‘यहोवा माझं बल आहे’
‘यहोवा माझं बल आहे’
जोन कोव्हिल यांच्याद्वारे कथित
माझा जन्म १९२५ साली जुलै महिन्यात इंग्लंडमधील हडर्सफील्ड इथं झाला. मी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझी तब्येत पहिल्यापासूनच नाजूक होती. माझे बाबा तर म्हणायचे, “साधं वारं लागलं तरी तू आजारी पडतेस.” आणि त्यांचं म्हणणं काही खोटं नव्हतं!
लहानपणापासून मी पाळकांना जगात शांती राहावी म्हणून कळकळीनं प्रार्थना करताना पाहिलं होतं. पण, दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा मात्र त्यांनी युद्धात विजय मिळावा म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली. हे पाहून मी गोंधळात पडले. माझ्या मनात अनेक शंका उत्पन्न झाल्या. त्याच सुमारास, ॲनी रॅट्क्लिफ आमच्या घरी आली. ती आमच्या भागात राहणारी एकटीच यहोवाची साक्षीदार होती.
मला अशा प्रकारे सत्य मिळालं
ॲनीनं आम्हाला सॅलव्हेशन हे पुस्तक दिलं आणि तिच्या घरी एका बायबल चर्चेसाठी उपस्थित राहण्याचं माझ्या आईला निमंत्रण दिलं. * आईनं मलाही सोबत यायला सांगितलं. ती पहिली चर्चा मला आजही आठवते. येशूच्या खंडणीबद्दल ती चर्चा होती आणि आश्चर्य म्हणजे मला ती मुळीच कंटाळवाणी वाटली नाही. खरं तर त्या चर्चेतून माझ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा गेलो. यावेळी, येशूने शेवटल्या काळाविषयी दिलेल्या चिन्हाबद्दल चर्चा झाली. जगातल्या दुःखदायक परिस्थितीशी त्या माहितीची तुलना केल्यावर, आईला व मला खात्री पटली की हेच सत्य आहे! त्याच दिवशी आम्हाला राज्य सभागृहात येण्याचं निमंत्रण देण्यात आलं.
सभागृहात काही तरुण पायनियरांशी माझी भेट झाली. त्यांपैकी एक जॉइस बार्बर (आता एलिस) होती. ती अजूनही आपला पती पीटर याच्यासोबत लंडन बेथेलमध्ये सेवा करत आहे. त्या सगळ्या पायनियरांना भेटल्यावर माझा असा ग्रह झाला की सगळेच साक्षीदार पायनियर असतात. त्यामुळे, अद्याप शाळेतच होते तरीसुद्धा, मी प्रचार कार्यात दर महिन्याला ६० तास घालवू लागले.
पाच महिन्यांनी, ११ फेब्रुवारी, १९४० रोजी ब्रॅडफर्ड इथं झालेल्या झोन संमेलनात (ज्याला आता विभागीय संमेलन म्हणतात) आईचा व माझा बाप्तिस्मा झाला. आमच्या या नव्या धर्माला बाबांचा विरोध नव्हता, पण ते स्वतः मात्र कधी साक्षीदार बनले नाहीत. माझा बाप्तिस्मा झाला त्याच सुमारास, रस्त्याच्या कोपऱ्यावर उभं राहून साक्षकार्य करण्याची नवीन पद्धत सुरू करण्यात आली होती. मी सुद्धा हातात मासिकांची बॅग घेऊन आणि गळ्यात प्लॅकार्ड अडकवून या साक्षकार्यात सहभागी झाले. एका शनिवारी मला बाजारातल्या सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी उभं राहायला सांगण्यात आलं. मनुष्याची भीती अजूनही माझ्या मनातून पूर्णपणे गेलेली नव्हती. त्यामुळे आपल्या ओळखीचं कोणी भेटू नये असं मला मनातल्या मनात वाटत होतं. पण नेमकं त्याच दिवशी जणू काही माझ्या सगळ्या वर्गसोबत्यांनी तिथूनंच जायचं ठरवलं होतं!
