पवित्र सभांविषयी आदर दाखवणे
पवित्र सभांविषयी आदर दाखवणे
“त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन.”—यशया ५६:७.
१. आपल्या सभांविषयी उचित आदर दाखवण्याची कोणती शास्त्रवचनीय कारणे आपल्याजवळ आहेत?
यहोवाने आपल्या लोकांना, अर्थात अभिषिक्त ख्रिस्ती व त्यांच्या सहकाऱ्यांना त्याच्या “पवित्र पर्वतावर” उपासना करण्याकरता एकत्रित केले आहे. तो त्यांना आपल्या “प्रार्थनामंदिरात,” म्हणजेच त्याच्या आत्मिक मंदिरात हर्षित करत आहे. हे “सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर” आहे. (यशया ५६:७; मार्क ११:१७) यावरून हे सूचित होते की यहोवाची उपासना पवित्र, शुद्ध आणि उदात्त आहे. आपल्या सभा, अभ्यास व उपासनेविषयी उचित आदर बाळगण्याद्वारे आपण हे दाखवून देतो की पवित्र गोष्टींसंबंधी आपला दृष्टिकोनही यहोवासारखाच आहे.
२. यहोवा आपल्या उपासनेकरता निवडलेल्या जागेस पवित्र समजतो हे कशावरून दिसून येते आणि येशूनेही असाच दृष्टिकोन असल्याचे कसे दाखवले?
२ प्राचीन इस्राएलात यहोवाने त्याच्या उपासनेकरता निवडलेले ठिकाण पवित्र मानावयाचे होते. दर्शनमंडप तसेच त्यातील सर्व सामान व उपकरणांना अभिषेक करावयाचा होता जेणेकरून “ती परमपवित्र ठरतील.” (निर्गम ३०:२६-२९) मंदिरातील दोन मंडपांना “पवित्रस्थान” आणि “परमपवित्रस्थान” म्हणण्यात आले. (इब्री लोकांस ९:२, ३) कालांतराने जेरूसलेम येथील मंदिराने दर्शनमंडपाची जागा घेतली. यहोवाच्या उपासनेचे केंद्र या नात्याने जेरूसलेमला “पवित्र नगर” म्हणण्यात आले. (नहेम्या ११:१; मत्तय २७:५३) येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान त्याने जेरूसलेम येथील मंदिराबद्दल उचित आदर दाखवला. जे लोक मंदिरात व्यापार करण्याद्वारे किंवा ये-जा करण्यासाठी सोयीचा रस्ता म्हणून मंदिराचा वापर करण्याद्वारे मंदिराचा अनादर करत होते, त्यांच्यावर तो क्रोधित झाला.—मार्क ११:१५, १६.
३. इस्राएलातील सभांचे पावित्र्य कशावरून सूचित होते?
३ इस्राएली लोक यहोवाची उपासना करण्याकरता आणि त्याच्या नियमशास्त्राचे पठन ऐकण्याकरता नियमित एकत्र येत असत. त्यांच्या सणांच्या विशिष्ट दिवसांना पवित्र मेळ्याचा दिवस म्हणत. (लेवीय २३:२, ३, ३६, ३७) एज्रा व नहेम्या यांच्या काळात एका सार्वजनिक सभेत लेवी हे “नियमशास्त्राचा अर्थ लोकांस समजावून सांगत होते.” “लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले” तेव्हा लेव्यांनी लोकांस असे म्हणून शांत केले की “‘शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे.’” यानंतर इस्राएलांनी सात दिवसांचा मांडवांचा सण साजरा केला आणि “चोहोकडे आनंदच आनंद झाला.” शिवाय, “पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत एज्रा, देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. या प्रकारे त्यांनी सात दिवसपर्यंत सण पाळिला, आणि आठव्या दिवशी विधिपूर्वक सणाचा समारोप केला.” (नहेम्या ८:७-११, १७, १८) या खरोखरच पवित्र सभा होत्या आणि यांना उपस्थित राहणाऱ्यांनी त्यांकडे आदरपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे होते.
आपल्या सभा देखील पवित्र आहेत
४, ५. आपल्या सभांविषयी कोणती अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यांवरून या पवित्र सभा असल्याचे सिद्ध होते?
