपाधी, राजांच्या वंशावळी आणि आत्म-स्तुतीचे शब्द, हे सारखेच आहेत, त्यामुळे ही क्यूनिफॉर्म लिपी वाचणे शक्य झाले आहे.
१८५० च्या दशकापर्यंत विद्वान, प्राचीन मध्यपूर्व, अकेडियन किंवा अश्शूरी-बॅबिलोनियन लोकांची क्यूनिफॉर्म लिपीत असलेली सामान्य बोली भाषा वाचू शकले. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका यांत असे म्हटले आहे: “अकेडियन बोली वाचता आल्यानंतर, अभ्यासकांना क्यूनिफॉर्म लिपीचे स्वरूप चांगल्या प्रकारे समजले. आणि याच आधारावर मग, क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या इतर भाषाही सहजपणे वाचणे शक्य झाले.” पण या लेखांचा बायबलशी काय संबंध आहे?
बायबलशी जुळणारा पुरावा
बायबलमध्ये म्हटले आहे, की जेरूसलेम शहरावर कनानी राजे राज्य करीत होते; पण सा.य.पू. १०७० च्या सुमारास यहो. १०:१; २ शमु. ५:४-९) काही विद्वान यावर शंका घेत होते. पण १८८७ साली इजिप्तमधील अमर्ना येथे एका बाईला शेतात काम करत असताना एक मातीची पाटी सापडली. त्याच ठिकाणी नंतर हळूहळू ३८० मातीच्या पाट्या सापडल्या. या पाट्यांवरील मजकूराचे भाषांतर केल्यानंतर विद्वानांना समजले की हा मजकूर, इजिप्तचे शासक (अमेनहोटेप तिसरा आणि अखेनाटोन) व कनानी राजे यांच्यातील राजनीति संबंधित मजकूर होता. आणि सहा पत्रे जेरूसलेमचा शासक अब्दी-हेबा याची होती.
दाविदाने जेरूसलेमवर विजय मिळवला. (बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू मासिकात असे म्हटले आहे: “अमर्ना येथे सापडलेल्या पाट्यांवर, जेरूसलेम हे कुणाच्या तरी मालकीची जमीन नव्हे तर एक शहर आहे, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आणि अब्दी-हेबाचा, तो राज्यपाल आहे, त्याचा महाल आहे, आणि जेरूसलेममध्ये त्याने ५० इजिप्शियन सैनिकांना तैनात केले आहे, असाही जो उल्लेख करण्यात आला आहे त्यावरून समजते, की जेरूसलेम हे एक लहानसे डोंगराळ देशातील राज्य होते.” याच मासिकात पुढे असेही म्हटले होते: “अमर्ना येथे सापडलेल्या पत्रांवरून आपण ही खातरी बाळगू शकतो, की त्या काळादरम्यान इतर प्रसिद्ध शहरांप्रमाणेच जेरूसलेम शहरही अस्तित्वात होते.”
अश्शूरी व बॅबिलोनियन लिखाणांतील नावे
अश्शूरी व नंतर बॅबिलोनियन लोक मातीच्या पाट्यांवर तसेच सिलेंडर (लंबवर्तुळाकार शिला), प्रीझ्म आणि मोठ्या सार्वजनिक वास्तूंवर आपला इतिहास लिहायचे. त्यामुळे विद्वानांनी जेव्हा अकेडियन लिपी वाचली तेव्हा त्यांना असे आढळून आले, की या लेखांमध्ये अशा लोकांचा उल्लेख आहे ज्यांची नावे बायबलमध्येही आढळतात.
द बायबल इन द ब्रिटिश म्यूझियम नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: ‘नव्याने स्थापन झालेल्या सोसायटी ऑफ बिब्लिकल आर्कियॉलॉजीच्या सदस्यांना १८७० साली उद्देशून बोलताना डॉ. सॅम्यूएल बर्च यांनी म्हटले, की त्यांना (क्यूनिफॉर्म लिपीतील) अम्री, अहाब, येहू, अजऱ्या, मनहेम, पेकह, होशा, हिज्किया, मनश्शे या हिब्रू राजांची तसेच, तिग्लथपिलेसर तिसरा, सर्गोन, सन्हेरीब, एसरहद्दोन आणि अशूरबानिपाल या अश्शूरी राजांची व बेनहदाद, हजाएल आणि रसीन या सिरियन राजांची नावे ओळखता आली.’
