यहोवाचे भय बाळगून जीवनाचा आनंद लुटा
यहोवाचे भय बाळगून जीवनाचा आनंद लुटा
“परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही.”—स्तोत्र ३४:९.
१, २. (क) ख्रिस्ती धर्मजगतात देवाचे भय बाळगण्याविषयी कोणते भिन्न दृष्टिकोन आढळतात? (ख) आपण कोणते प्रश्न विचारात घेणार आहोत?
ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक देवाचे भय बाळगण्याविषयी शिकवताना सहसा बायबलवर आधारित नसलेल्या एका शिकवणुकीचा आधार घेतात. ती ही, की देव पाप करणाऱ्यांना सर्वकाळ नरकात यातना देतो. पण हे बायबलच्या विरोधात आहे कारण बायबल सांगते की यहोवा हा एक प्रेमळ व न्यायी देव आहे. (उत्पत्ति ३:१९; अनुवाद ३२:४; रोमकर ६:२३; १ योहान ४:८) ख्रिस्ती धर्मजगतातील इतर काही पाळक याच्या अगदी उलट पवित्रा घेतात. ते देवाच्या भयाविषयी कधी उल्लेखही करत नाहीत. उलट ते असे शिकवतात ती देव इतका क्षमाशील आहे की कोणी काहीही केले तरी तो त्यांना स्वीकारतो. हे देखील बायबलच्या सामंजस्यात नाही.—गलतीकर ५:१९-२१.
२ खरे पाहता, बायबल आपल्याला देवाचे भय बाळगण्याचे प्रोत्साहन देते. (प्रकटीकरण १४:७) पण या वस्तुस्थितीमुळे काही प्रश्न उपस्थित होतात. एक प्रेमळ देव आपण त्याचे भय बाळगावे अशी का म्हणून अपेक्षा करेल? देव आपल्याकडून कशाप्रकारचे भय बाळगण्याची अपेक्षा करतो? देवाचे भय बाळगल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो? स्तोत्र ३४ यातील पुढील वचनांची चर्चा करत असताना आपण हे प्रश्न विचारात घेऊ.
देवाचे भय का बाळगावे?
३. (क) देवाचे भय बाळगण्याविषयीच्या आज्ञेविषयी तुमचा काय दृष्टिकोन आहे? (ख) यहोवाचे भय बाळगणारे आनंदी का असतात?
३ या विश्वाचा सृष्टिकर्ता आणि सार्वभौम शासक या नात्याने यहोवाचे भय आपण बाळगलेच पाहिजे. (१ पेत्र २:१७) पण एखाद्या क्रूर देवतेच्या कोपामुळे भयग्रस्त होण्यासारखे हे नाही. तर देवाचे भय बाळगण्याचा अर्थ यहोवाची खरी ओळख घडल्यामुळे त्याचा आदरयुक्त धाक वाटणे असा होतो. तसेच हे त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याचे भय आहे. देवाचे भय हे चांगले व एखाद्या व्यक्तीची उन्नती घडवून आणणारे आहे, त्याला दुःखी करणारे किंवा दहशत उत्पन्न करणारे नाही. यहोवा हा “आनंदी देव” आहे आणि मानवांनी जीवनाचा आनंद लुटावा असे त्याला वाटते. (१ तीमथ्य १:११, NW) पण असे करण्याकरता आपण देवाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. बऱ्याच लोकांना असे करण्याकरता आपली सबंध जीवनशैलीच बदलावी लागू शकते. पण जे हे आवश्यक बदल करतात त्यांना दाविदाच्या या शब्दांची प्रचिती येते: “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य! परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा,’ कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही.” (स्तोत्र ३४:८, ९) देवासोबत चांगला संबंध असल्यामुळे, त्याचे भय बाळगणाऱ्यांना सार्वकालिक मोलाचे असे काहीही उणे पडत नाही.
४. दावीद व येशू या दोघांनीही कोणते आश्वासन दिले?
