येशू ख्रिस्त—सर्वश्रेष्ठ मिशनरी
येशू ख्रिस्त—सर्वश्रेष्ठ मिशनरी
“मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठविले आहे.”—योहा. ७:२९.
१, २. मिशनरी म्हणजे काय आणि सर्वश्रेष्ठ मिशनरी कोणाला म्हणता येते?
“मिशनरी,” हा शब्द ऐकताच तुमच्या मनात काय येते? काही जणांना कदाचित ख्रिस्ती धर्मजगताच्या मिशनऱ्यांची आठवण होईल. या मिशनऱ्यांपैकी बरेचजण, ज्या देशांत त्यांना पाठवण्यात आले आहे, तेथील राजकीय व आर्थिक कारभारांत स्वतःला गोवतात. पण तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असल्यामुळे मिशनरी म्हणताच तुम्हाला पृथ्वीवरील निरनिराळ्या देशांत सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी नियमन मंडळाने पाठवलेल्या असंख्य मिशनऱ्यांची आठवण झाली असेल. (मत्त. २४:१४) हे मिशनरी, लोकांना यहोवा देवाच्या जवळ येण्यास व त्याच्यासोबत एक अतिशय खास असा नातेसंबंध जोडण्यास साहाय्य करतात. या उदात्त कार्याकरता ते आपला वेळ व शक्ती निःस्वार्थपणे समर्पित करतात.—याको. ४:८.
२ “मिशनरी” हा शब्द जरी बायबलच्या मूळ पाठात आढळत नसला तरीसुद्धा, इफिसकर ४:११ यात “सुवार्तिक” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे मिशनरी असेही भाषांतर करता येते. यहोवा हा सर्वश्रेष्ठ सुवार्तिक आहे पण त्याला सर्वश्रेष्ठ मिशनरी म्हणता येत नाही कारण त्याला कधीही कोणाद्वारे पाठवण्यात आले नाही. पण येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्याच्या संदर्भात असे म्हटले: “मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठविले आहे.” (योहा. ७:२९) मानवजातीबद्दल आपले अफाट प्रेम व्यक्त करण्याकरता यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवले. (योहा. ३:१६) येशूला सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम मिशनरी म्हणता येते कारण त्याला पृथ्वीवर पाठवण्याचे एक कारण हे होते की त्याने “सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहा. १८:३७) देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात तो पूर्णतः यशस्वी ठरला आणि त्याने केलेल्या सेवेमुळे आजही आपल्याला फायदा होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या सेवाकार्यात, मग आपल्याला मिशनरी म्हणून नियुक्त केलेले असो वा नसो, आपण त्याच्या शिकवण्याच्या पद्धतींचा अवलंब करू शकतो.
३. आपण कोणत्या प्रश्नांचा विचार करणार आहोत?
३ राज्याच्या सुवार्तेचा प्रचारक या नात्याने येशूविषयी पुढील काही प्रश्न मनात येतात: येशूला या पृथ्वीवर कशाप्रकारचे अनुभव आले? त्याची शिकवण्याची पद्धत इतकी परिणामकारक का होती? त्याचे सेवाकार्य इतके फलदायी का ठरले?
अनोळखी परिस्थितीत उत्सुक मनोवृत्ती
४-६. पृथ्वीवर असताना येशूला कोणत्या बाबतींत बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले?
४ सध्याच्या काळातल्या मिशनऱ्यांना तसेच राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात राहायला गेलेल्या काही ख्रिश्चनांना त्यांच्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या तुलनेत, निम्न दर्जाच्या राहणीमानाची सवय करून घ्यावी लागते. पण येशूचा विचार करा. स्वर्गात तो आपल्या पित्यासोबत व शुद्ध मनाने यहोवाची सेवा करणाऱ्या इतर स्वर्गदूतांसोबत ज्या परिस्थितीत राहात होता, त्याची तुलनादेखील आपण पृथ्वीवरील त्याच्या परिस्थितीशी करू शकत नाही. (ईयो. ३८:७) एका नीतिभ्रष्ट जगात पापी मानवांसोबत राहण्याचा अनुभव त्याच्याकरता किती वेगळा असेल! (मार्क ७:२०-२३) शिवाय, येशूला आपल्या अगदी जवळच्या शिष्यांच्या आपसांतील हेव्यादाव्यांना तोंड द्यावे लागले. (लूक २०:४६; २२:२४) पण येशूने पृथ्वीवर आलेल्या या सर्व अनुभवांना अगदी समर्थपणे तोंड दिले.
