देवासोबत चाला आणि उत्तम आशीर्वाद मिळवा
देवासोबत चाला आणि उत्तम आशीर्वाद मिळवा
“ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करितात.”—होशेय ८:७.
१. आपण कशाप्रकारे यहोवासोबत चालू शकतो?
एखाद्या भीतीदायक प्रदेशातून भ्रमंती करताना तुमच्यासोबत अनुभवी वाटाड्या असल्यास बरेच धोके टाळता येतात. एकट्यानेच जाण्यापेक्षा अशा वाटाड्यासोबतच जाणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. काही बाबतीत, आपणही अशाच स्थितीत आहोत. सध्याचे दुष्ट जग एखाद्या मोठ्या वाळवंटासारखे आहे. आणि या वाळवंटातून जाताना, यहोवा आपला वाटाड्या होण्यास तयार आहे. स्वतःहूनच वाट शोधण्यापेक्षा त्याच्यासोबतच चालणे आपल्याकरता शहाणपणाचे ठरेल. पण आपण देवासोबत कसे चालू शकतो? त्याने त्याच्या वचनात दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे आपण त्याच्यासोबत चालू शकतो.
२. या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२ याआधीच्या लेखात होशेय अध्याय १ ते ५ यातील लाक्षणिक नाटकाची चर्चा करण्यात आली. आपण पाहिल्याप्रमाणे या नाटकातून आपण अशा बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, ज्या आपल्याला देवासोबत चालण्यास मदत करू शकतात. आता आपण अध्याय ६ ते ९ यांतील काही मुख्य मुद्द्यांवर चर्चा करू या. पण आधी आपण या चार अध्यायांचा संक्षिप्त सारांश पाहूया.
सारांश
३. होशेय अध्याय ६ ते ९ यातील माहितीचा थोडक्यात सारांश सांगा.
३ यहोवाने होशेयला मुख्यतः इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यात भविष्यवाणी घोषित करण्यासाठी पाठवले होते. या राष्ट्रातील प्रमुख गोत्र एफ्राईम असल्यामुळे, राष्ट्राला एफ्राईम या नावानेही ओळखले जात. पण या राष्ट्राने देवाला त्यागले होते. होशेय ६ ते ९ अध्यायांनुसार लोकांनी यहोवाच्या कराराचे उल्लंघन करून व दुष्ट कार्ये करून देवासोबत विश्वासघात केला होता. (होशेय ६:७) यहोवाकडे परत जाण्याऐवजी त्यांनी इतर राष्ट्रांवर भरवसा ठेवला. सतत वाईट गोष्टींची पेरणी केल्यामुळे त्यांना वाईटच फळ मिळणार होते. दुसऱ्या शब्दांत त्यांच्यावर देवाचा न्यायदंड येणार होता. पण होशेयच्या भविष्यवाणीत एक दिलासा देणारा संदेश देखील आहे. लोकांना असे आश्वासन देण्यात आले होते की त्यांना अजूनही यहोवाकडे परत येण्याची संधी होती आणि त्यांनी मनःपूर्वक पश्चात्ताप केल्याचे आपल्या कार्यांवरून दाखवल्यास त्यांना दया दाखवण्यात येईल.
४. होशेयच्या भविष्यवाणीतील कोणत्या व्यवहारोपयोगी मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत?
४ होशेयच्या भविष्यवाणीतल्या या चार अध्यायांतून आपल्याला देवासोबत चालत राहण्यास साहाय्यक ठरेल असे आणखी मार्गदर्शन मिळते. चार व्यवहारोपयोगी मुद्द्यांवर आपण विचार करूया: (१) खरा पश्चात्ताप केवळ शब्दांतून नव्हे तर कृतींतून व्यक्त होतो; (२) केवळ बलिदानांनी देव संतुष्ट होत नाही; (३) यहोवाचे उपासक त्याच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा त्याला दुःख होते; आणि (४) चांगले फळ मिळवण्याकरता आपण चांगल्या गोष्टींची पेरणी केली पाहिजे.