४ आज यहोवाने पृथ्वीवरील कोणतेही विशिष्ट नगर पवित्र असल्याचे सांगितलेले नाही. त्याच्या उपासनेकरता समर्पित केलेले खास मंदिर आज पृथ्वीवर नाही. तरीपण आपण ही गोष्ट विसरू नये की यहोवाच्या उपासनेकरता भरवलेल्या सभा या पवित्र सभा आहेत. आठवड्यातून तीन वेळा आपण शास्त्रवचने वाचण्याकरता व त्यांचा अभ्यास करण्याकरता एकत्र येतो. या सभांमध्ये नहेम्याच्या काळाप्रमाणेच, यहोवाचे वचन ‘स्पष्टीकरणासहित वाचून दाखवले जाते.’ (नहेम्या ८:८) आपल्या सर्व सभांची सुरुवात व समारोप प्रार्थनेने होतो आणि बहुतेक सभांमध्ये आपण यहोवाच्या स्तुतीकरता गीते गातो. (स्तोत्र २६:१२) मंडळीच्या सभा खरोखरच आपल्या उपासनेचा अविभाज्य भाग असून आपण या सभांबद्दल प्रार्थनाशील मनोवृत्तीने पाहावे आणि त्यांकडे आदरपूर्वक लक्ष द्यावे.
५ यहोवाचे लोक त्याची उपासना करण्याकरता, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता आणि ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाचा आनंद लुटण्याकरता एकत्र येतात तेव्हा तो त्यांना आशीर्वादित करतो. कोणतीही सभा असते तेव्हा, आपण ही खात्री बाळगू शकतो की ‘तेथे परमेश्वर आशीर्वाद देण्याचे ठरवितो.’ (स्तोत्र १३३:१, ३) जर आपण त्या सभेला उपस्थित राहून तेथे चालणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमाकडे लक्ष दिले तर त्या आशीर्वादात आपल्यालाही सहभागी होता येईल. शिवाय, येशूने म्हटले: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” संदर्भानुसार हे विधान खरे तर दोन व्यक्तींमधील गंभीर स्वरूपाच्या समस्येचे निवारण करण्याकरता एकत्र येणाऱ्या ख्रिस्ती वडिलांकरता आहे पण हेच तत्त्व आपल्या सभांनाही लागू होते. (मत्तय १८:२०) ख्रिस्ताच्या नावाने त्याचे अनुयायी एकत्र येतात तेव्हा पवित्र आत्म्याच्या माध्यमाने तो तेथे उपस्थित असतो. त्याअर्थी या सभांना आपणही पवित्र समजू नये का?
६. आपल्या सभांकरता वापरल्या जाणाऱ्या लहान व मोठ्या सभागृहांबद्दल काय म्हणता येईल?
६ यहोवा हाताने बांधलेल्या मंदिरांत राहात नाही हे खरे आहे. तरीपण आपली राज्य सभागृहे खऱ्या उपासनेची ठिकाणे आहेत असे आपण म्हणू शकतो. (प्रेषितांची कृत्ये ७:४८; १७:२४) तेथे आपण यहोवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता, त्याला प्रार्थना करण्याकरता आणि त्याची स्तुती गाण्याकरता एकत्रित होतो. संमेलनगृहांबद्दलही हेच म्हणता येईल. तसेच अधिवेशनांकरता भाड्याने घेतलेली मोठी सभागृहे, नाट्यगृहे किंवा स्टेडियम्स यांसारखी ठिकाणे देखील आपल्या पवित्र सभांकरता वापरली जातात तेव्हा त्या काळापुरती ती उपासनेची ठिकाणे बनतात. या सर्व सभा मग त्या लहान असोत वा मोठ्या त्या सर्वांबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे आणि हा आदर आपल्या वृत्तीतून व वर्तणुकीतून दिसून आला पाहिजे.
सभांविषयी आदर कसा दाखवावा?
७. कोणत्या एका प्रत्यक्ष मार्गाने आपण आपल्या सभांविषयी आदर व्यक्त करू शकतो?