५ मानवांची भाषा, येशू चमत्कारिकपणे आपोआप बोलू लागला नाही. तर बालपणापासून तो ती शिकला. एकेकाळी स्वर्गात देवदूतांना आदेश देणाऱ्याकरता हा किती वेगळा अनुभव असेल याची कल्पना करा! पृथ्वीवर येशूने ‘माणसांच्या भाषांपैकी’ निदान एका भाषेचा उपयोग केला. ही भाषा ‘देवदूतांच्या भाषेपेक्षा’ अगदी वेगळी होती. (१ करिंथ. १३:१) पण येशूने आपल्या कृपावचनांनी लोकांची मने जिंकली. कोणताही मनुष्य त्याच्यासारखा बोलला नाही असे त्याच्याविषयी लोक म्हणत.—लूक ४:२२.
६ देवाचा पुत्र पृथ्वीवर आला तेव्हा आणखी कोणकोणत्या बाबतीत त्याला बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले असेल याचा विचार करा. येशूला आदामाकडून उपजत पापी स्वभाव मिळाला नसला तरी, तो एक मानव होता. कालांतराने जे त्याचे “बंधू” किंवा अभिषिक्त अनुयायी बनणार होते त्यांच्यासारखाच तो बनला. (इब्री लोकांस २:१७, १८ वाचा.) पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री, येशू आपल्या स्वर्गीय पित्याला ‘देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देण्याची’ विनंती करू शकत होता, पण तरी त्याने तसे केले नाही. पण आद्यदेवदूत मीखाएल या नात्याने येशूला ज्या असंख्य देवदूतांवर अधिकार होता त्याचा जरा विचार करा! (मत्त. २६:५३; यहू. ९) येशूने पृथ्वीवर असताना महत्कृत्ये केली हे कबूल आहे. पण पृथ्वीवर त्याने केलेली कृत्ये, स्वर्गात तो जे काही करण्यास समर्थ होता त्याच्या तुलनेत अगदीच मर्यादित होती.
७. नियमशास्त्राच्या संदर्भात यहुद्यांची कशी मनोवृत्ती होती?
७ पृथ्वीवर येण्याअगोदर “शब्द” म्हणून स्वर्गात अस्तित्वात असताना, कदाचित येशूनेच देवाच्या वतीने बोलणारा प्रतिनिधी या नात्याने, इस्राएल लोकांचे अरण्यात मार्गदर्शन केले असावे. (योहा. १:१; निर्ग. २३:२०-२३) पण ‘देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले असूनही त्यांनी ते पाळले नव्हते.’ (प्रे. कृत्ये ७:५३; इब्री २:२, ३) खरे तर, पहिल्या शतकातील यहुदी धर्मपुढाऱ्यांना नियमशास्त्राचा खरा उद्देशच उमगला नव्हता. उदाहरणार्थ, शब्बाथाविषयीचा नियमच घ्या. (मार्क ३:४-६ वाचा.) शास्त्री व परूशी लोकांनी “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास” यांकडे दुर्लक्ष केले. (मत्त. २३:२३) तरीसुद्धा, येशूने त्यांच्याविषयी आशा सोडली नाही; तर तो त्यांना सत्याविषयी उपदेश करत राहिला.
८. येशू आपले साहाय्य करण्यास समर्थ का आहे?
८ येशू लोकांना मदत करण्यास उत्सुक होता. लोकांबद्दल त्याला वाटणारे प्रेम ही त्यामागची प्रेरणा होती. त्यांना साहाय्य करण्याची त्याला मनापासून इच्छा होती. येशूच्या ठायी असलेली खऱ्या सुवार्तिकाची ही उत्सुक मनोवृत्ती कधीही मंदावली नाही. आणि पृथ्वीवर असताना तो यहोवाला पूर्णपणे विश्वासू राहिल्यामुळेच तो “आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला.” शिवाय, “ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.”—इब्री २:१८; ५:८, ९.
