वैवाहिक जीवनात आनंदी असणे
वैवाहिक जीवनात आनंदी असणे
“सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.”—नीति. २४:३.
१. देवाने पहिल्या मानवाच्या बाबतीत सुज्ञता कशी दाखवली?
आपले भले कशात आहे हे आपल्या सुज्ञ स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. उदाहरणार्थ, आपला उद्देश पूर्ण करण्याकरता एदेन बागेत, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही,” हे देवाला जाणवले. देवाच्या उद्देशाचा एक मुख्य भाग हा होता, की विवाहित जोडप्यांनी मुले प्रसवून “पृथ्वी व्यापून” टाकावी.—उत्प. १:२८; २:१८.
२. मानवजातीच्या भल्यासाठी यहोवाने कोणती व्यवस्था केली?
२ यहोवाने म्हटले: “त्याच्यासाठी [आदामासाठी] अनुरूप साहाय्यक मी करीन.” यास्तव त्याने पहिल्या मानवाला गाढ निद्रा आणली आणि त्याच्या परिपूर्ण शरीरातून एक फासळी काढून घेतली व या फासळीची त्याने स्त्री बनवली. यहोवाने या परिपूर्ण स्त्रीला अर्थात हव्वेला आदामाकडे नेले तेव्हा आदाम म्हणाला: “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.” हव्वा खरोखरच आदामाची अनुरूप साहाय्यक होती. आदाम आणि हव्वा या दोघांमध्ये अनोखे गुण प्रदर्शित करण्याची कुवत होती, तरीपण दोघेही परिपूर्ण होते आणि दोघांनाही देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. अशा प्रकारे देवाने पहिले लग्न लावून दिले. देवाने ठरवून दिलेल्या या लग्न व्यवस्थेला आदाम आणि हव्वेने आनंदाने स्वीकारले. यामुळे त्या दोघांनाही एकमेकांचा आधार मिळणार होता.—उत्प. १:२७; २:२१-२३.
३. अनेक जण देवाने दिलेल्या देणगीला अर्थात विवाहाला कसे लेखतात व यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात?
३ परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगात सगळीकडे आपण बंडाळीचा आत्मा पाहतो. या बंडाळीच्या आत्म्यामुळे ज्या समस्या उद्भवतात त्यास देव जबाबदार नाही. पुष्कळ लोक, देवाने दिलेल्या देणगीला अर्थात विवाह योजनेला तुच्छ लेखतात; ही व्यवस्था जुनी आहे, यामुळे मानसिक त्रास व झगडे होतात, असे ते म्हणतात. जे विवाह करतात त्यांच्यामध्ये घटस्फोट अगदी सर्वसामान्य बनला आहे. पालकांना मुलांबद्दल जिव्हाळा राहिलेला नाही आणि बहुतेकदा स्वतःच्या स्वार्थासाठी ते मुलांचा ढाल म्हणून उपयोग करतात. शांती व ऐक्य टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा अनेक पालक समंजसपणा दाखवण्यास तयार नसतात. (२ तीम. ३:३) अशा कठीण काळात आपण आपल्या वैवाहिक जीवनातील आनंद कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो? कोणत्याही कारणामुळे विवाह तुटू न देता तो यशस्वीरीत्या टिकवण्यासाठी समजूतदारपणा कशा प्रकारे मदत करतो? आपल्या जीवनात आनंद टिकवून ठेवलेल्यांच्या आधुनिक दिवसांतील उदाहरणांतून आपण काय शिकतो?
यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
४. (क) विवाहाविषयी पौलाने कोणता सल्ला दिला? (ख) आज्ञाधारक ख्रिस्ती, पौलाचा सल्ला कशा प्रकारे मान्य करतात?
४ ख्रिस्ती प्रेषित पौल याने विधवांना असा सल्ला दिला, की जर त्या पुनर्विवाह करू इच्छित असतील तर त्यांनी “केवळ प्रभूमध्ये” लग्न करावे. (१ करिंथ. ७:३९) यहुदी धर्मातून आलेल्या ख्रिश्चनांसाठी हा नवीन विचार नव्हता. इस्राएल राष्ट्राला देवाने जे नियमशास्त्र दिले होते त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले होते, की त्यांनी आजूबाजूच्या मूर्तीपूजक राष्ट्रांसोबत “सोयरीक” करू नये. देवाने दिलेल्या या दर्जाचे उल्लंघन करणे किती घातक होते याचे यहोवाने आणखी स्पष्टीकरण दिले. “ते [गैर-इस्राएल] लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील; त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.” (अनु. ७:३, ४) विवाहसोबती निवडण्याच्या बाबतीत यहोवा आधुनिक दिवसांतील आपल्या सेवकांकडून काय अपेक्षा करतो? यहोवाच्या सेवकाने “प्रभूमध्ये” असलेल्या एका समर्पित, बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीला विवाह सोबती म्हणून निवडावे, अशी यहोवा आपल्या आधुनिक सेवकांकडून अपेक्षा करतो. यहोवाने दिलेल्या या सूचनेचे पालन करण्यातच सुज्ञपणा आहे.
