यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवा
यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवा
“मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे.”—स्तो. १६:८.
१. बायबलमधील अहवालांचा आपल्यावर कोणता परिणाम होऊ शकतो?
यहोवाच्या लिखित वचनात, मानवजातीबरोबर त्याने केलेल्या व्यवहारांचा सुरेख अहवाल नमूद आहे. देवाचा उद्देश पूर्ण होण्यात ज्या अनेक लोकांचा सहभाग होता त्यांचा उल्लेख देवाच्या वचनात करण्यात आला आहे. अर्थात या लोकांच्या शब्दांचा व कृतींचा जो उल्लेख बायबलमध्ये करण्यात आला आहे तो केवळ कथा म्हणून आपल्या मनोरंजनासाठी करण्यात आलेला नाही. तर, हे अहवाल आपल्याला देवाच्या जवळ येण्यास मदत करतात.—याको. ४:८.
२, ३. स्तोत्र १६:८ मधील शब्दांचा काय अर्थ होतो?
२ बायबलमधील पात्रे जसे की, अब्राहाम, सारा, मोशे, रूथ, दावीद, एस्तेर, प्रेषित पौल व आणखी इतरांशी आपण सुपरिचित आहोत. यांच्या अनुभवांतून आपण बरेच काही शिकू शकतो. पण, बायबलमध्ये ज्यांचा थोडक्यातच उल्लेख करण्यात आला आहे अशांच्या उदाहरणाचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. या अहवालांवर मनन केल्याने आपणही स्तोत्रकर्त्याने जे म्हटले त्या अनुषंगाने कार्य करू शकू: “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.” (स्तो. १६:८) या शब्दांचा काय अर्थ होतो?
३ जुन्या काळात, सैनिक सहसा आपल्या उजव्या हाताने तलवार चालवत असे आणि त्याच्या डाव्या हातात ढाल असे. त्यामुळे त्याचा डावा हात सुरक्षित राहत असे परंतु त्याच्या उजव्या हाताला काही संरक्षण नसे. पण जर त्याचा मित्र त्याच्या उजव्या बाजूला राहून लढत असेल तर त्याच्या उजव्या हाताला संरक्षण मिळत असे. आपण जर यहोवाला सतत आपल्या मनात ठेवले आणि तो जे अपेक्षितो ते करीत राहिलो तर तो आपले संरक्षण करेल. बायबल अहवालांवर मनन केल्याने आपला विश्वास मजबूत होईल जेणेकरून आपण ‘प्रभूला सतत आपल्यासमोर ठेवू शकू.’—मराठी कॉमन लँग्वेज.
यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो
४. देव प्रार्थनांचे उत्तर देतो याचे शास्त्रवचनातील एक उदाहरण द्या.
४ आपण जर यहोवाला आपल्यापुढे ठेवले तर तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. (स्तो. ६५:२; ६६:१९) याचा पुरावा आपल्याला अब्राहामाच्या वृद्ध सेवकाच्या बाबतीत मिळतो. हा वृद्ध सेवक कदाचित एलियाजर असावा. अब्राहामाने त्याला इसहाकासाठी देवाला भिऊन वागणारी एक बायको शोधण्यासाठी मेसोपोटामियाला पाठवले. एलियाजरने मार्गदर्शनासाठी देवाला प्रार्थना केली आणि जेव्हा रिबका त्याच्या उंटांना पाणी पाजू लागली तेव्हा त्याला जाणवले, की यहोवा त्याला याबाबतीत मार्गदर्शन देत होता. एलियाजरने कळकळीने प्रार्थना केल्यामुळेच त्याला रिबका सापडली जिच्यावर इसहाकाचे खूप प्रेम होते. (उत्प. २४:१२-१४, ६७) हे खरे आहे, की अब्राहामाच्या सेवकाला एक खास नेमणूक देण्यात आली होती. पण आपणही, त्याच्याप्रमाणेच हा भरवसा बाळगू नये का, की यहोवा आपल्याही प्रार्थना ऐकतो?
५. मोजक्या शब्दांत व मनातल्या मनात यहोवाला केलेली प्रार्थना देखील प्रभावी ठरू शकते, असे आपण का म्हणू शकतो?
