तुम्हाला खरे मित्रबनवायला आवडेल का?
तुम्हाला खरे मित्रबनवायला आवडेल का?
पुष्कळ लोकांना चांगले मित्र हवे असतात. आपल्या जवळच्या मित्रांना आपले अनुभव सांगता आल्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होते. पण तुम्हाला खरे मित्र कोठे सापडू शकतात? सर्व मानवी नातेसंबंधातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निःस्वार्थ प्रेम, असे येशूने जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी दाखवून दिले. त्याने असे शिकवले: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) याला सुवर्ण नियम म्हणतात. तुम्हाला जर खरे मित्र हवे असतील तर आधी तुम्ही स्वतः निःस्वार्थी, उदार असावयास हवे, असे या सुवर्ण नियमात म्हटले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला जर मित्र हवा असेल तर आधी तुम्ही एक मित्र असले पाहिजे. ते कसे?
घनिष्ठ, उबदार मैत्री अचानक प्रस्थापित होत नसते. कारण मित्र म्हणजे केवळ एकमेकांना ओळखत असलेल्या दोन व्यक्ती नव्हेत. त्या अशा व्यक्ती असतात ज्यांच्याशी तुमचे भावनिक नाते जुळते. निकटचे बंधन तयार करून ते तसेच टिकवून ठेवण्याकरता परिश्रम घ्यावे लागतात. मैत्रीत बहुधा तुम्हाला तुमच्या मित्राच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. मित्र केवळ आपल्या जीवनातील आनंदाच्या क्षणांतच सहभागी होत नाहीत, तर दुःखाच्या क्षणांतही ते आपल्या पाठीशी असतात.
गरजू व्यक्तीला भावनिक व व्यावहारिक साहाय्य देऊन तुम्ही खरी मैत्री दाखवता. नीतिसूत्रे १७:१७ म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” खरे तर, मैत्रीचे बंधन, कधीकधी रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असू शकते. नीतिसूत्रे १८:२४ म्हणते: “एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षांहि आपणास धरून राहतो.” अशाप्रकारची घनिष्ठ मैत्री कशी बनवायची याबद्दल तुम्हाला आणखी माहिती मिळवायला आवडेल का? तुम्हाला अशा लोकांमध्ये सामील होण्यास आवडेल का, की जे एकमेकांवर प्रेम करणारे म्हणून ओळखले जातात? (योहान १३:३५) तुम्हाला अशाप्रकारचे खरे मित्र मिळवण्यास मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. (w०६ ३/१)