एकोणीसशे चाळीस साली आम्ही ज्या कंपनीत (त्याकाळी मंडळीला कंपनी म्हणत) होतो, तिचे दोन भाग करण्यात आले. माझ्या वयाचे सगळे सोबती दुसऱ्या कंपनीत गेले. मी याबद्दल आमच्या कंपनी सर्व्हंटकडे (आताचे अध्यक्षीय पर्यवेक्षक) तक्रार केली, तेव्हा ते म्हणाले, “तुझ्या वयाचे सोबती तुला हवे असतील तर तू स्वतःच त्यांना तुझ्या क्षेत्रातून शोधून काढ ना!” मग मी अगदी तेच करायचं ठरवलं! थोड्याच काळानंतर मला एल्सी नोबल भेटली. तिनं सत्य स्वीकारलं आणि माझी जिवाभावाची मैत्रीण बनली.
पायनियर सेवेचे आशीर्वाद
शिक्षण संपल्यावर मी एका अकाउंटंटकडे कामाला लागले. पण पूर्णवेळेच्या सेवकांना मिळणारा आनंद पाहून, मलाही पायनियर बनून यहोवाची सेवा करावी असं मनापासून वाटू लागलं. १९४५ सालच्या मे महिन्यात, मी खास पायनियर सेवेस सुरुवात केली. पण पहिल्याच दिवशी, दिवसभर पाऊस होता. तरीपण, मी इतकी आनंदी होते की मी पावसाची मुळीच पर्वा केली नाही. खरं तर, प्रचारासाठी दररोज घराबाहेर पडल्यामुळे आणि सायकल चालवण्याचा नियमित व्यायाम मिळाल्यामुळे माझी तब्येत बरीच सुधारली. माझं वजन तसं ४२ किलोंपेक्षा जास्त कधीच वाढलं नसलं, तरी माझ्या पायनियर सेवेत मात्र कधीही खंड पडला नाही. या सगळ्या वर्षांत, ‘यहोवा माझं बल आहे’ या शब्दांची सत्यता मी अक्षरशः अनुभवली आहे.—स्तो. २८:७, पं.र.भा.
मला खास पायनियर म्हणून नव्या मंडळ्या सुरू करण्याच्या उद्देशानं अशा शहरांमध्ये पाठवण्यात आलं, जिथं कोणीही यहोवाचे साक्षीदार नव्हते. मी सुरुवातीला तीन वर्षं इंग्लंडमध्ये आणि मग तीन वर्षं आयर्लंडमध्ये सेवा केली. आयर्लंडमधील लिस्बर्न शहरात पायनियर सेवा करत असताना मी एका प्रोटेस्टंट चर्चच्या साहाय्यक पाळकासोबत बायबल अभ्यास केला. त्याला बायबलच्या मूलभूत शिकवणींविषयी जसजसं सत्य समजू लागलं, तसतसं त्यानं याविषयी आपल्या मंडळीतल्या लोकांना सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जणांनी चर्चच्या वरिष्ठांकडे तक्रार केली, तेव्हा साहजिकच त्याला याबद्दल जाब विचारण्यात आला. तो म्हणाला की आपण आजपर्यंत अनेक चुकीच्या गोष्टी शिकवल्या हे कळपातील सदस्यांना सांगणं, ख्रिस्ती या नात्यानं आपण आपली नैतिक जबाबदारी समजतो. या मनुष्याच्या कुटुंबानं त्याचा कडाडून विरोध केला. तरीपण त्यानं यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि मृत्यू होईपर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा केली.
आयर्लंडमध्ये मला नेमण्यात आलेलं दुसरं शहर, लार्न इथं १९५० साली सहा आठवडे मला एकट्यानंच सेवाकार्य करावं लागलं. कारण, माझी पायनियर जोडीदार थियॉक्रसीज इन्क्रीज संमेलनासाठी न्यूयॉर्कला गेली होती. माझीही या संमेलनाला जायची खूप इच्छा होती, पण मला जाता आलं नाही. त्यामुळे या सहा आठवड्यांचा काळ माझ्यासाठी अतिशय अवघड गेला. पण याच काळात, मला क्षेत्र सेवेत आलेल्या चांगल्या अनुभवांमुळे खूप प्रोत्साहन मिळालं. वीस वर्षांपूर्वी आपलं एक प्रकाशन ज्यांनी घेतलं होतं, असे एक वयस्क गृहस्थ मला भेटले. त्यांनी ते पुस्तक इतक्यांदा वाचलं होतं की त्यांना ते जवळजवळ तोंडपाठ झालं होतं. त्यांनी, तसंच त्यांच्या मुलानं व मुलीनंही सत्य स्वीकारलं.