उत्तम प्रशिक्षण मिळालेला शिक्षक
९, १०. येशूला पृथ्वीवर पाठवण्यात आले त्याअगोदर त्याला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण मिळाले?
९ आजच्या काळात, मिशनऱ्यांना नियुक्त करण्याआधी नियमन मंडळ त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करते. येशू ख्रिस्तालाही प्रशिक्षण मिळाले होते का? हो, मिळाले होते. पण मशीहा म्हणून त्याला अभिषिक्त करण्यात आले त्याआधी त्याने यहुदी रब्बींच्या महाविद्यालयांत शिक्षण घेतले नव्हते. किंवा, प्रतिष्ठित धर्मपुढाऱ्यांच्या चरणांजवळ बसून त्याने विद्या प्राप्त केली नव्हती. (योहा. ७:१५; प्रे. कृत्ये २२:३ पडताळून पाहा.) तर मग, लोकांना शिकवण्याची पात्रता येशूला कशी मिळाली?
१० येशूची आई मरीया तसेच त्याचे दत्तक वडील योसेफ यांनी नक्कीच येशूला लहानपणी बरेच काही शिकवले असेल. पण येशूला त्याच्या सेवाकार्याकरता आवश्यक असणारे प्रशिक्षण सर्वश्रेष्ठ माध्यमातून, म्हणजेच खुद्द यहोवाकडून मिळाले होते. यासंदर्भात येशूने म्हटले: “मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.” (योहा. १२:४९) काय बोलावे याविषयी पुत्राला सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या याकडे लक्ष द्या. पृथ्वीवर येण्याअगोदर नक्कीच येशूने बराच काळ आपल्या पित्याचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकण्यात घालवला असेल. यापेक्षा चांगले प्रशिक्षण त्याला कोठून मिळाले असते?
११. येशूने मानवजातीप्रती आपल्या पित्याच्या मनोवृत्तीचे कितपत अनुकरण केले?
११ पुत्राला निर्माण करण्यात आले तेव्हापासूनच त्याचा आपल्या पित्यासोबत अतिशय जवळचा नातेसंबंध होता. पृथ्वीवर येण्याअगोदर येशूने यहोवाच्या मानवांसोबतच्या व्यवहारांचे निरीक्षण केले आणि त्याद्वारे देवाला मानवांप्रती कशा भावना आहेत हे त्याला उमजले. म्हणूनच पुत्राच्या वागण्याबोलण्यातून देवाला मानवजातीबद्दल वाटणारे प्रेम स्पष्टपणे दिसून आले. बुद्धीचे मूर्त स्वरूप या नात्याने त्याचे वर्णन करण्यात आले तेव्हा तो असे म्हणू शकला: “मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.”—नीति. ८:२२, ३१.
१२, १३. (क) इस्राएल लोकांसोबत आपल्या पित्याच्या व्यवहारांचे निरीक्षण केल्यामुळे येशूला काय शिकायला मिळाले? (ख) येशूने यहोवाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा कसा उपयोग केला?
१२ पुत्राला मिळालेल्या प्रशिक्षणाचा एक भाग हाही होता, की प्रतिकूल परिस्थितीला आपला पिता कसे तोंड देतो याचे त्याला निरीक्षण करायला मिळाले. उदाहरणार्थ, वारंवार आज्ञाभंग करणाऱ्या इस्राएल लोकांशी यहोवाने कशाप्रकारे व्यवहार केला याचा विचार करा. नहेम्या ९:२८ यात असे म्हटले आहे: “जेव्हाजेव्हा त्यास स्वास्थ्य मिळे तेव्हातेव्हा ते तुझ्यासमोर [यहोवासमोर] दुष्कर्म करीत; यामुळे तू त्यांस शत्रूंच्या हाती देत असस; व ते त्याजवर सत्ता चालवीत; तरी ते तुजकडे वळून तुझा धावा करीत, तो तू स्वर्गातून ऐकत असस, आणि तुझ्या दयेच्या कृत्यांस अनुसरून तू त्यांस अनेक वेळा मुक्त केले.” यहोवासोबत कार्य केल्यामुळे आणि त्याच्या कार्यांचे निरीक्षण केल्यामुळे येशूनेही आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांबद्दल हीच करुणा व्यक्त केली.—योहा. ५:१९.