४ दाविदाने आपल्या माणसांना ‘पवित्र जन’ म्हटले. त्याच्या काळात हे शब्द त्यांना लागू होत होते कारण ते देवाच्या पवित्र राष्ट्राचे सदस्य होते. तसेच त्यांनी दाविदाला साथ देण्याकरता आपला जीवही धोक्यात घातला होता. ते शौल राजापासून पलायन करत होते तरीसुद्धा दाविदाला पूर्ण खात्री होती की यहोवा त्यांच्या गरजा जरूर भागवील. दाविदाने लिहिले: “तरुण सिंहांसहि वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याहि चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.” (स्तोत्र ३४:१०) येशूनेही आपल्या अनुयायांना अशाचप्रकारचे आश्वासन दिले.—मत्तय ६:३३.
५. (क) येशूचे बहुतेक अनुयायी कोणत्या वर्गातले होते? (ख) भय बाळगण्याविषयी येशूने कोणता सल्ला दिला?
५ येशूचे बोलणे ऐकणाऱ्यांपैकी बरेचजण गरीब व यहूदी समाजातल्या निम्न वर्गातले होते. म्हणूनच, येशूला ‘त्यांचा कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.’ (मत्तय ९:३६) हे साधेसुधे लोक येशूला अनुसरण्याचे धैर्य दाखवतील का? असे करण्याकरता त्यांना मानवांचे नव्हे तर यहोवाचे भय आपल्या मनात उत्पन्न करावे लागणार होते. येशूने म्हटले: “जे शरीराचा वध करितात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करिता येत नाही त्यांची भीति बाळगू नका. तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हास सुचवून ठेवितो वध केल्यावर नरकांत [“गेहेन्नात,” NW] टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीति बाळगा. पांच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.”—लूक १२:४-७.
६. (क) येशूच्या कोणत्या शब्दांमुळे अनेक ख्रिश्चनांना बळ मिळाले आहे? (ख) देवाचे भय बाळगण्यासंबंधी येशूच सर्वात उत्तम उदाहरण का आहे?
६ यहोवाचे भय बाळगणाऱ्यांना जेव्हा त्यांचे शत्रू देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करण्याकरता त्यांच्यावर दबाव आणतात तेव्हा ते येशूचा हा सल्ला आठवू शकतात: “जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रहि देवाच्या दूतांसमोर पत्करील; परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.” (लूक १२:८, ९) या शब्दांतून अनेक ख्रिश्चनांना बळ मिळाले आहे विशेषतः अशा देशांत जेथे खऱ्या उपासनेला बंदी आहे. हे बांधव सावधगिरीने ख्रिस्ती सभांमध्ये व त्यांच्या सार्वजनिक सेवाकार्यात यहोवाची स्तुती करण्याचे चालू ठेवतात. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) ‘सद्भय’ अर्थात देवाचे भय बाळगण्याविषयी येशूने सर्वात उत्तम आदर्श आपल्याला पुरवला. (इब्री लोकांस ५:७, पं.र.भा.) त्याच्यासंदर्भात देवाच्या भविष्यसूचक वचनात असे भाकीत करण्यात आले होते: “परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराच्या . . . भयाचा आत्मा त्याजवर राहील; परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल,” अर्थात देवाचे भय बाळगणे त्याला आनंददायक वाटेल. (यशया ११:२, ३) त्याअर्थी, देवाचे भय बाळगल्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी आपल्याला शिकवण्याकरता येशूच सर्वात योग्य आहे.
७. (क) ख्रिस्ती एका अर्थाने दाविदाने दिलेल्या निमंत्रणाला कसा प्रतिसाद देतात? (ख) आईवडील दाविदाच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतात?
७ येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणारे व त्याच्या शिकवणुकींचे स्तोत्र ३४:११) आपल्या माणसांना “मुलांनो” असे म्हणून संबोधणे दाविदाकरता अगदी स्वाभाविक होते कारण ते सर्व त्याला आपला नेता मानत होते व त्याअर्थी त्याचा आदर करत होते. दाविदानेही आपल्या या अनुयायांना आध्यात्मिक साहाय्य पुरवले जेणेकरून त्यांनी एकजूट राहावे व देवाची कृपा त्यांच्यावर कायम राहावी. ख्रिस्ती पालकांकरता हे किती उत्तम उदाहरण आहे! यहोवाने त्यांना त्यांच्या मुलांवर अधिकार दिला आहे आणि “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा” अशी आज्ञाही दिली आहे. (इफिसकर ६:४) दररोज आपल्या मुलांसोबत आध्यात्मिक गोष्टींविषयी चर्चा करण्याद्वारे आणि त्यांच्यासोबत नियमित बायबल अभ्यास चालवण्याद्वारे आईवडील आपल्या लहान मुलांना यहोवाचे भय बाळगून जीवनाचा आनंद लुटायला शिकवतात.—अनुवाद ६:६, ७.
पालन करणारे सर्वजण एका अर्थाने दाविदाच्या या निमंत्रणाला प्रतिसाद देतात: “मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन.” (देवाचे भय कशाप्रकारे प्रदर्शित करायचे?
८, ९. (क) देवाचे भय बाळगून चालणे हितकारक का आहे? (ख) दुर्भाषणापासून आपली जीभ आवरण्याचा काय अर्थ होतो?
८ याआधी सांगितल्याप्रमाणे यहोवाचे भय बाळगल्यामुळे आपल्या जीवनातला आनंद संपत नाही. दाविदाने असा प्रश्न विचारला: “सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण?” (स्तोत्र ३४:१२) खरे पाहता, यहोवाचे भय बाळगणेच दीर्घायुष्याची व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. “मी देवाचे भय बाळगतो” असे म्हणणे सोपे आहे. पण आपल्या वर्तनातून हे प्रदर्शित करणे ही निराळी गोष्ट आहे. म्हणूनच दावीद पुढे स्पष्ट करतो की आपण देवाचे भय बाळगतो हे कसे प्रदर्शित करावे?
९ “आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर.” (स्तोत्र ३४:१३) प्रेषित पेत्राने ख्रिस्ती बांधवांना एकमेकांबद्दल बंधूप्रेम व्यक्त करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याला स्तोत्र ३४ यातील हा भाग उद्धृत करण्यास प्रेरित करण्यात आले. (१ पेत्र ३:८-१२) आपली जीभ दुर्भाषणापासून आवरण्याचा असा अर्थ होतो की आपण इतरांना ज्यामुळे उत्तेजन मिळणार नाही अशाप्रकारच्या गोष्टी पसरवू नयेत. उलट, इतरांशी बोलताना नेहमी आपला हाच प्रयत्न असावा, की आपल्या बोलण्यामुळे त्यांना उत्तेजन मिळावे. तसेच, नेहमी धैर्याने खरे बोलण्याचाही आपला प्रयत्न असला पाहिजे.—इफिसकर ४:२५, २९, ३१; याकोब ५:१६.
१०. (क) वाईटाचा त्याग करण्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट करा. (ख) बरे ते करण्यात कोणत्या चांगल्या गोष्टींचा समावेश आहे?