५. यहोवाचा आणि विवाहित ख्रिश्चनांचा, विवाहप्रसंगी घेतलेल्या वचनांविषयी कोणता दृष्टिकोन आहे?
५ देवाच्या नजरेत विवाहप्रसंगी घेतलेल्या शपथा पवित्र आहेत. पहिल्या विवाहाविषयी बोलताना देवाचा स्वतःचा पुत्र येशू याने असे म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:६) आपण देवाला दिलेल्या वचनाच्या गांभीर्याची स्तोत्रकर्ता आपल्याला आठवण करून देतो. तो म्हणतो: “देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड.” (स्तो. ५०:१४) विवाह करणारे दांपत्य पुष्कळ आनंद अनुभवणार असले, तरीसुद्धा विवाहाच्या दिवशी त्यांनी एकमेकांना दिलेली वचने गंभीर स्वरूपाची आहेत आणि त्यांना देवाला याविषयी जाब द्यावा लागणार आहे.—अनु. २३:२१.
६. इफ्ताहाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
६ सा.यु.पू. १२ व्या शतकात इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून सेवा करणाऱ्या इफ्ताहाचे उदाहरण घ्या. त्याने यहोवाला असे वचन दिले: “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.” मिस्पाला आपल्या घरी परतल्यावर आपल्याला भेटायला आलेली पहिली व्यक्ती आपली एकुलती एक मुलगी आहे हे पाहिल्यावर इफ्ताह दिलेले वचन तोडायचा प्रयत्न करतो का? मुळीच नाही. उलट तो म्हणतो: “परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.” (शास्ते ११:३०, ३१, ३५) इफ्ताहाचा वंश पुढे नेण्याकरता त्याच्या मुलीव्यतिरिक्त त्याला दुसरे अपत्य नव्हते. तरीदेखील त्याने यहोवाला दिलेले वचन पाळले. अर्थात इफ्ताहाने दिलेले वचन हे विवाहप्रसंगी घेतल्या जाणाऱ्या शपथांपासून वेगळे असले तरीपण हा अहवाल, ख्रिस्ती पती-पत्नीने विवाहप्रसंगी एकमेकांना दिलेले वचन पाळण्याकरता एक उत्तम उदाहरण आहे.
विवाह यशस्वी कशामुळे होतो?
७. नवविवाहितांना कोणते फेरबदल करावे लागतात?
७ ज्यांचा विवाह होऊन अनेक वर्षे झाली आहेत अशी अनेक दांपत्ये, त्यांचा विवाह ठरल्यानंतर ते जेव्हा एकमेकांना भेटत होते, त्या काळाची मोठ्या आनंदाने आठवण करतात. त्यांच्या भावी सोबत्याला जवळून ओळखण्याचा किती आनंदविणारा अनुभव होता तो! एकमेकांसोबत त्यांनी जितका अधिक वेळ घालवला तितके ते एकमेकांना जवळून ओळखू शकले. अशा गाठी-भेटींनंतर अथवा आईवडिलांनी विवाह ठरवल्यानंतर ते एकदाचे पतीपत्नी झाले व त्यानंतर त्यांना अनेक महत्त्वाचे फेरबदल करावे लागले. एक पती म्हणतो: “आमच्या लग्नाच्या सुरुवातीला आम्हाला दोघांना ज्या सर्वात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले होते, ती समस्या म्हणजे, आता आम्ही एकटे राहिलो नाहीत ही जाणीव आम्हाला स्वतःला करून द्यावी लागली. काही काळपर्यंत तरी आम्हाला आमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर व कौटुंबिक सदस्यांबरोबर आमचा संबंध मर्यादित ठेवायला जड गेले.” ज्याच्या लग्नाला ३० वर्षे झाली आहेत अशा आणखी एका पतीला लग्नाच्या सुरुवातीला जाणवले, की संतुलित असण्याकरता त्याने “केवळ एकट्याचा नव्हे तर दोघांचा” विचार करायला शिकले पाहिजे. कोणतेही आमंत्रण स्वीकारण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी तो आपल्या बायकोशी याबाबत चर्चा करतो आणि मग दोघांचा फायदा लक्षात घेऊन निर्णय घेतो. अशा परिस्थितीत समजूतदारपणा दाखवल्याने खूप फायदा होतो.—नीति. १३:१०.