खरा पश्चात्ताप कसा व्यक्त होतो?
५. होशेय ६:१-३ या वचनांचे सार काय आहे?
५ पश्चात्ताप व दया, किंवा क्षमाशीलता याविषयी होशेयच्या भविष्यवाणीतून आपल्याला बरेच काही शिकण्यास मिळते. होशेय ६:१-३ यात आपण असे वाचतो: “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हास फाडिले आहे, व तोच आम्हास बरे करील; त्याने आम्हास जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमि शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल.”
६-८. इस्राएलांनी दाखवलेला पश्चात्ताप फोल का ठरला?
६ या वचनांतील उद्गार कोणाचे आहेत? काहींच्या मते ही विधाने अविश्वासू इस्राएल लोकांची आहेत. त्यांचे म्हणणे आहे की देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणारे हे लोक, पश्चात्ताप करण्याचे ढोंग करून देवाच्या क्षमाशीलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण इतरजण म्हणतात की हे शब्द संदेष्टा होशेय याचे आहेत. तो लोकांना यहोवाकडे परतण्याची विनवणी करत होता. ही विधाने कोणाचीही असोत, मुख्य प्रश्न हा आहे की इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यातील लोक यहोवाकडे परतले का व त्यांनी खरा पश्चात्ताप दाखवला का? नाही, त्यांनी असे केले नाही. होशेयच्या द्वारे यहोवा म्हणतो: “हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण [“प्रेमदया,” NW] सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्या दहिवराप्रमाणे आहे.” (होशेय ६:४) देवाच्या लोकांच्या दयनीय आध्यात्मिक स्थितीचे किती अचूक वर्णन! प्रेमदया अर्थात एकनिष्ठ प्रीती—सूर्य निघताच विरून जाणाऱ्या पहाटेच्या दहिवराप्रमाणे जवळजवळ नाहीशीच झाली होती. लोकांनी पश्चात्ताप करण्याचा आव आणला तरीही यहोवाला या लोकांना क्षमा करण्याचे कोणते कारण सापडले नाही. मुळात समस्या काय होती?
७ इस्राएलांचा पश्चात्ताप मनापासून नव्हता. यहोवाला आपल्या लोकांबद्दल वाटणारा असंतोष होशेय ७:१४ यात अशाप्रकारे व्यक्त करण्यात आला आहे: “त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यावर पडून . . . ओरडतात.” पुढे, १६ वे वचन म्हणते: “ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे”—म्हणजे, “उदात्त उपासनेकडे नव्हे.” (तळटीप, NW) हे लोक यहोवासोबत तुटलेला नातेसंबंध पुन्हा जोडण्याकरता आपल्या जीवनात आवश्यक बदल करून त्याच्या उदात्त उपासनेकडे वळण्यास तयार नव्हते. मुळात, त्यांना देवासोबत चालण्याची इच्छाच नव्हती.
८ इस्राएलचा पश्चात्ताप आणखी एका कारणामुळे फोल ठरला. या लोकांनी पाप करण्याचे सोडलेले नव्हते. किंबहुना बेईमानी, मनुष्यघात, चोरी, मूर्तिपूजा, आणि देवाच्या आज्ञेविरुद्ध इतर राष्ट्रांसोबत संधान बांधणे यांसारखी निरनिराळ्या प्रकारची पापी कृत्ये करण्याचे त्यांनी पूर्वीसारखेच चालू ठेवले. होशेय ७:४ यात या लोकांची तुलना, ‘भटाऱ्याने तापवलेल्या भट्टीशी’ केलेली आहे. त्यांच्या मनात जळणाऱ्या दुष्ट वासनांमुळे त्यांची अशी तुलना करण्यात आली. अशा दोषास्पद आध्यात्मिक स्थितीत असलेले हे लोक दया दाखवण्याच्या लायक होते का? निश्चितच नाही. होशेय या विद्रोही लोकांना सांगतो की यहोवा ‘त्यांचा अधर्म स्मरेल; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देईल.’ (होशेय ९:९) त्यांना दया दाखवली जाणार नाही!