गिलियड प्रशिक्षण
इंग्लंडमधील इतर दहा पायनियरांसोबत मलाही १९५१ साली साउथ लँसिंग, न्यूयॉर्क इथं गिलियड प्रशालेच्या १७ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. या प्रशिक्षणादरम्यान जे उत्कृष्ट बायबल आधारित मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्यानं आम्ही खरोखरंच हरखून गेलो! त्या काळात मंडळ्यांमध्ये ईश्वरशासित सेवा प्रशालेत अद्याप बहिणींचा समावेश करण्यात आला नव्हता. पण
गिलियड प्रशालेत मात्र आम्हा बहिणींनाही विद्यार्थी भाषणं व रिपोर्ट सादर करावे लागत. आम्हाला तर त्या विचारानंही धडधडायचं! माझ्या पहिल्या भाषणाच्या वेळी मी हातात नोट्सचा कागद धरला होता, पण माझा हात थरथर कापत होता. आमचे प्रशिक्षक बंधू मॅक्सवेल फ्रेंड गमतीनं म्हणाले: “सगळेच उत्तम वक्ते सुरुवातीला घाबरतात, पण तू तर अगदी शेवटपर्यंत घाबरलेली होतीस.” प्रशिक्षणादरम्यान, वर्गापुढं बोलण्याची आमच्या सर्वांचीच क्षमता हळूहळू सुधारली. पाहतापाहता आमचं प्रशिक्षण संपलं आणि आम्हा पदवीधरांना निरनिराळ्या देशांत मिशनरी सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. मला नेमण्यात आलेला देश होता थायलंड!“हसमुख लोकांचा देश”
थायलंडमध्ये माझी मिशनरी जोडीदार म्हणून ऑस्ट्रिड ॲन्डर्सन हिला नेमण्यात आलं हा मी यहोवाचा एक आशीर्वादच समजते. एका मालवाहू जहाजानं आम्ही सात आठवड्यांचा प्रवास करून थायलंडची राजधानी बँकॉक इथं पोचलो. या शहरातल्या बाजारपेठा अतिशय गजबजलेल्या होत्या आणि सबंध शहरात कालव्यांचं जाळं पसरलेलं होतं. हे कालवेच या शहरातील मुख्य रस्ते होत. १९५२ साली थायलंडमध्ये १५० पेक्षाही कमी राज्य प्रचारक होते.
थाई भाषेतलं टेहळणी बुरूज मासिक आम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आम्हाला वाटलं, ‘ही भाषा खरंच कधी येईल का आपल्याला बोलता?’ अचूक स्वरात शब्द उच्चारणं हे एक आव्हानच होतं. उदाहरणार्थ, खाऊ हा शब्द सुरुवातीला उंच आणि मग खालच्या स्वरात उच्चारल्यास त्याचा अर्थ “भात” असा होतो. पण तोच शब्द जर खोल स्वरात उच्चारला तर त्याचा अर्थ “वार्ता” असा होतो. त्यामुळे क्षेत्र सेवेत सुरुवातीला, “आम्ही तुमच्यासाठी सुवार्ता आणली आहे” असं म्हणण्याऐवजी, आम्ही मोठ्या उत्साहानं लोकांना सांगत होतो की “आम्ही तुमच्यासाठी चांगला भात आणलाय!” असे गमतीदार प्रसंग अनेकदा घडले. पण शेवटी आम्ही थाई भाषा शिकलोच!
थाई लोक अतिशय मनमिळाऊ आहेत. थायलंडला हसमुख लोकांचा देश काही उगाच म्हणत नाहीत. आम्हाला सर्वात आधी कोरात (आता या शहराचे नाव नाखोन रातचासीमा आहे) या शहरात नेमण्यात आलं. तिथं आम्ही दोन वर्षं होतो. नंतर, आम्हाला चियांग माई या शहरात नेमण्यात आलं. बहुतेक थाई लोक बौद्ध असल्यामुळे त्यांना बायबलविषयी फारशी माहिती नाही. कोरातमध्ये मी एका पोस्टमास्टरबरोबर अभ्यास करत होते. आम्ही अब्राहामाविषयी चर्चा करत होतो. त्या मनुष्यानं हे नाव आधी ऐकलं असल्यामुळे तो लगेच ‘हो हो’ म्हणत मान हलवू लागला. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघंही वेगवेगळ्या अब्राहामांविषयी बोलत होतो. तो बायबलमधल्या नव्हे, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहाम लिंकन यांच्याविषयी बोलत होता!
प्रामाणिक मनोवृत्तीच्या थाई लोकांना बायबल शिकवताना आम्हाला आनंद वाटे. पण त्याच वेळी थाई लोकांनी आम्हाला साध्या राहणीमानातही आनंदी कसं राहायचं हे शिकवलं. हा धडा आमच्याकरता अतिशय मोलाचा होता, कारण कोरात इथं आमच्या पहिल्या मिशनरी गृहात वीज किंवा नळ नव्हते. अशा ठिकाणी सेवा करताना आम्हाला ‘संपन्न असणं व विपन्न असणं, ह्यांचं रहस्य शिकता आलं.’ प्रेषित पौलाप्रमाणेच, ‘जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करावयास शक्तिमान’ असण्याचा काय अर्थ आहे हे आम्ही प्रत्यक्षात अनुभवलं. —फिलिप्पै. ४:१२, १३.
नवीन जोडीदार आणि नवीन नेमणूक
मी १९४५ साली लंडनला गेले होते. त्यावेळी, ब्रिटिश म्युझियम पाहायला काही पायनियर व बेथेल सेवकांसोबत मीही गेले. त्या गटात ॲलन कोव्हिल हे देखील होते. त्यानंतर काही काळानं त्यांना गिलियडच्या ११ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. प्रशिक्षणानंतर त्यांना आधी फ्रांसमध्ये व नंतर बेल्जियममध्ये सेवा करण्यास नेमण्यात आलं. * कालांतरानं, मी थायलंड इथं मिशनरी सेवा करत असताना त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आणि मी होकार दिला.
आमचं लग्न ९ जुलै, १९५५ रोजी बेल्जियममधील ब्रसल्झ शहरात झालं. हनीमूनला पॅरिसला जायचं माझं आधीपासूनच स्वप्न होतं. त्यामुळे ॲलननं पुढच्या आठवड्यात तिथं एका संमेलनाला जायची व्यवस्था केली. पण तिथं पोचल्या पोचल्या ॲलनना संमेलनाच्या सबंध कार्यक्रमाचं भाषांतर करण्याची विनंती करण्यात आली. दररोज त्यांना पहाटेच निघावं लागायचं आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही रात्री उशिराच पोचायचो. त्यामुळे, हनीमूनला पॅरिसला जायची माझी हौस पूर्ण झाली खरी, पण मला ॲलनना दुरूनच पाहावं लागत होतं, कारण बहुधा ते स्टेजवरच असायचे! तरीही, त्यांना संमेलनाच्या कार्यक्रमात अशा प्रकारे योगदान करता आलं आणि त्यामुळे
भाऊबहिणींना फायदा झाला हे पाहून मला समाधान वाटलं. मला खात्री होती की आम्ही आपल्या वैवाहिक जीवनात सर्वात जास्त यहोवाला महत्त्व दिलं तर आम्ही खऱ्या अर्थानं आनंदी होऊ.लग्न झाल्यामुळे मी एका नव्या प्रचाराच्या क्षेत्रात, अर्थात बेल्जियमला आले. बेल्जियममध्ये अनेक लढाया झाल्या होत्या, एवढीच मला बेल्जियमबद्दल माहिती होती. पण इथं आल्यावर लवकरच मला कळालं की बहुतेक बेल्जियन लोक शांतताप्रिय आहेत. या क्षेत्रात प्रचार करण्याकरता मला फ्रेंचही शिकावं लागणार होतं कारण बेल्जियमच्या दक्षिणेकडं फ्रेंच बोलली जाते.
बेल्जियममध्ये १९५५ साली जवळपास ४,५०० प्रचारक होते. ॲलन व मी बेथेलमध्ये आणि प्रवासी कार्यात जवळजवळ ५० वर्षं सेवा केली. पहिली अडीच वर्षं आम्ही सायकलीनं डोंगरांतल्या रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या हवामानात प्रवास केला. या सगळ्या वर्षांत आम्ही २,००० भाऊबहिणींच्या घरी राहिलो! मला असे अनेक बांधव भेटले जे शरीरानं तितके सुदृढ नव्हते पण तरीही आपल्या पूर्ण शक्तिनिशी यहोवाची सेवा करत होते. त्यांच्या उदाहरणामुळे मला यहोवाची सेवा करत असताना कधीही हार न मानण्याचं प्रोत्साहन मिळालं. प्रत्येक मंडळीला भेट दिल्यानंतर आठवड्याच्या शेवटी आम्हा दोघांनाही नवीन उत्साह मिळाल्यासारखं वाटायचं. (रोम. १:११, १२) ॲलन खरोखर एक उत्तम जोडीदार होते. उपदेशक ४:९, १० यातील शब्द किती खरे आहेत: “एकट्यापेक्षा दोघे बरे . . . त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल”!