८, ९. (क) लग्न झालेल्या पती-पत्नीत खुला संवाद होणे का महत्त्वाचे आहे? (ख) कोणकोणत्या बाबतीत लवचिकपणा दाखवल्याने फायदा होऊ शकतो व का?
८ कधीकधी अगदी भिन्न संस्कृतीतून आलेल्या दोन व्यक्तींचा विवाह होतो. अशा वेळी खासकरून त्यांच्यामध्ये खुल्या मनाने संवाद होणे महत्त्वाचे असते. संभाषणाच्या पद्धतीत फरक असू शकतो. तुमचा विवाह सोबती नातेवाईकांबरोबर कसे बोलतो हे पाहिल्यावर तुम्हाला, तुमच्या विवाहसोबत्याला समजून घ्यायला मदत होऊ शकेल. कधीकधी जे काही बोलले जाते त्यावरून नव्हे तर ज्या पद्धतीने ते बोलले जाते त्यावरून एखाद्याच्या मनातील विचार समजून येतात. आणि पुष्कळ गोष्टी, जे बोलले जात नाही त्यावरून समजतात. (नीति. १६:२४; कलस्सै. ४:६) कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्याकरता समंजसपणाची आवश्यकता असते.—नीतिसूत्रे २४:३ वाचा.
९ छंद व मनोरंजन निवडण्याच्या बाबतीत, अनेक जोडप्यांना असे वाटले आहे, की लवचिक असणे महत्त्वाचे आहे. लग्नाआधी तुमचा विवाह सोबती कदाचित खेळ किंवा इतर मनोरंजनात वेळ घालवत असावा. लग्न झाल्यावर थोडेफार बदल करणे उचित असेल का? (१ तीम. ४:८) हाच प्रश्न, नातेवाईकांबरोबर घालवण्यात येणाऱ्या वेळाबाबत विचारला जाऊ शकतो. एका विवाहित जोडप्याला आध्यात्मिक व इतर कार्ये सोबत मिळून करण्याकरता वेळेची गरज असू शकते.—मत्त. ६:३३.
१०. समजूतदारपणा दाखवल्यामुळे पालक आणि त्यांच्या लग्न झालेल्या मुलांमधील चांगले संबंध कशा प्रकारे टिकून राहू शकतात?
१० लग्न झाल्यावर एक पुरुष आपल्या आईवडिलांना सोडतो. हीच गोष्ट स्त्रीला देखील लागू होते. (उत्पत्ति २:२४ वाचा.) तरीपण, आपल्या आईवडिलांचा मान राखण्याविषयी देवाने दिलेली आज्ञा लग्न झाल्यावरही लागू होते. यास्तव, लग्न झाल्यावर एक विवाहित जोडपे आपल्या आईवडिलांबरोबर आणि सासूसासऱ्यांबरोबर कदाचित काही वेळ घालवू इच्छितील. ज्याच्या विवाहाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत असा एक पती म्हणतो: “कधीकधी, आपल्या सोबत्याच्या, आईवडिलांच्या, भावंडांच्या, सासरच्या लोकांच्या विविध इच्छा आणि गरजा पूर्ण करताना संतुलन राखणे कठीण असते. ही परिस्थिती कशी हाताळायची हे ठरवताना उत्पत्ति २:२४ मधील सल्ला माझ्यासाठी अतिशय लाभदायक ठरला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांशी मी विश्वासू राहिलो पाहिजे आणि त्यांच्याप्रतीही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, या गोष्टीची मला जाणीव आहे. पण सोबतच, हे वचन मला सांगते, की मी माझ्या सोबत्याला प्रथम स्थान दिले पाहिजे.” त्यामुळे, जे ख्रिस्ती पालक समजूतदारपणा दाखवतात ते लग्न झालेल्या आपल्या मुलांचा आदर करतील. ते ही गोष्ट मान्य करतील, की त्यांच्या मुलांचे आता एक वेगळे कुटुंब आहे ज्यात, कुटुंबाचे मार्गदर्शन करण्याची प्रमुख जबाबदारी पतीची आहे.
११, १२. विवाहित दांपत्यांनी एकत्र मिळून कौटुंबिक अभ्यास आणि प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे?