९. होशेयच्या शब्दांवरून पश्चात्ताप व क्षमाशीलता यांविषयी आपण काय शिकतो?
९ होशेयचे शब्द वाचताना पश्चात्ताप व क्षमाशीलता यांविषयी आपण काय शिकतो? या विश्वासहीन इस्राएलांच्या इशारेवजा उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळते, की यहोवाकडून क्षमा मिळवण्याकरता आपण मनापासून पश्चात्ताप व्यक्त केला पाहिजे. हा पश्चात्ताप कशावरून दिसून येतो? कोणीही अश्रू गाळून किंवा निव्वळ शब्दांनी यहोवाची फसवणूक करू शकत नाही. मनापासून केलेला पश्चात्ताप त्या व्यक्तीच्या कृतींवरून स्पष्ट दिसून येतो. तेव्हा, देवाकडून क्षमा मिळवण्याकरता ज्याच्या हातून पाप घडले आहे त्याने आपले पापी वर्तन पूर्णपणे सोडून दिले पाहिजे आणि यहोवाच्या उदात्त उपासनेच्या उच्च आदर्शांनुसार आपले जीवन बदलले पाहिजे.
केवळ बलिदानांनी यहोवा संतुष्ट होत नाही
१०, ११. इस्राएलच्या उदाहरणावरून दिसून आल्याप्रमाणे, केवळ बलिदाने यहोवाला का संतुष्ट करू शकत नाहीत?
१० यहोवासोबत चालण्याकरता साहाय्यक ठरेल अशा एका दुसऱ्या मुद्द्यावर आता आपण चर्चा करू या. तो मुद्दा म्हणजे, देव केवळ बलिदानांनी संतुष्ट होत नाही. होशेय ६:६ म्हणते: “मी [यहोवा] यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.” तर यहोवा, दयेने, म्हणजेच एकनिष्ठ प्रीती या हृदयातून उत्पन्न होणाऱ्या गुणाने, तसेच त्याच्याविषयीच्या ज्ञानाने संतुष्ट होतो. पण तुम्ही म्हणाल: ‘यहोवा “यज्ञाचा” व ‘होमार्पणांचा’ भुकेला नाही असे या वचनात का म्हटले आहे? मोशेच्या नियमशास्त्रानुसार ही बलिदाने अर्पण करणे आवश्यक नव्हते का?’
११ नियमशास्त्रानुसार बलिदाने व अर्पणे आवश्यक होती खरी, पण होशेयच्या काळातल्या लोकांचा एक गंभीर दोष होता. काही इस्राएली लोक देवाधर्माचा आव आणण्याकरता अतिशय काटेकोरपणे बलिदाने अर्पण करत होते. पण त्याचवेळेस ते पापीकृत्येही करत होते. त्यांच्या अशा पापी वर्तनावरून, त्यांच्या हृदयात एकनिष्ठ प्रीती नव्हती हे दिसून आले. तसेच त्यांनी देवाच्या ज्ञानाचा अव्हेर केला आहे हेही दिसून आले कारण त्यांचे जीवन या ज्ञानाशी सुसंगत नव्हते. जर या लोकांची मनोवृत्तीच योग्य नव्हती आणि जर ते योग्य मार्गाने चालत नव्हते तर मग त्यांची बलिदाने काय कामाची होती? यहोवा देवाला त्यांची बलिदाने नकोशी झाली होती.
१२. होशेय ६:६ यात आजच्या काळातल्या लोकांकरता कोणता इशारा आहे?