७ सभांविषयी आदर दाखवण्याचे काही प्रत्यक्ष मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे राज्य गीते गाण्याकरता उपस्थित असणे. यांपैकी बरीच गीते प्रार्थनांच्या रूपात शब्दांकित करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे ती पूर्ण आदरासहित गायिली पाहिजेत. स्तोत्र २२ यांतील शब्द उद्धृत करून प्रेषित पौलाने येशूच्या संदर्भात असे लिहिले: “मी आपल्या भावांजवळ तुझे नाव सांगेन, मंडळीमध्ये मी तुझी स्तुती गाईन.” (इब्री लोकांस २:१२, पं.र.भा.) त्याअर्थी, सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत करून गीत क्रमांक सांगण्याआधीच आपण आपल्या जागेवर असले पाहिजे आणि मग गीताच्या शब्दांकडे लक्ष एकाग्र करून सर्वांसोबत ते गायिले पाहिजे. आपण ज्या पद्धतीने गीते गातो त्यावरून स्तोत्रकर्त्याने पुढील शब्द ज्या भावनेने लिहिले ती भावना व्यक्त झाली पाहिजे: “सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.” (स्तोत्र १११:१) होय, सभांना लवकर येण्याचे व त्या संपेपर्यंत थांबण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण राज्य गीतांतून यहोवाची स्तुती गाऊ इच्छितो.
८. बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते की सभांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे आपण आदरपूर्वक लक्ष दिले पाहिजे?
८ आपल्या सर्व सभांचे आध्यात्मिक महत्त्व वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सर्व उपस्थितांकरता केली जाणारी मनःपूर्वक प्रार्थना. एकदा, जेरूसलेममधील ख्रिस्ती एकत्र आले असताना त्यांनी “एकचित्ताने देवाला उच्च स्वराने” मनःपूर्वक प्रार्थना केली. परिणामस्वरूप, ते छळाला तोंड देऊनही “देवाचे वचन धैर्याने बोलू” शकले. (प्रेषितांची कृत्ये ४:२४-३१) त्याप्रसंगी, उपस्थितांपैकी कोणीही प्रार्थना चालली असताना इतर गोष्टींचा विचार करण्याकरता आपले मन भरकटू दिले असेल अशी आपण कल्पना करू शकतो का? नाही, त्या सर्वांनी “एकचित्ताने” प्रार्थना केली. सभांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रार्थनांतून सर्व उपस्थितांच्या भावना व्यक्त होतात. त्याअर्थी आपण या प्रार्थनांकडे आदरपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
९. आपला पेहराव व वर्तन यांतून आपण पवित्र सभांविषयी आदर कसा व्यक्त करू शकतो?
९ याशिवाय आपण ज्या पद्धतीने पेहराव करतो त्यावरूनही आपण दाखवू शकतो की ख्रिस्ती सभांच्या पावित्र्याचा आपण आदर करतो. पेहराव म्हटले की त्यात आपले कपडे आणि केशभूषा या दोन्ही गोष्टी येतात. प्रेषित पौलाने असा सल्ला दिला: “प्रत्येक ठिकाणी पुरूषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान् वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.” (१ तीमथ्य २:८-१०) जेव्हा खुल्या स्टेडियम्समध्ये मोठी अधिवेशने होतात तेव्हा, आपला पेहराव हा ऋतूमानानुसार असूनही सभ्य व शालीन असू शकतो. तसेच सभांविषयी आदर व्यक्त करण्याकरता कार्यक्रम सुरू असताना आपण काहीही खाऊ नये किंवा च्युईंग गम चघळू नये. योग्य पेहराव व वर्तनामुळे आपण यहोवा देवाबद्दल, त्याच्या उपासनेबद्दल आणि आपल्या सहउपासकांबद्दल आदर व्यक्त करतो.
देवाच्या घराण्याला शोभणारे वर्तन
१०. ख्रिस्ती सभांमध्ये वर्तनाचा उच्च दर्जा असणे आवश्यक आहे हे प्रेषित पौलाने कसे दाखवले?
१० पहिले करिंथकर १४ व्या अध्यायात आपल्याला प्रेषित पौलाने ख्रिस्ती सभा कशा चालवाव्यात यासंबंधी दिलेला सुज्ञ सल्ला सापडतो. शेवटी त्याने असे म्हटले: “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथकर १४:४०) आपल्या सभा या ख्रिस्ती मंडळीच्या कार्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे या सभांमध्ये यहोवाच्या घराण्याला शोभणाऱ्या वर्तनाचा दर्जा टिकवून ठेवणे अगत्याचे आहे.
११, १२. (क) सभांना येणाऱ्या मुलांच्या मनावर कोणती गोष्ट ठसवली पाहिजे? (ख) मुले सभांमध्ये उचितरित्या आपला विश्वास कसा व्यक्त करू शकतात?