११ कुटुंबात कौटुंबिक अभ्यासाचा नित्यक्रम असणे महत्त्वाचे आहे. अनेक ख्रिस्ती कुटुंबांच्या अनुभवांवरून ही गोष्ट किती खरी आहे हे दिसून येते. अभ्यास सुरू करणे किंवा तो नित्यनियमाने चालू ठेवणे सोपे नसेल. एक कुटुंबप्रमुख कबूल करतो: “मला एका गोष्टीची खंत वाटते. आमचं लग्न झालं तेव्हापासूनच आमचा कौटुंबिक बायबल अभ्यासाचा नित्यक्रम असता तर किती बरं झालं असतं.” ते पुढे म्हणतात: “अभ्यासाच्या वेळी आम्हाला एखादा विलोभनीय मुद्दा सापडतो तेव्हा माझी पत्नी आनंदाने कशी खुलते हे पाहणे माझ्यासाठी जणू काय एक देणगीच आहे.”
१२ पती-पत्नीने एकत्र प्रार्थना करणे, हे आणखी एक साहाय्य आहे. (रोम. १२:१२) पतीपत्नी जेव्हा एकजुटीने यहोवाची उपासना करतात तेव्हा देवाबरोबरच्या त्यांच्या निकटच्या संबंधामुळे त्यांचे वैवाहिक बंधन आणखी मजबूत होते. (याको. ४:८) एक ख्रिस्ती पती म्हणतो: “ज्यामुळे पती-पत्नीत मतभेद होतात अशा लहान-सहान चुकांच्या बाबतीतही लगेच क्षमा मागणे आणि एकत्र प्रार्थना करताना या चुकांचा उल्लेख करणे हा, झालेल्या चुकीबद्दल आपल्याला मनापासून वाईट वाटले आहे हे दाखवण्याचा एक मार्ग आहे.”—इफिस. ६:१८.
पतीपत्नीने एकमेकांशी समंजसपणे वागले पाहिजे
१३. पतीपत्नीतील नाजूक विषयावर पौलाने कोणता सल्ला दिला?
१३ विवाहित ख्रिश्चनांनी, वासनेने झपाटलेल्या आजच्या जगात सामान्य असलेल्या सवयी टाळल्या पाहिजेत ज्यामुळे वैवाहिक नातेसंबंध नष्ट होऊ शकतात. या विषयावर पौलाने असा सल्ला दिला: “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा. पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाहि स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.” यानंतर पौलाने पुढे असे स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन दिले: “एकमेकांबरोबर वंचना करू नका, . . . काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा मग पुन्हा एकत्र व्हा.” का? “प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून,” व “तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये” म्हणून. (१ करिंथ. ७:३-५) प्रार्थनेचा उल्लेख करताना पौलाने दाखवून दिले, की ख्रिश्चनांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. पण त्याने हेही स्पष्टपणे सांगितले, की प्रत्येक विवाहित ख्रिश्चनाला आपल्या विवाह सोबत्याच्या शारीरिक व भावनिक गरजांची जाणीव असली पाहिजे.
१४. विवाहातील नाजूक विषयाच्या बाबतीत शास्त्रवचनांतील तत्त्वे कशी लागू होतात?
१४ पतीने व पत्नीने एकमेकांशी खुल्या मनाने संवाद केला पाहिजे व त्यांना ही जाणीव असली पाहिजे, की विवाहातील या नाजूक विषयाच्या बाबतीत त्यांनी कोमलता दाखवली नाही तर समस्या उद्भवू शकतात. (फिलिप्पैकर २:३, ४ वाचा; मत्तय ७:१२ पडताळून पाहा.) ही गोष्ट, एकाच घरात वेगवेगळे धार्मिक विश्वास असलेल्यांच्या बाबतीत खरी ठरली आहे. मतभेद असले तरी, ख्रिस्ती व्यक्ती आपले चांगले वर्तन, दयाळुपणा आणि सहकार्य यांद्वारे सहसा परिस्थिती सुधारू शकते. (१ पेत्र ३:१, २ वाचा.) यहोवाबद्दल आणि विवाहसोबत्याबद्दल प्रेम आणि समंजसपणा, विवाहातील या बाबतीत मदत करू शकतो.
१५. पतीपत्नीने एकमेकांचा आदर केल्याने विवाह सुखी कसा होऊ शकतो?