१० “वाइटाचा त्याग कर व बरें ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.” (स्तोत्र ३४:१४) देव ज्या गोष्टींची निंदा करतो अशा सर्व गोष्टी, उदाहणार्थ लैंगिक दुराचार, अश्लीलता, चोरी, भूतविद्या, हिंसाचार, अतिमद्यपान, व अंमली पदार्थांचे सेवन आपण आवर्जून टाळतो. तसेच या घृणास्पद गोष्टी ज्या मनोरंजनाच्या प्रकारांत दाखवल्या जातात ते देखील आपण टाळतो. (इफिसकर ५:१०-१२) त्याऐवजी आपण बरे ते करण्याकरता आपल्या वेळेचा उपयोग करतो. आपण जी सर्वात चांगली गोष्ट करू शकतो ती म्हणजे राज्याचा प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यात नियमित सहभाग घेणे व इतरांना तारण मिळवण्यास साहाय्य करणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) चांगल्या गोष्टी करण्यात ख्रिस्ती सभांची तयारी करणे व त्यांना उपस्थित राहणे, जगभरातील कार्याकरता आर्थिक देणग्या देणे, आपल्या राज्य सभागृहाची काळजी घेणे आणि गरीब व गरजू बांधवांच्या गरजांबद्दल कळकळ व्यक्त करणे यांसारख्या गोष्टीही समाविष्ट आहेत.
११. (क) शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याविषयी दाविदाने जो उपदेश केला त्याप्रमाणे तो वागलाही हे आपण का म्हणू शकतो? (ख) मंडळीत ‘शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याकरता’ तुम्ही काय करू शकता?
११ शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या बाबतीत दाविदाचे उत्तम उदाहरण आहे. दोनदा त्याला शौलाला जिवे मारण्याची संधी मिळाली. दोन्ही वेळा त्याने हिंसाचार केला नाही आणि नंतर शांती प्रस्थापित करण्याच्या इराद्याने तो शौल राजाशी आदराने बोलला. (१ शमुवेल २४:८-११; २६:१७-२०) आज मंडळीतील शांती भंग होऊ शकेल अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण काय करू शकतो? आपण ‘शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करून तिचे अवलंबन’ केले पाहिजे. त्याअर्थी, एखाद्या बांधवासोबत आपले संबंध तितके सुरळीत नाहीत असे आपल्याला जाणवल्यास “प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर,” या येशूच्या सल्ल्याचे आपण पालन केले पाहिजे. त्यानंतर आपण खऱ्या उपासनेच्या इतर कार्यांत सहभाग घेऊ शकतो.—मत्तय ५:२३, २४; इफिसकर ४:२६.
देवाचे भय बाळगल्याने विपूल आशीर्वाद मिळतात
१२, १३. (क) देवाचे भय बाळगणाऱ्यांना सध्या कोणते फायदे अनुभवण्यास मिळतात? (ख) विश्वासू उपासक लवकरच कोणता अद्भुत आशीर्वाद अनुभवतील?
१२ “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तोत्र ३४:१५) दाविदासोबत देवाने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून या शब्दांची सत्यता पटते. आज यहोवा आपल्यावरही पाखर घालतो हे माहीत असल्यामुळे आपल्याला एकप्रकारचा मनस्वी आनंद व शांती अनुभवता येते. आपल्याला खात्री आहे की जीवनात कितीही दबावाला तोंड द्यावे लागले तरी तो नेहमी आपल्या गरजा भागवील. आपल्याला माहीत आहे की लवकरच सर्व खऱ्या उपासकांवर बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे ‘मागोगच्या गोगचा’ हल्ला होईल तसेच त्यांना ‘परमेश्वराच्या महान व भयंकर दिवसालाही’ तोंड द्यावे लागेल. (योएल २:११, ३१; यहेज्केल ३८:१४-१८, २१-२३) त्यावेळी आपल्याला कशाप्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे आपल्याला माहीत नाही पण निश्चितच दाविदाचे हे शब्द आपल्या बाबतीत खरे ठरतील: “नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करितो.”—स्तोत्र ३४:१७.
१३ तो दिवस येईल तेव्हा यहोवा कशाप्रकारे आपल्या महान नावाचा सर्व पृथ्वीवर गौरव करील हे पाहणे किती रोमांचकारी असेल! आपली अंतःकरणे यहोवाबद्दल आदराने व विस्मयाने भरून जातील आणि यहोवाचा विरोध करणाऱ्या सर्वांचा पाणउतारा करून त्यांचा नाश केला जाईल. “वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.” (स्तोत्र ३४:१६) या दुष्ट जगापासून अद्भुतरित्या मुक्तता होऊन देवाच्या नीतिमान नव्या जगात प्रवेश करण्याचा महान आशीर्वाद तेव्हा आपल्याला अनुभवण्यास मिळेल!