१२ होशेयच्या शब्दांत, चर्चला जाणाऱ्या अनेक लोकांकरता एक इशारा आहे. हे लोक आपल्या धार्मिक रितीरिवाजांकरवी देवाला जणू बलिदाने अर्पण करतात. पण त्यांच्या उपासनेचा त्यांच्या दैनंदिन चालचलणुकीवर काडीमात्रही प्रभाव पडत नाही. जर या लोकांचे हृदय त्यांना देवाविषयीचे अचूक ज्ञान घेण्यास आणि या ज्ञानानुसार आपल्या पापी कृत्यांपासून मागे फिरण्यास प्रवृत्त करत नसेल तर मग ते देवाला संतुष्ट करत आहेत असे खरेच म्हणता येईल का? केवळ धार्मिक कार्यांनी आपण देवाला संतुष्ट करू शकतो असे कोणीही समजू नये. देवाच्या वचनानुसार वागण्याऐवजी केवळ औपचारिक उपासनेने त्याची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल यहोवाला जराही संतोष वाटत नाही.—२ तीमथ्य ३:५.
१३. आपण आज कोणत्या प्रकारची बलिदाने अर्पण करतो पण या बलिदानांविषयी आपण काय आठवणीत ठेवावे?
१३ खरे ख्रिस्ती या नात्याने, देव केवळ बलिदानांनी संतुष्ट होत नाही हे आपण आठवणीत ठेवतो. अर्थात आज आपण यहोवाला प्राण्यांची बलिदाने अर्पण करत नाही. तरीपण आपण “त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ” त्याला अर्पण करतोच. (इब्री लोकांस १३:१५) तेव्हा आपण होशेयच्या काळातल्या पापी इस्राएली लोकांसारखे न होण्याची काळजी घेतली पाहिजे. देवाला आध्यात्मिक बलिदाने अर्पण करून आपण आपल्या वाईट कृत्यांवर पांघरूण घालू शकतो असा आपण विचार कधीही करू नये. लैंगिक अनैतिकतेत अडकलेल्या एका तरुणीचे उदाहरण पाहा. तिने नंतर असे कबूल केले: “मी क्षेत्र सेवेत जास्त वेळ खर्च करू लागले. असे केल्याने आपले वाईट कृत्य आपण लपवू शकतो असे मी समजत होते.” देवाच्या मार्गातून भरकटलेल्या इस्राएल लोकांनी जे करण्याचा प्रयत्न केला त्यासारखेच हे होते. पण आपल्या अंतःकरणातील हेतू चांगले असतील आणि आपले वर्तन शुद्ध असेल तरच यहोवा आपले स्तुतीयज्ञ स्वीकारेल.
यहोवाचे उपासक त्याच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा त्याला दुःख होते
१४. होशेयची भविष्यवाणी देवाच्या भावनांबद्दल काय प्रकट करते?
१४ होशेय अध्याय ६ ते ९ यातून जो तिसरा मुद्दा आपल्याला शिकायला मिळतो तो यहोवाचे उपासक त्याला सोडून देतात तेव्हा त्याला कसे वाटते, यासंबंधी आहे. देवाला कोमल तशाच कठोर भावनाही आहेत. जे आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतात त्यांच्याप्रती त्याला आनंदाच्या व सहानुभूतीच्या कोमल भावना आहेत. पण त्याचे लोक अपश्चात्तापी वृत्तीने वागतात तेव्हा मात्र तो कठोर होऊन निर्णायक पाऊल उचलतो. देवाला आपली मनःपूर्वक काळजी असल्यामुळे, आपण विश्वासूपणे त्याच्यासोबत चालतो तेव्हा त्याला आनंद वाटतो. स्तोत्र १४९:४ म्हणते, “परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.” पण देवाचे सेवक अविश्वासू होतात तेव्हा त्याला कसे वाटते?
१५. होशेय ६:७ या वचनानुसार काही इस्राएली पुरुष कशाप्रकारे वागत होते?
