वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने ‘हात ठेवण्याविषयी’ उल्लेख केला. तो येथे वडिलांना नियुक्त केल्या जाण्याबद्दल बोलत होता की आणखी कशाबद्दल?—इब्री ६:२.
याबाबतीत ठामपणे काहीही म्हणता येत नाही. पण पौल येथे पवित्र आत्म्याची कृपादाने देण्याकरता एखाद्या व्यक्तीवर हात ठेवण्याविषयी बोलत होता असे दिसते.
बायबलमध्ये काही ठिकाणी हात ठेवण्याचा उल्लेख देवाच्या सेवेतील विशिष्ट कार्याकरता एखाद्या व्यक्तीला नियुक्त करण्याच्या बाबतीत करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, मोशेने आपल्यानंतर इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्याकरता यहोशवाला नेमताना त्याच्यावर “आपले हात ठेवले होते.” (अनु. ३४:९) ख्रिस्ती मंडळीत, काही सुयोग्य पुरुषांवर हात ठेवून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. (प्रे. कृत्ये ६:६; १ तीम. ४:१४) आणि पौलाने कोणावर हात ठेवण्याच्या बाबतीत उतावळी न करण्याचा सल्ला दिला होता.—१ तीम. ५:२२.
पण येथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. पौलाने इब्री ख्रिश्चनांना ‘प्राथमिक बाबीसंबधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करण्याचे’ प्रोत्साहन दिले होते. या प्राथमिक बाबी कोणत्या होत्या? त्याने या प्राथमिक बाबींत, ‘निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास, आणि बाप्तिस्म्यांचे, व हात ठेवण्याचे शिक्षण’ या गोष्टींचा समावेश केला. (इब्री ६:१, २) तर मग, ज्या प्राथमिक बाबी सोडून ख्रिश्चनांनी प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करायचा होता, त्यांत वडिलांची नियुक्ती देखील समाविष्ट होती असे म्हणता येईल का? नाही. उलट मंडळीत वडील म्हणून नियुक्त केले जाणे हे एक असे ध्येय आहे जे आधीपासूनच प्रौढ असणारे बांधव मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतरही ते या नियुक्तीबद्दल कदर बाळगतात. म्हणूनच, वडील म्हणून नियुक्त केले जाणे ही एक प्राथमिक बाब आहे असे म्हणता येणार नाही.—१ तीम. ३:१.
पण, हात ठेवणे या संज्ञेचा दुसऱ्याही एका अर्थाने वापर करण्यात आला आहे. इस्राएल लोक पूर्वी यहोवाची खास प्रजा होती. पण पहिल्या शतकात यहोवाने नैसर्गिक इस्राएल लोकांचा अव्हेर केला व आत्मिक इस्राएलाचा, म्हणजेच अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीचा स्वीकार केला. (मत्त. २१:४३; प्रे. कृत्ये १५:१४; गल. ६:१६) अभिषिक्त जनांना विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व अशी इतर कृपादाने देण्यात आली. हा देवाचा त्यांच्यावर आशीर्वाद असल्याचा पुरावा होता. (१ करिंथ. १२:४-११) कर्नेल्य व त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला तेव्हा ते ‘अनेक भाषांतून बोलू लागले’ आणि यावरून त्यांना पवित्र आत्मा मिळाल्याचे सर्वांना दिसून आले.—प्रे. कृत्ये १०:४४-४६.
कधीकधी एखाद्यावर हात ठेवून त्याला चमत्कारिक कृपादाने दिली जात. फिलिप्पाने शोमरोनात सुवार्तेचा प्रचार केल्यानंतर बऱ्याच जणांनी बाप्तिस्मा घेतला. यानंतर नियमन मंडळाने पेत्र व योहान या प्रेषितांना तेथे पाठवले. कशासाठी? बायबलमध्ये असे म्हटले आहे: “तेव्हा [त्या दोघांनी अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्यांवर] आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.” याचा अर्थ त्यांना पवित्र आत्म्याची कृपादाने म्हणजेच सर्वांना दिसून येतील अशा विशेष क्षमता प्राप्त झाल्या असतील. आपण असे का म्हणू शकतो? कारण, आत्म्याचे हे कार्य पाहून पूर्वी जादूगिरी करणाऱ्या शिमोनाने स्वार्थाने प्रवृत्त होऊन, प्रेषितांना पैसे देऊ केले व आपल्यालाही इतरांवर हात ठेवून त्यांना पवित्र आत्म्याची चमत्कारिक कृपादाने देण्याचा अधिकार द्यावा अशी विनंती केली. (प्रे. कृत्ये ८:५-२०) इफिसस येथे १२ जणांचा बाप्तिस्मा झाला त्या घटनेबद्दल असे सांगितले आहे: “पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.”—प्रे. कृत्ये १९:१-७; पडताळून पाहा २ तीम. १:६.
त्याअर्थी, इब्री ६:२ येथे पौल, नव्याने विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याची कृपादाने देण्याकरता त्यांच्यावर हात ठेवण्याविषयी बोलत होता असे दिसते.