५ कधीकधी आपल्याला देवाच्या मदतीसाठी मनातल्या मनात पटकन् प्रार्थना करावी लागते. पर्शियाचा राजा अर्तहशश्त याने एकदा आपला प्यालेबरदार नहेम्या याचा चेहरा पडलेला पाहिला. राजाने त्याला विचारले: “तुझी विनंति काय आहे?” नहेम्याने लगेच ‘स्वर्गाच्या देवाला प्रार्थना’ केली. त्याला मनातल्या मनात अगदी मोजक्या शब्दांत प्रार्थना करावी लागली. तरीपण, देवाने त्याची प्रार्थना ऐकली म्हणता येईल कारण नहेम्याला जेरूसलेमच्या भिंती बांधण्याकरता राजाने मदत दिली. (नेहम्या २:१-८ वाचा.) होय, मनातल्या मनात केलेली प्रार्थनासुद्धा प्रभावी ठरू शकते.
६, ७. (क) प्रार्थनेच्या बाबतीत एपफ्रासने कोणते उदाहरण मांडले? (ख) आपण इतरांसाठी प्रार्थना का केली पाहिजे?
६ आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळाल्याचा आपल्याला लगेच पुरावा मिळत नसला तरी आपण “एकमेकांसाठी प्रार्थना” केली पाहिजे, असे आपल्याला आर्जवण्यात आले आहे. (याको. ५:१६) एपफ्रास हा “ख्रिस्ताचा विश्वासू सेवक” होता. त्याने विश्वासातल्या बंधूभगिनींसाठी कळकळीने प्रार्थना केली. रोममधून लिहिताना पौलाने त्याच्याविषयी असे म्हटले: “खिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे.”—कलस्सै. १:७; ४:१२, १३.
७ कलस्सै, लावदिकीया आणि हेरापली ही आशिया मायनर क्षेत्रातली शहरे होती. हेरापलीतील ख्रिस्ती अशा लोकांमध्ये राहत होते जे सिबिली नावाच्या देवीचे उपासक होते. लावदिकीयातील ख्रिश्चनांच्या आजूबाजूला भौतिकवादी लोक होते आणि कलस्सैमधील ख्रिस्ती बंधूभगिनी मानवी तत्त्वज्ञानाची बढाई मारणाऱ्या लोकांमध्ये राहत होते. (कलस्सै. २:८) म्हणूनच तर, कलस्सैच्या एपफ्रासने त्या शहरात राहणाऱ्या ख्रिश्चनांसाठी “जीव तोडून विनंती” अर्थात प्रार्थना केली! एपफ्रासच्या प्रार्थनांचे उत्तर कशाप्रकारे देण्यात आले त्याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेले नाही. पण, त्याने मात्र आपल्या सोबतच्या बंधूभगिनींसाठी प्रार्थना करण्याचे सोडले नाही. आपणही सोडू नये. आपण “दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ” करत नाही; तरीपण आपल्याला समजते, की कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा एखाद्या मित्राला विश्वासाच्या कडक परीक्षेचा सामना करावा लागत आहे. (१ पेत्र ४:१५) अशावेळी आपल्या खासगी प्रार्थनांत त्याच्यासाठी प्रार्थना करणे किती उचित ठरेल! इतरांच्या विनंत्यांमुळे पौलाला बळ मिळाले. आपल्याही प्रार्थनांचा असाच परिणाम होऊ शकतो.—२ करिंथ. १:१०, ११.
८. (क) देवाला प्रार्थना करण्याच्याबाबतीत आपली मनोवृत्ती काय असली पाहिजे? (ख) आपण इफिससमधील ख्रिस्ती वडिलांसारखे का असले पाहिजे?
८ लोक आपल्याला, प्रार्थनाशील मनोवृत्तीचे म्हणून ओळखतात का? इफिससमधील वडिलांना भेटल्यावर पौलाने “गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली.” त्यानंतर “ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले.” (प्रे. कृत्ये २०:३६-३८) आपल्याला या वडिलांची नावे माहीत नाहीत. पण, प्रार्थनेचे किती महत्त्व असते, या गोष्टीची त्यांना जाणीव होती, हे स्पष्ट आहे. तेव्हा आपणही, देवाला प्रार्थना करण्याच्या विशेषाधिकाराचा सांभाळ केला पाहिजे आणि आपला स्वर्गीय पिता आपल्या प्रार्थना जरूर ऐकेल असा भरवसा बाळगून आपले “पवित्र हात वर” केले पाहिजे.—१ तीम. २:८.
पूर्णपणे देवाच्या आज्ञांकित राहा
९, १०. (क) सलाफहादाच्या मुलींनी कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे? (ख) सलाफहादाच्या मुलींच्या आज्ञाधारक मनोवृत्तीचा, विवाहाच्या संबंधाने एखाद्या अविवाहित बांधवाच्या अथवा भगिनीच्या दृष्टिकोनावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो?
९ यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवल्यास आपण त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करू आणि परिणामतः त्याचे आशीर्वाद प्राप्त करू. (अनु. २८:१३; १ शमु. १५:२२) पण यासाठी आपण देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास तयार असले पाहिजे. मोशेच्या दिवसांत राहणाऱ्या सलाफहादाच्या मुलींच्या मनोवृत्तीचा विचार करा. सलाफहादाच्या पाच मुली होत्या. इस्राएली लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे, मुलांना आपल्या बापाकडून वारसा मिळत असे. पण सलाफहादाला मुले नव्हती, केवळ मुली होत्या. या पाचही मुलींना संपूर्ण वारसा मिळाला पाहिजे, अशी सूचना यहोवाने दिली. परंतु एका अटीवर. त्यांनी मनश्शेच्या मुलांशी विवाह करायचा होता जेणेकरून, वारशाने मिळालेली मालमत्ता त्याच कुळात राहील.—गण. २७:१-८; ३६:६-८.
१० सलाफहादाच्या मुलींना हा भरवसा होता, की जर त्यांनी देवाच्या सूचनांचे पालन केले तर सर्वकाही व्यवस्थित होईल. बायबल म्हणते: “परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले. सलाफहादाच्या मुली महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला. योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले.” (गण. ३६:१०-१२) या आज्ञाधारक स्त्रियांनी यहोवाच्या सूचनांचे पालन केले. (यहो. १७:३, ४) आध्यात्मिकरीत्या प्रौढ असलेल्या अविवाहित ख्रिस्ती बंधूभगिनींचा सलाफहादाच्या मुलींसारखाच असा विश्वास आहे, की जर त्यांनी “केवळ प्रभूमध्ये लग्न” करण्याविषयी देवाच्या सूचनेचे पालन केले तर त्यांचेही भले होईल.—१ करिंथ. ७:३९.
११, १२. आपल्याला देवावर भरवसा आहे हे कालेबने कसे दाखवून दिले?
११ इस्राएली कालेब याच्याप्रमाणे आपण पूर्णपणे यहोवाच्या आज्ञांकित राहिले पाहिजे. (अनु. १:३६) सा.यु.पू. सोळाव्या शतकात इस्राएली लोकांची ईजिप्तच्या दास्यत्वातून सुटका झाली. तेव्हा कनान देशाची पाहणी करण्याकरता मोशेने १२ हेरांना पाठवले. पण त्यापैकी फक्त २ हेरांनी—यहोशवा आणि कालेब—यांनी लोकांना यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून देशात प्रवेश करण्यास आर्जवले. (गण. १४:६-९) या घटनेच्या सुमारे चाळीस वर्षांनंतरसुद्धा यहोशवा आणि कालेब अद्यापही जिवंत होते आणि ते पूर्णपणे यहोवाच्या आज्ञांकित होते. यहोवाने मग यहोशवाला इस्राएली लोकांना वचनयुक्त देशांत नेण्याची आज्ञा दिली. पण, उरलेले दहा हेर ज्यांचा विश्वास कमकुवत झाला त्यांचा, इस्राएली लोक जेव्हा ४० वर्षे रानात भटकत होते तेव्हा मृत्यू झाला.—गण. १४:३१-३४.
१२ इस्राएली लोकांच्या रानातील भटकंतीतून जिवंत बचावलेला कालेब यहोशवापुढे उभे राहून असे म्हणू शकला: “मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.” (यहोशवा १४:६-९ वाचा.) देवाने कालेबला डोंगराळ भाग देण्याचे वचन दिले होते. या डोंगराळ भागात त्याचे शत्रू तटबंदी नगरांत राहत होते. तरीपण, पंचाऐंशी वर्षीय कालेबने, तो डोंगराळ भाग त्याला देण्याची विनंती केली.—यहो. १४:१०-१५.
१३. आपल्यासमोर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आल्या तरीसुद्धा, काय केल्याने आपण आशीर्वादित होऊ?
१३ विश्वासू व आज्ञाधारक कालेबप्रमाणे आपणही जर ‘यहोवाला पूर्णपणे अनुसरले’ तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल, असा आपण भरवसा बाळगू शकतो. आपल्यासमोर अडचणी येतात तेव्हा जर आपण ‘यहोवाला पूर्णपणे अनुसरलो’ तर यहोवा सतत आपल्या पाठीशी राहील अशी खात्री आपण बाळगू शकतो. कालेबप्रमाणे संपूर्ण आयुष्यभर यहोवाला अनुसरणे सोपे नसेल. राजा शलमोनाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला यहोवाला अनुसरले. नंतर मात्र त्याच्या वृद्धपणी त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले. ‘त्याचा बाप दावीद याचे मन जसे परमेश्वराकडे पूर्णपणे होते त्याप्रमाणे शलमोनाचे राहिले नाही.’ (१ राजे ११:४-६) आपल्यासमोर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आल्या तरी, आपण पूर्णपणे यहोवाला अनुसरले पाहिजे आणि त्याला आपल्यापुढे सतत ठेवले पाहिजे.