१५ अविश्वासू इस्राएल लोकांच्या संदर्भात यहोवा म्हणतो: “त्यांनी मनुष्याप्रमाणे करार मोडिला आहे; तेथे ते मजबरोबर बेइमानपणे वर्तले आहेत.” (होशेय ६:७) ‘बेइमानपणे वर्तणे’ असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “फसवणूक करणे, अविश्वासूपणे वागणे” असाही होतो. मलाखी २:१०-१६ यात आपल्या पत्नींचा विश्वासघात करणाऱ्या इस्राएली पुरुषांच्या अविश्वासू वागणुकीचे वर्णन करण्याकरताही हाच इब्री शब्द वापरण्यात आला आहे. होशेय ६:७ यात वापरलेल्या या शब्दाविषयी एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की “नातेसंबंधातील आत्मीयता व्यक्त करण्याकरता येथे वैवाहिक बंधनाशी संबंधित रूपक वापरले आहे . . . हा एक खासगी वाद आहे ज्यात प्रेमळ नातेसंबंध तोडण्यात आला आहे.”
१६, १७. (क) देवाने इस्राएलसोबत केलेल्या करारासंबंधी या राष्ट्राने काय केले? (ख) आपल्या कृतींबद्दल आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?
१६ यहोवाचा इस्राएल राष्ट्रासोबत एक करार होता. त्यामुळे लाक्षणिक अर्थाने यहोवा या राष्ट्राला आपल्या पत्नीसमान लेखत होता. देवाच्या लोकांनी या कराराच्या अटींचे उल्लंघन केले तेव्हा ते जारकर्म करण्यासारखे होते. देव एका विश्वासू पतीसारखा होता, पण त्याच्या लोकांनी त्याचा विश्वासघात केला होता!
१७ आपल्याबद्दल काय? देवाला आपली काळजी आहे आणि आपण त्याच्यासोबत चालावे असे त्याला वाटते. “देव प्रीति आहे,” आणि आपल्या कृतींचा त्याच्यावर परिणाम १ योहान ४:१६) आपण चुकीचा मार्ग पत्करल्यास आपण यहोवाला दुःखी करू शकतो आणि निश्चितच त्याला हे आवडणार नाही. हे आठवणीत ठेवल्याने आपल्यासमोर येणाऱ्या मोहांपासून आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे स्वतःला आवरता येईल.
होतो हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. (आपण चांगले फळ कसे मिळवू शकतो?
१८, १९. होशेय ८:७ यात आपल्याला कोणते तत्त्व आढळते आणि इस्राएलांच्या बाबतीत हे तत्त्व कशाप्रकारे खरे ठरले?
१८ होशेयच्या भविष्यवाणीतील शिकण्यासारखा चौथा मुद्दा आता आपण लक्षात घेऊ या: आपल्याला चांगले फळ कसे मिळू शकते? इस्राएल लोक आणि त्यांच्या अविश्वासू वर्तनातील अविचारीपणा व व्यर्थता यासंबंधी होशेयने असे लिहिले: “ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करितात.” (होशेय ८:७) येथे आपल्याला एक आठवणीत ठेवण्याजोगे तत्त्व आढळते: आपण आज जे काही करतो त्याचा आपल्या भविष्यात काय घडेल याच्याशी थेट संबंध आहे. हे तत्त्व अविश्वासू इस्राएल लोकांच्या बाबतीत कसे खरे ठरले?
१९ इस्राएल लोकांनी आपल्या पापी वर्तनाने जणू वाईट गोष्टींची पेरणी केली. याचे वाईट फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार होते का? देवाच्या प्रतिकूल न्यायदंडातून त्यांना सुटका नव्हती. होशेय ८:१३ म्हणते: “तो [यहोवा] त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील.” आणि होशेय ९:१७ यात आपण असे वाचतो: “माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.” यहोवा इस्राएल लोकांना त्यांच्या पापांकरता जबाबदार ठरवणार होता. वाईट गोष्टींची पेरणी केल्यामुळे त्यांना फळही वाईटच मिळणार होते. सा.यु.पू. ७४० साली अश्शूरी लोकांनी इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्यावर विजय मिळवला व त्यातील रहिवाशांना बंदिवान करून नेले तेव्हा या लोकांविरुद्ध देवाचा प्रतिकूल न्यायदंड बजावण्यात आला.