१५ इतर बाबतीतही, एक दयाळू पती आपल्या पत्नीला आदराने वागवेल. उदाहरणार्थ, लहान-सहान गोष्टींतही तो तिच्या भावनांची कदर करेल. लग्नाला ४७ वर्षे पूर्ण झालेला एक पती कबूल करतो: “या बाबतीत मी अजूनही बरंच शिकतोय.” ख्रिस्ती पत्नींना आपल्या पतींबद्दल गाढ आदर बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (इफिस. ५:३३) इतरांसमोर आपल्या पतीची टीका केल्याने, त्याच्या चुका दाखवल्याने पत्नीला पतीबद्दल आदर आहे असे मुळीच वाटणार नाही. नीतिसूत्रे १४:१ मध्ये आपल्याला अशी आठवण करून देण्यात आली आहे: “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.”
दियाबलाला वाव देऊ नका
१६. पतीपत्नी आपल्या वैवाहिक जीवनात इफिसकर ४:२६, २७ कसे लागू करू शकतात?
१६ “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) या वचनाचा अवलंब केल्यास वैवाहिक जीवनात उद्भवणारे मतभेद सोडवता येतात किंवा टाळताही येतात. “आमच्या दोघांत वाद झालाच तर मी त्याविषयी माझ्या पतीशी बोलले नाही, असं कधी झाल्याचं मला आठवत नाही. वाद मिटवण्यासाठी आम्हाला तासन्तास बसावे लागले होते,” असे एक भगिनी आठवून सांगते. या भगिनीने व तिच्या पतीने त्यांचा विवाह झाला तेव्हाच असे ठरवले, की त्यांच्यात कधी वाद झालेच तर ते तो वाद सोडवल्याशिवाय झोपणार नाहीत. “आम्ही असं ठरवलं, की समस्या कोणतीही असो. क्षमा करायची, विसरून जायचं आणि दुसऱ्या नवीन दिवशी नव्याने सुरुवात करायची.” अशा प्रकारे त्यांनी दियाबलाला आपल्या विवाहात थाराच दिला नाही अर्थात “वाव” दिला नाही.
१७. विवाह झाल्यानंतर जर जोडीदारापैकी एकाला वाटत असेल, की आपली जोडी मुळीच जमत नाही, तेव्हा कोणत्या गोष्टीची आठवण केल्याने मदत होऊ शकेल?
१७ पण ज्या व्यक्तीशी तुमचे लग्न झाले आहे त्या व्यक्तीशी तुमचे मुळीच जुळत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर काय? इतर पतीपत्नींमध्ये जो भावनिक ओलावा दिसतो, तसा आपल्या विवाहात नाही, असे तुम्हाला वाटत असेल. पण, वैवाहिक बंधनाबद्दल निर्माणकर्त्याचा जो दृष्टिकोन आहे त्याची आठवण केल्याने तुम्हाला मदत होऊ शकेल. पौलाने ईश्वरप्रेरणेने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.” (इब्री १३:४) आणि, “तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही,” या शब्दांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (उप. ४:१२) पती व पत्नी दोघेही जेव्हा यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या दोघांतील संबंध आणि देवाबरोबरील त्यांचे बंधन आणखी मजबूत होते. त्या दोघांनी मिळून आपला विवाह यशस्वी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण असे केल्याने विवाहाचा जनक यहोवा याच्या नावाचे गौरव होते, हे त्यांना माहीत आहे.—१ पेत्र ३:११.
१८. विवाहात कोणती गोष्ट शक्य आहे?
१८ ख्रिश्चनांना आपल्या विवाहात आनंदी होणे शक्य आहे. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ख्रिस्ती गुण अंगी बाणवावे लागतात. या गुणांपैकी एक गुण आहे समजूतदारपणा. आज, सबंध विश्वभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये अगणित विवाहित जोडपी आहेत ज्यांनी, विवाहात आनंद मिळवणे शक्य आहे, हे शाबीत करून दाखवले आहे.
तुमचे उत्तर काय असेल?
• वैवाहिक जीवनात आनंदी होणे अशक्य का नाही?
• वैवाहिक जीवन यशस्वी होण्याकरता कोणती गोष्ट पतीपत्नीस मदत करू शकते?
• पतीपत्नीने कोणते गुण अंगी बाणवण्याची गरज आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
कोणतेही आमंत्रण स्वीकारण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी पतीपत्नी एकमेकांशी चर्चा करतात
[१० पानांवरील चित्र]
वाद झाल्यास, त्याच दिवशी तो सोडवण्याचा प्रयत्न करा; असे केल्याने तुम्ही ‘सैतानाला वाव देणार नाही’