यहोवावर नेहमी भरवसा ठेवा
१४, १५. देवावर भरवसा ठेवणे किती महत्त्वाचे आहे याविषयी नामीच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकला आहात?
१४ आपले भविष्य आशाहीन वाटत असल्यामुळे आपण जेव्हा निराश होतो तेव्हा खासकरून आपण देवावर भरवसा ठेवला पाहिजे. वृद्ध नामीचे उदाहरण घ्या. तिच्या पतीला आणि दोन मुलांना मानवजातीचा शत्रू असलेल्या मृत्यूने गिळंकृत केले होते. मवाबहून यहुदास परतल्यानंतर तिने दुखाने असे म्हटले: “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणिले; परमेश्वर मला प्रतिकूळ झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता?”—रूथ १:२०, २१.
१५ नामी अतिशय खिन्न झाली होती. परंतु रूथ पुस्तकाचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर आपल्याला कळून येईल, की या खिन्न अवस्थेतही तिने यहोवावर भरवसा ठेवला. त्यामुळे तिची परिस्थिती पार बदलली! नामीच्या विधवा सुनेने अर्थात रूथने बवाजाशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा झाला. नामी या मुलाची दाई बनली. अहवालात असे म्हटले आहे: “‘नामीला पुत्र झाला,’ असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेविले. तो इशायाचा बाप व दावीदाचा आजा होय.” (रूथ ४:१४-१७) नामीचे पृथ्वीवर पुनरुत्थान होईल तेव्हा तिला समजेल, की तिची सून रूथ, मशीहा येशूची पूर्वज बनली. अर्थात रूथचेही तेव्हा पुनरुत्थान झालेले असेल. (मत्त. १:५, ६, १६) नामीप्रमाणे आपल्या जीवनातील घटनांना कदाचित कलाटणी मिळेल किंवा नाही याची आपण खात्री बाळगू शकत नाही. तरीपण आपण नेहमी देवावर भरवसा ठेवू शकतो. नीतिसूत्रे ३:५, ६ वचनांत आपल्याला हेच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा
१६. प्राचीन इस्राएलमध्ये विशिष्ट वृद्ध जनांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने कसे साहाय्य केले?
१६ आपण जर यहोवाला सतत आपल्यापुढे ठेवले तर तो आपल्या पवित्र आत्म्याकरवी आपल्याला मार्गदर्शन देईल. (गलती. ५:१६-१८) इस्राएली ‘लोकांचा भार वाहण्यास’ मोशेची मदत करण्याकरता ज्या ७० लोकांना निवडण्यात आले होते त्यांच्यावर देवाचा आत्मा कार्य करीत होता. या सत्तरांपैकी केवळ दोघांच्या नावांचा अर्थात एलदाद व मेदाद यांचा उल्लेख करण्यात आलेला असला तरी, पवित्र आत्म्याने उरलेल्या सर्वांना आपापली कर्तव्ये बजावण्यास मदत केली. (गण. ११:१३-२९) हे सत्तर जणही, आधी ज्यांना नियुक्त करण्यात आले होते त्यांच्याप्रमाणेच मेहनती, देव-भीरू, भरवसालायक आणि प्रामाणिक होते. (निर्ग. १८:२१) आज ख्रिस्ती वडील असेच गुण दाखवतात.
१७. निवासमंडपाच्या बांधकामात यहोवाच्या पवित्र आत्म्याची काय भूमिका होती?
१७ रानात, निवासमंडपाच्या बांधकामाच्या वेळी, यहोवाच्या पवित्र आत्म्याची महत्त्वाची भूमिका होती. यहोवाने बसालेल याला प्रमुख कारागीर आणि निवासमंडपाचे बांधकाम करणारा म्हणून नियुक्त केले. आणि, “मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धि, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब” देईन, असे वचन दिले. (निर्ग. ३१:१-५) ही सुरेख नेमणूक पार पाडण्यास “बुद्धिमान” लोकांनी बसालेल आणि त्याचा साहाय्यक अहलियाब यांना मदत केली. शिवाय, यहोवाच्या आत्म्याने इच्छुक लोकांना सढळ हाताने दान करण्यास प्रवृत्त केले. (निर्ग. ३१:६; ३५:५, ३०-३४) हाच आत्मा देवाच्या आधुनिक दिवसांतील सेवकांना राज्याला प्रथम स्थान देण्याकरता त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतो. (मत्त. ६:३३) आपल्याजवळ विशिष्ट कौशल्ये असतील. पण यहोवाने या दिवसांत त्याच्या लोकांना जे काम दिले आहे ते पूर्ण करण्याकरता आपल्याला मार्गदर्शन द्यावे म्हणून आपण पवित्र आत्म्यासाठी त्याला प्रार्थना केली पाहिजे.—लूक ११:१३.