१३ येशूने आपल्या शिष्यांसोबतही सहानुभूतीने व्यवहार करण्याद्वारे यहोवाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग केला. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने ज्या प्रेषितांवर इतके प्रेम केले होते, ते सर्वजण “त्याला सोडून पळून गेले.” (मत्त. २६:५६; योहा. १३:१) प्रेषित पेत्राने तर ख्रिस्ताला तीन वेळा नाकारले! तरीपण, येशूने मात्र आपल्या प्रेषितांना आपल्याकडे परत येण्याची संधी नाकारली नाही. त्याने पेत्राला म्हटले: “तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” (लूक २२:३२) आत्मिक इस्राएलास “प्रेषित व संदेष्टे” यांनी बनलेल्या पायावर यशस्वीरित्या उभारण्यात आले आणि नव्या जेरूसलेमचा पाया असलेल्या शिलांवर कोकऱ्याच्या म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या १२ विश्वासू प्रेषितांची नावे आहेत. आजही, अभिषिक्त ख्रिस्ती ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असलेल्या त्यांच्या समर्पित सोबत्यांबरोबर राज्याचा प्रचार विश्वासूपणे करत आहेत आणि देवाच्या शक्तिशाली हाताखाली व त्याच्या परमप्रिय पुत्राच्या नेतृत्त्वाखाली या संघटनेची भरभराट होत आहे.—इफिस. २:२०; योहा. १०:१६; प्रकटी. २१:१४.
येशूची शिकवण्याची पद्धत
१४, १५. येशूची शिकवण्याची पद्धत शास्त्री व परूशी यांच्यापेक्षा कशाप्रकारे वेगळी होती?
१४ आपल्या अनुयायांना शिकवताना येशूने यहोवाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा कसा उपयोग केला? जेव्हा आपण येशूची व यहुदी धर्मपुढाऱ्यांची तुलना करतो तेव्हा आपल्याला येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीची श्रेष्ठता स्पष्टपणे दिसून येते. शास्त्री व परूशी लोकांनी “आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले.” याउलट, येशू जे बोलला ते स्वतःच्या मनाने बोलला नाही तर तो देवाच्या वचनाला किंवा संदेशाला जडून राहिला. (मत्त. १५:६; योहा. १४:१०) आपणही हेच केले पाहिजे.
१५ आणखी एका बाबतीत येशू त्याकाळच्या धर्मपुढाऱ्यांपेक्षा अगदी वेगळा होता. शास्त्री व परूशी यांच्याविषयी तो म्हणाला: “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत.” (मत्त. २३:३) येशू लोकांना जे शिकवायचा त्याप्रमाणे तो स्वतः वागत होता. याचे एक उदाहरण पाहू या.
१६. मत्तय ६:१९-२१ यात नमूद असलेल्या आपल्या शब्दांप्रमाणेच येशू वागला असे तुम्ही का म्हणू शकता?
१६ येशूने आपल्या शिष्यांना “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा,” असे सांगितले. (मत्तय ६:१९-२१ वाचा.) येशू स्वतः याप्रमाणे वागला का? हो, कारण तो प्रामाणिकपणे स्वतःबद्दल असे म्हणू शकत होता की “खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५८) येशूची राहणी अगदी साधी होती. त्याने आपले लक्ष राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यावर केंद्रित केले. आणि पृथ्वीवर संपत्ति साठवल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या काळज्या व विवंचनांपासून मुक्त असण्याचा काय अर्थ होतो हे त्याने स्वतःच्या उदाहरणावरून दाखवले. येशूने हे स्पष्ट केले की पृथ्वीवर संपत्ती साठवण्याऐवजी स्वर्गात संपत्ती साठवणे चांगले आहे कारण “तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत.” स्वर्गात संपत्ती साठवण्याविषयी येशूने दिलेल्या सल्ल्याचे तुम्ही पालन करत आहात का?
लोकांना आकर्षित करणारे येशूचे उत्तम गुण
१७. कोणत्या गुणांमुळे येशू एक असामान्य सुवार्तिक ठरला?
१७ कोणत्या गुणांमुळे येशू एक असामान्य सुवार्तिक ठरला? ज्या लोकांना त्याने साहाय्य केले त्यांच्याप्रती त्याच्या मनोवृत्तीमुळे तो इतका यशस्वी ठरला. येशूने यहोवाच्या उत्तम गुणांचे अनुकरण केले, उदाहरणार्थ नम्रता, प्रेम व करुणा. या गुणांमुळे कशाप्रकारे अनेकजण येशूकडे आकर्षित झाले हे पाहा.