धीर धरण्यास साहाय्य करणाऱ्या प्रतिज्ञा
१४. आपल्यावर संकटे आली तरीसुद्धा आपल्याला कशामुळे धीर धरण्यास साहाय्य मिळेल?
१४ तोपर्यंत, या भ्रष्ट, दुष्ट जगात यहोवाच्या आज्ञांचे पालन करत राहण्याकरता धीराची गरज आहे. सतत आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करत असताना देवाचे भय आपले साहाय्य करू शकते. आपण कठीण समयांत राहात असल्यामुळे यहोवाच्या काही सेवकांना अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. यांमुळे ते अतिशय दुःखी व कष्टी होतात. पण ते खात्री बाळगू शकतात की जर ते यहोवावर विसंबून राहिले तर तो त्यांना धीर धरण्यास साहाय्य करील. दाविदाचे शब्द त्यांना खरोखर सांत्वनदायक आहेत: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) दाविदाचे पुढील शब्द देखील आपल्याला उत्तेजन देतात: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१९) आपल्यावर कितीही संकटे येवोत, यहोवा आपल्याला त्यांतून सोडवण्यास समर्थ आहे.
१५, १६. (क) स्तोत्र ३४ रचल्यानंतर लवकरच दाविदाला कोणत्या दुःखद घटनेविषयी कळले? (ख) परीक्षांना तोंड देण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?
१५ स्तोत्र ३४ रचल्यानंतर लवकरच दाविदाला नोब शहराच्या रहिवाशांवर आलेल्या संकटाविषयी ऐकण्यास मिळाले. त्याला खबर मिळाली की शौलाने त्या सर्वांचा आणि बहुतेक याजकांचा वध केला आहे. आपणच नोबला गेल्यामुळे शौलाने क्रोधाविष्ट होऊन या निष्पाप लोकांना जिवे मारले या जाणिवेने दावीद किती दुःखी झाला असेल! (१ शमुवेल २२:१३, १८-२१) नक्कीच याप्रसंगीही दावीदाने यहोवाकडे साहाय्याकरता प्रार्थना केली असेल आणि भविष्यात “नीतिमानांचे” पुनरुत्थान होईल या आशेमुळे त्याला सांत्वन मिळाले असेल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
मत्तय १०:२८) दाविदानेही अशाप्रकारचा भरवसा व्यक्त केला: “[नीतिमानाची] सर्व हाडें तो संभाळितो; त्यातले एकहि मोडत नाही.” (स्तोत्र ३४:२०) येशूच्या बाबतीत या वचनाची अक्षरशः पूर्णता झाली. येशूला क्रूरपणे जिवे मारण्यात आले तरीसुद्धा त्याचे एकही हाड ‘मोडले’ नाही. (योहान १९:३६) या वचनाची आणखीही एका अर्थाने पूर्णता होते. स्तोत्र ३४:२० हे वचन आपल्याला हे आश्वासन देते की अभिषिक्त ख्रिश्चनांना व “दुसरी मेंढरे” या गटातील त्यांच्या साथीदारांना कोणत्याही परीक्षांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा त्यांना कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होणार नाही. त्यांची हाडे लाक्षणिक अर्थाने कधीही मोडली जाणार नाहीत.—योहान १०:१६.
१६ आजही पुनरुत्थानाची आशा आपल्याला बळ देते. आपल्याला माहीत आहे की आपल्या शत्रूंनी काहीही केले तरी ते आपले कायमस्वरूपी नुकसान करू शकत नाहीत. (१७. यहोवाच्या लोकांचा द्वेष करणाऱ्या अपश्चत्तापी लोकांना कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल?