द बायबल ॲण्ड रेडिओकार्बन डेटींग नावाच्या पुस्तकात, बायबलमधील इस्राएल व यहुदा देशांच्या इतिहासाची तुलना प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीतील लेखांशी करण्यात आली. परिणाम? “इस्राएल व यहुदाच्या काळातील इतर देशांनी केलेल्या नोंदीत, यहुदा व इस्राएलच्या एकूण १५-१६ राजांची नावे आणि त्यांचा कालखंड, बायबलमधील राजे नावाच्या पुस्तकांत आढळणाऱ्या नावांशी व माहितीशी तंतोतंत जुळतो. एकाही राजाची माहिती इकडे-तिकडे झालेली नाही, किंवा, इतर देशांनी केलेल्या नोंदीत, बायबलमधल्या राजे पुस्तकातील आपल्याला अपरिचीत असलेले एकही नाव नाही.”
अठराशे एकोणऐंशी साली, एक अतिशय प्रसिद्ध कीलाकृती लेख सापडला होता. क्यूनिफॉर्म लिपीत असलेल्या या लेखाला सायरस सिलेंडर म्हटले जाते. या लेखात असे म्हटले आहे, की सा.यु.पू. ५३९ मध्ये बॅबिलोनवर विजय मिळवल्यानंतर, सायरसने, बंदिवानांना आपापल्या मायदेशी पाठवण्याचे फर्मान काढले. या फर्मानाचा लाभ घेऊन मायदेशी परतलेल्यांमध्ये यहुदी लोकही होते. (एज्रा १:१-४) एकोणीसाव्या शतकातील अनेक अभ्यासकांनी, बायबलमधील हे फर्मान विश्वसनीय आहे किंवा नाही, यावर आक्षेप घेतला होता. पण, पर्शियन काळातील क्यूनिफॉर्म लिपीतील लेख आणि सायरस सिलेंडर, बायबलमधील नोंदी अचूक असल्याचा खातरीलायक पुरावा देतात.
अठराशे त्र्याऐंशी साली, बॅबिलोन जवळील निप्पूर येथे ७०० पेक्षा अधिक क्यूनिफॉर्म लिपीतील लेख सापडले. यांत उल्लेखलेल्या २,५०० नावांपैकी जवळजवळ ७० नावे, यहुदी आहेत, हे ओळखता येते. ती नावे, “करार करणाऱ्यांची, दलालांची, साक्षीदारांची, कर गोळा करणाऱ्यांची व राज दरबारात सेवा करणाऱ्यांची वाटतात,” असे इतिहासकार एडवीन यामाऊची म्हणतात. यहुद्यांनी बॅबिलोनशी या काळात ठेवलेल्या संपर्काचा पुरावा खूप महत्त्वाचा आहे. कारण बायबलमध्ये, इस्राएलातील फक्त एक “अवशेष” असेरिया व बॅबिलोनच्या बंदिवासातून आपल्या मायदेशी परतेल असे भविष्यसूचक विधान करण्यात आले होते. या विधानानुसार काही लोक आपल्या मायदेशी परतले, पण पुष्कळ लोक बॅबिलोनमध्येच राहिले.—यश. १०:२१, २२.
सा.यु.पू. च्या पहिल्या हजार वर्षांदरम्यान, अक्षर लिपीचा विकास झाल्यावरही क्यूनिफॉर्म लिपीचा वापर होत होता. पण अश्शूरी व बॅबिलोन्यांनी नंतर, क्यूनिफॉर्म लिपीचा उपयोग करण्याचे सोडून केवळ अक्षर लिपीचा वापर सुरू केला.
आज संग्रहालयांमध्ये क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या लाखो पाट्या आहेत ज्यांचा अभ्यास अजून व्हायचा आहे. अभ्यासकांनी आतापर्यंत ज्या पाट्या वाचल्या त्यावरून तर बायबल किती भरवसालायक आहे याचा खूप मोठा पुरावा मिळतो. ज्या लेखांचे वाचन अजून बाकी आहे ते आणखी कोणता पुरावा सादर करतात, कोणास ठाऊक?
[२१ पानांवरील चित्र]
ब्रिटिश म्यूझियमच्या सौजन्याने घेतलेले छायाचित्र