सेनाधीश यहोवाबद्दल नेहमी आदरणीय मनोवृत्ती बाळगा
१८, १९. (क) देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कोणत्याप्रकारची मनोवृत्ती उत्पन्न करतो? (ख) शिमोन व हन्नाच्या उदाहरणावरून तुम्हाला कोणती गोष्ट शिकायला मिळाली?
१८ यहोवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आदरणीय मनोवृत्ती उत्पन्न करतो ज्यामुळे आपण यहोवाला नित्य आपल्यापुढे ठेवतो. देवाच्या प्राचीन लोकांना सांगण्यात आले होते: “सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.” (यश. ८:१३) पहिल्या शतकातील जेरूसलेमेत शिमोन आणि हन्ना नावाच्या दोन व्यक्ती होत्या ज्यांची आदरणीय मनोवृत्ती होती. (लूक २:२५-३८ वाचा.) शिमोनाने मशीहाविषयीच्या भविष्यवाणींवर भरवसा ठेवला व तो “इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता.” देवाने शिमोनावर आपला पवित्र आत्मा ओतला आणि तो मशीहाला पाहेपर्यंत जिवंत राहील, असे त्याला आश्वासन दिले. आणि अगदी तसेच झाले. सा.यु.पू. २ सालच्या एके दिवशी, येशूची आई मरीया व त्याचा दत्तक पिता योसेफ यांनी बाळ येशूला मंदिरात आणले. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन शिमोनाने मशीहाविषयी केलेल्या भविष्यवाणीचे शब्द बोलून दाखवले आणि येशूला वधस्तंभावर टांगले जाईल तेव्हा मरीयेच्या जिवातून तरवार भोसकावी तसे अतोनात दुःख तिला सहन करावे लागेल, असेही भाकीत केले. पण, शिमोनाने जेव्हा “प्रभूच्या ख्रिस्ताला” आपल्या हातात घेतले तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! शिमोनाने आदरणीय मनोवृत्तीचे किती उत्तम उदाहरण आजच्या देवाच्या सेवकांसाठी मांडले आहे!
१९ चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा हन्ना ‘मंदिर सोडून गेली नाही.’ “उपास व प्रार्थना” करून रात्रंदिवस ती यहोवाची पवित्र सेवा करीत राहिली. बाळ येशूला मंदिरात आणण्यात आले तेव्हा हन्ना देखील तिथे होती. भावी मशीहाला पाहून तिलाही किती धन्य वाटले असावे! “तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.” हन्नाला गप्प बसवेना. ही सुवार्ता कधी मी इतरांना सांगते, असे तिला झाले होते! शिमोन आणि हन्नाप्रमाणे आज वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनींना, आपण कितीही वृद्ध झालो तरी यहोवाचे साक्षीदार म्हणून त्याची सेवा करण्यास आनंद वाटतो.
२०. आपण तरुण असो वा वृद्ध, आपण काय केले पाहिजे व का?
२० आपण तरुण असो वा वृद्ध, यहोवाला नित्य आपल्यापुढे ठेवले पाहिजे. मगच तो, त्याच्या राज्याविषयी आणि त्याच्या महत्कृत्यांविषयी इतरांना सांगण्यासाठी आपण करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवर आशीर्वाद देईल. (स्तो. ७१:१७, १८; १४५:१०-१३) पण यहोवाचा आदर करण्याकरता, ज्या गुणांनी तो संतुष्ट होईल असे गुण आपण प्रदर्शित केले पाहिजे. बायबलमधील आणखी काही अहवालांचे परीक्षण केल्यावर आपण या गुणांविषयी काय शिकू शकतो?
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
• आपण पूर्णपणे यहोवाच्या आज्ञांकित का असले पाहिजे?
• आपण खिन्नावस्थेत असलो तरी आपण यहोवावर भरवसा का ठेवला पाहिजे?
• यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांना कशाप्रकारे मदत करतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]
नहेम्याने यहोवाला केलेली प्रार्थना प्रभावी ठरली
[५ पानांवरील चित्र]
नामीला मिळालेल्या आशीर्वादांची आठवण ठेवल्यास आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्यास मदत होईल