‘यहोवाला आपलं बल’ मानून सेवा केल्यानं मिळालेले आशीर्वाद
इतक्या वर्षांत ॲलन व मला यहोवाची सेवा करण्यास इतरांना मदत करताना अनेक आनंददायी अनुभव आले. उदाहरणार्थ, १९८३ मध्ये अँटवर्प शहरातील एका फ्रेंच मंडळीला भेट देताना आम्ही एका कुटुंबासोबत राहिलो होतो. त्यांच्याच घरी झैरेचा (सध्या काँगोचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) बेन्जमिन बान्डीवीला हा तरुण बांधवही मुक्कामाला होता. बेन्जमिन हा उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशानं बेल्जियमला आला होता. तो आम्हाला म्हणाला, “तुम्ही यहोवाच्या सेवेला किती पूर्णपणे समर्पित आहात. खरंच, मला तुमचा हेवा वाटतो.” ॲलन त्याला म्हणाले: “एकीकडे तू म्हणतोस, तुला आमचा हेवा वाटतो. पण तू तर जगिक यश मिळवण्याच्या मागे लागला आहेस. या दोन गोष्टी विसंगत आहेत असं नाही वाटत तुला?” या सडेतोड विधानानं बेन्जमिनला आपल्या जीवनाबद्दल गांभीर्यानं विचार करण्यास भाग पाडलं. नंतर झैरेला परतल्यावर तो पायनियर सेवा करू लागला आणि सध्या तो शाखा समितीचा एक सदस्य आहे.
१९९९ साली माझं अन्ननलिकेतील अल्सरचं ऑपरेशन झालं. तेव्हापासून तर माझं वजन फक्त ३० किलोच आहे. मी खरंच एखाद्या नाजूक ‘मातीच्या भांड्यासारखी’ आहे. तरीपण, यहोवानं मला ‘पराकोटीचं सामर्थ्य’ दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ऑपरेशननंतर यहोवानं मला पुन्हा एकदा ॲलनसोबत प्रवासी कार्यात सहभागी होणं शक्य केलं. (२ करिंथ. ४:७) २००४ साली मार्च महिन्यात ॲलनचा झोपेतच मृत्यू झाला. मला त्यांची खूप उणीव भासते, पण यहोवाच्या स्मृतीत ते सुखरूप आहेत या जाणिवेनं मला सांत्वन मिळतं.
आज वयाच्या ८३ व्या वर्षी मागे वळून पाहताना, मी पूर्णवेळ सेवेत घालवलेली ६३ वर्षं मला आठवतात. अजूनही, घरीच एक बायबल अभ्यास चालवण्याद्वारे आणि दररोज यहोवाच्या अद्भुत उद्देशाबद्दल इतरांशी बोलण्याच्या संधींचा फायदा घेण्याद्वारे मी सेवाकार्यात सहभाग घेते. कधीकधी माझ्या मनात विचार येतो, की ‘१९४५ साली पायनियर सेवा सुरू केली नसती, तर माझं जीवन कसं असतं?’ त्यावेळी माझ्या नाजूक प्रकृतीमुळे मला पायनियर सेवा जमणार नाही असं वाटत होतं. पण तरीसुद्धा, मी तरुणपणीच ही सेवा हाती घेतली याबद्दल आज मला मनापासून समाधान वाटतं! आपण जर यहोवाला जीवनात पहिलं स्थान दिलं तर तो आपलं बलस्थान ठरतो याचा मला व्यक्तिशः अनुभव घ्यायला मिळाला!
[तळटीपा]
^ परि. 6 सॅलव्हेशन हे १९३९ साली प्रकाशित झालेले पुस्तक आता छापले जात नाही.
^ परि. 22 बंधू कोव्हिल यांची जीवनकथा टेहळणी बुरूज मार्च १५, १९६१ (इंग्रजी) या अंकात प्रकाशित झाली होती.
[१८ पानांवरील चित्र]
माझी मिशनरी जोडीदार, ऑस्ट्रिड ॲन्डर्सन (उजवीकडे) हिच्यासोबत
[१८ पानांवरील चित्र]
माझ्या पतीसोबत १९५६ साली प्रवासी कार्यात
[२० पानांवरील चित्र]
ॲलनसोबत २००० साली