१८. येशू नम्र होता असे आपण का म्हणू शकतो?
१८ पृथ्वीवर येण्याची जबाबदारी स्वीकारल्यावर येशूने “स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पै. २:७) हे नम्रतेचे कृत्य होते. शिवाय, येशूने लोकांना तुच्छ लेखले नाही. ‘मी स्वर्गातून आलो आहे, तेव्हा तुम्ही माझे ऐकलेच पाहिजे’ अशा भावनेने तो त्यांच्याशी वागला नाही. स्वतःला मशीहा म्हणवणाऱ्या खोट्या प्रेषितांप्रमाणे, आपणच खरा मशीहा आहोत अशी घोषणा करत येशू सगळीकडे फिरला नाही. उलट, कधीकधी तर त्याने आपल्याविषयी व आपल्या महत्कृत्यांविषयी इतरांना न सांगण्याची लोकांना आज्ञा दिली. (मत्त. १२:१५-२१) येशूची अशी इच्छा होती की लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींच्या आधारावर त्याचे अनुयायी बनण्याचा निर्णय घ्यावा. येशूचे शिष्य किती धन्य होते, कारण त्यांच्या प्रभूने स्वर्गातील परिपूर्ण देवदूतांसारखे असण्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही!
१९, २०. प्रेम व करुणा या गुणांनी, लोकांना साहाय्य करण्यास येशूला कशाप्रकारे प्रवृत्त केले?
१९ येशू ख्रिस्ताने दाखवलेला आणखी एक गुण म्हणजे प्रेम. त्याच्या स्वर्गीय पित्याचा मुख्य गुण. (१ योहा. ४:८) प्रेमामुळेच प्रेरित होऊन येशूने लोकांना शिकवले. उदाहरणार्थ, एका तरुण अधिकाऱ्याबद्दल येशूच्या भावनांचा विचार करा. (मार्क १०:१७-२२ वाचा.) येशूने ‘त्याच्यावर प्रीति केली’ आणि त्याला मदत करण्याची त्याची मनापासून इच्छा होती. पण त्या श्रीमंत मनुष्याने ख्रिस्ताचा अनुयायी होण्याकरता आपल्या अमाप संपत्तीचा त्याग केला नाही.
२० येशूच्या मोहक गुणांपैकी आणखी एक गुण म्हणजे करुणा. सगळ्या अपरिपूर्ण मानवांप्रमाणेच येशूच्या शिक्षणाला प्रतिसाद देणारे लोक देखील आपल्या जीवनातील समस्यांनी बेजार होते. हे जाणून येशूने त्यांना शिकवताना करुणा व दया दाखवली. उदाहरणार्थ, एके प्रसंगी येशू व त्याच्या प्रेषितांना जेवण्यापुरतीही सवड मिळाली नाही. पण त्याठिकाणी जमलेल्या लोकसमुदायाला पाहिल्यावर येशूची काय प्रतिक्रिया होती? “ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला. आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) आपल्या कार्यक्षेत्रातील या लोकांची दयनीय अवस्था येशूच्या लक्षात आली आणि त्यांना शिकवण्याकरता व महत्कृत्ये करून त्यांना साहाय्य करण्याकरता तो खपला. काहीजण त्याच्या उत्तम गुणांमुळे आकर्षित होऊन, व त्याच्या उपदेशांनी प्रेरित होऊन त्याचे शिष्य बनले.
२१. पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
२१ येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याबद्दल अजून बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुढील लेखात आपण यांपैकी काही गोष्टी पाहणार आहोत. सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे आणखी कोणत्या मार्गांनी आपण अनुकरण करू शकतो?
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• पृथ्वीवर येण्याअगोदर येशूला कोणते प्रशिक्षण मिळाले?
• येशूची शिकवण्याची पद्धत कोणत्या अर्थाने शास्त्री व परूशी यांच्या शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ होती?
• येशूच्या कोणत्या गुणांमुळे लोक त्याच्याकडे आकर्षित झाले?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
येशू लोकांना कशारितीने शिकवायचा?