१७ पण दुष्ट लोकांची परिस्थिती वेगळी आहे. लवकरच त्यांना ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या त्यांचे फळ भोगावे लागेल. “दुष्टाचे मरण दुष्टाईंतच होणार; नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात.” (स्तोत्र ३४:२१) जे देवाच्या लोकांचा विरोध करत राहतील त्यांना सर्वात भयानक संकटाला तोंड द्यावे लागेल. येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी “युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.”—२ थेस्सलनीकाकर १:१०.
१८. ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ आजही कोणत्या अर्थाने उद्धार झाला आहे आणि भविष्यात त्यांना काय अनुभवण्यास मिळेल?
१८ दाविदाचे स्तोत्र या दिलासादायी शब्दांनी समाप्त होते: “परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करितो. त्याचा आश्रय धरणारा कोणीहि दोषपात्र ठरत नाही.” (स्तोत्र ३४:२२) आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीच्या शेवटास राजा दाविदाने म्हटले: “[देवाने] आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटातून सोडविला.” (१ राजे १:२९) लवकरच असा दिवस येईल की जेव्हा, दाविदाप्रमाणेच यहोवाचे भय बाळगणारे सर्वजण मागे वळून पाहतील व आनंदी होतील कारण त्यांना पापाच्या सर्व दोषापासून मुक्त करण्यात आलेले असेल आणि त्यांच्या सर्व परीक्षांपासून त्यांचा उद्धार करण्यात आलेला असेल. आजही, अभिषिक्त ख्रिस्तीजनांपैकी बहुतेकांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळाले आहे. सर्व राष्ट्रांतील एक “मोठा लोकसमुदाय” आज येशूच्या बंधूंतील शेषांसोबत मिळून देवाची सेवा करत आहे आणि परिणामस्वरूप यहोवाच्या दृष्टिकोनातून ते शुद्ध आहेत. कारण येशूने वाहिलेले रक्त पापापासून त्यांचा उद्धार करू शकते असा विश्वास त्यांनी प्रदर्शित केला आहे. ख्रिस्ताच्या येणाऱ्या हजार वर्षांच्या राज्यशासनादरम्यान खंडणी यज्ञार्पणाचे पुरेपूर फायदे त्यांना लाभतील आणि त्यांना मानवी परिपूर्णता दिली जाईल.—प्रकटीकरण ७:९, १४, १७; २१:३-५.
१९. ‘मोठ्या लोकसमुदायातील’ सदस्यांनी काय करण्याचा निर्धार केला आहे?
१९ देवाच्या उपासकांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ हे सर्व आशीर्वाद का लाभतील? कारण त्यांनी यहोवाचे भय बाळगण्याचा निर्धार केला आहे. आदरयुक्त विस्मयाच्या व अधीनतेच्या भावनेने त्याची सेवा करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. खरोखर, यहोवाच्या भयामुळे सध्याचे जीवन तर सुखदायी होतेच पण यामुळे आपल्याला “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास” देखील साहाय्य मिळते. हे खरे जीवन म्हणजे, देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवन.—१ तीमथ्य ६:१२, १८, १९; प्रकटीकरण १५:३, ४. (w०७ ३/१)
तुम्हाला आठवते का?
• आपण देवाचे भय का बाळगले पाहिजे आणि त्याचे भय बाळगण्याचा काय अर्थ होतो?
• देवाचे भय बाळगल्यामुळे आपल्या वर्तनावर कोणता परिणाम होतो?
• देवाचे भय बाळगल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?
• कोणत्या प्रतिज्ञा आपल्याला शेवटपर्यंत धीर धरण्यास मदत करतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
यहोवाचे भय बाळगणारे बंदीच्या काळात सावधगिरीने कार्य करतात
[३० पानांवरील चित्र]
आपल्या शेजाऱ्यांचे बरे करण्यारता आपण जे सर्वात चांगले कार्य करू शकतो ते म्हणजे त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे