“मला मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा दिसला”
“मला मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा दिसला”
“तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) येशूने म्हटल्यानुसार, प्रीती हे प्रारंभीच्या ख्रिस्ती बंधुत्वाचे वैशिष्ट्य बनले. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर शंभरहून अधिक वर्षांनी लिखाण केलेल्या टर्टुलियनने काही लोकांचे हे मत नोंदले: ‘पाहा ते कसे एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार आहेत.’
अशी प्रीती आजही आपल्याला जगात दिसू शकते का? होय. ब्राझीलमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला मिळालेल्या या पत्राचे उदाहरण घ्या. पत्र लिहिणारी, मारीलिया नावाची एक स्त्री होती; तिने लिहिले:
“बीया मेसेथेस, अर्जेंटिना येथे राहत असताना, माझ्या आईला (एक यहोवाची साक्षीदार) ओस्टियोआर्थ्रायटिस झाला ज्याने तिचा कमरेपासूनचा खालचा भाग लुळा पडला. ती आजारी पडल्यानंतर पहिले आठ महिने बीया मेसेथेस येथील साक्षीदारांनी तिची प्रेमाने काळजी घेतली. त्यांनी तिच्यासाठी सर्वकाही म्हणजे, घर साफ करणे, स्वयंपाक करणे वगैरे सर्व कामे केली. दवाखान्यात देखील आईसोबत रात्रंदिवस सतत कोणी न कोणी असत.
“त्यानंतर आई व मी ब्राझीलला परतलो आणि ती अजूनही आजारीच आहे. आम्ही राहतो तेथील साक्षीदार आई बरी व्हावी म्हणून जमेल ते करत आहेत.”
मारीलिया शेवटी आपल्या पत्रात म्हणते: “मी स्वतः एक साक्षीदार नाही, पण मला कबूल करावे लागेल, की साक्षीदारांमध्ये मला मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा दिसला.”
होय, आजही असे लोक आहेत जे ख्रिस्ती प्रेम दर्शवतात. त्यांच्या आचरणातून, येशूच्या शिकवणी आपल्या जीवनात किती शक्तिशाली ठरू शकतात हे ते दर्शवतात.