११ विशेषतः आपल्या मुलांना सभांमध्ये कसे वागले पाहिजे हे शिकवणे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती आईवडिलांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगितले पाहिजे की राज्य सभागृह आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचे ठिकाण खेळण्यासाठी नाही. ही ठिकाणे यहोवाची उपासना करण्यासाठी व त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आहेत. सुज्ञ राजा शलमोन याने लिहिले: “तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक; बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे.” (उपदेशक ५:१) मोशेने इस्राएल लोकांना एकत्र येण्यास सांगितले तेव्हा त्याने मोठ्या माणसांसोबतच ‘बालकांनाही’ आणावे असे सांगितले. त्याने म्हटले: “सर्व लोकांना . . . जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तीहि ऐकतील आणि . . . तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरावयाला ती शिकतील.”—अनुवाद ३१:१२, १३.
१२ त्याचप्रमाणे आज आपली लहान मुले देखील सभांना आपल्या आईवडिलांसोबत उपस्थित राहतात ती मुख्यतः ऐकण्यासाठी व शिकण्यासाठी. बायबलमधील मूलभूत सत्ये समजू लागल्यावर, मुले लहान लहान उत्तरे देऊन आपला विश्वास “मुखाने कबूल” करू शकतात. (रोमकर १०:१०) अगदी लहान मूल असल्यास, त्याला ज्याचा अर्थ समजू शकतो अशा एखाद्या प्रश्नाचे ते एखाद दोन शब्दांत उत्तर देऊ शकते. सुरुवातीला त्याला ते उत्तर वाचून दाखवावे लागू शकते पण कालांतराने तो आपल्या स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. हे मुलांच्या भल्याकरता आहे आणि त्यांना असे उत्तर देण्यास आनंदही वाटतो. शिवाय, अशी मनःपूर्वक दिलेली उत्तरे ऐकून सभेला उपस्थित असलेल्या इतरांनाही आनंद वाटतो. साहजिकच, आईवडील स्वतः ज्याप्रकारे उत्तर देतात ते मुलांकरता एक आदर्श ठरते. शक्यतो, मुलांना त्यांचे स्वतःचे बायबल, गीतपुस्तक आणि ज्या पुस्तकाचा अभ्यास चालला आहे त्याची एक प्रत दिली पाहिजे. या प्रकाशनांबद्दल उचित आदर दाखवण्यास त्यांना शिकवले पाहिजे. असे केल्यामुळे त्यांच्या मनावर ही गोष्ट ठसवली जाईल की सभा या पवित्र असतात.
१३. आपल्या सभांना पहिल्यांदा येणाऱ्यांच्या संदर्भात आपण कोणती आशा बाळगतो?
१३ अर्थात, आपल्या सभा ख्रिस्ती धर्मजगताच्या देवळांमधील उपदेशांसारख्या असू नयेत. सहसा या सभा अगदीच भावनाशून्य पद्धतीने अथवा पावित्र्याचा आव आणून घेतल्या जातात. तर कधीकधी त्यांत रॉक म्युझिकच्या कार्यक्रमात असतो तसा धांगडधिंगा असतो. राज्य सभागृहात असलेल्या आपल्या सभांमध्ये मैत्रिपूर्ण व आपुलकीचे वातावरण असावे अशी आपली इच्छा आहे. अर्थात वातावरण इतके खेळकरही असू नये की राज्य सभागृह एखाद्या क्लबसारखे वाटू लागेल. आपण येथे यहोवाची उपासना करण्याकरता एकत्र येतो, तेव्हा आपल्या सभा या नेहमीच आदरपूर्ण असाव्यात. आपली अशी इच्छा आहे की सभांमध्ये सादर केलेला कार्यक्रम ऐकून आणि आपले व आपल्या मुलांचे वर्तन पाहून पहिल्यांदा येणाऱ्या लोकांनी “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे” असे म्हणावे.—१ करिंथकर १४:२५.
आपल्या उपासनेचा स्थायी भाग
१४, १५. (क) आपण आपल्या देवाच्या घराकडे दुर्लक्ष करण्याचे कसे टाळू शकतो? (ख) यशया ६६:२३ याची पूर्णता कशाप्रकारे झाली आहे?
१४ याआधी उल्लेख केल्याप्रमाणे, यहोवा आपल्या “प्रार्थनामंदिरात” अर्थात आपल्या आध्यात्मिक मंदिरात लोकांना एकत्र आणून त्यांना हर्षित करत आहे. (यशया ५६:७) देवाचा विश्वासू सेवक नहेम्या याने त्याच्या यहुदी बांधवांना आठवण करून दिली की त्यांनी मंदिरासाठी आर्थिक साहाय्य देऊन त्याबद्दल योग्य आदर व्यक्त करावा. त्याने म्हटले: “आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये,” किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये. (नहेम्या १०:३९) शिवाय, यहोवाने त्याच्या “प्रार्थनामंदिरात” येऊन त्याची उपासना करण्याचे जे निमंत्रण आपल्याला दिले आहे त्याकडेही आपण दुर्लक्ष करू नये.
१५ नियमितरित्या उपासनेकरता एकत्र येण्याच्या गरजेविषयी सांगताना यशयाने अशी भविष्यवाणी केली: “असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसऱ्या चंद्रदर्शनापर्यंत; एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाति मजपुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.” (यशया ६६:२३) आज हेच घडत आहे. नियमितरित्या, प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात समर्पित ख्रिस्ती यहोवाची उपासना करण्याकरता एकत्र येतात. त्यांच्या उपासनेत इतर गोष्टींसोबतच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व सार्वजनिक सेवाकार्यात सहभागी होणे हे अंतर्भूत आहे. तुम्हीही ‘यहोवापुढे भजनपूजन करण्यास’ नियमितपणे येणाऱ्यांपैकी आहात का?
१६. सभांना नियमित उपस्थित राहणे हा आतापासूनच आपल्या जीवनाचा स्थायी भाग का असला पाहिजे?
१६ यशया ६६:२३ याची पूर्णता खऱ्या अर्थाने यहोवाने वचन दिलेल्या नव्या जगात होईल. तेव्हा, खरोखरच दर सप्ताहात व दर महिन्यात, किंबहुना सदासर्वकाळ, “सर्व मनुष्यजाति [यहोवापुढे] भजनपूजन करण्यास येईल.” यहोवाची उपासना करण्याकरता एकत्र येणे हा नव्या जगातही आपल्या आध्यात्मिक जीवनाचा स्थायी भाग असेल. जर असे आहे, तर मग पवित्र सभांना नियमित उपस्थित राहण्यास आपण आजच आपल्या जीवनाचा स्थायी भाग बनवू नये का?
१७. “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते” तसतसे सभांना उपस्थित राहणे अधिकच महत्त्वाचे का आहे?
१७ अंत जवळ येत असताना आपण यहोवाच्या उपासनेकरता असलेल्या ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहण्याचा अधिकच पक्का निर्धार केला पाहिजे. आपल्या सभांचे पावित्र्य लक्षात घेऊन, आपण कधीही आपली नोकरी, शाळेचा गृहपाठ किंवा संध्याकाळच्या शिकवणी यांसारख्या कारणांमुळे आपल्या सहउपासकांसोबत नियमित एकत्र येण्याकडे दुर्लक्ष करू नये. बांधवांच्या सहवासामुळे मिळणाऱ्या मनोबलाची आपल्याला आज नितांत गरज आहे. आपल्या मंडळीच्या सभा आपल्याला एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे ओळखण्याची, एकमेकांना प्रोत्साहन देण्याची तसेच “प्रीती व सत्कर्मे” यांकरता उत्तेजन देण्याची संधी देतात. “आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते” तसतसे आपण हे अधिकच केले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) तेव्हा सभांना नियमित उपस्थित राहण्याद्वारे, योग्य पेहराव करण्याद्वारे आणि आपल्या उचित वर्तनाद्वारे आपण नेहमी आपल्या पवित्र सभांबद्दल आदर दाखवू या. असे केल्याने आपण हे सिद्ध करू की पवित्र गोष्टींसंबंधी आपलाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे. (w०६ ११/०१)
उजळणी
• यहोवाच्या लोकांच्या सभांना पवित्र लेखले जावे हे कशावरून दिसून येते?
• आपल्या सभांच्या कोणत्या वैशिष्ट्यांवरून हे सिद्ध होते की त्या पवित्र आहेत?
• लहान मुले हे कसे दाखवू शकतात की ते आपल्या सभांच्या पावित्र्याचा आदर करतात?
• सभांना नियमित उपस्थित राहणे यास आपण आपल्या जीवनाचा स्थायी भाग का बनवावे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[३० पानांवरील चित्रे]
यहोवाची उपासना करण्याकरता असलेल्या सभा कोठेही असोत, त्या पवित्र आहेत