२०. इस्राएल लोकांच्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायला मिळते?
२० त्याकाळच्या इस्राएल लोकांच्या अनुभवावरून आपल्याला एक त्रिकालाबाधित सत्य शिकायला मिळते: आपण जे पेरतो तेच उगवेल. देवाचे वचन आपल्याला बजावते: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) जर आपण वाईट गोष्टींची पेरणी केली तर आपल्याला वाईटच फळ मिळेल. उदाहरणार्थ, जे अनैतिक कृत्ये करतात त्यांना अतिशय कष्टदायक परिणाम भोगावे लागतील. आपल्या पातकांबद्दल पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
२१. आपण चांगले फळ कसे मिळवू शकतो?
२१ तर मग, आपण चांगल्या गोष्टींची पेरणी कशी करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आपण एक साध्याशा उदाहरणाने देऊ शकतो. जर एखाद्या शेतकऱ्याला गव्हाचे पीक काढायचे असेल तर तो ज्वारी पेरेल का? अर्थातच, तो असे करणार नाही. त्याला जे पीक हवे, त्याचीच त्याला पेरणी करावी लागेल. त्याचप्रकारे जर आपल्याला चांगले फळ मिळवायचे असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टींची पेरणी करावी लागेल. तुम्हाला सर्वकाळ चांगलेच फळ मिळवायची इच्छा आहे का—अर्थात सध्याच्या काळात एक समाधानदायक जीवन आणि देवाच्या नव्या जगात सार्वकालिक जीवन मिळवण्याची तुम्हाला इच्छा आहे का? तर मग तुम्ही सदोदीत देवासोबत चालण्याद्वारे व त्याच्या नीतिमान दर्जांनुसार आचरण करण्याद्वारे चांगल्या गोष्टींची पेरणी केली पाहिजे.
२२. होशेय अध्याय ६ ते ९ यातून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
२२ होशेय ६ ते ९ अध्यायांतून आपल्याला चार गोष्टी शिकायला मिळाल्या: (१) खरा पश्चात्ताप कृतींतून व्यक्त होतो; (२) केवळ बलिदानांनी देव संतुष्ट होत नाही; (३) यहोवाचे उपासक त्याच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा त्याला दुःख होते; आणि (४) चांगले फळ मिळवण्याकरता आपण चांगल्या गोष्टींची पेरणी केली पाहिजे. बायबलच्या या पुस्तकातील शेवटले पाच अध्याय आपल्याला देवासोबत चालण्यास कसे साहाय्य करू शकतात? (w०५ ११/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• खरा पश्चात्ताप कशावरून दिसून येतो?
• केवळ बलिदानांनी आपला स्वर्गीय पिता का संतुष्ट होत नाही?
• देवाचे उपासक त्याला सोडून देतात तेव्हा त्याला कसे वाटते?
• चांगले फळ मिळवण्याकरता आपण कशाची पेरणी केली पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
पहाटेच्या अभ्राप्रमाणे इस्राएलची एकनिष्ठ प्रीती विरून गेली
[९ पानांवरील चित्र]
इस्राएल लोकांच्या पापी वासनांची तुलना जळत्या भट्टीशी करण्यात आली
[१० पानांवरील चित्र]
यहोवाने आपल्या लोकांची अर्पणे का स्वीकारली नाहीत?
[११ पानांवरील चित्र]
चांगले फळ मिळवण्याकरता आपण चांगले तेच पेरले पाहिजे